हरकिशनसिंग सुरजीत : एक असे नेते ज्यांचा सल्ला विरोधकही घेत असत

कॉम्रेड हरकिशनसिंग सुरजीत

फोटो स्रोत, CPIM

फोटो कॅप्शन, कॉम्रेड हरकिशनसिंग सुरजीत
    • Author, राजवीर कौर गिल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"कॉम्रेड सुरजीत हे मनानं आणि कामानंही खरे शेतकरी होते."

डी. राजा आपल्या जुन्या राजकीय सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या हरकिशनसिंग सुरजीत यांचं स्मरण करताना म्हणाले, "त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यातील एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा अनुभव होता..."

डी. राजा हे सध्या सीपीआयचे (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) महासचिव आहेत.

हरकिशनसिंग सुरजीत यांना एक हुशार आणि दूरदृष्टी असलेले राजकारणी म्हणून ओळखलं जातं. ते भारतात आघाडी सरकार तयार करण्यासाठी पुढाकार घेणारे नेते होते, आणि कोणत्याही पक्षाला सोबत घेण्याची त्यांच्यात ताकद होती.

अनेक राजकीय तज्ज्ञ त्यांना भारतीय राजकारणाचे 'चाणक्य' मानतात. त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांमध्ये ते 'कॉम्रेड सुरजीत' नावाने प्रसिद्ध होते.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) राष्ट्रीय नेते हरकिशनसिंग सुरजीत हे सात दशकांपेक्षा जास्त काळ सक्रिय राजकारणात होते.

1964 मध्ये जेव्हा पक्षाचे दोन गट पडले, सीपीआय आणि सीपीआय (मार्क्सवादी), तेव्हा हरकिशनसिंग सुरजीत यांनी मार्क्सवादी विचारधारा स्वीकारत सीपीआय (एम) गटात जाण्याचा निर्णय घेतला.

भगतसिंग यांचा प्रभाव आणि ठाम निर्धार

जालंधर जिल्ह्यातल्या छोट्याशा बडाला गावात जन्मलेले हरकिशनसिंग सुरजीत हे भगतसिंग यांच्यापासून प्रेरित झाले, आणि त्यामुळेच ते राजकारणातही सक्रिय झाले.

त्यानंतर आपल्या 90 वर्षांच्या आयुष्यातील 70 हून अधिक वर्षे त्यांनी राजकारण आणि सामाजिक संघर्षासाठी समर्पित केले.

1980 च्या सुमारास सीपीआय (एम) पंजाबचे राज्य सचिव सुखविंदरसिंग सेखों हरकिशनसिंग सुरजीत यांच्या संपर्कात आले.

ते सांगतात, "23 मार्च 1932 हा शहीद भगतसिंग यांचा पहिला बलिदान दिन होता. त्या वेळी होशियारपूर काँग्रेस समितीनं होशियारपूर न्यायालयावर काँग्रेसचा झेंडा फडकावण्याचं जाहीर केलं होतं."

"जेव्हा प्रशासनानं लष्कराला पाचारण केलं, तेव्हा काँग्रेसनं आपला कार्यक्रम रद्द केला. परंतु, हरकिशनसिंग सुरजीत काँग्रेसच्या या निर्णयावर नाराज झाले होते. मग त्यांनी स्वतःच वेगानं होशियारपूर न्यायालयावरचा ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवला आणि काँग्रेसचा झेंडा फडकावला."

"त्या वेळी सुरजीत फक्त 16 वर्षांचे होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि तुरुंगात पाठवलं. अटकेनंतर सुरजीत सिंग यांनी आपलं नाव 'लंडनतोड सिंग' असं सांगितलं होतं."

अनेक राजकीय तज्ज्ञ हरकिशनसिंग सुरजीत यांना भारतीय राजकारणाचे 'चाणक्य' मानतात.

फोटो स्रोत, CPIM

फोटो कॅप्शन, अनेक राजकीय तज्ज्ञ हरकिशनसिंग सुरजीत यांना भारतीय राजकारणाचे 'चाणक्य' मानतात.

सेंखों सांगतात की, या घटनेमुळे हरकिशनसिंग सुरजीत यांचं शिक्षण अर्धवट राहिलं. त्यांनी दहावीचे प्रॅक्टिकल पेपर दिले होते, परंतु ते लेखी परीक्षा देऊ शकले नाहीत.

"तरीही, इंग्रजी, पंजाबी, हिंदी आणि उर्दू या भाषांवर प्रभुत्व असलेल्या हरकिशनसिंग सुरजीत यांनी नंतर 'चिंगारी' नावाचं एक मासिकही सुरू केलं."

सीपीआय (एम)च्या वेबसाइटनुसार, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हरकिशनसिंग सुरजीत पंजाबमधील आघाडीच्या कम्युनिस्ट नेत्यांच्या संपर्कात आले आणि 1934 मध्ये त्यांनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. पुढच्याच वर्षी, 1935 मध्ये ते काँग्रेस सोशलिस्ट पक्षाचे सदस्य झाले.

