काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन : असा होता त्यांचा हवाई दलापासून ते राजकारणापर्यंतचा प्रवास

सुरेश कलमाडी

फोटो स्रोत, Hindustan Times via Getty Images

पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री तसंच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचं मंगळवारी (6 जानेवारी) पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते.

कलमाडी यांचं पार्थिव दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्याच्या एरंडवणेमधील कलमाडी यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 3.30 वाजता नवी पेठ वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती पुणे शहरातील काँग्रेस नेते अभय छाजेड यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेले सुरेश कलमाडी हे एकेकाळी राज्य आणि केंद्रीय राजकारणातलाही महत्त्वाचा चेहरा होते. दिल्लीतील नेत्यांशी त्यांची जवळीक होती. त्यामुळं राजकीय कारकीर्दीत त्यांना प्रचंड यश मिळाल्याचंही दिसलं होतं.

भारतीय हवाई दलाचे पायलट असलेले सुरेश कलमाडी राजकारणात आले. त्यानंतर देशाच्या क्रीडा धोरणासाठी काम करत त्यांनी ओळख मिळवली.

भारतात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचारेच आरोप झाले. नंतर या प्रकरणात त्यांना क्लीनचीट मिळाली होती.

(राष्ट्रकुल स्पर्धांवेळी कलमाडींवर आरोप झाल्यानंतर बीबीसी हिंदीने त्यांच्या प्रवासाची माहिती देणारी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यातली काही माहिती याठिकाणी देत आहोत.)

हवाई दलात पायलट

राजकारणाचा विचार करता सुरेश कलमाडी हे शरद पवारांचे नीकटवर्तीय असल्याचं मानलं जात होतं. विश्लेषकांनी तर पवार हे कलमाडींचे 'गॉडफादर' असल्याचंही म्हटलं होतं.

पवारांनी पंतप्रधान व्हावं यासाठी कलमाडींनी प्रचंड प्रयत्न केले होते, असं पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेते सांगतात.

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीधर झालेले सुरेश कलमाडी यांनी खडकवासलामधील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून पदवी घेतली होती.

सुरेश कलमाडी

फोटो स्रोत, Hindustan Times via Getty Images

भारतीय हवाई दलात ते 1965 मध्ये पायलट म्हणून सहभागी झाले होते. 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.

सुरेश कलमाडी यांनी एनडीएमध्ये हवाई दल प्रशिक्षण पथकाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले. नंतर ते हवाई दलातून निवृत्त झाले.

त्यानंतर मात्र कलमाडी यांनी राजकारणात प्रवेश केला.

1970 च्या दशकात कलमाडी यांची पुणे युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

उद्योजक कलमाडी

कलमाडी कुटुंब मूळचे कर्नाटकचे होते.

सुरेश कलमाडी यांचे वडील डॉ. के. शामराव हे पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी पुण्यात कन्नड संघ आणि कन्नड शाळेची स्थापना केली होती.

हवाई दलात सहभागी झाल्यानंतर सुरेश कलमाडी यांनी समाजवादी राजकारणी निळूभाऊ लिमये यांच्याकडून पुण्यात डेक्कन जिमखाना परिसरातलं हॉटेल पूना कॉफी हाऊस विकत घेतलं.

सुरेश कलमाडी

फोटो स्रोत, ANI

त्यावेळी ते एक लहान रेस्तराँ होतं. पण कलमाडींनी त्याचा कारभार वाढवला. अनेकांना आजही सुरेश कलमाडी यांची पूना कॉफी हाऊसच्या काळातील काऊंटरवरील आठवणीत येतात.

सत्तरच्या दशकात कलमाडींच्या पूना कॉफी हाऊससारख्या व्यवसायांची सुरुवात झाली होती.

त्या काळी कलमाडी यांची जायंट्स इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेचे नाना चुडासामा आणि नंतर शरद पवार यांच्याशी भेट झाली. शरद पवार तेव्हा काँग्रेसमध्ये होते.

पवारांशी जवळीक

अभ्यासकांच्या मते, पवारांना कलमाडींमध्ये शहरी भागातील लोकांशी उत्तम शैलीत संवाद साधण्याचा गुण दिसला होता. तसंच त्यांचा उद्योगपतींशी परिचय होता आणि त्यांचा संपर्कही चांगला होता.

पवारांच्या मदतीने, सुरेश कलमाडी 1977 मध्ये पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले आणि नंतर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

त्यावेळी संजय गांधी हे काँग्रेसमधील प्रमुख नेतृत्व होते. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते, कलमाडी अत्यंत महत्त्वाकांक्षी होते आणि त्यांना पक्षाच्या हायकमांडचं लक्ष वेधून घ्यायचं होतं.

कलमाडी आणि सोनिया गांधी

फोटो स्रोत, AFP via Getty Images

असं सांगितलं जातं की, एकदा मोरारजी देसाई पुण्याला आले होते त्यावेळी कलमाडींनी त्यांच्या गाडीवर चप्पल फेकली. ही बातमी संजय गांधींपर्यंत पोहोचली आणि कलमाडी त्यांच्या नजरेत आले.

