भारत-पाकिस्तान संघर्षाच्या 'त्या' चार दिवसात BBC च्या टीमनं ग्राऊंडवर काय पाहिलं?

दिव्या आर्य (बीबीसी हिंदी) आणि फरहत जावेद (बीबीसी उर्दू)
फोटो कॅप्शन, दिव्या आर्य (बीबीसी हिंदी) आणि फरहत जावेद (बीबीसी उर्दू)
    • Author, दिव्या आर्य (बीबीसी हिंदी) आणि फरहत जावेद (बीबीसी उर्दू)

7 मे 2025 च्या पहाटे भारताने 'ऑपरेशन सिंदूर'ची सुरुवात करत पाकिस्तानवर हवाई हल्ले केले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या 26 जणांच्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली.

पाकिस्ताननेही आपल्या बाजूने हल्ले करून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. सामान्य नागरिकही यात अडकले, ज्यामुळे मृत्यू आणि मोठ्या प्रमाणावर विध्वंसही झाला. मात्र, अचानक झालेल्या शस्त्रसंधीमुळे हे सर्व थांबलं.

दोन्ही देशात तणावाची परिस्थिती वाढल्यावर सीमारेषेच्या दोन्ही बाजूंवरील बीबीसीच्या पत्रकारांनी प्रत्यक्ष ठिकाणी (ग्राऊंड रिपोर्ट) जाऊन परिस्थितीचं कशा पद्धतीनं वार्तांकन केलं, त्याबद्दलचा हा रिपोर्ट.

दिवस पहिला : 7 मे 2025, बुधवार

भारत :

मध्यरात्रीनंतर काही वेळातच आमचे फोन वाजू लागले. सोशल मीडियावर 'ऑपरेशन सिंदूर' हा शब्द प्रचंड गाजत होता.

पहाटे दोनच्या सुमारास भारत सरकारने अधिकृत निवेदन जारी करून सांगितलं की, भारतानं "पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांच्या नऊ ठिकाणांवर हल्ला केला आहे, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात होती आणि ते हल्ले तिथूनच निर्देशित किंवा नियंत्रित केले जात होते."

निवेदनात पुढं म्हटलं होतं की, एप्रिलमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर' सुरू करण्यात आले. पहलगाम हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.

"पाकिस्तानस्थित दहशतवादी गट (मॉड्युल्स)" भारतात आणखी हल्ल्यांची योजना आखत असल्याची गुप्त माहिती भारताकडे होती, असं भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काही तासांनंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं.

अनेक शहरांमध्ये नागरिकांसाठी मॉक सिक्युरिटी ड्रिल झाल्यामुळे, आम्ही शक्य तितक्या लवकर श्रीनगर गाठण्याचा निर्णय घेतला.

पण अनेक भारतीय विमान कंपन्यांनी त्यांची उड्डाणं रद्द केली होती. लवकरच जम्मू आणि श्रीनगर विमानतळही बंद करण्यात आले.

भारत-पाकिस्तान संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बीबीसीची एक टीम रेल्वे स्टेशनकडे निघाली, तर इतरांनी दिल्लीहून जम्मूपर्यंतच्या 12 तासांच्या लांब प्रवासासाठी टॅक्सींची व्यवस्था केली.

दोन्ही देशांना विभाजित करणाऱ्या नियंत्रण रेषेवर आधीच जोरदार गोळीबाराच्या आणि रणगाड्यांमधून गोळे डागले जात असल्याच्या बातम्या येत होत्या. कुपवाडा जिल्ह्यातील बीबीसीच्या एका टीमनं पहिल्या वार्तांकनात घरं आणि मालमत्तांचं नुकसान झाल्याचं चित्रण केलं.

जसजसा दिवस पुढे सरकत गेला, तसं भारतीय सैन्याच्या सूत्रांनी भारतीय बाजूने किमान 15 लोकांचा मृत्यू झाल्याची बीबीसीला पुष्टी दिली.

