मुंबईत पोलीस ठाण्यात राहणाऱ्या 'या' पाकिस्तानी नागरिकाला परतणं अवघड का बनलंय?

65 वर्षीय नादीर खान ऑक्टोबर 2024 पासून मुंबईतील एमआरए पोलीस स्टेशनमध्ये राहत आहेत.
फोटो कॅप्शन, 65 वर्षीय नादीर खान ऑक्टोबर 2024 पासून मुंबईतील एमआरए पोलीस स्टेशनमध्ये राहत आहेत.
    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशानंतर पाकिस्तानचा व्हिसा असलेल्या नागरिकांना परत पाठवलं जात आहे.

परंतु, महाराष्ट्रात दक्षिण मुंबईतील एका पोलीस स्टेशनमध्ये डिटेंशनमध्ये असलेले नादीर खान गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानला परत जाण्याची वाट पाहत आहेत.

65 वर्षीय नादीर खान ऑक्टोबर 2024 पासून मुंबईतील एमआरए पोलीस स्टेशनमध्ये राहत आहेत. आपण पाकिस्तानमधील कराचीचे रहिवासी असल्याचं ते सांगतात.

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नागरिकांना परत पाठवलं जात असताना नादीर खान यांनाही आपल्याला मायदेशी पाठवलं जाईल, अशी आशा आहे.

नादीर खान सांगतात, "रविवारी (27 एप्रिल) मला दिल्लीला जायचं आहे, असं सांगितलं होतं. तिकीटही केलं होतं. पण पुन्हा ऐनवेळी रद्द करण्यात आलं आहे. माझं नाव पाठवत आहेत, असं मला सांगण्यात आलं होतं. पण मी अजूनही प्रतिक्षेत आहे."

ते पुढे म्हणाले, "11 एप्रिल 2024 रोजी माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. ऑक्टोबर 2024 मध्ये मी शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आलो. मला बाहेर येऊन आता सहा महिने उलटले आहेत, तेव्हापासून मी या पोलीस स्टेशनमध्येच राहत आहे.

"मी दिवसभर इथेच राहतो. मी जिवंत राहण्यासाठी जेवतोय फक्त. पाकिस्तान दुतावासाकडूनही मला काही निरोप नाही. पण ते काही प्रतिक्रिया देणार नाहीत, तोपर्यंत मला सोडणार नाहीत का?" असाही प्रश्न ते उपस्थित करतात.

"आताची परिस्थिती पाहून मला भीती वाटणं नैसर्गिक आहे. आजूबाजूच्या लोकांना इथे मी पाकिस्तानी असल्याचं माहिती आहे. त्यांनी माझ्याविषयीच्या बातम्या वाचल्या असतील. मी पोलीस स्टेशनच्या गेटपर्यंतही जात नाही. माझ्यासाठी लाईफ थ्रेटसारखं आहे," असंही ते म्हणाले.

दक्षिण मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेले एमआरए मार्ग पोलीस स्टेशन
फोटो कॅप्शन, दक्षिण मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेले एमआरए मार्ग पोलीस स्टेशन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यासंदर्भात आम्ही पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

परंतु, दोन महिन्यांपूर्वी (25 फेब्रुवारी) नादीर खान यांच्यासंदर्भात पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं की, "पाकिस्तानी नागरिक मुंबईत आला होता. एमआरए पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

"सदर गुन्ह्यात सहा महिन्याची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा भोगून ऑक्टोबर 2024 मध्ये बाहेर आल्यानंतर अधिकृत रेस्ट्रिक्शन ऑर्डरनुसार एमआरए पोलीस स्टेशनमध्ये डिटेन करण्यात आलं आहे. डिपोर्टेशनची प्रक्रिया सुरू आहे. भारतात आल्यानंतर तो मुंबईत आल्यावर स्वत:च सरेंडर झाला होता."

आता गेल्या सहा महिन्यांपासून नादीर खान हे एमआरए पोलीस स्टेशनमध्येच तात्पुरत्या वास्तव्यास आहेत. त्यांचं राहणं, जेवण, असं सारं काही याच पोलीस स्टेशनच्या आवारात सुरू आहे.

मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना बेकायदेशिरित्या आवश्यक कागदपत्रांविना भारतात दाखल झाल्याप्रकरणी आणि अनधिकृरित्या थांबल्याप्रकरणी सहा महिने तुरुंगवास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. परंतु, तुरुंगातून बाहेर येऊन सहा महिने उलटले असून ते परत आपल्या घरी जाण्यासाठी प्रतिक्षेत आहेत.

