You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'स्मृती-पलाश'च्या खासगी आयुष्याचं 'मनोरंजन' कुणी आणि का केलं? त्यामागची कारणं काय?
क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचे नातेसंबंध आणि लग्नाबद्दलची उलट-सुलट चर्चा एव्हाना सर्वांना परिचित झाली असेल.
लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक येणं, त्यांचं लग्न रद्द होणं आणि मग एकाएकी त्या दोघांच्या नात्यासंदर्भात उलट-सुलट गोष्टींची राळ उठणं आणि माध्यमांमध्ये या कथित चर्चेला ऊत येणं, असं तिचं स्वरूप आहे.
ते पाहता, जिथं लोकांच्या खासगी आयुष्याच्या एखाद्या चेहरा नसलेल्या, अक्राळविक्राळ अशा बिनचेहऱ्याच्या महाकाय माध्यमी राक्षसाकडून अक्षरश: चिंध्या-चिंध्या केल्या जातायत, अशी कल्पितदुर्दशा दाखवणाऱ्या नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित अशा 'ब्लॅक मिरर' वेबसिरीजची मला आठवण आली.
दुर्दैवाने, असाच एखादा एपिसोड मी उघड्या डोळ्यांनी वास्तवात पाहतोय-जगतोय की काय, असं मला वाटलं.
कदाचित माझं असं वाटणंही अतिशयोक्तही असेल, पण ज्या प्रकारे ही चर्चा सुरू आहे, ती कुठल्याही सुज्ञ माणसाला योग्य आणि नैतिकतेला धरून वाटणार नाही, हे तर निश्चितच!
काही लोक यावर व्यक्तही झाले आणि होत आहेत.
पण मग नक्की हे काय सुरू आहे आणि असं का सुरू आहे? 'स्मृती-पलाश'च्या खासगी आयुष्याचं 'मनोरंजन' का करण्यात आलं? ते कुणी केलं? त्यामागची कारणं काय? याचा अभ्यासकांच्या माध्यमातून घेतलेला हा धांडोळा...
'कुणाच्या तरी वैयक्तिक आयुष्याच्या चिंध्या करणारं मनोरंजन'
स्मृती आणि पलाश यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडलंय, हे खरं तर कुणालाच ठाऊक नाही.
त्यांच्या खासगी गोष्टींबद्दल सगळ्यांना सगळंच माहिती असावं, याची गरजही नाही.
मग, तरीही त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलच्या सार्वजनिकरित्या होणाऱ्या नको तितक्या उलटसुलट आणि सगळ्याच 'कथित स्वरूपाच्या' चर्चांमधून त्यांच्या आयुष्यातील 'खासगी'पणाचा होणारा चिंधडा-चोथा कुणाही सुज्ञ व्यक्तीला अस्वस्थ करणाराच वाटेल.
यासंदर्भात आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांच्याशी चर्चा केली.
त्या सांगतात की, "खासगी आयुष्याची अशी लक्तरं वेशीवर टागणं हे फार भयंकरच वाटतं. कोण जात्यात असेल आणि कोण सुपात असेल, अशीच ही परिस्थिती आहे. कारण, इतक्या पटकन कुणीही कुठल्याही कारणासाठी 'उचललं' जाऊ शकतं. असे प्रसंग जिथं चर्चेला अथवा गॉसिपिंगला वाव आहे, तिथं तर नक्कीच 'उचलले' जाताना दिसतात. मला वाटतं की, सोशल मीडियाच्या बिझनेस मॉडेलचाच भाग आहे."