पण उल्हास पवार यांनी त्यावेळी वेगळी माहिती दिली होती. मी त्यावेळी मोरारजी देसाईंच्या गाडीजवळ होतो. चप्पल फेकण्यात आल्याचं खरं आहे, पण ते युवक काँग्रेसचे नव्हते. त्यावेळी तिथे तीन वेगवेगळ्या संघटना निदर्शने करत होत्या," असं ते म्हणाले.

काँग्रेसमध्ये वजन वाढले

शरद पवारांनी काँग्रेसपासून वेगळं होऊन काँग्रेस एस हा नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा कलमाडी त्यांच्याबरोबर गेले. नवीन पक्षाच्या युवा शाखेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष बनले. नंतर 1986 पर्यंत ते या पदावर होते.

या काळात शरद पवारांमुळं ते 1982 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेत पोहोचले. नंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.

1991 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्याचे तत्कालीन खासदार विठ्ठलराव गाडगीळ यांचा पराभव झाल्यानंतर, कलमाडी यांनी स्थानिक काँग्रेसची सूत्रे हाती घेतली.

नरसिंह राव सरकारमध्ये ते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाले. संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करणारे ते आजपर्यंतचे एकमेव रेल्वे राज्यमंत्री आहेत.

एका स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या मते , "कलमाडी वर्तमानपत्रांमध्ये एवढ्या जाहिराती द्यायचे की संपूर्ण मंत्रालय त्यांच्यामुळंच चालत आहे असं वाटत होते. त्यांनी स्वतःची चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते एक कुशल व्यवस्थापक आहेत."

सुरेश कलमाडी

फोटो स्रोत, AFP

कलमाडी यांचे राजीव गांधींशीही चांगले संबंध होते. दोघांचंही पायलट असणे हे या चांगल्या संबंधाचं एक कारण होतं.

पुण्यात त्यांचे अनेक टीकाकार होते, तसे चाहतेही होते. एका ज्येष्ठ पत्रकारांच्या मते, पुण्यात राष्ट्रीय खेळांचे आयोजन झालं तेव्हा शहराचं रूपच बदललं.

"कलमाडींनी पुणे चित्रपट महोत्सव आणि पुणे मॅरेथॉन सुरू केलं. त्यामुळं शहराची प्रतिष्ठा उंचावली. त्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचं नेतृत्व केलं. कलमाडींनी पुण्याचा एकमेव चेहरा म्हणून स्वतःला पुढं करण्याचा प्रयत्न केला. वर्षानुवर्ष, त्यांनी शरद पवारांना आव्हान देणारे ते एकमेव नेते आहेत, हे दिल्लीतील पक्ष नेत्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला."

कलमाडी यांनी 1997 मध्ये काँग्रेस पक्ष सोडला. त्यावेळी सीताराम केसरी पक्षाचे नेते होते. पुण्यातून तिकीट मिळणार नाही, असं कलमाडींना वाटलं होतं.

क्रीडा संघटनांवर पकड

कलमाडींनी पुणे विकास आघाडी नावाचा एक नवा पक्ष स्थापन केला. पण त्याला फार चांगली कामगिरी करता आली नाही. 1999 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि नंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.

2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून त्यांना मिळालेल्या विजयासाठी शरद पवार यांनाही जबाबदार मानलं जाते.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, कलमाडींचा दिल्लीत इतका प्रभाव होता की 2009 मध्ये काँग्रेस सदस्यांचा एक गट कलमाडींविरुद्ध तक्रार करण्यासाठी सोनिया गांधींकडे गेला होता, परंतु त्यांना त्यांना भेटण्यासाठीही वेळ देण्यात आला नाही.

कलमाडींचा खेळाशी काहीही संबंध नव्हता. पण तरीही ते आधी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे प्रमुख झाले आणि नंतर भारतीय ऑलिंपिक संघटनेत प्रवेश केला.

सुरेश कलमाडी

फोटो स्रोत, MANAN VATSYAYANA/AFP via Getty Images

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप आणि क्लीन चीट

त्यानंतर भारतात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून कलमाडींवर प्रचंड टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मोठा राजकीय धक्का बसला.

2010 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या आयोजन समितीचे ते अध्यक्ष होते. क्रीडा स्पर्धांमध्ये भ्रष्टाचार, चोरी आणि कट रचल्याप्रकरणी सुरेश कलमाडी आणि इतर दहा जणांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले होते.

निकालासंबंधीच्या उपकरणांसाठी एका स्विस खाजगी कंपनीला बेकायदेशीरपणे 141 कोटी रुपयांच्या फुगवलेल्या किमतीत कंत्राट दिल्यानं सरकारी तिजोरीचं मोठं नुकसान झालं होतं असं सीबीआयनं आरोपपत्रात म्हटलं होतं.

या प्रकरणात कलमाडी यांना तुरुंगात जावे लागले आणि नऊ महिने तुरुंगात घालवल्यानंतर, त्यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी म्हणजे एप्रिल 2025 मध्ये त्यांना या प्रकरणातून ईडीने क्लीन चीट दिले होते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.