मतदान केंद्र म्हणजे काय? निवडणूक अधिकाऱ्यांचं नेमकं काम काय असतं?

फोटो स्रोत, ANI
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
निवडणुकीच्या प्रक्रियेत सर्वांत महत्त्वाचा असतो,तो मतदानाचा दिवस.
मतदार या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतात. पण हे मतदान केंद्र कुठे असेल, हे कसं ठरवलं जातं?
पोलिंग स्टेशन आणि पोलिंग बूथमध्ये काय फरक असतो, मतदानाआधी तिथले अधिकारी काय तयारी करतात, जाणून घेऊया.
मतदान केंद्र काय असतं?
पोलिंग स्टेशन किंवा मतदान केंद्र म्हणजे अशी एखादी इमारत किंवा आवार, जिथे मतदान केलं जातं.
तर या पोलिंग स्टेशनमध्ये वेगवेगळ्या जागी किंवा वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पोलिंग बूथ असतात.
पोलिंग बूथ म्हणजे छोटीशी बंदिस्त जागा किंवा आडोसा जिथे मतदार प्रत्यक्ष मत देतात म्हणजे एकतर, मतपत्रिकेवर शिक्का मारतात किंवा मतदान यंत्रावर बटन दाबून मत देतात.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मध्ये मतदान केंद्राविषयी तरतुदी आहेत. तसंच याविषयी भारतीय निवडणूक आयोगाची मार्गदर्शक तत्वही आहेत, जी लोकसंख्येतील बदलानुसार अपडेट केली जातात.
2020 सालच्या नियमानुसार एका मतदारसंघातील जास्तीत जास्त 1500 मतदारांसाठी एक मतदान केंद्र असायला हवं आणि कुठल्याही मतदाराला मत देण्यासाठी साधारण दोन किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करावा लागू नये.
त्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये किंवा उत्तर प्रदेशसारख्या जास्त लोकवस्तीच्या राज्यामध्ये भरपूर मतदान केंद्र दिसून येतात. तर ग्रामिण भागात तुलनेनं त्यांची संख्या कमी असते.
मतदान केंद्राची निवड कशी होते?
साधारणपणे सरकारी किंवा निमसरकारी इमारतींचा मतदान केंद्र म्हणून वापर केला जातो. अशा पक्क्या इमारती सुरक्षेच्या दृष्टीनं निवडल्या जातात.

फोटो स्रोत, ANI
शाळा आणि कॉलेजात डेस्कसारख्या सुविधा उपलब्ध असतात, त्यामुळे तिथे मतदान केंद्र तयार करणं सोपं जातं.
काहीवेळा गावातलं सार्वजनिक सभागृह किंवा कम्युनिटी सेंटर अशा सार्वजनिक इमारतींचा वापरही मतदान केंद्र म्हणून केला जाऊ शकतो.
पण पोलिस स्टेशन, हॉस्पिटल, मंदिर किंवा धार्मिक स्थळं अशा जागांचा वापर मतदान केंद्र म्हणून केला जाऊ नये, असं नियमावली सांगते.
तसंच मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात कुठलं राजकीय पक्षाचं कार्यालय नसावं असाही नियम आहे.
जिथे सरकारी इमारती नसतील तिथे खासगी इमारती आणि तात्पुरत्या उभारलेल्या शेडमध्येही मतदान केंद्र उघडता येतं, पण शक्यतो अशा जागा टाळल्या जातात.

फोटो स्रोत, Getty Images
मतदान केंद्रासाठी इमारतीची निवड कोण करतं? तर जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असलेली व्यक्ती ही त्या जिल्ह्याची निवडणूक अधिकारी असते.
हे जिल्हा निवडणूक अधिकारी मतदान केंद्राविषयी निर्णय घेतात. पण त्यांनी या केंद्रांसाठी निवडणूक आयोगाकडून मान्यता घेणंही आवश्यक असतं. अन्यथा तिथलं मतदान रद्द ठरतं.
दुर्गम भागात मतदान केंद्र कसं असतं?
तसंच देशाच्या अगदी दुर्गम भागातील लोकांनाही मतदान करता यावं यासाठी कधीकधी जंगलात,डोंगरावरही मतदान केंद्र उभारली जातात.
त्यासाठी अधिकाऱ्यांना दूरवर प्रवास करून जावं लागू शकतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
कधीकधी अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या मतदारांसाठी अधिकारी 200-300किलोमीटरचा प्रवासही करतात.
2019 च्या निवडणुकीत गुजरातच्या गीरच्या जंगलातून,लडाखमध्ये हिमालयात ट्रेक करून तर अंदमानमधल्या बेटावर दलदलीतून वाट काढत अधिकाऱ्यांना जावं लागलं होतं.

फोटो स्रोत, ANI
अशा दुर्गम जागी जाताना मतदान अधिकाऱ्यांना बरीच तयारी करावी लागते. प्रत्यक्ष मतदानाच्या काही दिवस आधीच प्रवास करावा लागू शकतो.
अगदी दूरच्या जागी जाताना सगळी उपकरणं आणि कागदपत्रं सोबत घेऊन खडतर प्रवासही करावा लागतो.
निवडणूक अधिकारी कसं काम करतात?
भारतात निवडणूक आयोग असला तरी त्यांच्याकडे निवडणूक घेण्यासाठी मोठी स्वतंत्र यंत्रणा आणि कर्मचारी-अधिकारी नसतात.
तर शिक्षक, पोलिस असे सरकारी कर्मचारीच निवडणूक काळात आयोगासाठी काम करतात.
मतदान यंत्र मतदान केंद्रावर सुरक्षित नेणं, मतदानाच्या दिवशी मतदारांची पडताळणी करणं, मतदान केंद्राची सुरक्षा, मतमोजणी, इत्यादी कर्तव्य हे कर्मचारी पार पाडतात.

फोटो स्रोत, ANI
मतदानासाठी आता भारतात यंत्राचा वापर केला जातो, म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ईव्हीएम. ही यंत्र बॅटरीवर चालतात, म्हणजे जिथे वीजपुरवठा नाही अशा ठिकाणीही ती मतदानासाठी वापरली जाऊ शकतात.
त्याला व्हिव्हिपॅट हे यंत्रही जोडलेलं असतं, ज्यात कुणाला मत पडलं आहे त्याची माहिती असते.
मतदानाच्या दिवसअखेर हे मतदान यंत्र बॅटरीपासून वेगळं केलं जातं. यंत्राचे वेगवेगळे भाग खास केसेसमध्ये पॅक केली जातात. या केसेस निवडणूक आयोगाचा शिक्का आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या सही-शिक्क्यासह सील केल्या जातात.
आधीच निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रावर ही मतदान यंत्र नेली जातात. मतमोजणीच्या दिवशीच ती पुन्हा उघडली जातात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