तुरुंगातून बाहेर येऊन सहा महिने उलटले असून ते परत आपल्या घरी जाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.
फोटो कॅप्शन, तुरुंगातून बाहेर येऊन सहा महिने उलटले असून ते परत आपल्या घरी जाण्यासाठी प्रतीक्षेत आहेत.

फेब्रुवारी 2025 म्हणजेच साधारण दोन महिन्यांपूर्वी बीबीसी मराठीने नादीर खान यांनी दिलेली माहिती आणि पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यावेळी ते भारतात कसे आले आणि हे प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेतलं होतं. ती सविस्तर बातमी तुम्हाला इथे वाचता येईल.

त्यावेळी ते म्हणाले होते, "मी पाकिस्तानचा आहे. माझा जन्म कराचीत झाला आणि घरही तिथेच आहे. आता तीन वर्षं होत आले मी माझ्या मुलांना पाहिलं सुद्धा नाही. आता कुटुंबाची खूप आठवण येते. रात्री झोपही लागत नाही.

एवढ्या दिवसांत आता इथल्या सगळ्यांची ओळख झाली आहे. मला सगळे खान भाई बोलवतात. चांगली वागणूक देतात. पण माझं वय आता 65 आहे. मला काही झालं तर, याचीही भीती वाटते. मला लवकर घरी पाठवावं," नादीर करीम खान यांनी सांगितलं.

दक्षिण मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ असलेल्या एमआरए मार्ग पोलीस स्टेशनमध्ये 65 वर्षीय नादीर करीम खान गेल्या सहा महिन्यांपासून राहत आहेत. ते मूळचे पाकिस्तान, कराची इथले असल्याचं ते सांगतात.

भारतात कसे दाखल झाले?

नादीर करीम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नादीर खान हे लेदर जॅकेटचे व्यावसायिक आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये नेपाळमध्ये काठमांडू येथे एका एक्सोमध्ये ते सहभागी झाले होते. याठिकाणी त्यांची भेट काही स्थानिक विक्रेत्यांशी झाली. जवळपास दोन कोटी रुपयांचे जॅकेट्स या विक्रेत्यांना आपण दिले. परंतु त्यांनी दिलेले चेक नंतर बाऊन्स झाले, असं नादीर खान सांगतात.

यांसदर्भात आपण काठमांडू येथे स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. परंतु आपल्यावर हल्ला झाला आणि त्याच लोकांनी आपला पासपोर्ट घेतला, असंही ते सांगतात.

या दरम्यान, नादीर यांची नेपाळमधील व्हिजाची मुदत संपली आणि ते दिलेल्या मुदतीपेक्षा अधिक काळ तिकडे राहिल्याने आठ ते नऊ हजार डॉलर्सचा दंड त्यांना बसला, असंही ते सांगतात.

पाकिस्तानच्या नागरिकांना परत पाठवलं जात असताना नादीर खान यांनाही आपल्याला मायदेशी पाठवलं जाईल अशी आशा आहे.
फोटो कॅप्शन, पाकिस्तानच्या नागरिकांना परत पाठवलं जात असताना नादीर खान यांनाही आपल्याला मायदेशी पाठवलं जाईल अशी आशा आहे.

नादीर खान पुढे म्हणाले, "यानंतर मी नेपाळहून भारतात जाण्याचा निर्णय घेतला. कारण भारतात मी नेपाळहून जाऊ शकत होतो आणि भाषेची समस्याही येणार नाही, असा विचार केला.

मी सोनौली या सीमेवरून चालत भारतात दाखल झालो. तिथून बसने गोरखपूर येथे गेलो. त्याठिकाणी पोलीस स्टेशनमध्येही मदत मागितली. परंतु त्यांनी दिल्ली येथील पाकिस्तान दूतावासाकडे जाण्यास सांगितलं."

गोरखपूर येथून नादीर खान यांनी दिल्ली गाठलं. त्याठिकाणी दूतावासाकडे मदत मागितली. नंतर आवश्यक कागदपत्र नसल्याने कुठेही थांबता येत नसल्याने 1 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबईत आल्याचंही ते सांगतात.

मुंबईत पोलिसांना सर्व माहिती सांगून आपण सरेंडर होण्याचं ठरवलं होतं, असं ते म्हणाले.

दादर रेल्वे स्थानकाहून टॅक्सी चालकाला पोलीस आयुक्तालय कार्यालयाकडे सोडण्यास सांगितलं. परंतु चालकाने सीएसएमटीजवळील पोलीस उपायुक्तालय कार्यालयाकडे सोडलं आणि तिथे आपण सर्व माहिती सांगितली, असं ते म्हणाले.

पोलिसांनी काय सांगितलं?