"सोशल मीडियाच्या येण्यामुळे या सगळ्याचा व्हॉल्यूम प्रचंड वाढलेला आहे, ही सगळ्यात प्रॉब्लेमेटीक गोष्ट आहे," असं मत डिजिटल लिटरसी एज्यूकेटर असलेल्या मुक्ता चैतन्य मांडतात.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या की, "लोकांना गॉसिप कायमच आवडतं. जोवर ते स्वत:पर्यंत येत नसतं, तोवर लोक ते आवडीनं करतात आणि तो मानवी स्वभाव आहे. पण, माध्यमं उपलब्ध झाल्याने हे गॉसिप पसरण्याला काही मर्यादाच उरलेली नाहीये. दुसरं, माध्यमशिक्षित समाज नसल्याने काय फॉरवर्ड करावं, करू नये, कशाबद्दल बोलावं-बोलू नये. आपण जेव्हा काही बोलतो, शेअर करतो, तेव्हा त्यातून कुणाच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवतो का, हीच गोष्ट आपल्याबद्दल कुणी केली तर आपल्याला आवडेल का, ही गोष्ट लोक विचारातच घेत नाहीत."
"कुणाच्या तरी वैयक्तिक आयुष्याच्या चिंध्या करणारं हे मनोरंजन आहे, हे विवेकभानच पुसट होत गेलेलं आहे," असं त्या सांगतात.
यामागच्या मानसिक कारणांचा शोध घेण्याच्या दृष्टीने आम्ही क्लिनीकल सायककॉलॉजिस्ट गौरी जानवेकर यांच्याशी चर्चा केली.
त्याही असंच सांगतात की, "एक तर, गॉसिपिंग ही माणसाची प्राथमिक गरज आहे. पण हे गॉसिपिंग ज्यावेळेला उघडपणे होताना दिसतं, त्यावेळेला त्याची किंमत आपल्याला भरावी लागत नाहीये, ही जाणीव त्यामागे असते. आता सोशल मीडियावर काहीही टाकलं तरी त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार नाहीये. 'तुम्ही असं कसं बोलू शकता', असं म्हणून तुम्हाला कुणी जबाबदार धरत नाही, तशी यंत्रणाही नाही. त्याचे परिणाम भोगावे लागत नाहीत, म्हणूनच माणसं उघडपणे इतकं दुसऱ्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये घुसताना दिसतात," असं त्या सांगतात.
हे सारं येतं कुठून?
'गॉसिपिंग' या मानवी मूलभूत सहज प्रवृत्तीला सोशल मीडियाने बिनचेहऱ्याची स्पेस उपलब्ध करून दिली, हे 'स्मृती-पलाश' यांच्याही झालेल्या आधी अनेक प्रकरणांवरून सहज लक्षात येतं.
महिला खेळाडूंचीच मोजकी उदाहरणं घ्यायची झाली तर सानिया मिर्झाचं तसेच सायना नेहवालचंही वैयक्तिक आयुष्य असंच लोकांच्या उलट-सुलट गॉसिपिंगचा भाग ठरलं.
पण लोकांना अशा चर्चा करण्याची, पुरेशी माहिती नसताना निर्णायक मतं बनवण्याची, इतरांचं खासगी आयुष्य चघळण्याची अशी चटक का लागलेली आहे?
यामागची नेमकी कारणं काय आहेत?
याविषयीचं विश्लेषण करताना गौरी जानवेकर सांगतात की, नैतिक श्रेष्ठत्वाचा बडेजाव, मनातली भीती आणि सूप्त असूया यांचं प्रक्षेपण यातून दिसून येतं.
त्या सांगतात की, "काही वर्षांपूर्वी क्लास वन ऑफिसर असलेल्या जोडप्याच्या मुलानं आत्महत्या केली होती. त्याबद्दलही असंच झालं होतं की, खूप लोकांनी त्यांना पालकत्वाचे सल्ले दिले होते. दुसऱ्यांना गॉसिप करून असे सल्ले दिले तर नैतिकदृष्ट्या मी किती श्रेष्ठ आहे, असं काहीतरी माणसांच्या मेंदूंमध्ये तयार व्हायला लागतं. मी नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असल्याने मला बोलण्याचा अधिकार आहे, अशा धारणेतून ते बोलत असतात."
पुढे त्या सांगतात की, "काही लोकांच्या मनात असलेल्या भीतीचा निचरादेखील असे लोक या माध्यमातून करत असतात. जसं की, स्वत:च्या आयुष्यातील रिजेक्शनची भीती, डावललं जाण्याची भीती असते. असं काहीतरी बोलून आपल्याच मनातल्या भीतीचा निचरा करण्याचा हा त्यांच्यासाठीचा मार्ग असतो.
