अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांशी 9 मेच्या रात्री काय बोलणं झालं? पंतप्रधान मोदींनी संसदेत सांगितलं

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान 9 मेच्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांच्याशी फोनवर काय संवाद झाला होता, याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत केला.

मोदी म्हणाले, "9 मेच्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष एक तासापासून मला फोन करण्याचा प्रयत्न करत होते. नंतर मी त्यांना फोन केला आणि म्हटलं की, तुमचे तीन–चार वेळा फोन आले होते."

"तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. माझं उत्तर होतं, जर पाकिस्तानाचा हा हेतू असेल तर त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि आम्ही त्याहून मोठा हल्ला करून त्याचं उत्तर देऊ. आम्ही आधीच सांगितलं होतं, गोळीचं उत्तर गोळ्यांनीच देऊ. 10 मेच्या सकाळपर्यंत आपण पाकिस्तानच्या लष्करी ताकदीला चिरडून टाकलं. हेच आमचं उत्तर होतं आणि हाच आमचा जिगर होता."

याआधी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीच्या दाव्यांवर सरकारला घेरलं होतं आणि यावर संसदेत उत्तर देण्याचं आव्हान दिलं होतं.

राहुल गांधी म्हणाले होते, "ट्रम्प यांनी 29 वेळा शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा केला आहे. जर ते खोटं बोलत असतील, तर पंतप्रधान मोदींमध्ये इंदिरा गांधींसारखं फक्त 50 टक्के धाडस जरी असेल, तरी त्यांनी सांगावं की, असं काही नव्हतं. जर पंतप्रधानांमध्ये दम असेल, तर त्यांनी ठामपणे सांगावं की ट्रम्प खोटं बोलत आहेत."

'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले नरेंद्र मोदी?

'ऑपरेशन सिंदूर'वर सुरू असलेल्या चर्चेच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आणि काँग्रेस स्वार्थी राजकारण करत असल्याचा आरोप केला.

नरेंद्र मोदींनी आज (29 जुलै) संध्याकाळी 6.30 वाजता भाषण सुरू करताना म्हटलं, "ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना आरसा दाखवण्यासाठी मी उभा आहे. जगातल्या कोणत्याही देशाने भारताला स्वतःच्या सुरक्षेसाठी कारवाई करण्यापासून रोखलेले नाही. क्वाड असो, ब्रिक्स असो किंवा फ्रान्स, रशिया, जर्मनी यांच्यासह अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. पण माझ्या देशाच्या वीरांच्या शौर्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही."

पंतप्रधान मोदी म्हणाले, "तीन–चार दिवसांनंतरच काँग्रेस म्हणू लागली, 'कुठे गेली छप्पन इंचाची छाती, कुठे हरवला मोदी, मोदी तर अपयशी ठरला.' ते याचा आनंद घेत होते. पहलगाममध्ये लोकांच्या हत्येतसुद्धा ते त्यांच्या स्वार्थी राजकारणाची संधी शोधत होते आणि माझ्यावर टीका करत होते."

यानंतर विरोधी बाकांमधून गोंधळ सुरू झाला. पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान लोकसभा अध्यक्षांना विरोधकांना समज देण्याची वेळ आली.

मोदी पुढे म्हणाले, "22 एप्रिलचा बदला आपल्या सैन्याने 22 मिनिटांत ठरवलेल्या उद्दिष्टांसह घेतला."

मोदी म्हणाले, "पहिल्यांदाच असं झालं की, भारताने अशी रणनीती आखली की, जिथे आपण कधीच गेलो नव्हतो, तिथे पोहोचलो. पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले. बहावलपूर, मुरिदकेसुद्धा जमीनदोस्त केले."

"ऑपरेशन सिंदूरदरम्यान संपूर्ण जगाने आत्मनिर्भर भारताची ताकद ओळखली. मेड इन इंडिया ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानची पोलखोल केली."

