जागतिक रंगभूमी दिन : कोणती चुंबकीय शक्ती सर्वसामान्य माणसाला नाटक बघायला प्रवृत्त करते?

फोटो स्रोत, Screenshot/Everest Marathi
- Author, जयंत पवार
- Role, नाटककार
(जयंत पवार यांनी जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नाटकविश्वाचा धांडोळा घेणारा लेख बीबीसी मराठीसाठी 2018 मध्ये लिहिला होता. या लेखात प्रस्तुत केलेले मुद्दे आजही प्रासंगिक वाटतात. हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)
खरंतर नाटकवाल्यासाठी तो ज्या दिवशी नाटकाचा प्रयोग करतो, तो त्याचा रंगभूमी दिन असतो. त्याच्यासाठी प्रयोग म्हणजे रंगभूमीचं सेलिब्रेशन असतं आणि या उत्सवाच्या सिद्धतेसाठीच तो सतत तयारी करत असतो. नाटक डोक्यात घेऊन वावरत असतो. खरा नाटकवाला हा 24 तास नाटकवाला असतो, असं म्हणतात ते त्यासाठीच असावं.
पण कधीतरी इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट या संस्थेने जागतिक रंगभूमी दिन साजरा करायला सुरुवात केली. नेमकं सांगायचं तर 1962 सालापासून. आणि 27 मार्च ही तारीख त्यासाठी मुक्रर केली.
आपल्याला असा काही दिवस असतो, हे फार काही माहीत नव्हतं. गेल्या 20-25 वर्षांत हे आपल्या कानावर यायला सुरुवात झाली.
मराठी नाटकवाले गेली कैक वर्षे 5 नोव्हेंबर हा दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा करताहेत. 1843 साली या दिवशी विष्णुदास भावे यांनी 'सीतास्वयंवर' या नाटकाचा प्रयोग सांगलीत केला. या मराठीतल्या पहिल्या नागर नाट्यप्रयोगाची आठवण म्हणून हा दिवस.
आपण तो वेगवेगळे समारंभ, कार्यक्रम करून साजरा करतो. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने (ITI). मात्र जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्याची वेगळी पद्धत अवलंबिली आहे.


या दिवशी जगातल्या विविध देशांतल्या रंगकर्मींपैकी एका मान्यवर व्यक्तीला रंगभूमीविषयी संदेशवजा विचार मांडायला सांगितलं जातं आणि ते भाषण अथवा संदेश जगभर प्रसारित केला जातो.
यात जॉन कॅक्त्यूपासून आर्थर मिलर, हेरॉल्ड पिंटरसारख्या जगविख्यात नाटककार-रंगकर्मींनी नाटकाविषयीचं आपलं चिंतन मांडलं आहे.
नाटक म्हणजे काय, नाटकाचं सामर्थ्य काय, त्याच्या पुढची आव्हानं कोणती आणि नाटकवाल्यांचं कर्तव्य काय या विषयीचे हे विचार आपल्या नाटकाकडे बघण्याच्या धारणा मुळापासून तपासायला लावतात.

फोटो स्रोत, Getty Images
इसवी सनापूर्वी पाचव्या शतकात ग्रीक रंगभूमीवर झालेल्या नाटकांपासून ते आजतागायत जगभर नाटकं होत आहेत. म्हणजे जवळपास अडीच हजार वर्षांहून अधिक काळ नाटक नावाची गोष्ट आपल्यावर गारुड करते आहे. ती अनेक कालखंडांतून गेली, तिनं अनेक स्थित्यंतरं पाहिली, बहर पाहिले, मरणासन्न अवस्था अनुभवल्या. अगदी आजही जागतिकीकरणोत्तर कालखंडात नाटकासमोर अनेक बिकट आव्हानं निर्माण झाली आहेत.
त्यांना सामोरं जाताना नाटकाची दमछाक होते आहे. नाटक मरतंय, अशी बोंब जगभर मारली जातेय आणि तरीही सगळीकडे नाटक खेळलं जातंय, पाहिलं जातंय.
खेळणारे दमले, कमी झाले, बघणारे घटले तरी नाटक टिकलेलं आहे. ते का टिकलं आहे? नाटक करणाऱ्यांना, करू इच्छिणाऱ्यांना का त्याचं आकर्षण वाटत राहिलं आहे? कोणती चुंबकीय शक्ती सर्वसामान्य माणसाला नाटक बघायला प्रवृत्त करते? या प्रश्नांचं उत्तर आहे 'जादू.'

