संतोष माने : रागाच्या भरात शहरात बेदरकारपणे चालवलेली बस, 9 जणांचा झाला होता मृत्यू

- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुणे
मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव बेस्ट बसने बाजारपेठेत घुसून अनेकांना उडवल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली.
या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 43 लोक जखमी झाल्याची माहिती आहे.
अपघाताच्या वेळी बसने बाजारपेठेतील अनेक वाहनांना धडक दिली. या घटनेत काही रिक्षांचा चक्काचूर झाला. या बसचा ड्रायव्हर संजय मोरे याला अटक करण्यात आलेली आहे. 105,108,118 कलमा अंतर्गत ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती डीसीपी गणेश गावडे यांनी दिली आहे.
चालक संजय मोरे हा 1 डिसेंबरला चालक म्हणून कामावर रुजू झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचे वय 54 वर्षे असून याआधी तो अन्य ठिकाणी कामाला होता. पोलिसांच्या प्रथमीत चौकशीत आरोपी चालकाने याआधी कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे समोर आलंलआहे. अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमके कोण? याबद्दल पोलीस तपास सुरू आहे.
या प्रकारामुळे पुण्यातल्या संतोष माने प्रकरणाची अनेकांना आठवण झाली.
2012 मध्ये तुरुंगात गेलेल्या संतोष मानेला सुप्रीम कोर्टाने जन्मठेप सुनावली आहे.
ही जन्मठेपेची शिक्षा पूर्ण करुन माने कदाचित काहीच वर्षात तुरुंगातून सुटेल, असं त्याचे वकील म्हणतात. पण संतोष मानेच्या प्रकरणाने अनेकांचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदलून गेलं.
काय आहे संतोष माने प्रकरण?
एसटी बस चालक असलेला संतोष माने 25 जानेवारी 2012 च्या सकाळी स्वागरेट बस स्थानकात आला होता तो आपली रात्रीची ड्युटी बदलून दिवसा करुन द्यावी म्हणून मागणी करण्यासाठी.
अधिकाऱ्यांनी ही मागणी मान्य न केल्याने माने बाहेर निघाला आणि थेट डेपोमध्ये पार्क असलेल्या बसमध्ये जाऊन बसला.
आपल्याकडील मास्टर चावीने त्याने बस सुरु केली आणि कोणाच्याही लक्षात येण्याच्या आधी तो ती बस घेऊन थेट रस्त्याच्या विरुद्ध दिशेने स्वारगेटकडून कॅम्पच्या दिशेने निघाला.
सकाळची वेळ असल्याने अनेकजण आपल्या कामावर निघाले होते. उलट्या दिशेने बस चालवत मानेने वाटेत येईल त्या प्रत्येक वाहनाला धडक दिली.

फोटो स्रोत, Prachee Kulkarni
कॅम्पकडच्या रस्त्याकडून वळून तो पुन्हा स्वारगेटच्या दिशेने आला. स्वारगेट, गोळीबार मैदान, भवानी पेठ, गुलटेकटी, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता असा प्रवास करत तिथून तो पुन्हा सारसबागेकडून पुढे गेला.
तिथे शेवटी त्याला थांबवण्यात लोकांना यश आलं. एका नागरिकाने आणि एका पोलिसाने बसमध्ये शिरत त्याला बसमधून बाहेर काढत ही बस अखेर थांबवली गेली.
तोपर्यंत ही बस शहरात 15 किलोमीटर फिरली होती. त्या सकाळी एकूण 9 जण मृत्युमुखी पडले तर 37 जण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आलं.
कोर्टात काय झालं?
लोकांनी मानेला पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर या प्रकरणी पुणे कोर्टात सुनावणी सुरु झाली. दर सुनावणीला जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्यांचे नातेवाईक कोर्टात हजेरी लावायचे.
अखेर 2013 मध्ये एप्रिल महिन्यात कोर्टाने मानेला फाशीची शिक्षा सुनावली. यावेळी मानेचे हे कृत्य म्हणजे ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर’ प्रकारचा गुन्हा असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले होते.
या प्रकरणी पुढे उच्च न्यायालयात अपील करत मानेने आपली भूमिका कोर्टात मांडली गेली नसल्याचा दावा केला. त्यानंतर उच्च न्यायालयाने पुन्हा पुणे कोर्टाला या प्रकरणाची सुनावणी घेण्यास सांगितले.
पुणे कोर्टाने मानेची शिक्षा कायम ठेवल्यावर पुन्हा उच्च न्यायालयात अपील करण्यात आले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
सेशन कोर्टात सुनावणी सुरु असताना संतोष मानेचे वकील तो मनोरुग्ण असल्याचा दावा करत होते. पुणे कोर्टात त्याचा वकिलांचा हा पुणे कोर्टाने वकिलांचा हा दावा फेटाळून लावला. उच्च न्यायालयात पुन्हा मानेच्या वकिलांनी हीच मांडणी केली. त्यासोबत ससून रुग्णालय आणि येरवडा रुग्णालयाच्या डॅाक्टरांचे अहवाल देखील त्यांनी सादर केले.
मूळचा सोलापूरचा असणारा माने यापूर्वी देखील मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार घेत असल्याचा दावा वकिलांनी केला होता. मानेला भास होत असायचे तसेच तो तणावाखाली होता असा बचाव पक्षाच्या वकिलांचा दावा होता. पण उच्च न्यायालयाने हे दावे मान्य केले नाहीत आणि त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

फोटो स्रोत, Getty Images
मानेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. यावेळीही पुन्हा माने मानसिक आजारी असल्याचाच दावा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने हा दावा मान्य केला नाही. पण हा प्रकार झाला त्यावेळी तो तणावाखाली असल्याचं सांगत त्याची फाशीची शिक्षा रद्द करत त्याला जन्मठेप सुनावली.
सप्टेंबर 2019 मध्ये त्याच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्यात आलं.
सध्या संतोष माने येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याला अटक होऊन 11 वर्ष झाली आहेत. तुरुंगाधिकाऱ्यांनी त्याच्या वर्तणुकीचा आधारे निर्णय घेतला तर तो पुढच्या काही वर्षात बाहेर येऊ शकेल, अशी माहिती संतोष मानेचे वकिल अॅडव्होकेट धनंजय माने यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
अॅडव्होकेट धनंजय माने म्हणाले, “आम्ही सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 2019 मध्ये फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेप सुनावली आहे. तुरुंगातील मानेचे वर्तन पाहून ही शिक्षा 12 वर्षांची का 14 वर्षांची हे तुरुंगातील अधिकारी ठरवतील. आणि त्यानंतर संतोष मानेची सुटका होईल.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