तिसरं कारण, प्रसिद्ध लोकांबद्दल मनामध्ये प्रेरणाही असते आणि आपण तिथंपर्यंत पोहोचू शकत नाही, याची असूयाही असते. ती असूया अशा स्वरूपामध्ये बाहेर येते, की बघा तुमचंही आयुष्य किती वाईट आहे," असं त्या सांगतात.
माणसांच्या अशा वागण्याचं मनोवैज्ञानिक विश्लेषण करण्यासोबतच माध्यमे आणि तंत्रज्ञानाची यातली भूमिकादेखील तितकीच निर्णायक ठरताना दिसते.
हाच मुद्दा मुक्ता दाभोलकर मांडताना दिसतात.
त्या सांगतात की, "माणसातील विकारांसाठी सोशल मीडिया ही एक 'फेसलेस' जागा उपलब्ध झालेली आहे. ती जागा रेग्यूलेट केली नाहीत, तर माणसंही रेग्यूलेट होणार नाहीत. आपल्याला साधे रेल्वेच्या प्रवासालाही नियम करावे लागतात. पण सोशल मीडियावरील अशा वागण्यासाठी काही उत्तरदायित्वचं नाहीये. सोशल मीडियाचं बिझनेस मॉडेल आणि त्यांचं उत्तरदायित्व ठरवणं, याच्यातच या सगळ्याचं उत्तर आहे," असं त्या सांगतात.
पण, या सगळ्यात स्मृतीचं क्रिकेटमधील कर्तृत्व झाकोळलं गेलं. अगदी तिने अलीकडेच जिंकून आणलेला वर्ल्डकपही विस्मृतीत गेला आणि प्रकर्षानं वर आली ती तिच्या नातेसंबंधांचीच चर्चा...
नैतिकता आणि सत्याऐवजी 'अल्गोरिदम'ला मिळालेली प्रतिष्ठा
यासंदर्भात आम्ही 'तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधावर 'जेएनयू' विद्यापीठात संशोधन करणारे संशोधक' पंकज फणसे यांच्याशी चर्चा केली.
'सोशल मीडिया ही अटेन्शन इकॉनॉमीची दुधारी तलवार आहे,' असं विधान ते करतात.
ते या चर्चेची आणखी एक दुसरी बाजूही स्पष्ट करताना दिसतात.
विशेषत: स्मृती-पलाश प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, "तुम्हीच आधी लोकांचं कुतूहल जागृत केलेलं आहे. तुम्ही ज्यावेळी वर्ल्डकप जिंकला, त्यावेळी तुम्ही त्या प्लॅटफॉर्मचा वापर तुमच्या रिलेशनशीपसाठी करून घेतला आणि जास्तीत जास्त अटेन्शन मिळवण्याचा प्रयत्न केला. अल्गोरिदम हा कधीही 'पॉझिटीव्ह-निगेटीव्ह' अशा स्वरूपात काम करत नाही. अल्गोरिदम फक्त 'अटेन्शन'साठी काम करतो. इथं तेच दिसून येतं. लोकांचं कुतूहल जागृत झाल्यानंतर, तुमच्या आयुष्यात काय झालंय, किती वाईट झालंय, हे त्यांना मॅटर करत नाही, पण लोकांना तुमच्या आयुष्यात काय चाललंय, याची चटक मात्र लागलेली असते."
'अल्गोरिदम याच चटकेसाठीचं काम करतो," असं महत्त्वाचं विधान ते करतात.
"अल्गोरिदमला चांगलं-वाईट असं काहीही कळत नाही. आपण हे विसरून जातो की, आपणच पर्सनल आयुष्याचा कंटेट बनवला आहे. एकदा तुम्ही असं केलं की, त्याच गोष्टी तुम्हाला प्रसिद्धी देतात आणि त्याच तुमचं ट्रोलिंगही करतात."