सीडीएसच्या नेमणुकीचा उल्लेख करत ते म्हणाले, "नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्स – तिन्ही सैन्यदलांचा समन्वय इतका प्रभावी ठरला की पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली. सिंदूरपासून सिंधूपर्यंत भारताने कारवाई केली आहे. दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना समजले आहे की, त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल."

राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी घडवून आणल्याच्या दाव्यांवरून सरकारवर टीका केली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रम्पसमोर ठामपणे उभं राहण्याचं आव्हान दिलं.

राहुल गांधी यांनी आरोप केला की, सरकारने हवाई दलाचे हात बांधून ठेवले होते, कारण सरकारकडे लढण्याची इच्छाशक्तीच नव्हती.

राहुल गांधी म्हणाले, "ट्रम्प यांनी 29 वेळा शस्त्रसंधीचं श्रेय घेतलं आहे. जर ते खोटं बोलत असतील, तर जर पंतप्रधान मोदींकडे इंदिरा गांधींसारखं 50 टक्केही धाडस असेल, तर त्यांनी ठामपणे सांगावं की, असं काही झालं नव्हतं. जर पंतप्रधानांमध्ये दम असेल, तर त्यांनी सांगावं की ट्रम्प खोटं बोलत आहेत."

राहुल गांधी म्हणाले, "पहलगाम हल्ल्यानंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध केला नाही, म्हणजेच संपूर्ण जगाने भारताला पाकिस्तानच्या बरोबरीत ठेवलं. किंबहुना, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानचे जनरल आसिम मुनीर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जेवण केलं आणि सध्या अमेरिकन कमांडरसह ते या गोष्टीवर चर्चा करत आहेत की दहशतवाद कसा थांबवायचा."

राहुल म्हणाले, "कोणताही दहशतवादी हल्ला म्हणजे युद्धाची घोषणा आहे' – या धोरणामुळे तुम्ही दहशतवाद्यांना असा अधिकार दिला की, युद्धात ओढायचं असेल तर एक हल्ला करा."

राहुल गांधी म्हणाले की, भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, कारण चीन आणि पाकिस्तान यांना वेगळं ठेवण्याचा जो भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख पाया होता, त्याला धक्का बसला आहे.

प्रियंका गांधी काय म्हणाल्या?

राहुल गांधींच्या आधी लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पहलगाम हल्ल्यातील सुरक्षेच्या त्रुटींवरून सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं, "संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या कालच्या दीर्घ भाषणात एक मुद्दा राहून गेला की, बैसरन व्हॅली या पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्था का नव्हती?"

प्रियंका गांधींनी सरकारला विचारलं की, पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री किंवा गुप्तचर विभागातील कुणाचाही राजीनामा का झाला नाही?

प्रियंका गांधी म्हणाल्या, "थोड्याच वेळापूर्वी सरकार म्हणत होती की, काश्मीरमध्ये शांतता आहे, तिथं अमन-चैन आहे, शांततेचं वातावरण आहे, चला काश्मीर फिरायला जाऊ. शुभम द्विवेदीचं सहा महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं, ते काश्मीरमधील बैसरन व्हॅलीत गेले होते."

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 जणांमध्ये शुभम द्विवेदी हेही होते, ज्यांना त्यांच्या पत्नीच्या समोरच दहशतवाद्यांनी ठार मारलं.

प्रियंका गांधी यांनी सरकारला विचारलं, "तिथे सुरक्षा का नव्हती? एकही सैनिक का दिसला नाही? सरकारला हे माहीत नव्हतं का, की दररोज तिथे हजार ते पंधराशे पर्यटक जातात? हे माहीत नव्हतं का, की तिथे पोहोचण्यासाठी जंगलातून जावं लागतं? काही झालं तर लोकांनी काय करायचं?"

