'ब्लॅक बॉक्स थिएटर' : नाट्यगृहांमध्ये एक प्रकारची शांत चळवळ सुरू झालीये का? ती नेमकी काय आहे?

 कोविडनंतर इथं येणा-यांची संख्या, प्रयोगांची संख्या लक्षणीय वाढली.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, कोविडनंतर इथं येणा-यांची संख्या, प्रयोगांची संख्या लक्षणीय वाढली.
    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुंबईच्या वर्सोवा उपनगरातल्या आरामनगरची संध्याकाळ. काही मोठ्या काही छोट्या आधुनिक इमारतीसोबतच कोळी वसाहतीतसारखी छोटीही घरं.

त्यातून पळणाऱ्या गल्ल्या. इथल्या एका छोट्या घरासमोर आम्ही थांबतो. म्हणजे, बाहेरुन तरी हे घरच वाटतं. वर एक छोटा मजला आणि बाहेरुन नंतर जोडण्यात आलेला एक माडीवजा जिना.

सूर्यास्त झाला आहे, अंधार पडू लागला आहे. दोन माणसं जातील एवढ्या छोट्या गेटमधून आत जातो.

समोर एक निळा दरवाजा आहे. त्याच्या बाजूला पाटी आहे. 'हरकत स्टुडिओ'. त्याच्या बाजूला (बहुतेक पुढच्या आठवड्यात होणा-या) कार्यक्रमांची पोस्टर्स आहेत.

निळ्या दरवाज्यातून आम्ही आत जातो. डोळ्यासमोर अंधार. मग समजतं की एक काळी भिंत दोन पावलांवर आहेत आणि तिच्या कडेकडेनी डाव्या बाजूला जायचं आहे. तसं जातो आणि उजव्या बाजूनं एक प्रकाश तुमच्याकडे येतो. नजर स्थिरावते. आम्ही एका थिएटरमध्ये उभे आहोत.

'हरकत स्टुडिओ'

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, 'हरकत स्टुडिओ'

साधारण 50 तेत 60 लोक बसतील एवढीच व्यवस्था. हळू हळू लोक येऊ लागतात.

काही मांडी घालू बसतात, काही खुर्च्यांवर. समोर याच प्रमाणात छोटा रंगमंच. साधारण पंधरा बाय पंधरा फूट उंचीनं प्रेक्षकांच्याच पातळीवर असणारा.

पडदा काळा, विंगा काळ्या, भिंती काळ्या, दारं काळी. हा एक Black Box आहे. सगळ्या बाजूंनी काळा बॉक्स असणारं एक नाट्यगृह.

तेवढ्या आटोपशीर जागेत नाटक सुरु होतं आणि रंगमंच आणि प्रेक्षकांतली सीमा पुसून जाते. ते एकाच अवकाशाचा भाग बनतात. ते एकाच पातळीवर असतात.

साधारण 50 तेत 60 लोक बसतील एवढीच व्यवस्था.

फोटो स्रोत, Sharad Badhe/BBC

फोटो कॅप्शन, साधारण 50 तेत 60 लोक बसतील एवढीच व्यवस्था.

रंगभूमीवर सध्या काही नवीन घडतं आहे. नवनवी नाटकं तर होत आहेतच. पण त्याचबरोबर नाट्यगृहांमध्येच एका प्रकारची शांत चळचळ सुरू आहे.

ती घडवण्यात कलाकारांची गरज आहे आणि तेवढीच प्रेक्षकांचीही. ही 'ब्लॅक बॉक्स थिएटर'ची चळवळ आहे.

'प्रेक्षकांना वाटतं, फक्त माझ्यासाठीच नाटक सुरू'

"मला वाटतं की प्रेक्षकांना ते अगोदरपासूनच हवं होतं, फक्त अनुभव घेईपर्यंत त्यांना ते माहिती नव्हतं," 'हरकत स्टुडिओ'च्या को-फाऊन्डर मिका तलवार सांगतात.

'हरकत' सुरू होऊन दहा वर्षं झाली, पण कोविडनंतर इथं येणाऱ्यांची संख्या, प्रयोगांची संख्या लक्षणीय वाढली.