दुसऱ्या टीमनं श्रीनगरजवळील बारामुल्ला जिल्ह्यातील एका रुग्णालयात अनेक जखमी लोकांना पाहिलं. ही टीम उरी जिल्ह्यातील एका गावातही पोहोचली, जिथे काही तासांपूर्वीच हल्ला झाला होता आणि तिथल्या घरांतून अजूनही धूर निघत असल्याचे आढळले होते.

त्या दिवसाबद्दलचे काही मुद्दे नंतर स्पष्टही झाले, जसं की भारतीय फायटर जेट्स पाकिस्तानकडून पाडण्यात आल्याच्या वृत्तावर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी दिलेली प्रतिक्रिया.

नुकतंच ब्लूमबर्ग टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "7 मे रोजी नुकसान झालं होतं. पण संख्या किंवा आकडा महत्त्वाचा नाही, हे नुकसान का झालं आणि त्यावर आपण काय केलं, हे महत्त्वाचं आहे."

भारत पाकिस्तान सीमाभाग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

पाकिस्तान :

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भारताच्या संभाव्य हल्ल्याची भीती होती. परंतु, भारत पाकिस्तानमधील मोठ्या शहरांच्या इतक्या आत येऊन हल्ला करणार नाही, असं मानलं जात होतं. पाकिस्तानचं सैन्यदल हाय-अलर्टवर होतं.

भारतानं नऊ ठिकाणांवर हल्ला केला. त्या रात्री हल्ल्यांत मुझफ्फराबाद शहराचा मध्यभाग, पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमधील रावळकोट आणि कोटलीजवळचा भाग, तसेच पाकिस्तानमधील बहावलपूर, मुरिदके आणि सियालकोट यांचा समावेश होता.

क्षेपणास्त्र (मिसाइल) हल्ल्याच्या काही वेळातच, बीबीसीची टीम इस्लामाबादहून मुझफ्फराबादकडे निघाली आणि सकाळी लवकरच शहराच्या मध्यभागी असलेल्या मशिदीच्या ठिकाणी पोहोचली. काही तासांपूर्वीच मिसाइल हल्ला झाला होता.

पहिला हल्ला सय्यदना बिलाल नावाच्या मशिदीवर झाला, तेव्हा मशिदीच्या आजूबाजूच्या घरांमध्ये लोक गाढ झोपलेले होते. सलग झालेल्या स्फोटांच्या आवाजाने नागरिकांमध्ये धक्का, भीती आणि संताप पसरला होता.

सकाळी मोठा गोंधळ उडाला होता. सैन्यदलाचे जवान तैनात करण्यात आले होते आणि पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता. मशिदीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. कोणालाही अगदी मीडियालाही त्या ठिकाणी जाण्याची परवानगी नव्हती.

ती मशीद पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, आणि आजूबाजूच्या घरांच्या भिंती व खिडक्यांचंही नुकसान झालं होतं.

स्थानिकांनी सांगितलं की, पहिला स्फोट होताच लोकं घाबरून अनवाणी पळत सुटले. आम्ही पाहिलं की काही लोक मशिदीकडे येत होते, किती नुकसान झालं आहे हे पाहत होते आणि आपल्या घरांना कुलूप लावत होते.

शहरात भीतीचं वातावरण होतं आणि बाजारपेठा व शैक्षणिक केंद्रं, संस्था बंद होती. शहराच्या आत क्षेपणास्त्र हल्ल्याची अपेक्षा नव्हती, असं लोकांनी सांगितलं.

बीबीसीच्या इतर टीम्सनीही मुरिदके आणि बहावलपूरहून वार्तांकन केलं.

भारत-पाकिस्तान संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत पंजाबमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यांनी अशा ठिकाणांना लक्ष्य केलं, जी स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पूर्वी कट्टरवादी गटांची केंद्रं होती, पण गेल्या अनेक वर्षांपासून तिथं कोणतीही हालचाल नव्हती किंवा ती अधिकृतपणे बंद करण्यात आली होती.