हरकिशनसिंग सुरजीत यांना आघाडीच्या राजकारणातील अग्रणी आणि मार्गदर्शक म्हणूनही ओळखलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हरकिशनसिंग सुरजीत यांना आघाडीच्या राजकारणातील अग्रणी आणि मार्गदर्शक म्हणूनही ओळखलं जातं.

द्वितीय महायुद्धाच्या काळात हरकिशनसिंग सुरजीत काही काळ भूमिगत होते. परंतु, 1940 मध्ये त्यांना पुन्हा अटक करण्यात आली.

सीपीआय(एम)च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, इतर संस्थापक नेत्यांप्रमाणेच सुरजीत यांनाही त्यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

त्यांनी आपल्या आयुष्यात 10 वर्षे तुरुंगात घालवली, ज्यापैकी 8 वर्षे स्वातंत्र्यपूर्व काळातली होती. याशिवाय, त्यांनी एकूण 8 वर्षे भूमिगत राहूनही घालवली.

सुरजीत आणि प्रीतम यांचं प्रेम

डी. राजा हरकिशनसिंग सुरजीत आणि त्यांच्या पत्नी प्रीतम कौर यांच्यातील नात्याबद्दल बोलताना आश्चर्य व्यक्त करतात.

ते म्हणतात, "कॉम्रेड सुरजीत आणि प्रीतम यांच्यातील प्रेम सर्वांनाच सहज जाणवायचं."

डी. राजा सांगतात, "मी तामिळ आहे आणि प्रीतम कौर या केवळ पंजाबी किंवा थोडीफार हिंदी बोलायच्या. मी वर्षानुवर्ष त्यांच्या घरी जात होतो, पण आमच्यात कधीच बोलणं झालं नाही. पण जेव्हा मी दरवाज्यातून आत यायचो, तेव्हा त्या हसत हसत माझं स्वागत करायच्या."

"आम्ही तासन्‌तास कॉम्रेड सुरजीत यांच्याशी इंग्रजीत बोलत असू, राजकीय चर्चा सुरू असायच्या. परंतु, प्रीतम कौर कधीच त्यांच्या व्यग्रतेचा त्रास मानायच्या नाहीत. उलट, त्या नेहमी हसतमुख असायच्या आणि आम्हाला आरामात बसायला मोकळेपणाने परवानगी द्यायच्या."

हरकिशनसिंग सुरजीत आणि त्यांच्या पत्नी प्रीतम कौर

फोटो स्रोत, Preetam Kaur

फोटो कॅप्शन, हरकिशनसिंग सुरजीत आणि त्यांच्या पत्नी प्रीतम कौर

डी. राजा पुढे सांगतात "मला त्यांच्या दोघांमधील संवाद कधीच नीट कळला नाही, पण जेव्हा ते दोघं एकमेकांच्या सोबत असायचे, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधानाचं हास्य, एकमेकांच्या कामाला दिलेला सन्मान, यातूनच त्यांचं परस्परांतील प्रेम स्पष्टपणे दिसायचं."

"आम्हा सर्व सहकाऱ्यांनीही त्यांच्या उदारतेचा खूप अनुभव घेतला. खरं तर, त्या दोघांनीही आपलं संपूर्ण आयुष्य समाजकारणासाठी अर्पण केलं होतं."

आघाडी सरकार स्थापन करण्याची क्षमता असलेला नेता

हरकिशनसिंग सुरजीत यांना आघाडीच्या राजकारणातील अग्रणी आणि मार्गदर्शक म्हणूनही ओळखलं जातं.

डी. राजा सांगतात की, 1989, 1996 आणि 2004 मध्ये केंद्रात वेगवेगळ्या पक्षांची आघाडी सरकारं स्थापन करण्यात हरकिशनसिंग सुरजीत यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली होती.

"सुरजीत यांना राजकारण्यांना एका समान मुद्द्यावर एकत्र कसं आणायचं याचं कौशल्य होतं."

ते म्हणतात, "कॉम्रेड सुरजीत यांची राजकीय समज इतकी प्रभावी होती की विरोधी पक्षांचे नेतेसुद्धा त्यांच्याकडे सल्ला घ्यायला येत असत."

"ते राजकारणावर स्पष्ट आणि निःपक्षपाती मत नोंदवत असत आणि हे करताना स्वतःच्या विचारधारेप्रतीही ते पूर्ण प्रामाणिक राहायचे."

हरकिशनसिंग सुरजीत यांनी जागतिक राजकारणाच्या पटलावर आपली अमिट छाप सोडली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हरकिशनसिंग सुरजीत यांनी जागतिक राजकारणाच्या पटलावर आपली अमिट छाप सोडली.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डी. राजा सांगतात की, सुरजीत यांनी 1989 मध्ये व्ही. पी. सिंग यांचे नॅशनल फ्रंटचे सरकार स्थापन करण्यासाठी अनेक गटांशी चर्चा केली. कारण एकच ते भाजपाला धर्माच्या नावावर राजकारण करणारा पक्ष मानायचे आणि त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचं, असं त्यांचं ठाम मत होतं.

