'माझ्या डोळ्यांदेखत जिवलग मित्राचा मृत्यू झाला', विद्यार्थ्याने सांगितलं एअर फोर्सच्या विमान अपघाताचं भयावह दृश्य

    • Author, अबुल आझाद, सजल दास, शाहनेवाज रॉकी आणि मुकीमुल अहसान
    • Role, बीबीसी बांगला, ढाका येथून

बांगलादेशची राजधानी ढाका शहरात एका एअर फोर्सच्या प्रशिक्षण विमानाचा भीषण अपघात झाला. हे विमान थेट शाळेच्या इमारतीवर कोसळलं, ज्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शाळेतील अनेक छोटी मुलं गंभीर जखमी झाली आहेत. अपघातानंतरचा परिसर भीती आणि आक्रोशाने भरून गेला होता.

फरहान हसननं परीक्षा संपवली होती आणि मित्रांशी बोलत बोलत तो वर्गाबाहेर येत होता, तितक्यात बांगलादेशच्या हवाई दलाचं प्रशिक्षण विमान शाळेच्या परिसरात कोसळलं, यात किमान 27 जणांचा मृत्यू झाला.

"माझ्यासमोरच जळतं विमान इमारतीवर आदळलं," असं माइलस्टोन स्कूलच्या या विद्यार्थ्यानं 'बीबीसी बांगला'ला सांगितलं.

राजधानी ढाका शहराच्या उत्तरेकडील उपनगरातल्या शाळेतील व्हीडिओमध्ये स्पष्ट दिसतं की विमान दोन मजली इमारतीवर आदळल्यानंतर मोठी आग लागली आणि काळ्या धुराचे लोट उठले.

या दुर्घटनेत 170 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

सैन्यदलांनी सांगितलं की, स्थानिक वेळेनुसार दुपारी एक वाजता प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतल्यानंतर एफ-7 विमानात तांत्रिक बिघाड झाला. या अपघातात पायलट फ्लाइट लेफ्टनंट मो. तौकिर इस्लाम यांचाही मृत्यू झाला आहे.

फरहान 'बीबीसी बांगला'शी बोलताना आपल्या काकांसोबत आणि वडिलांसोबत होता. त्यानं भावूक होत सांगितलं की, "माझा सगळ्यात जवळचा मित्र, ज्याच्यासोबत मी परीक्षेच्या हॉलमध्ये होतो, माझ्यासमोरच त्याचा मृत्यू झाला."

शाळा सुटायची वेळ आणि विमान कोसळलं

"माझ्या डोळ्यासमोरच… विमान त्याच्या डोक्यावरून गेलं. शाळा सुटत असल्यामुळे लहान मुलांना घेण्यासाठी अनेक पालक आत उभे होते… आणि विमान त्यांना घेऊनच गेलं," असं फरहानने सांगितलं.

कॉलेजमधील शिक्षक रेझौल इस्लाम यांनी 'बीबीसी'ला सांगितलं की, "मी स्वतः पाहिलं, विमान थेट इमारतीवर जाऊन आदळलं."

दुसरे एक शिक्षक, मसूद तारिक, यांनी 'रॉयटर्स'ला सांगितलं, "एक स्फोटाचा आवाज आला. मागे वळून पाहिलं तर फक्त आग आणि धूर दिसत होता... त्यावेळी इथे खूप पालक आणि लहान मुलं होती."

अपघातानंतर काही तासांतच, दाट लोकवस्तीच्या त्या परिसरात प्रचंड गर्दी जमली. अपघाताचं दृश्य पाहण्यासाठी लोक इमारतींच्या छतांवर उभे होते.

लोक घाबरून वाट दिसेल तिकडे धावत होते, तेव्हा अॅम्ब्युलन्स आणि स्वयंसेवक जखमी आणि मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी माइलस्टोन स्कूल आणि कॉलेजमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत होते.

किमान 30 अॅम्ब्युलन्स जखमी लोक आणि मृतदेह बाहेर नेताना दिसल्या.

घटनास्थळी माहिती घेण्यासाठी आलेल्या एका महिलेनं 'बीबीसी'ला सांगितलं की, अपघात झाल्यानंतर तिच्या मुलानं तिला फोन करून सांगितलं, पण तेव्हापासून त्याची काहीच खबर नाही.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लॅस्टिक सर्जरीच्या डॉक्टरांनी सांगितलं की, 50 हून अधिक लोकांना, ज्यात मुलं आणि प्रौढ दोघंही होते त्यांना भाजल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अपघातात जखमी किंवा मृत झालेल्यांचे अनेक कुटुंबीय आणि नातेवाईक रुग्णालयात होते. त्यात आठवीतल्या तन्वीर अहमदचे काका शाह आलम यांचाही समावेश होता. तन्वीरचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

"माझा लाडका पुतण्या सध्या शवागृहात आहे," असं शाह आलम म्हणाले. ते त्याच्या लहान भावाला म्हणजे तन्वीरच्या वडिलांना घट्ट धरून उभा होते, ते बोलण्याच्याही मनस्थितीत नव्हते.

बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्यांपैकी बहुतेक जण लहान मुलं आहेत. त्यांचे वय 9 ते 14 वर्षांच्या दरम्यान आहे.

अनेक सामान्य नागरिक रक्तदानासाठी रुग्णालयात आले, तर बांगलादेशमधील दोन प्रमुख राजकीय पक्ष, बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीचे काही नेते रुग्णालयात भेट देण्यासाठी आले होते.

जीवितहानी टाळण्यासाठी पायलटनं प्रयत्न केला पण...

बांगलादेशच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, ढाकामधील सात वेगवेगळ्या रुग्णालयांत जखमींना दाखल करण्यात आलं आहे. तर हंगामी सरकारने मंगळवारी देशभरात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे, त्यामुळे राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल.

सैन्यदलांनी सांगितलं की, विमानात तांत्रिक बिघाड झाल्यावर पायलटने जास्त लोकसंख्या नसलेल्या भागाकडे विमान वळवण्याचा प्रयत्न केला होता. विमानाने ढाक्यातील एअर फोर्स बेसमधून नुकतंच उड्डाण घेतलं होतं.

या घटनेची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, असं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे.

बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी सांगितलं की, घटनेचं कारण शोधण्यासाठी 'आवश्यक ती सर्व पावलं' उचलली जातील आणि 'सर्व प्रकारची मदत' दिली जाईल.

ते म्हणाले, "हा संपूर्ण देशासाठी खूप दुःखाचा क्षण आहे. जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो आणि सर्व संबंधित यंत्रणांना विशेषतः रुग्णालयांना, ही परिस्थिती पूर्ण गांभीर्याने हाताळण्याच्या सूचना देतो," असं त्यांनी सोशल मीडिया साइट 'एक्स' वर म्हटलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.