मुरिदके येथे एका इमारतीवर हल्ला झाला, जी पूर्वी जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचे वैचारिक केंद्र म्हणून ओळखले जात होते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दावा केला की, भारतानं सामान्य नागरिक राहत असलेल्या इमारतींना लक्ष्य केलं होतं.

लष्करी प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, पाच शहरांमध्ये 12 महिला आणि मुलांसह एकूण 31 नागरिक ठार झाले. भारतानं दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचा दावा "पूर्णपणे निराधार" असल्याचं त्यांनी सांगितलं.

दुपारपर्यंत पाकिस्तानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (सीएए) पूर्व आणि ईशान्य हवाई हद्द बंद केली आणि विमानांसाठी इशारा नोटिसा जारी केल्या. लाहोर, रावळपिंडी आणि कराचीच्या आकाशात लढाऊ विमानं दिसत होती, तसेच लष्करी वाहनांची हालचाली वाढल्याचे जाणवत होतं.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपत्कालीन बैठक बोलावली, ज्यामध्ये लष्कर आणि सरकारचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी झाले होते. एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, पंतप्रधानांनी "भारताच्या चिथावणीला प्रत्युत्तर देण्यासाठी" सशस्त्र दलांना हिरवा कंदील दिला आहे.

संध्याकाळ होताच नियंत्रण रेषेजवळील लष्करी चौक्यांवर आणि निवासी भागात जोरदार तोफगोळ्यांचे आणि गोळीबाराचे वृत्त समोर येऊ लागले.

दिवस दुसरा : 8 मे 2025, गुरूवार

भारत :

सीमेपलीकडील तोफगोळ्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि आम्ही गुरुवारी सकाळी भेट दिलेल्या सीमेवरील गावांमध्ये लोक सुरक्षित स्थळी गेल्यामुळे गावं ओस पडलेली दिसत होती.

भारतानं एक निवेदन जारी करत सांगितलं की, बुधवार आणि गुरुवार दरम्यानच्या रात्री पाकिस्ताननं "ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्यानं भारताच्या उत्तर व पश्चिम भागातील अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारतानं त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरवले".

त्याचबरोबर "लाहोरमधील एका हवाई संरक्षण यंत्रणेला (एअर डिफेन्स सिस्टिम) निष्क्रिय करण्यात आल्याचा" दावा भारताने केला.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं की, पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेली संस्था 'रेझिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ), ही पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेची शाखा आहे. लष्कर-ए-तैयबा या संघटनेला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे.

भारतात सीमेवर झालेल्या गोळीबारात 16 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी त्यांनी दिली. संध्याकाळी उशिरा आमची एक टीम पूंछ जिल्ह्यात पोहोचली आणि तिथल्या लोकांची भेट घेतली. त्यांनी पाकिस्तानच्या गोळाबारीला 'कयामत की रात' (मुक्तीची रात्र) असं म्हटलं.

रात्र होताच, सीमेच्या विविध भागांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. अनेक भागांमध्ये ब्लॅकआऊट लागू करण्यात आला होता.

पाकिस्तानने जम्मू, पठाणकोट, उधमपूर या तीन लष्करी तळांवर हल्ले केले. परंतु, त्यांचे सर्व हल्ले भारताने निष्फळ ठरवले, या वृत्ताला भारत सरकारने पुष्टी दिली.

बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी झालेल्या कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.
फोटो कॅप्शन, बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी झालेल्या कट्टरवाद्यांच्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.

पाकिस्तान :

सकाळपर्यंत, त्या प्रदेशातील पहिले ड्रोन युद्ध सुरू झाले होते. वेगवेगळ्या शहरांतील, विशेषतः लाहोरमधील नागरिकांनी ड्रोन उडताना पाहिले.

पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं दोन डझनहून अधिक भारतीय ड्रोन पाडल्याचा, दावा आयएसपीआरच्या डीजींनी केला. लाहोर, गुजरानवाला, चकवाल, रावळपिंडी आणि कराचीसारख्या शहरांमध्ये ड्रोन पडताना दिसले. काही ठिकाणी स्थानिक नागरिकांना सायरनचा आवाज ऐकू आला.

एका पत्रकार परिषदेत पाकिस्तानने पहलगाम घटनेची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली.

रावळपिंडीत क्रिकेट स्टेडियमजवळ एक ड्रोन पाडण्यात आल्याचे वृत्त आले. ज्यामुळे पाकिस्तान सुपर लीगचे (पीएसएल) सामने पुढे ढकलण्यात आले. क्रिकेट बोर्डाने उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला.

सध्याची परिस्थिती थांबवली नाही तर आण्विक युद्धाचा धोका "खरा आणि अस्तित्वात असलेला धोका" बनून राहिल, असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं.

रात्री मुझफ्फराबादजवळील सेक्टरमध्ये गोळीबार सुरूच होता. गोळीबार एवढा जोरदार होता की, आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्या हॉटेलमधून तो दिसत होता. काही मीडिया टीम्सशिवाय या हॉटेलमध्ये कोणीही नव्हतं.

दिवस तिसरा : 9 मे 2025, शुक्रवार

भारत :

पहाटेपर्यंत जोरदार गोळीबार सुरू असल्याने पुंछमधील टीमला बंकरमध्ये लपावं लागलं. जेव्हा लोक त्यांच्या बंकरमधून बाहेर आले, तेव्हा सर्वत्र विनाश झाल्याचं चित्र दिसत होतं.

एका तरुणीने, जिचे वडील स्फोटात ठार झाले होते, ती म्हणाली, "पहलगाममधील दहशतवाद्यांनी मारलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे ऑपरेशन होते. आता माझ्या वडिलांसाठी काय करणार? मला न्याय कसा मिळणार?"

अनेक कुटुंबांनी वेळेवर सावध करण्यात आले नसल्याची तक्रार केली.

एका मध्यमवयीन महिलेची 12 वर्षांची जुळी भाची आणि भाचा या गोळीबारात मारले गेले. त्या म्हणाल्या की, "जर भारत सरकारने हल्ला करण्याआधी आम्हाला इथून बाहेर काढलं असतं, तर कदाचित आमची मुलं अजूनही जिवंत राहिली असती."

रात्र होताच सीमावर्ती भागांमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आला. ड्रोन दिसल्याच्या आणि स्फोटांच्या आवाजांच्या बातम्या पुन्हा येऊ लागल्या.

भारत-पाकिस्तान संघर्ष

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तान :

ड्रोन युद्ध सुरू असताना, इस्लामाबादमधील लष्करी सूत्रांनी पत्रकारांना सांगितलं की, एअर डिफेन्स प्रणाली सज्ज करण्यात आल्या असून पारंपरिक लष्करी संसाधनांनाही सक्रिय करण्यात आलं आहे.

डीजी आयएसपीआर लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी 7 मेच्या रात्री भारताच्या हल्ल्याचा तपशील दिला आणि त्या रात्री पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय विमानांना "पाडल्याचं" सांगितलं.

कतार आणि संयुक्त अरब अमिराती राजनैतिक आणि गुप्तचर मार्गांनी दोन्ही देशांच्या संपर्कात असल्याची पुष्टी अनेक स्त्रोतांनी बीबीसीला दिली. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी पुन्हा इस्लामाबादला फोन केला.

दिवस चौथा : 10 मे 2025, शनिवार

भारत :

शनिवारचा दिवस सर्वात नाट्यमय ठरला. पाकिस्तानच्या हल्ल्यांचा परिणाम जम्मू आणि राजौरीसह नागरी वस्त्यांवर झाला.