ब्लॅक बॉक्स थिएट

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC Marathi

"रंगमंचाच्या मी इतक्या जवळ बसू शकते की जणू समोरचं नाटक फक्त माझ्यासाठीच सुरु आहे. हा अनुभव प्रेक्षकांसाठी नवा होता. ते त्यांना हवहवसं वाटू लागलं," असं मिका सांगतात.

"प्रत्येक कलेचं स्वत:चं एक माध्यम असतं आणि त्यानुसार व्यासपीठही असतं. सिनेमा तुम्ही मोठ्या पडद्यावरही पाहता आणि कम्प्युटरवरही पाहता. अनुभव मात्र वेगवेगळे असतात. नाटकांचं किंवा प्रत्यक्षदर्शी कलांचंही तसंच असतं," करण तलवार म्हणतात.

ग्राफिक्स

फोटो स्रोत, BBC Marathi

'हरकत' सारखा स्टुडिओ बाहेरुन पाहाल तर इथं नाटकं वगैरे होतात असं कोणाला वाटणारंही नाही. पण आत Black Box आहे, जिथं नवनवे प्रयोग होत असतात.

मुंबईच्या या भागात हे केवळ असं एकमात्र थिएटर नाही. नेमका आकडा कोणालाही माहिती नाही, पण वीसहूनही अधिक छोटी थिएटर्स या उपनगरात आहेत असं सांगितलं जातं.

गेल्या काही वर्षांत रंगभूमीवर हे काही नवीन घडून येतं आहे. केवळ पुण्या-मुंबईत नाही तर नाशिक, कोल्हापूर अशा शहरांमध्येही होतं आहे.

छोटी नाट्यगृहं अथवा ब्लॅक बॉक्स थिएटर्स तयार होत आहेत आणि तिथं वेगवेगळे रंगाविष्कारही होत आहेत.

नवी रंगभाषा, नवीन नाट्यगृहं

मोठ्या नाट्यगृहांच्या आणि प्रयोगांच्या साच्यातून बाहेर पडून कलाकार आणि प्रेक्षकांमधली दरी मिटवणारी ही नाट्यगृहं आहेत. ज्याला इंटिमेट थिएटर किंवा समीप रंगभूमीही म्हटलं जातं.

पुण्या-मुंबईतल्या प्रायोगिक नाटकांच्या चळवळीनं पूर्वीही असे प्रयोग केले होते, पण आता त्याला एक गंभीर व्यावसायिक स्वरुपही याचं शहरांमध्ये येतं आहे. नवे रंगाविष्कार होत आहेत, नवी रंगभाषा तयार होते आहे.

ब्लॅक बॉक्स थिएटर

फोटो स्रोत, BBC Marathi

खरं तर अशा छोट्या रंगमंचांचे प्रयोग यापूर्वीही भारतीय रंगभूमीवर झाले आहेत. नाटक हा त्रिमितीय अविष्कार मर्यादांमध्ये अडकून न राहता कुठेही सादर होऊ शकतो, हे अनेक मोठ्या नाट्य कलावंतांनी करुन दाखवलं.

उदाहरणार्थ भारतभर असणारी पथनाट्यांची एक परंपरा. राजकीय भाष्यासाठीही ही रस्त्यावर केली गेलेली नाटकं महत्वाची ठरली.

सांगायचं हे की, महाराष्ट्राची व्यावसायिक रंगभूमी ही मोठी असली तरीही पुण्या मुंबईतून इतरत्र पसरलेल्या प्रायोगिक आणि हौशी रंगभूमीनं यापूर्वीही छोट्या, आटोपशीर, बॉक्ससारख्या रंगमंचावर प्रयोग केले आहेत. आज त्याला एक नवं व्यावसायिक रुप येतं आहे.

"अगोदर छबिलदास होतं. ती शाळा होती. मग त्या शाळेनं बाहेर काढल्यावर मुंबईचे 'अविष्कार'वाले लोक माहीममध्ये गेले. मग माहीममधनं बाहेर पडले तेव्हा जागा शोधावी लागली. म्हणजे थोडक्यात बिऱ्हाड पाठीवर घेऊन हिंडणं हे काही टळलं नाही. आपली एक जागा असावी या हेतूचा एक प्रयत्न चालू होता," असं रंगकर्मी अतुल पेठे सांगतात.

