सलीम कुत्ता कोण आहे, विधानसभेत हे नाव का गाजतंय, त्याचं 'कुत्ता' नाव कसं पडलं?

सलीम कुत्ता

फोटो स्रोत, Screenshot

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते सुधाकर बडगुजर आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता या दोघांचा एक व्हिडिओ समोर आल्याने वादाला तोंड फुटले आहे.

सलीम कुत्ता कोण आहे, त्याने कोणते गुन्हे केले आहेत आणि त्याचं हे नाव का पडलं याची चर्चा सध्या होताना दिसत आहे.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केल्याची घोषणा केली आहे.

सुधाकर बडगुजर हे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिक विभाग प्रमुख आहेत. सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा सहकारी आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर यांनी बडगुजर यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

"हा सार्वजनिक कार्यक्रम होता आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण ओळखावे हे जरूरी नाही," असं हर्षा बडगुजर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

"हा व्हीडिओ 15-16 वर्षं जुना आहे," असं हर्षा बडगुजर म्हणाल्या होत्या.

1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी सलीम कुत्ता दोषी आढळला होता. बडगुजर आणि सलीम कुत्ता हे दोघे नाशिक येथे एका फार्महाऊसवर पार्टी करत असतानाचा हा व्हीडिओ आहे. त्यावरुन विधिमंडळात गदारोळ झाला आहे.

गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटले, "हा मुद्दा नितेश राणे, दादाजी भुसे आणि आशिष शेलार या सरकारमधील आमदारांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी आम्ही विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या घटनेमागे कुणाचा वरदहस्त आहे, याची देखील सखोल चौकशी होईल."

फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की "दाऊदच्या गॅंगमधील सदस्य आणि संबंधित व्यक्ती हे दोघे नाचत असल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. तो पॅरोलवर असतानाचा हा व्हीडिओ आहे. पॅरोलवरील व्यक्तीला पार्टी देखील करता येत नसते.

पार्टीपेक्षा हे महत्त्वाचं आहे की यातून काय संकेत जातो. बॉम्बस्फोटातील आरोपी सोबत जर कुणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ त्यांच्या संवेदना मेल्या आहेत."

याआधी काय झालं?

भाजप आमदार नितेश राणे यांनी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचे फोटो विधानसभेत दाखवले.

सुधाकर बडगुजर

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, सुधाकर बडगुजर

"सलीम कुत्ताने एक पार्टी आयोजित केली होती आणि त्या पार्टीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते उपस्थित होते," असे राणे म्हणाले.

"माझ्याकडे या पार्टीचे व्हीडिओ देखील आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात यावा, असे राणे म्हणाले.

जर राजकीय नेते आणि दहशतवाद्यांचे संबंध असतील तर आपलं राज्य आणि देश असुरक्षित राहील असं राणे म्हणाले.

सलीम कुत्ता कोण आहे?

सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा सहकारी आहे. 1993 मध्ये मुंबई येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग होता असं कोर्टात सिद्ध झालं होतं.

या प्रकरणात तो दोषी सिद्ध झाला होता. या साखळी बॉम्बस्फोटात त्याने स्फोटकं, दारूगोळा आणि बंदुकीच्या गोळ्या पुरवल्या होत्या असं कोर्टाने म्हटलं होतं.

सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता
फोटो कॅप्शन, भाजप आमदार नितेश राणे यांनी हा फोटो विधानसभेत सादर केला आहे. सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर.

सलीम कुत्ताचं खरं नाव हे मोहम्मद सलीम मीरा शेख आहे. लोकसत्ताचे क्राइम रिपोर्टर राहुल खळदकर सांगतात, "तो मूळचा तामिळनाडूतील तंजावूर जिल्ह्यातील कुट्टा या गावचा आहे. या गावाच्या नावाहूनच त्याचे नाव सलीम कुत्ता पडले असल्याचं सांगितलं जातं.

"तसेच तो कुणाला मारताना अगदी रानटी कुत्र्यासारखा क्रूर होतो म्हणून देखील त्याला कुत्ता म्हटलं जातं. त्याची देहबोली ही आक्रमक होती त्यामुळे देखील त्याला कुत्ता म्हणत होते," खळदकर सांगतात.