"परंतु, 1996 मध्ये भाजपला थोड्या वेळासाठी का होईना, सरकार बनवण्यात यश मिळालं. त्यानंतरही कॉम्रेड सुरजीत यांनी पुढाकार घेऊन आधी एच.डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वात संयुक्त मोर्चा सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर आय.के. गुजराल देशाचे पंतप्रधान झाले."

डी. राजा म्हणतात की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि दिवंगत अटल बिहारी वाजपेयी आपल्या पदावर असतानाही कॉम्रेड सुरजीत यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत आणि त्यांच्या मताला महत्त्व देत.

डी. राजा यांनी कॉम्रेड सुरजीत यांच्याबद्दल सांगितलं की, ते उत्तम वक्ते तर होतेच, पण त्याहूनही ते चांगले श्रोते होते.

"जेव्हा मी त्यांच्याकडे श्रीलंकन तमिळ लोकांबद्दल बोलायला जायचो, तेव्हा ते हसत हसत म्हणायचे, 'तुमच्या मनात त्यांच्यासाठी खास जागा आहे. तुम्हीच मला सांगा, काय करायचं ते."

हरकिशन सिंग सुरजीत यांनी व्हिएतनामचा स्वातंत्र्यलढा, पॅलेस्टिनी चळवळ आणि क्यूबासोबत एकजुटतेच्या मोहिमांमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं.

फोटो स्रोत, Preetam Kaur

फोटो कॅप्शन, हरकिशन सिंग सुरजीत यांनी व्हिएतनामचा स्वातंत्र्यलढा, पॅलेस्टिनी चळवळ आणि क्यूबासोबत एकजुटतेच्या मोहिमांमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं.

डॉ. राजा सांगतात की, 1996 मध्ये जेव्हा ज्योती बसू यांना पंतप्रधान बनवण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा सुरजीत यांनी त्याला पाठिंबा दिला होता. परंतु, पक्षात विरोध झाला तेव्हा त्यांनी आपलं मत कुणावर लादलं नाही.

"कॉम्रेड सुरजीत नेहमी पक्षाचे सामान्य कार्यकर्ते राहिले आणि कधीच कोणत्याही पदाची लालसा दाखवली नाही."

"त्यांचं आयुष्य खूपच साधं होतं. दोन खोल्यांचं घर, बहुतेक वेळा पांढरी पगडी आणि साधे वस्त्र परिधान केलेलं असायचे. त्यांचं राहणीमानही एका सामान्य पंजाबी कुटुंबासारखंच होतं."

हरकिशनसिंग सुरजीत हे नेहमीच पदापासून दूर राहिले, तरीही त्यांनी दोन वेळा पंजाब विधानसभेची निवडणूक जिंकली आणि एकदा राज्यसभेचे सदस्य म्हणूनही निवडून आले होते.

मनाने शेतकरी असलेला राजकारणी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत सरचिटणीस सीताराम येचुरी एक प्रसंग सांगायचे, एकदा कॉम्रेड सुरजीत यांनी पंडित नेहरू यांच्या सभेसाठी जागा मोकळी करण्यासाठी, रातोरात शेतात उभी असलेली बार्लीचं पीक स्वतः कापलं होतं. ते आयुष्यभर मनाने शेतकरीच राहिले.

"खरं तर, जवाहरलाल नेहरू हे सुरजीत यांच्या गावात लोकांना संबोधित करायला येणार होते. परंतु, सभेच्या आदल्या दिवशी पोलिसांनी जिथे कार्यक्रम होणार होता ती जागाच ताब्यात घेतली होती."

हरकिशनसिंग सुरजीत यांच्या शेतात बार्लीचं पीक उभं होतं, पण त्यांनी ते रातोरात कापून टाकलं आणि सकाळपर्यंत त्या शेतात सभा घेण्यासाठी तंबूही उभारले गेले होते.

पण स्वतःची उभी पीकं कापणारे हरकिशनसिंग आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढत राहिले.

स्वतःची उभी पीकं कापणारे हरकिशनसिंग आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढत राहिले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्वतःची उभी पीकं कापणारे हरकिशनसिंग आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढत राहिले.

डी. राजा सांगतात, "ते 1938 मध्ये पंजाब किसान सभेचे सचिव झाले होते. त्यांनी अनेक वर्षे अखिल भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस आणि अध्यक्ष म्हणूनही काम केले."

"कॉम्रेड सुरजीत हे मनानं आणि कामानंही खरे शेतकरी होते."

सीपीआयएमच्या वेबसाईटनुसार, "शेतकरी चळवळ उभी करण्याचा आणि पक्ष मजबूत करण्याचा त्यांना मोठा अनुभव होता. याच अनुभवामुळे त्यांनी जातीयवादापासून नेहमी दूर राहणं पसंत केलं."

व्हिएतनामचा स्वातंत्र्यलढा, पॅलेस्टिनी चळवळ आणि क्यूबासोबत एकजुटतेच्या मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं.

1990 च्या दशकात सोव्हिएत संघाचं विघटन झाल्यानंतर, त्यांच्या पूर्वीच्या अनुभवातून धडा घेत त्यांनी पक्षाला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.