अशा छोट्या रंगमंचांचे प्रयोग यापूर्वीही भारतीय रंगभूमीवर झाले आहेत.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, अशा छोट्या रंगमंचांचे प्रयोग यापूर्वीही भारतीय रंगभूमीवर झाले आहेत.

"पुण्यात 90 च्या दशकात दामले कुटुंबीयांनी 'सुदर्शन रंगमंच' सुरू केलं. तिथून पुण्याचे जे तरुण लोक होते त्यांना एक हक्काची जागा मिळाली. मग ज्योत्स्ना भोळे सुरु झालं. पुढे डॉ लागूंच्या कुटुंबानं आर्थिक मदत केल्यावर 'डॉ श्रीराम लागू रंगअवकाश' सुरू झालं. ते एका संस्थेनं उभं केलं होतं," अतुल पेठे पुढे सांगतात.

"पण एका व्यक्तीनं, प्रदीप वैद्यनं, हे 'द बॉक्स' सारखं थिएटर सुरू केलं. वस्तुत: रेस्कॉन नावाच्या एका कंपनीतल्या या शेड्स आहेत. त्या बंद पडल्या होत्या. त्या त्यांनी घेतल्या आणि त्या रुपांतरित केल्या प्रयोगांसाठी. एका प्रकारे आपण ज्याला सुयोग्य जागा म्हणू, म्हणजे काळे पडदे आहेत, विंगा आहेत, दिवे आहेत, प्रेक्षकांच्या सगळ्या गरजा आहेत. मुख्य म्हणजे या सगळ्याचं व्यवस्थापन नाट्यप्रेमी मंडळी करतात," अतुल पेठे या 'बॉक्स'मध्येच बसून आमच्याशी बोलत असतात.

ब्लॅक बॉक्स थिएटर

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

या 'बॉक्स' थिएटरमध्ये अतुले पेठे त्यांचं वीस वर्षांपूर्वीचं नाटक 'साठेचं काय करायचं' चे पुन्हा प्रयोग करत आहेत. त्याच्या तालमीच्या वेळेसच ते भेटतात.

पुण्याच्या मध्यभागात कोविडकाळानंतर सुरू झालेलं, 'द बॉक्स' थिएटर किंवा 'द बॉक्स हब'. कधीकाळी छोट्या उद्योगांचे वर्कशॉप्स असणारे हे गाळे, आता कलाविष्कारांचे छोटे बॉक्स झाले आहेत.

या छोटेखानी बॉक्सेसमध्ये नाटकं होतात, प्रदर्शनं होतात, कवितावाचन होतं, गाण्याचे कार्यक्रम होतात, स्टॅन्ड अप कॉमेडी शोज होतात. हे मल्टिडिसिप्लिनरी बॉक्सेस आहेत.

ग्राफिक्स

फोटो स्रोत, BBC Marathi

रुपाली आणि त्यांचे पती प्रदीप वैद्य यांनी मिळून हे 'द बॉक्स हब' पुण्यात सुरु केलं. आज ती नाट्यप्रेमी पुण्यातली एक गजबजलेली जागा बनली आहे.

"आमचं जे प्रेक्षक बसण्याचं फर्निचर आहे ते सगळं फोल्ड करुन रचता येतं. म्हणून तुम्हाला खरोखरच एक मोकळा काळा बॉक्स मिळू शकतो ज्यात तुम्ही हवं तसं परफॉर्म करु शकता. मध्ये परफॉर्म केलं आणि चारही बाजूंनी प्रेक्षक बसले आहेत अशा रचनेपासून ते नेहमी करतो तसं, म्हणजे एकीकडे प्रेक्षक आणि समोर नाटक, अशा रचनेतही परफॉर्म करता येईल. त्यामुळे व्हर्सटेलिटी तयार होते," रुपाली सांगतात.

