You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 'आपले', 'त्यांचे' की 'सर्वांचेच'? या प्रश्नाचा वेध घेणारे नाटक - 'भूमिका'
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'भूमिका' नाटकात दोन प्रसंग आहेत. नाटक संपल्यावरही मोठा काळ ते सोबत राहतात. मी हे नाटक पाहून काही दिवस झाले आहेत, तरीही ते डोक्यात रेंगाळताहेत.
एक प्रसंग म्हणजे, या नाटकाचा जो नायक आहे, विवेक जयंत, त्यांना खूप वर्षांनी त्यांच्या शाळेतल्या 'बागूल' या मित्राचा फोन येतो. हा मित्र आता अमेरिकेत मोठ्या पदावर आहे. फोन आला आहे कारण पेशानं अभिनेता असणारे विवेक एका सिरियलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 'भूमिका' करत आहेत.
बोलणं होतं आणि शेवटी फोन ठेवतांना विवेक यांच्याकडून अगदी मनापासून सहजपणे (आणि कदाचित पहिल्यांदाच) शब्द येतात, 'जय भीम'!
दुसरा प्रसंग आहे जेव्हा बाबासाहेबांच्या पेहरावात (निळा सूट, टाय आणि काळ्या फ्रेमचा जाड चष्मा) घरी आलेल्या विवेक यांच्यासमोर त्यांच्याकडे घरकाम करणा-या बाई येतात.
त्यांच्या मुलीला मेडिकलला प्रवेश मिळालाय म्हणून त्या पेढे घेऊन आल्यात आणि अवचित बाबासाहेबांसारखेच दिसणारे विवेक त्यांना समोर दिसतात.
त्यांच्या बांध फुटतो. खरं-खोटं त्या विसरतात. हात जोडून समोर गुडघ्यावर बसून रडत म्हणतात, "बाबा, तुम्ही नसता तर आमची मुलं कशी शिकली असती?"
हे प्रसंग का कोरल्यासारखे सोबत राहतात, हे कदाचित या लेखप्रपंचातून समजू शकेल. कदाचित प्रेक्षक म्हणून हा माझा वैयक्तिक अनुभव असेल. पण प्रत्येकालाच व्यक्तिगतरीत्या भिडणारे प्रसंग, चर्चा या नाटकात आहेत.
ते कधी धक्का देतात, कधी रागही आणतात, कधी खजील करतात, पण प्रत्येक वेळेस स्वत:च्या विचारांच्या भोवऱ्यात ढकलून देतात. तो भोवरा नाटकानंतरही तुमच्या सोबत राहतो.
क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेलं आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेलं 'भूमिका' हे नाटक प्रेक्षकांच्या विवेकाला जागं करतं किंवा तसा करायचा प्रामाणिक प्रयत्न करतं.
समकालीन मराठी समाजात जे वास्तव सोयीस्करपणे मौनाखाली झाकून ठेवलं गेलंय ते किंवा ज्याविषयी कधी अधेमधे विचारलं जातं तेव्हा सोयीस्कर उत्तर हे 'मौन' असतं ते, या नाटकातून एका धैर्यानं मांडण्यात आलं आहे.
पहिल्यांदाच कोणी याविषयी बोलतं आहे असं नाही. किंवा असं धाडस कोणीच केलं नाही असंही नाही. तसे निवडक धाडसी सगळ्याच क्षेत्रांत आहेत. पण तरीही काळ महत्वाचा. त्याची कसोटी निर्णायक.
त्यामुळे ज्या काळात टोकदार झालेल्या अस्मितांनी बहुतांशांच्या भावनांना एवढं 'संवेदनशील' केलं आहे की, सत्य दूरच पण किमान काही निरीक्षणं मांडण्याची भिती सर्वत्र असतांना, त्या भितीचा उपयोग करुन झुंडीचं राजकारण उभं रहात असतांना, त्यातून ध्रुवीकरण होऊन कोणत्या ना कोणत्या प्रकारचा 'प्रोपोगंडा' करत असल्याचे शिक्के मारले जात असतांना आणि त्याची पहिली सहज शिकार नाटक वा सगळ्याच कला ठरत असतांना एका मुख्य प्रवाहातल्या नाटकानं अशा विषयांना हात घालणं, हे महत्वाचं.