"सलीम कुत्ताला शिक्षा झाल्यापासून तो महाराष्ट्रातील विविध तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आधी तो नाशिक मध्ये होता. आता तो पुण्यातील येरवडा तुरुंगात आहे. येरवड्याला 2016 पासून आल्यापासून त्याला पॅरोल देखील मिळाली नाही. त्यामुळे हा व्हीडिओ जुना आहे," असं खळदकर सांगतात.

सलीम कुत्ता अंडरवर्ल्डमध्ये कसा आला?

खळदकर सांगतात की "सलीम कुत्ता छोटे-मोठे गुन्हे करत होता. पोलीस सतत त्याच्या मागावर असायची. पायधोनी आणि कुलाबा पोलीस स्थानकात त्याच्या नावावर गंभीर गुन्हे होते.

"1990च्या सुमारास तो चोऱ्यामाऱ्या करणे आणि गुंडगिरी करणे अशी कामं तो करू लागला. आणखी मोठी कामं मिळावी यासाठी त्याने अबू बकर नावाच्या एका गुन्हेगाराकडे कामाची मागणी केली. अबू बकरने त्याची आणि मोहम्मद डोसा उर्फ मजनू मुस्तफा याच्याशी ओळख करून दिली. तेव्हापासून तो दाऊदच्या कंपनीत सामील झाला," असं खळदकर सांगतात.

दाऊद इब्राहिम

फोटो स्रोत, Other

फोटो कॅप्शन, दाऊद इब्राहिम

"सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय मोहम्मद डोसाचा खास माणूस बनला. 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणावेळी त्याला हत्यारांचे अनलोडिंग करण्याचे काम देण्यात आले होते.

"दारूगोळा पुरवणे, बंदुकीच्या गोळ्या पुरवणे यासाठी त्याला टाडा न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती," असं खळदकर सांगतात.

या बॉम्बस्फोटात 257 हून अधिक लोकांचे प्राण गेले होते. 700 हून अधिक लोक जखमी झाले होते आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.

खडसेंनी दाखवला गिरीश महाजन यांचा फोटो

नितेश राणेंनी सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ताचा फोटो दाखवल्यानंतर आज विधान परिषदेत गोंधळ उडाला. या वरुन सत्ताधारी आणि विरोधकात खडाजंगी झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत भाजप नेते गिरीश महाजन यांचा फोटो दाखवला आणि 'हा फोटो सलीम कुत्तासोबतचा आहे', असा दावा खडसेंनी केला.

'एका विवाह सोहळ्यात पालकमंत्री आणि काही आमदार उपस्थित होते', असा खडसेंनी दावा केला.

गिरीश महाजन
फोटो कॅप्शन, विधान परिषदेत गिरीश महाजनांचा फोटो दाखवण्यात आला.

'सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई होते, तर मग महाजन यांच्यावर का नाही. एक मंत्री कसा काय बसू शकतो,' या प्रकरणाची देखील चौकशी करावी असं खडसे यांनी म्हटलं.

सुधाकर बडगुजर यांच्या मुद्द्याहून दिशाभूल करण्यासाठी गिरीश महाजन यांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आल्याचं सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.

याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ज्या लग्नात गिरीश महाजन गेले होते ते लग्न मुस्लिम धर्माचे नाशिकचे असणारे शेर ए खातीम यांच्या पुतण्याच्या लग्नाला गेले होते. त्यांचा दाऊद सोबत कोणताही सबंध नाही. ज्या परिवारात लग्न झालं त्यांचा देखील कुठं ही दाऊदसोबत संबंध नाही. ज्यावेळी हे आरोप ( 2018 साली) गिरीश महाजन यांच्यावर झाले त्यावेळी डीसीपी समिती नेमली होती. त्यामधे स्पष्ट करण्यात आलं की दाऊद सोबत त्याचा काही संबंध नाही."

"केवळ उद्धव ठाकरे आज सभागृहात आले त्यामुळं यांनी आज गिरीश महाजन यांच्यावर आरोप करण्यात आले गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत," असं फडणवीस म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)