जम्मूतील एका तरुण महिलेनं आम्हाला सांगितलं, "आमच्या बेडरूममध्ये धुराचे लोट पसरले होते, आम्ही मोठ्या कष्टानं बाहेर पडलो आणि पाहिलं की आमच्या घराच्या छपराचा काही भाग उखडला गेला होता."

किमान दोन जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये एक माणसाचा समावेश होता. जो आपल्या मुलांना घेऊन सुरक्षित ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना गोळीबाराचा बळी ठरला.

राजौरी येथे झालेल्या एका स्फोटात एका सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला.

पंजाबमधील गुरदासपूर आणि पठाणकोटमध्ये बीबीसीच्या टीम्सना पहाटेच्या हल्ल्यांनंतर शेतांमध्ये मोठमोठे खड्डे दिसले. अमृतसर शहरावर आलेले अनेक सशस्त्र ड्रोन्स पाडण्यात आल्याचे भारत सरकारने सांगितले.

सर्वजण आणखी एका तणावपूर्ण रात्रीसाठी तयारी करत होते, तोपर्यंत संध्याकाळी अचानक शस्त्रसंधीची घोषणा झाली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आणि लगेचच भारतीय परराष्ट्र सचिवांनी एका विशेष पत्रकार परिषदेत याला दुजोरा दिला.

परंतु, अंधार पडताच, आम्ही आकाशात ड्रोन उडताना पाहिले आणि पुन्हा स्फोटांचे आवाज ऐकू आले. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबतचे वृत्त दिले, ज्यात जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हेही होते.

नंतर रात्री उशिरा परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानकडून 'समजुतींचे उल्लंघन' (व्हायोलेशन्स ऑफ अंडरस्टँडिंग) झाल्याची पुष्टी केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी तणावपूर्ण आणि तात्पुरत्या शांततेत, अनेक लोक नियंत्रण रेषेजवळील आपल्या गावी परतले.

तंगधर जिल्ह्यात, बीबीसीच्या टीमनं एका कुटुंबाची भेट घेतली. या कुटुंबाचं घर हल्ल्यात मोडकळीस आलं होतं, अनिश्चित भविष्याकडे ते डोळे लावून बसले होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

पाकिस्तान :

पंजाबमधील अनेक हवाई तळांवर "हाय-स्पीड क्षेपणास्त्र हल्ले" पाहिल्याचा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला.

पहाटे सुमारे 2:30 वाजता भारताने रावळपिंडीजवळील चकलाला येथील नूर खान एअरबेसवर हल्ला केला, जो मोठ्या सैन्य छावणीचा भाग आहे. स्फोट इतका प्रचंड होता की, त्या आवाजाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील रहिवाशीही जागे झाले.

नूर खान एअरबेसवर झालेला हल्ला हा 9 आणि 10 मे दरम्यान भारताने केलेल्या किमान 11 हल्ल्यांपैकी एक होता.

भारतीय हवाई दलानुसार, सुरुवातीचे हल्ले नूर खान, रफीकी, रहीम यार खान आणि सुक्कूर येथे झाले, त्यानंतर सरगोधा, भोलारी आणि जेकोबाबाद येथे हवाई हल्ले करण्यात आले.

या हल्ल्यांनंतर, पाकिस्तानने एक मोठं लष्करी ऑपरेशन सुरू केलं, ज्याला "ऑपरेशन बन्यान अल-मुर्सोस" असं नाव देण्यात आलं. ज्यात जम्मू, उधमपूर आणि पठाणकोट येथील भारतीय लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले.

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर देखरेख करणाऱ्या नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली होती, असा पाकिस्तानच्या लष्करी सूत्रांनी दावा केला.

मात्र, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नंतर अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचं म्हटलं.

यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतर, दोन्ही देशांच्या डीजीएमओमधील संपर्कही पूर्ववत झाला.

मात्र, शस्त्रसंधीनंतर लगेचच त्याच्या उल्लंघनाच्या बातम्याही आल्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)