कोल्डप्ले कॉन्सर्टमधील एका कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांचा व्हायरल व्हीडिओचं उदाहरण अगदी अलीकडचं आहे.
तिथे, या दोन्ही कर्मचाऱ्यांनी लोकांचं असं कोणतंही कुतूहल स्वत:हून चाळवलेलं नव्हतं. मग त्यांच्या खासगी आयुष्याचं चर्वितचर्वण का झालं, असा प्रश्न आम्ही पंकज फणसे यांना विचारला.
ते सांगतात की, "अटेन्शन इकॉनॉमीचं स्वरूपचं असं आहे की, लोकांचं कुतूहल चाळवलं जातंच. त्यात गॉसिपींग या मानवी स्वभावाला सोशल मीडियामुळे एक 'ऑर्गनायझ्ड' आणि 'ऍम्प्लीफाईड' स्वरूप आणि माध्यम मिळालेलं आहे."
टीआरपीच्या गणितांनी घेतलेला नैतिकतेचा, सत्याचा आणि सत्यशोधनाच्या वृत्तीचा बळी
एकीकडे, मानवी स्वभावाचे पैलू तर दुसरीकडे माणसांच्याच खासगी आयुष्यावर, खासगी माहितीवर कसलीही नैतिकता तसेच सत्याची आणि सत्यशोधनाचीही चाड न ठेवणारा आणि संधी मिळताच झडप घालून त्याच्या चिंध्या चिंध्या करणारा अक्राळविक्राळ महाकाय माध्यम राक्षस दिसून येतो.
'असे कळते आहे', 'असं बोललं जात आहे', 'या चॅट्सची आम्ही पुष्टी करत नाही' अशी विधानं करत 'क्लिकबेट' स्वरूपात खरडलेले मथळे हे जणू खासगीपणाचा गळा घोटणाऱ्या राक्षसाची वखवखलेली नखंच वाटतात.
अगदी काही दिवसांपूर्वी अभिनेता धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतरही अशीच काहीशी परिस्थिती दिसून आली. मृत्यूची बातमी निश्चित नसतानाही त्या प्रतिष्ठित माध्यमांकडूनही घाईघाईनं देण्यात आल्या.
अक्षरश: त्यावरही मीम्स बनले आणि हसंही झालं. थोडक्यात, वेदनादायी प्रसंगही यातून सुटताना दिसत नाहीत.
कवी सलील कुलकर्णी यांनी यावर आपल्या फेसबुकवर व्हीडिओ पोस्ट करत म्हटलंय की, "मैत्रमैत्रिणींनो, आपण असे का वागतो? त्या स्मृती मंधानाच्या आयुष्यात जे काही घडलेलं असेल ते ती बघेल, तिच्या जवळचे लोक बघतील. आपल्या घरातील बहीण-मुलगी असती, तर आपण असं बोललो असतो का? सगळ्यांपेक्षा जास्त आपल्याला माहिती आहे, हे दाखवण्याची अशी काय आपल्याला हौस आहे? कुणाच्या मृत्यूच्याही बाबतीत, की सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे, याची घाई कसली आहे? बातम्या पसरवण्याची आणि माहिती नसताना वाढवून सांगण्याची... यातून अशी कोणती अचिव्हमेंट मिळणारे? थोडं तरी शहाणीवेनं वागूया."
याच मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर, मुक्ता चैतन्य 'लोकांना माध्यम शिक्षित करण्याची गरज' व्यक्त करत असतानाच त्या माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.
त्या सांगतात की, "माध्यमं इतक्या प्रचंड प्रमाणात क्लिकबेट आणि सर्क्यूलर इन्फॉर्मेशनच्या ट्रॅपमध्ये अडकेलली आहेत, की माध्यमांना बरेचदा हे लक्षात येत नाही की, कुठल्या गोष्टी कशासाठी करतोय. आकड्यांची प्रचंड स्पर्धा आहे, म्हणून हे करतोय, असं जर असेल तर माध्यमांमध्ये आकड्यांचे घोडे नाचवणारे जे कुणी वरिष्ठ बसलेले आहेत त्यांनी याचा विचार करायला हवा. कारण, याला काही शेवटच नाहीये. हे नॉनएन्डींग आहे."