प्रियंका म्हणाल्या, "तिथे ना डॉक्टरांचा, ना फर्स्ट एडचा काहीही बंदोबस्त होता. ना सुरक्षेची कुठलीही व्यवस्था होती. हे सगळे लोक सरकारच्या भरोशावर तिथे गेले होते, आणि सरकारने त्यांना देवाच्या भरोशावर सोडलं."

प्रियंका गांधी म्हणाल्या की, पहलगाममधील सुरक्षेच्या त्रुटींवर मोदी सरकार शांत आहे.

प्रियंका म्हणाल्या, "नेहरूंपासून माझ्या आईच्या अश्रूंपर्यंत सरकार सगळ्यावर बोललं, पण ज्यावर खरंच बोलायला हवं होतं, ते म्हणाजे पहलगाममधील अपयश, त्यावर काहीच नाही."

प्रियंका गांधी म्हणाल्या, "माझ्या आईच्या अश्रूंची गोष्ट झाली आहे. माझ्या आईचे अश्रू तेव्हा आले होते, जेव्हा त्यांच्या पतीला दहशतवाद्यांनी शहीद केलं होतं. त्या वेळी त्या केवळ 44 वर्षांच्या होत्या. आज मी या सभागृहात उभी आहे आणि त्या 26 लोकांविषयी बोलतेय, कारण मी त्यांचा दु:ख समजू शकते, मी ते अनुभवू शकते."

'ऑपरेशन महादेव'बद्दल अमित शाह यांनी काय माहिती दिली?

लोकसभा सभागृहात पहलगाम हल्ला आणि 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेचा आज (29 जुलै) दुसरा दिवस आहे. या चर्चेची सुरुवात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.

भारताच्या सुरक्षा दलांनी चालवलेल्या 'ऑपरेशन महादेव'मध्ये पहलगाम हल्ल्यातील तीन कट्टरतावादी मारले गेले आहेत, अशी माहिती चर्चेच्या सुरुवातीलाच गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात दिली.

गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चेची सुरुवात करताना सभागृहात सांगितलं की, "पहलगाम हल्ल्यात निर्दोष नागरिकांची हत्या करण्यात आली. धर्म विचारून नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर मारण्यात आलं. हे सर्व खूपच क्रौर्यानं करण्यात आलं. त्याचा मी तीव्र निषेध करतो."

'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेच्या वेळेस अमित शाह म्हणाले की, "अशा क्रूर घटनेवर चर्चा आणि चिंतन व्हायला हवं, हे स्वाभाविक आहे. त्याचबरोबर भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, याच्या व्यवस्थेचीही चिंता असली पाहिजे."

'ऑपरेशन महादेव'बद्दल अमित शाहांनी काय सांगितलं?

याच दरम्यान अमित शाह म्हणाले की, त्यांना सोमवारी (28 जुलै) झालेल्या 'ऑपरेशन महादेव'ची माहितीदेखील द्यायची आहे.

ते म्हणाले, "काल ऑपरेशन महादेवमध्ये सुलेमान उर्फ फैसल जट, अफगाण आणि जिबरान नावाचे दहशतवादी सैन्य, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत मारले गेले.

सुलेमान हा लष्कर-ए-तैयबाचा कमांडार होता. तो पहलगाम आणि गगनवीर हल्ल्यात सहभागी होता. अफगाण आणि जिबरानदेखील लष्कर-ए-तैयबाचा 'ए' ग्रेडचा दहशतवादी होता."

"बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्यात या तिन्ही दहशतवाद्यांचा सहभाग होता. हे तिघेही मारले गेले आहेत.

सैन्याच्या पॅरा फॉर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या जवानांना मी खूप-खूप धन्यवाद देऊ इच्छितो. तिन्ही दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे."

'ऑपरेशन महादेव' कसं पार पडलं?

गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत पहलगाम हल्ल्यानंतर कट्टरतावाद्यांना पकडण्यासाठी केलेल्या संपूर्ण कारवाईबद्दल विस्तारानं सांगितलं आहे. ती पुढीलप्रमाणे आहे :

"22 मे 2025 ला ऑपरेशन महादेवची सुरुवात झाली होती. पहलगाममध्ये ज्या दिवशी हत्याकांड झालं, त्याच रात्री जम्मू-काश्मीरमध्ये एक सुरक्षाविषयक बैठक झाली होती."

"एक वाजता हल्ला झाला आणि मी साडेपाच वाजता श्रीनगरमध्ये पोहोचलो होतो. 23 एप्रिलला एक सुरक्षाविषयक बैठक झाली. सर्वात आधी त्यात निर्णय घेण्यात आला की जे क्रूर खुनी आहेत, ते देश सोडून पळून जाता कामा नये."

"22 मे ला आयबीजवळ गुप्तेहरांकडून माहिती आली. त्यात छांचीगाम परिसरात दहशतवादी असल्याची माहिती होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी मे पासून 22 जुलैपर्यंत सातत्यानं प्रयत्न करण्यात आले."

"काल जे ऑपरेशन झालं, त्यात आपल्या निर्दोष लोकांना मारणाऱ्या तीन दहशतवाद्यांना मारण्यात आलं."

"अशी फक्त शंका होती की यांनी हे हत्याकांड केलं, मात्र, एनआयएनं आधीच या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना, जेवण पोहोचवणाऱ्यांना अटक केली होती."

"आम्ही कोणत्याही प्रकारची घाई केली नाही. घटनास्थळी जे काडतूस मिळालं, त्याचा एफएसएल अहवाल आम्ही आधीच तयार करून ठेवला होता. काल जेव्हा हे तीन दहशतवादी मारले गेले, तेव्हा त्यांच्याकडे तीन रायफल मिळाल्या. घटनास्थळी मिळालेले काडतूस याच रायफलमधील होते."

"माझी अपेक्षा होती की, जेव्हा ही माहिती मिळेल, तेव्हा सत्ताधारी पक्ष-विरोधी पक्षांमध्ये आनंद निर्माण होईल. मात्र, यांचे (विरोधी पक्ष) चेहरे तर उतरलेले आहेत. दहशतवादी मारले गेले याचाही तुम्ही आनंद वाटत नाही. दहशतवाद्यांचा धर्म पाहून तुम्ही दु:खी होऊ नका."

"1,055 लोकांची 3,000 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. याच्या आधारे स्केच बनवण्यात आलं."

"शोध घेत असताना ज्यांनी दहशतवाद्यांना राहण्यास जागा दिली होती, त्या दोन जणांची ओळख पटवण्यात आली. त्यांना अटक करण्यात आली. ते सध्या कोठडीत आहेत."

चर्चेच्या पहिल्या दिवशी काय-काय घडलं?

सोमवार (28 जुलै) हा 'ऑपरेशन सिंदूर'वरील लोकसभेतील चर्चेचा पहिला दिवस होता. त्याची सुरुवात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली.

ते म्हणाले की, "पाकिस्ताननं पुन्हा आगळीक केली, तर आम्ही आणखी कठोर कारवाई करू. पाकिस्तानला जो गैरसमज वाटत होता, तो आम्ही ऑपरेशन सिंदूरद्वारे दूर केला. जर काही राहिला असेल, तर तोदेखील दूर केला जाईल."

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "पाकिस्तानबरोबर कोणताही संघर्ष नाही. हा संस्कृतपणा विरुद्ध असंस्कृतपणा याचा संघर्ष आहे. जर कोणी आमच्या सार्वभौमत्वाची हानी केली, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल."

राजनाथ सिंह म्हणाले :

  • आमचा मूळ स्वभाव बुद्धाचा आहे, युद्धाचा नाही. आम्ही आजदेखील म्हणतो की, पाकिस्तान समृद्ध असणं आमच्या हिताचं आहे.
  • नरेंद्र मोदी सरकारची भूमिका स्पष्ट आहे - चर्चा आणि दहशतवाद एकत्र चालू शकत नाहीत.
  • पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद हा वेडेपणा नाही, विचारपूर्वक केलेल्या कटाचा भाग आहे. हे एक टूलकिट आहे. ज्याला पाकिस्तान आणि त्याच्या एजन्सींनी एक धोरण म्हणून अंमलात आणलं आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीदेखील या चर्चेत भाग घेतला. त्यांनी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीमध्ये तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीच्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळलं.