गंभीर सामाजिक आणि राजकीय भाष्य नाटकांची मोठी परंपरा असणाऱ्या मराठी व्यावसायिक रंगभूमीवर मोठ्या अंतरानं असं नाटक आलं आहे, जे 'भूमिका' घेतं.
आंबेडकर कोणाचे?
आंबेडकर कोणाचे? ही जी चर्चा हे नाटक रंगमंचावर घडवून आणतं, खरं तर ती महाराष्ट्रातल्या विशेषत्वानं उच्चवर्गीय, सवर्ण समाजामध्ये होत आली आहे. कधी मोठ्यानं, कधी हळू आवाजात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं मोठेपण त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या कार्याच्या या देशातल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर झालेल्या अटळ परिणामाने सगळ्यांनीच मान्य केलं आहे.
पण तरीही या देशातलं जातवास्तव हे कायम आहे. त्यामुळे एक मर्यादित वर्ग कायमच 'आपले' आणि 'त्यांचे' असं वर्गीकरण करत आला आहे.
कधी कधी बाबासाहेबांना त्यांचं शिक्षण, अर्थशास्त्रीय मांडणी, घटनानिर्मिती या निवडक मुद्द्यांवर आपलसं करुन त्यांनी केलेली धर्मचिकित्सा, मांडलेली आरक्षणाची गरज यावरुन त्यांच्यापासून सोयिस्कर अंतर असा वर्ग ठेवत आला आहे. कधीकधी या अंतराचं रुपांतर आढ्यतेतही झालं आहे.
केवळ बाबासाहेबच नव्हे तर त्यांचे अनुयायी, त्यांच्यापासून प्रेरणा घेणारे शोषित समाज यांच्याबाबतीतही समज आणि धारणा अशा अंतराचीच राहिली आहे.
अनेक अभ्यासकांनी हे नोंदवलं, लिहिलं आहे. उदाहरणार्थ, 6 डिसेंबरला दादरच्या चैत्यभूमीवर होणारी गर्दी आणि त्यावरुन झालेल्या उलटसुलट चर्चा. या नाटकात त्याचाही उल्लेख होतो.
या राखल्या गेलेल्या अंतरामुळे आणि ते अंतर तोडण्याच्या प्रेरणेच्या अभावामुळे बाबासाहेबांबद्दल फारसा अभ्यासही झालेला नसतो.
या 'भूमिका' नाटकाचा नायक विवेक जयंत हा त्या वर्गाचं प्रतिनिधित्व करतो. पण त्यांच्या आयुष्यात ती प्रेरणा येते त्यांना सिरियलमध्ये मिळालेल्या बाबासाहेबांच्या भूमिकेमुळं. ते राहतात पुण्यात आणि काम करतात मुंबईत.
त्या भूमिकेसाठी म्हणून त्यांचा अभ्यास सुरू होतो आणि बाबासाहेबांचा अभ्यास सुरू झाल्यावर जवळपास प्रत्येकाचं जे होतं, तेच त्यांच होतं. त्यांचं आयुष्य बदलतं. एक भूमिकेसाठीचा अभ्यास विवेक यांना एक नवीन दृष्टी देतो.
बाबासाहेबांच्या कामाची व्यापकता तर समजतेच, पण त्यांच्या भवतालात असलेली असमानताही दिसू लागते.
'आता जात वगैरे कोणी मानत नाही' असं सरसकट ऐकायला येणारं वाक्य त्यांनीही ऐकलेलं असतं, पण आता घरातल्या कामवाल्या बाईंचा चहाचा वेगळा कप विवेकना आता खटकतो.
जे चुकीचं आहे, तरीही घडतं आहे ते दिसू लागतं. पण त्यामुळे बदलायला तयार नसलेला जो त्यांचा भवताल आहे, त्याच्याशी खटके उडणं सुरू होतं. ते प्रश्न एका प्रकारे प्रेक्षकांनाही असतात. उदाहरणार्थ, तुम्ही संविधान वाचलं आहे का? किती जणांकडे उत्तर आहे?
त्यांची पत्नी, मुलगी, मामा असे या गोतावळ्यात आहेत. त्यातला प्रत्येक जण हा एका विचाराचा, वर्गाचा प्रतिनिधी आहे. या प्रत्येकासोबत काही वाद होतात, काही चर्चा होतात.