तरुण कलाकारांसाठी महत्वाची जागा

या नव्या बॉक्स थिएटर्सचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती अपारंपारिक जागी तयार झाली आहेत. म्हणजे जिथं आपण नाटकाची वा कलाविष्कारांची कल्पनाही कदाचित करणार नाही.

साहित्यकृतींचं अभिवाचनही इथं होतं.

फोटो स्रोत, Mayuresh Konnur/BBC

फोटो कॅप्शन, साहित्यकृतींचं अभिवाचनही इथं होतं.

खरं तर ब्लॅक बॉक्स ही जगभरात सर्वत्र आहेत. साधारण 60 च्या दशकात अमेरिकेत Black Box थिएटर्स येऊ लागली. तिथून ती युरोपातही पसरली.

भारतात गेल्या काही वर्षांत स्टॅन्ड अप शोजनी त्याला चालना दिली. बघता बघता नाटकं आणि इतर कलाही तिथं होऊ लागल्या. प्रॉडक्शन कॉस्टही कमी असल्यानं नव्या कलाकारांच्या नव्या प्रयोगांना सहज संधी मिळाली.

ग्राफिक्स

फोटो स्रोत, BBC Marathi

प्रसिद्ध मराठी स्टॅन्ड अप कॉमेडियन आणि 'भाडिपा'चा सहसंस्थापक सारंग साठे याच्या मते हा छोट्या जागा तरुण कलाकारांसाठी खूप महत्वाच्या ठरत आहेत. विशेषत: ज्यांना सोलो शोज करायचे आहेत.

"मुख्य म्हणजे इथे प्रयोग करण हे लॉस मेकिंग नाही आहे. स्टॅन्ड अप च्या सोलो शो साठी फार फार तर खर्च काय आहे तर आपण फेसबुकवर पैसे लावून ते पुश केलं. त्याचे हजारभर पैसे. त्या छोट्या प्रेक्षागृहात 200 रुपये प्रमाणे 100 तिकिटं जरी विकू शकलो तरी 20000 रुपये होतात. हे सोडून काही खर्च नाही. अनेक जागा या प्रॉफिट शेअरिंगवर चालतात. त्यामुळे नवीन कॉमिकसाठी या जागा आवश्यक आहेत," असं सारंग सांगतो.

भारतात गेल्या काही वर्षांत स्टॅन्ड अप शोजनी ब्लॅक बॉक्सला चालना दिली.

फोटो स्रोत, Sarang Sathe BhaDiPa

फोटो कॅप्शन, भारतात गेल्या काही वर्षांत स्टॅन्ड अप शोजनी ब्लॅक बॉक्सला चालना दिली.

सोशल मीडिया सोबत वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरही या थिएटर्सच्या जाहिराती आणि तिकिटविक्री होत असते.

उदाहरणार्थ तिकिट खिडकी या वेबसाईटवर पुण्या मुंबईसोबत इतर शहरांमधले असे छोटे रंगमंच आणि वैविध्यपूर्ण प्रयोग तुम्हाला दिसतील. म्हणजे प्रेक्षकही पैसे देऊन अशा प्रयोगांना छोट्या रंगमंचांकडे जात आहेत.

"लोक देतात पैसे याला नक्की. पण कोण आर्टिस्ट परफॉर्म करतो आहे हाही मुद्दा आहे. मुख्यत: स्टॅन्ड-अप मध्ये मोठेमोठे आर्स्टिस्ट छोट्या जागांमध्ये परफॉर्म करतात. तेव्हा त्यांचं तिकिट हजार रुपयांच्या पुढेही असतं.

म्हणजेच या जागांमध्ये 100 ते 1000 आणि कधीकधी त्याच्या पुढेही तिकिटांची किंमत आहे. पण काय कार्यक्रम आहे त्याच्यावर अवलंबून आहे. कोण सादर करतं आहे हे महत्वाचं आहे," 'तिकिट खिडकी' या वेबसाईटचे कुशाल खोत सांगतात.

कोविडनंतर छोटी नाट्यगृहं का वाढत आहेत?