एस. जयशंकर म्हणाले :

  • 22 एप्रिल ते 17 जून दरम्यान दरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही.
  • 9 मे ला अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून माहिती दिली की पुढील काही तासात पाकिस्तान मोठा हल्ला करू शकतो.
  • 25 एप्रिलपासून 'ऑपरेशन सिंदूर' सुरू होईपर्यंत, अनेक फोन कॉल आणि चर्चा झाल्या. माझ्या स्तरावर 27 फोन आले. तर पंतप्रधान मोदींच्या पातळीवर जवळपास 20 फोन कॉल आले.
  • पंतप्रधानांनी त्यांच्या उत्तरात हे स्पष्ट केलं होतं की जर असा कोणताही हल्ला झाला, तर आम्ही त्याला योग्य ते प्रत्युत्तर देऊ.
  • सीमेपलीकडून दहशतवादाची धोका कायम आहे, मात्र ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची एक नवीन प्रतिमा समोर आली आहे.

विरोधी पक्षांनी सरकारलं घेरलं

दुसऱ्या बाजूला, शस्त्रसंधी घडवून आणल्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर विरोधी पक्षानं प्रश्न उपस्थित केले.

याच दरम्यान, काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई, दीपेंद्र हुड्डा, टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि शिवसेनेचे (यूबीटी) खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यांची चर्चा झाली.

गौरव गोगोई म्हणाले, "आम्ही सरकारचे शत्रू नाही. दहशतवादाविरोधातील लढाईत आजदेखील आम्ही सरकारसोबत आहोत. मात्र सत्य समोर आलं पाहिजे. आम्हाला आशा होता की गृहमंत्री याची नैतिक जबाबदारी घेतील आणि पंतप्रधान (नरेंद्र मोदी) संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देतील."

"आम्ही सर्वांनी एकजुटीनं पंतप्रधान मोदींना पूर्ण पाठिंबा दिला. संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या पाठिशी होता. मात्र 10 मे ला बातमी आली की शस्त्रसंधी झाली. काय झालं? आधी 21 टार्गेट निवडण्यात आले होते, मग ते नऊ का झाले?"

"पाकिस्तान जर खरोखरंच गुडघे टेकण्यास तयार होता, तर तुम्ही का थांबलात, तुम्ही का वाकलात? कोणासमोर तुम्ही सरेंडर केलं?"

"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 26 वेळा म्हणाले आहेत की आम्ही युद्ध थांबवलं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले आहेत की पाच-सहा लढाऊ विमानं पडली आहेत. तुम्ही सांगा की किती लढाऊ विमानं पडली?"

तर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रश्न विचारला की पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार म्हणालं होतं की "पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही" आणि पाकिस्तानवर अनेक निर्बंध लावण्यात आले होते. मग 14 सप्टेंबरला आशिया चषकात भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्धचा सामना कसा काय खेळेल?

ते म्हणाले, "बैसरणच्या खोऱ्यात लोकांना मारण्यात आलं. पाकिस्तानबरोबर व्यापार बंद आहे. त्यांची विमानं इथे येऊ शकत नाहीत. सागरी मार्गानं जहाज येऊ शकत नाहीत. तुम्हाला सदसदविवेकबुद्धी नाहीए का. तुम्ही कोणत्या तोंडानं पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार आहात."

ओवैसी असंही म्हणाले की भारत आणि पाकिस्तानमधील तो क्रिकेट सामना पाहण्याची परवानगी त्यांची सदसदविवेकबुद्धी देत नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)