यासंदर्भात एमआरए मार्ग पोलीस स्थानकातील एटीसीचे (अँटी टेरीरीजम सेल) पोलीस सब इन्सपेक्टर अनिल राठोड यांनी सांगितलं, "चौकशीत त्यांनी सांगितलं आहे की, नेपाळमध्ये जॅकेटचा व्यापार करण्यासाठी गेले होते. माल मोठ्या प्रमाणात तिकडे उधारीवर दिला.

दरम्यान व्हिजा संपला. पण उधारी न मिळाल्याने ते तिथेच थांबले. म्हणून नेपाळ सरकारकडून दंड भरला गेला. ज्यांनी माल घेतला त्यांनी मारहाण केली आणि पासपोर्ट काढून घेतला, असं ते सांगत आहेत."

"भारतात आल्यानंतर दर्यागंज पोलिसांनी त्यांना पाकिस्तान दूतावासाकडे पाठवलं. तर तिकडून त्यांनी पोलीस स्टेशनकडे जायला सांगितलं. कुठे मदत मिळत नसल्याने आणि राहण्यासाठी जागा मिळत नसल्याने एजंटमार्फत ते सूरतला आले.

सूरतहून गाडी पकडून मुंबई सेंट्रल येथे आले. तिथून गोव्याला गेले. तिकडून पुन्हा दादरला आले. दादरहून टॅक्सीने झोन 1 च्या पोलीस कार्यालयात गेले. तिथे माहिती मिळाल्यावर एमआरए मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतलं. बेकायदेशीर आल्याने विविध विभागांकडून चौकशी झाली. एटीसी, एटीएस, रॉ, आयबी सर्वांनी चौकशी केली."

"एमआरए पोलिसांनी मग गुन्हा दाखल केला आणि कोर्टाने बेकायदेशीरीत्या आल्याने आणि राहिल्याने सहा महिन्यांची शिक्षा दिली. 11 ऑक्टोबर 2024 रोजी ते तुरुंगातून बाहेर आले. कोर्टाने त्यांना डिपोर्ट करण्याचे आदेश दिले आहेत," असंही ते सांगतात.

"त्यांना डिपोर्ट करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि पाकिस्तान दूतावास यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे." असंही ते म्हणाले.

फॉरेनर्स रिजनल रेजिस्ट्रेशन ऑफिसर आणि सिव्हिल अथॉरिटी, मुंबई यांच्याकडून रेस्ट्रिक्शन ऑर्डरप्रमाणे, 11 ऑक्टोबरपासून डिपोर्टेशनपर्यंत नादीर करीम खान यांना एमआरए मार्ग पोलीस स्टेशनच्या आवारातून (प्रीमायसीस) बाहेर जाता येणार नाही, अशीही माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

'मला इथे लोक खान भाई बोलतात, घरातल्यांप्रमाणे वागवतात'

नादीर खान आता घरी परत जाण्यासाठी प्रतिक्षेत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते एमआरए मार्ग पोलीस स्टेशन हेच त्यांचं घर आहे, तिथेच एका खोलीत ते झोपतात.

खान यांच्या जेवणाची सोय सुद्धा इथेच करून दिली जाते. "हे पूर्ण कम्पाऊंड आता कुटुंबासारखं झालं आहे. मला घरातल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणेच वागवतात. मला ते खान भाई म्हणतात. मला चांगली वागणूक मिळत आहे. पण आता मला माझ्या घरी जायचं आहे.

यासाठी त्यांनी आवश्यक ती प्रक्रिया करावी. चौकशी करावी. पाकिस्तान दूतावासाने याची दखल घ्यावी. असं किती काळ राहणार?" असं नादीर खान सांगतात.

नादीर खान हे लेदर जॅकेटचे व्यावसायिक आहेत.
फोटो कॅप्शन, नादीर खान हे लेदर जॅकेटचे व्यावसायिक आहेत.

कुटुंबाशी काही संपर्क होऊ शकला का? यावर बोलताना ते म्हणाले, "तुरुंगात जाण्यापूर्वी मी घरातल्यांशी बोललो होतो. मी सुखरुप असल्याचं कळवलं होतं."

ते पुढे सांगतात, "मला रात्री झोप येत नाही. माझे दोन मुलं आहेत. लहान मुलगा 14 वर्षांचा होता आता तो 17 वर्षांचा झाला असेल. मी शिक्षित आहे. माझं पदवीपर्यंतचं शिक्षण कराचीमध्ये झालं असून एमबीए इजिप्तमध्ये झालं आहे. व्यवसायासाठी मी यापूर्वीही अनेक देशांमध्ये गेलो आहे. पण असा प्रसंग कधी आला नाही."

तसंच, आपले मोठे बंधू अन्वर खान हे 1979 मध्ये पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये टेस्ट मॅच खेळल्याचा दावाही ते करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)