सहज आणि स्वस्त असं जरी या Black Box चं अर्थकारण असलं तरीही या प्रकारची इंटिमेट थिएटर्स मूळ धरू लागण्याचं एक मुख्य कारण म्हणजे कोविड काळानंतर बदललेलं आयुष्य.

प्रत्यक्ष अनुभव घेण्याची एक गरज प्रत्येकाला वाटू लागली. लॉकडाऊनमध्ये अडकल्यावर प्रवासाची जशी उर्मी दाटून आली, तशी कलांच्या प्रत्यक्षानुभवाचीही.

त्या अनुभवासाठी समीप रंगभूमी आहे. त्यामुळे बहुतांश Black Box थिएटर्स कोविडनंतर सुरू झाली.

बहुतांश Black Box थिएटर्स कोविडनंतर सुरू झाली.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

फोटो कॅप्शन, बहुतांश Black Box थिएटर्स कोविडनंतर सुरू झाली.

"लोकांना त्यावेळेस जगण्याची किंमत कळली आणि मरणाचा अर्थ कळला. मुख्य म्हणजे माणसं माणसांना भेटणं. कारण नाटक ही कला अशी आहे ज्यात जिवंत माणसं जिवंत माणसांसमोर काहीतरी करतात.

एका पातळीवर असुरक्षिततेतनं, नुसतं नाटकच काय लोक प्रवास करु लागले. नेणिवेच्या पातळीवर नश्वरता म्हणजे काय हे लोकांना जास्त उमगू लागलं," अतुल पेठे सांगतात.

किरण यज्ञोपवित नाट्यलेखक आणि दिग्दर्शक आहेत. पुण्यात 'महाराष्ट्र कल्चरल सेंटर' या संस्थेचे पदाधिकारीही आहेत. या संस्थेचं 'श्रीराम लागू रंग अवकाश' हे असंच एक नवं छोटं इंटिमेट थिएटर.

"पोस्ट कोविड प्रत्यक्षदर्शी कलांकडे बघण्याचा माणसांचा दृष्टिकोन पुष्कळ बदलला आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की, कोविड संपल्या संपल्या लोक रिव्हेन्ज टुरिझम मध्ये गेली."

"पोस्ट कोविड प्रत्यक्षदर्शी कलांकडे बघण्याचा माणसांचा दृष्टिकोन पुष्कळ बदलला."

फोटो स्रोत, Mayuresh Konnur/BBC

फोटो कॅप्शन, "पोस्ट कोविड प्रत्यक्षदर्शी कलांकडे बघण्याचा माणसांचा दृष्टिकोन पुष्कळ बदलला."

लॉकडाऊनच्या काळात घरात अडकल्यानं सतत मोबाईल वा कम्प्युटरवर वेगवेगळ्या गोष्टी पाहण्याचा अतिरेक झाला होता.

ओटीटीचाही एक भडीमार झाला होता. त्या अतिरेकातूनच लोकांची प्रत्यक्षानुभूती घेण्याची भावना वाढीस लागली असंही रंगकर्मींना वाटतं.

"माझं जे 'होल बॉडी मसाज' नावाचं नाटक आहे, ते आम्ही मोठ्या रंगमंचावर करुन बघितलं. सपशेल आपटलं. मग असं लक्षात आलं की, याला इंटिमसीचा जो अनुभव आहे, म्हणजे त्या माणसाच्या जगण्याचा भाग होणं किंवा ते अगदी जवळून त्या संवेदनांपर्यंत जाणं, हे जे इंटिमेट स्पेसमध्ये होतं आहे ते मोठ्या रंगअवकाशात होणार नाही आहे. त्यामुळे ही जागा तयार झाली कारण आता विचारही तसा होतो आणि प्रेक्षकही अनुभव तशा पद्धतीनं घेऊ इच्छितात," यज्ञोपवित सांगतात.

भारतीय रंगभूमी कायम प्रवाही राहिली आहे आणि इथल्या रसिकांची अभिरुचीही. नवं घेणं, प्रयोग करणं इथं कायम सुरु असतं. त्यात एक नवा अध्याय सुरू होतो आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूरूमचे प्रकाशन