हाच मुद्दा पुढे नेत पंकज फणसे सांगतात की, "हे फक्त या प्रकरणापुरतं मर्यादित नाही. कुठल्याही घटनेबाबत आता सत्यशोधनामध्ये कुणालाही इंटरेस्ट राहिलेला नाही. प्रतिष्ठित माध्यमांनाही आता फक्त काहीही स्टोरी बनवून अटेन्शन सीक करायची चटक लागलेली आहे. ही आजची नवीन इकॉनॉमी असून मीडियाचा तर तो कणा झालेला आहे. 'पोस्ट ट्रुथ वर्ल्ड'मध्ये सत्य शोधण्यामध्ये कुणालाही इंटरेस्ट नाहीये. खोटी असली तरी चालेल, पण स्टोरी हवी. त्यामुळे, या सगळ्यातून खरी पत्रकारिता, सत्यशोधन, क्रिटीकल थिंकींग, नैतिकता, लॉजिक हे सगळे बाजूला पडतं आणि ते पडलेलं आहे, याच्याशी मी सहमतच आहे."
"कंटेट तयार केलात तरच टीकाल, ही डिजिटल माध्यमांची रियालिटी पण आहे," असं मुक्ता दाभोलकर सांगतात.
त्या म्हणतात की, "पत्रकारांचा पगारच जर का हे करण्यातून येणार असेल तर ते अशा हेडींग्स देणारच. शेवटी, दिवसाच्या अखेरीस आकडे दाखवल्यावरच त्यांना पगार मिळणार आहे. जे मज्जा करायला हे करतात, ती मानसिकता भयंकर नक्कीच आहे," असं त्या सांगतात.
तंत्रज्ञानासह नैतिकतेचे-भावनांचे जटील होत जाणारे प्रश्न
मुक्ता चैतन्य यांच्या म्हणण्याप्रमाणे जर हे 'हे नॉनएन्डींग असेल,' तर मग याला आवर कसा घालायचा, हा प्रश्न महत्त्वाचा वाटतो.
यानिमित्ताने मला सरतेशेवटी, जर्मन तत्त्वचिंतक युर्गेन हॅबरमास यांनी मांडलेला 'पब्लिक स्फिअर' हा सिद्धांत आठवतो, ज्यामध्ये त्यांनी आधुनिक समाजात 'प्रायव्हेट स्फिअर'ला धोके असतील, असं सांगितलंय.
तर मग, तंत्रज्ञानाच्या वाढत्या सहभागासह दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिक बिकट नाही का होणार? 'ब्लॅक मिरर'चा एखादा एपिसोड मी पाहतोय, अशी जी भीती माझ्या मनात तयार झाली, ती वास्तव आहे की अवास्तव आहे?
या प्रश्नावर गौरी जानवेकर म्हणतात की, "आर्थिक आणि सामाजिक फ्रस्ट्रेशन जितकं वाढत जातं, तितकं माणसं जास्त अविवेकी वागत जातात. जिथे समाज शांत आणि स्थैर्य अधिक असतं, तिथल्या माणसांचा विवेक जागा होण्याची शक्यता अधिक असते. जसजसा समाज तयार होत जातो, तसाच विवेक आणि अविवेकही तयार होत जाईल."
पंकज फणसे हाच धागा पकडून म्हणतात की, "भविष्याचं आकलन आताच करणं अवघड आहे, पण त्या त्या काळात एथिक्स आणि मोरॅलिटीचे नवे निकष तयार होत जातात. आधी ट्रोलिंग चिंतेचा विषय होता, पण बरेच सेलिब्रिटींना आता ट्रोलिंगचं काही देणंघेणं राहिलेलं नाहीये. आता ट्रोलिंग हा 'पार्ट ऑफ न्यू नॉर्मल' झालं आहे. भविष्यात आजच्यापेक्षा नक्की वेगळी परिस्थिती असणार आहे, हे नक्की. पण इतकंही घाबरायचं कारण नाही," असंही ते सांगतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)