त्याशिवाय सिरियलचा लेखक सोमनाथ आणि कामवाल्या बाई आहेत, जे दोघं मागास समाजातून येतात. त्यांची आयुष्यं पुरती वेगळी आहेत. पण त्यांच्याकडूनही विवेकना बाबासाहेब समजतात.
मुद्दा हा की, एक वर्ग जो त्याला ऐतिहासिकदृष्ट्या मिळालेले 'अॅडव्हाण्टेज' जपतो आहे, त्यातल्या विवेकला बाबासाहेबांच्या भूमिकेसाठी केलेल्या अभ्यासामुळे स्वत:ची 'भूमिका' मिळते.
राखलेलं 'अंतर' गळून पडतं आणि त्यातूनच वर सुरुवातीला उधृत केलेल्या प्रसंगात 'जय भीम' म्हणण्यातला सहजपणा आणि 'कन्व्हिक्शन' त्याच्यात येतं.
आरक्षणाचा प्रश्न
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात या प्रश्नानं नवं आणि निर्णायक वळण घेतलं आहे. हजारो वर्षं जातीच्या उतरंडीत खाली असलेल्या आणि त्यामुळं मागे राहिलेल्या जातसमुहांना सामाजिक न्याय मिळावा म्हणून स्वातंत्र्यानंतर आरक्षणाची भूमिका देशानं स्वीकारली.
गेली सात दशकं त्याचे विविध परिणाम पहायला मिळाले आहेत. सगळ्यांना नाही तरीही एका मोठ्या लोकसंख्येला मुख्य प्रवाहात त्यामुळं येता आलं आहे.
पण गेल्या काही वर्षांपासून बहुसंख्याक असलेले वर्गही आरक्षणाची मागणी करत आहेत. त्याचा संबंध बहुतांशानं शेतीआधारित अर्थव्यवस्थेतून उद्योगाधारित अर्थव्यवस्थेत जातांना मिळणाऱ्या आर्थिक संधींशी आहेत. मुख्यत्वे आर्थिक असणाऱ्या या मागणीला वेगळे कंगोरे आहेत.
पण ऐतिहासिक अन्याय दूर करुन सामाजिक न्यायासाठी दिलेल्या आरक्षणाबाबत अनेकदा उलटसुलट चर्चा आपल्या समाजात झाली आहे, होत असते.
'खुल्या' प्रवर्गातून अनेकदा या तक्रारी कधी उघडपणे, कधी हळू आवाजात बोलल्या जातात की 'उत्तम मार्क्स मिळूनही आम्हाला प्रवेश मिळत नाही, पण ज्यांना आरक्षण आहे त्यांना कमी मार्क्स मिळूनही प्रवेश मिळतो'. अशा तक्रारी कधीकधी दु:स्वासापर्यंत जातात. हे वास्तव आहे आणि ते नवीन नाही.
तसंच इथे या नाटकातही घडतं आणि आरक्षणाबद्दलच्या या 'तक्रारी'लाही हात घालण्यात आला आहे.
विवेक यांच्या मुलीला, कुहूला, जवळपास 93 टक्के मार्क पडूनही मेडिकल प्रवेशाला मार्क कमी पडतात. दुसरीकडे कामवाल्या बाईंच्या मुलीला कुहूपेक्षा कमी मार्क मिळूनही मेडिकलला प्रवेश मिळतो.
इथे वादंग उठतो. तोपर्यंत घरातल्याच एक असलेल्या कामवल्या बाई आता लांबच्या वाटू लागतात. बाईंना ते जाणवतंही. इथे त्यांची बाजू विवेक समजू शकतो कारण आता बाबासाहेबांच्या अभ्यासामुळे त्याला केवळ वरवरची तुलना दिसत नाही.
त्याला 'अॅडव्हान्टेज मिळणं' आणि 'संधी निर्माण करणं' यातला फरक समजलेला असतो. हा सगळाच प्रसंग आणि त्याभोवती नाटकाच होणारी चर्चा उद्बोधक आहे.
नाटककाराला यातून पुढच्या पिढीविषयी आशा, त्यांची समज कदाचित दाखवून द्यायची असावी आणि सांगायचं असावं की, ते वेगळा विचार करू शकतात.
