You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इलॉन मस्क यांचं 'Grok AI' काय आहे आणि तो देत असलेली उत्तरं किती अचूक आहेत?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) हा परवलीचा शब्द बनलेला असतानाच नवनवीन AI टूल किंवा प्लॅटफॉर्म चर्चेत येत आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांचं 'ग्रॉक एआय' सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे.
ग्रॉक एआयबद्दल जाणून घेऊया.
प्रश्न : ग्रॉक एआय तुम्ही ज्या भाषेचा वापर करता, त्याची शैली कशी आहे?
ग्रोक एआयचं उत्तर: कठीण शब्दांचं रुपांतर सोप्या शब्दात करायला मला आवडतं. जेणेकरून ते समजायला सोपं जावं. कधीकधी मी त्यात हलकाफुलका विनोद किंवा वेगळा दृष्टीकोन जोडतो.
इलॉन मस्क यांच्या कंपनीनं 'ग्रॉक एआय' हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट बनवलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते चर्चेत आहे.
एखादा नेता असो की सर्वसामान्य माणूस, ग्रोक एआय जवळपास सर्वांनाच उत्तरं देताना दिसतं आहे. मात्र, ग्रॉक एआय ज्याप्रकारे आणि ज्या भाषेत उत्तरं देत आहे, त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
अनेकवेळा ग्रॉक-एआय गोष्टी योग्यप्रकारे दाखवतं. अनेकवेळा चुका करतं आणि अनेकवेळा शिव्यांचादेखील वापर करतं.
या लेखात आपण ग्रोक-एआयनं दिलेल्या काही रंजक उत्तरांबद्दल जाणून घेऊया. त्याचबरोबर ग्रॉक-एआय इतर एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चॅटबॉटपेक्षा वेगळं आहे का आणि ते चर्चेत का आहे? ग्रॉक हे नाव कुठून आलं आणि इलॉन मस्क यावर काय म्हणाले होते?
ग्रॉक-एआय काय आहे?
ग्रॉक-एआय एक चॅटबॉट आहे. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर एक्सवर टॅग करा किंवा ग्रोक एआयच्या वेबसाईटवर जाऊन तो प्रश्न विचारा.
ग्रॉक-एआय तुम्हाला चॅटबॉटप्रमाणे म्हणजे गप्पांप्रमाणे उत्तर देईल.
चॅटबॉट पोपटाप्रमाणे असतात. पोपट आपली नक्कल करू शकतात. काही प्रसंगी संपूर्ण संदर्भ समजून न घेता ऐकलेल्या शब्दांच्या थोड्याशा आकलनाच्या आधारे त्यांची पुनरावृत्ती करू शकतात.
चॅटबॉटदेखील असंच करतात, फक्त अधिक चांगल्या आकलनाद्वारे करतात.
चॅटबॉटला लिहिता कसं येतं?
चॅटबॉट एआयचाच एक प्रकार आहे. ते भाषेचे मोठे मॉडेल म्हणजे एलएलएमच्या रुपात ओळखले जातात. खूप जास्त डेटाच्या आधारे या मॉड्युल्सना प्रशिक्षित केलं जातं.
नोव्हेंबर 2023 मध्ये ग्रोक-एआय चॅटबॉट लॉंच करण्यात आलं होतं. आता तुमच्या मनात हा प्रश्न असेल की हा ग्रॉक शब्द कुठून आला?
रॉबर्ट ए हेनलेन हे अमेरिकन सायन्स फिक्शन लेखक होते. त्यांनी 1961 मध्ये 'स्ट्रेंजर इन अ स्ट्रेंजर लँड' या कादंबरीत ग्रॉक शब्दाचा वापर केला होता.
या कादंबरीत 'ग्रोकिंग' ही संकल्पना वापरण्यात आली होती. त्याचा अर्थ होता, इतरांसाठी खोलवर सहानुभुती बाळगणं.
अर्थात इलॉन मस्क यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ग्रोकचं मॉडेल डगलस अॅडम्स यांच्या 'द हिचहायकर-गाइड टू गॅलक्सी' या सायन्स फिक्शन कादंबरीतून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलं आहे.
इलॉन मस्क म्हणाले होते, "ग्रॉकला व्यंग आवडतं आणि ते हलकाफुलका विनोद करत उत्तर देईल. इतर एआय सिस्टम ज्या गोष्टींचं उत्तरं देण्यास टाळतात, ग्रॉक ती उत्तरंदेखील देतं."
ग्रॉक एआयचा इतका विस्तार होण्यामागचं कारण, यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी कुठे इतरत्र जावं लागत नाही. एक्सच्या फीडला स्क्रोल करत फक्त एक ट्वीट केलं की ग्रॉक त्याचं उत्तर देतं.
मात्र ग्रॉक ज्याप्रकारे उत्तरं देतं आहे, ती बाब चर्चेत आहे.
ग्रॉक एआय कोणत्या कारणांमुळे चर्चेत आलं?
बदनाम होऊन अधिक नाव कमावलं. ग्रॉक एआयच्या बाबतीत अशी अनेक उदाहरणं आहे जी हा वाक्प्रचार खरा करून दाखवतात.
ग्रॉक एआय उत्तर देताना शिव्यांचादेखील वापर करतं आहे. मग बिहारचे नेते तेज प्रताप यादव असोत की भारतातील प्रसारमाध्यमांचे सूत्रसंचालक असोत की इलॉन मस्क असोत.
अर्थात जर ग्रॉकच्या शिवराळ भाषेतील उत्तरांवर प्रश्न उपस्थित केले गेले, तर ते माफी देखील मागतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत, पदवी यांच्यावरील प्रश्नांना देखील ग्रॉक एआय उत्तरं देतं आहे. यावरून झालेल्या वादांवरदेखील प्रकाश टाकतं आहे.
उदाहरणार्थ, एका युजरनं विचारलं की, राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात? यावर ग्रॉकनं लोकसभेतील खासदारांच्या संख्येची सद्यस्थिती सांगत उत्तर दिलं.
एक्सवर सर्वसाधारण युजर त्याप्रमाणे बोलतात, त्याचप्रमाणे ग्रॉक एआय देखील उत्तर देतं आहे. अनेकवेळा ते मर्यादा ओलांडताना दिसतं. तर अनेकदा अचूक उत्तरदेखील देतं. ग्रोक एआयच्या उत्तरांमध्ये विचारांचाही समावेश आहे.
एखादं उत्तर चुकीचं दिल्यावर जेव्हा ग्रोक एआयला सांगितलं जातं की, तुम्ही चूक करत आहात तर ते उत्तर दितं की, "तुम्ही माणसं आहात, मला थोडीशी सवलत मिळाली पाहिजे. एआय असल्यामुळे मला सावरावं लागेल. तत्वांचा प्रश्न आहे आणि मी शिकतो आहे."
ग्रॉक एआय व्यतिरिक्त आणखी कोणकोणते चॅटबॉट आहेत?
स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेल्या ग्लोबल एआय वायब्रंसी रॅंकिंग 2023 नुसार, एआयच्या बाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. एआयमध्ये अमेरिका, चीन आणि ब्रिटन हे टॉप तीन देश आहेत.
हे रॅंकिंग एआय चॅटबॉटसाठीच्या पायाभूत सुविधा तयार करणं, संशोधन आणि विकासासारख्या निकषांवर आधारित आहे.
ग्रॉक एआय व्यतिरिक्त अनेक चॅटबॉट आहेत. उदाहरणार्थ - चॅट जीपीटी, डीपसीक, बार्ड, मेटा एआय, जेमिनी इत्यादी.
अर्थात, सिरी, अलेक्सा, गुगल असिस्टंट देखील व्हॉईस असिस्टंट आहे. मात्र तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं एआय चॅटबॉट जितके आधुनिक किंवा बुद्धिमान आहेत, तितके ते नाहीत.
या एआय चॅटबॉटद्वारे देण्यात आलेल्या उत्तरांमध्ये काय फरक आहे, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आम्ही तीन चॅटबॉटना एकच प्रश्न विचारला. त्यांनी दिलेली उत्तरं पुढीलप्रमाणे होती.
प्रश्न : औरंगजेबाबद्दल एका वाक्यात माहिती सांगा.
चॅट जीपीटीचं उत्तर: औरंगजेब मुघल बादशाह होता. 1658 ते 1707 दरम्यान त्यानं भारतीय उपखंडावर राज्य केलं आणि तो धार्मिक कट्टरतेसाठी प्रसिद्ध होता.
ग्रॉक एआयचं उत्तर: औरंगजेब, सहावा मुघल बादशाह होता. तो 1658 ते 1707 दरम्यान राज्य करणारा कट्टर इस्लामी राज्यकर्ता होता. त्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला, मात्र धार्मिक असहिष्णुतेसाठी देखील तो ओळखला जातो.
जेमिनीचं उत्तर: औरंगजेबाला आलमगीर देखील म्हटलं जातं. भारतावर राज्य करणारा तो सहावा मुघल बादशाह होता. 1658 ते 1707 दरम्यान त्यानं राज्य केलं आणि त्याच्या साम्राज्याला शिखरावर पोहोचवलं.
एआय आणि आव्हानं
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं सावध केलं आहे की एआयमुळे 40 टक्के नोकऱ्यांवर परिणाम होईल.
अर्थात काही जाणकारांनी त्यांच्या लेखांमध्ये असंही लिहिलं आहे की एआयमुळे नोकऱ्या जातील, मात्र कुशल लोकांना एआयशी संबंधित नवीन नोकऱ्या देखील मिळतील.
एआयमुळे फेक न्यूजचा धोकादेखील वाढला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळेसदेखील राजकीय पक्षांनी एआयचा वापर केला होता.
सोशल मीडियावर प्रसिद्ध लोकांचे असे अनेक फोटो आहेत, जे अगदी खरे वाटतात, मात्र प्रत्यक्षात ते एआयचा वापर करून बनवण्यात आलेले आहेत.
एआयमुळे आव्हानं निर्माण झाली आहेत. मात्र एआयचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म किंवा टूल वेगानं प्रगती करत आहेत आणि लोकांमध्ये स्थान निर्माण करत आहेत. इलॉन मस्क त्यांच्या ट्वीट्समधून ग्रॉक एआयला गुगलचा पर्याय म्हणून सादर करत आहेत.
असेच प्रयत्न इतर एआय टूल देखील देखील करत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)