कारण, पण या प्रवेशाच्या प्रकरणानंतर 'जेन झी' असलेली कुहू एकदम वेगळा मार्ग निवडते आणि त्या निवडीचं कारण तिच्या वडिलांकडे, म्हणजे विवेककडे, बोट दाखवून म्हणते की 'ते जर एवढ्या काळानंतर भूमिकेत बदल करायला, काही नवीन करायला तयार असतील तर मी का तसं करू नये?'
हा बदल विवेकमध्ये बाबासाहेबांच्या भूमिकेनंतर आलेला असतो.
कलाकाराची 'भूमिका'
हा एक आद्य प्रश्न आहेत, तो म्हणजे 'कलाकार भूमिका का घेत नाहीत?' केवळ रंगमंचावरची भूमिका साकारुन त्यांना वेगळं होता येईल का? मग समाज आणि व्यवस्थेवर त्यांचा जो प्रभाव आहे, अधिकार आहे त्याची जबाबदारी ते घेणार की नाही?
योग्य आहे त्याच्या बाजूनं उभं राहण्यासाठी आणि जे अयोग्य आहे त्याला विरोध करण्याची धमक ते दाखवणार की नाही?
हे असे प्रश्न जाहीरपणे विचारले जातात. कोणत्याही कलाकार-लेखक-विचारवंत यांच्या 'सामाजिक दायित्वा'चा प्रश्न प्रत्येक समाजाच्या केंद्रस्थानी असतोच. त्यावर भरपूर लिहिलं-बोललं आहे. अजूनही जाणार आहे.
'भूमिके'चा हा प्रश्न या नाटकातही मध्यवर्ती आहे. ज्या भूमिकेची जाणीव विवेकला बाबासाहेबांच्या अभ्यासातून आली आहे. तो त्याचा स्वत:चा शोध आहे. त्यामुळे इतर कलाकारांसारखी बोटचेपी वा स्वार्थी मौनाची भूमिका न घेता, तटस्थ न राहता, व्यक्त होण्याची प्रेरणा त्याला मिळाली आहे.
अंतर्यामी हे अनेक बदल घडून आले आहेत आणि त्यातला एक हा आहे. भूमिका 'स्वीकारण्यापासून' भूमिका 'घेण्यापर्यंतचा' हा प्रवास आहे.
एका अन्याय झालेल्या प्रकरणात विवेक स्वत:ची भूमिका जाहीरपणे मांडतात, सरकारवर टीका करतात आणि प्रोड्यूसरकडून दबाव येऊनही पर्वा न करता त्या भूमिकेशी ठाम राहतात. प्रसंगी करियर पणाला लागतं. पण तडजोड करत नाही. कुटुंबीय मन वळवण्याचे प्रयत्न करतात, पण विवेकचं 'कन्व्हिक्शन' न हलणारं आहे.
या नाटकाच्या शेवटी जो विवेक आणि त्याचे मामा यांचा जो संवाद आहे, खरं तर मोठा वाद आहे, तो ऐकण्यासारखा आहे.
पण सध्या आपल्या भोवताल एका मोठ्या वैचारिक घुसळणीतून जातो आहे. तिथं बदलास स्वीकारू शकणाऱ्या खुल्या विचारी व्यक्तींचं आणि ऐकिवास आव्हान न देता बुद्धीची कवाडं बंद करुन बसलेल्या व्यक्तींचं जे द्वंद्व सुरु आहे. तेच समोर रंगमंचावर घडतं.
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे यापूर्वीही मराठी रंगभूमीवर या विषयांना हात घालणारी, गहनता आणि गांभीर्य असणारी नाटकं झाली आहेत. त्याचा उहापोह इथे अप्रस्तुत आहे.
पण 'भूमिका' हे नाटक एकंदरितच सगळ्या सामाजिक-राजकीय चर्चाविश्वाचं (डिस्कोर्स) गांभीर्य नष्ट करण्याचे प्रयत्न होत असतांना, 'व्हॉट्स ऍप' युनिव्हर्सिटी तर ते बौद्धिक मांद्यत्वाकडे नेत असतांना, त्यातून ध्रुवीकरणाचे आणि द्वेषाचे वेल पसरण्याची भीती असतांना, हे विषय ते आजची भाषा आणि दृष्टिकोनासह रंगभूमीवर मांडण्याचं धाडस करतं, हे समकालीन रंगभूमीला नाकारता येणार नाही.