थिएटर मॅजिक नावाची अशी एक गोष्ट आहे की ती स्वत:च्या आत इतरांना खेचून घेते आणि आपल्यातलं गूढ कलावंतांना शोधायला भाग पाडते.
कोणीतरी रंगमंचाला 'जादूचा पेटारा' म्हटलंय. तुम्ही नाटक पाहायला जाता, तेव्हा मिट्ट काळोख केलेला असतो. त्या काळोखात शिरल्यावर तुम्ही एकटे होता.
काही वेळानं पहिली, दुसरी, तिसरी घंटा होते आणि तुम्ही एकाग्र होता. पडद्याआडून श्रेयनामावली वाचली जाते. पडदा आतून उजळतो. तुम्ही अधिक टोकदार होता आणि उत्कंठेनं बघू लागता. पडदा दुभंगतो आणि उजळलेला रंगमंच दिसतो. हाच तो जादूचा पेटारा.
जादुगार जसा आपल्या पेटाऱ्यातून एकेक वस्तू काढत आपली करामत दाखवतो तशी रंगमंचावर एकेक पात्रं येतात. जादूच्या खेळात जसे तुम्ही नजरबंद होता, तसंच मंत्रभारलेपण रंगमंचावरच्या गोष्टी बघताना येतं आणि तुम्ही स्वत:ला त्या पात्रांच्या मागोमाग नेऊ लागता.
ते बोलेल त्यावर विश्वास ठेवता. समोरचा नट कोणी अमूक तमूक आहे, हे तुमच्या लक्षात असतं, पण आता तो रंगमंचावर कोणी अमूक तमूक झालाय यावर तुमचा पक्का विश्वास बसतो. ह्या दोन्ही जाणिवा कमीअधिक बाळगत तुम्ही नाटकाच्या स्वाधीन होता. एका खऱ्या वाटणाऱ्या खोट्या खेळात खरं खरं सामील होता, हीच ती नाटकाची जादू.

ती बघणाऱ्याला जशी मोहित करते तशीच करणाऱ्यालाही. रंगमंचीय अवकाशाच्या पोकळीत नट अवतरतो. झगझगीत प्रकाश अंगावर पडताच त्याचा कायापालट होतो.
त्या पोकळीतला अवकाश तो आपल्या शब्दांनी आणि शरीरानं भरून टाकतो. ते शब्द लेखक पुरवतो, दिग्दर्शक त्याला हालचाली देतो पण रंगमंचावर नट स्वायत्तपणे शब्द-शरीराचं मायाजाल विणत जातो.
तिसरी जादूभरी गोष्ट अशी की नाटक करणारा आणि बघणारा. दोघांच्यात हा जिवंत व्यवहार साक्षात होत असतो. ही गोष्ट नाटकाला चित्रपट आणि टीव्ही माध्यमांपासून वेगळं काढते, शक्तिशाली बनवते.
शेक्सपिअरनं 'जग ही एक रंगभूमी आहे' असं म्हटलंय, हे सर्वश्रुत आहे. पण हे उलटं करूया. रंगभूमी हे एक जग आहे. असं जग जे आतून आणि बाहेरूनही पाहता येतं. त्याची वेगवेगळी रूपं बघता येतात.
प्रेक्षागृहातून दिसणारं नाटक वेगळं असतं आणि विंगेतून दिसणारं नाटक वेगळं असतं. बॅकस्टेजला नाटक वेगळ्या आवाजात ऐकू येतं आणि बॅकस्टेजला एक वेगळंच स्वतंत्र नाटक समांतरपणे घडत असतं.

फोटो स्रोत, Getty Images
रंगमंचावर वावरणारा नट, त्याला शब्द पुरवणारा, एक नाट्यानुभव घडवणारा लेखक, नटाच्या हालचाली आणि रंगमंचीय व्यवहार नीयत करणारा दिग्दर्शक हे तर प्रतिविश्वामित्रच असतात.
विजया मेहता म्हणत, 'मी नाटक मागच्या रांगेतून बघते. प्रेक्षकांच्या डोक्यांच्या रेषांवरून रंगमंचावरचा प्रयोग वेगळा दिसतो. त्यात प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया/प्रतिसाद मिसळलेले असतात.
'आपलं नाटक रंगतंय की कोसळतंय हे दिग्दर्शकाला तिथून चांगलं कळतं.' असा हा व्यवहार करणारे-बघणारे आपली बाहेरच्या जगाची ओळख टिकवून आतलं जग साकारत असतात.
असा जगाचा आतून आणि बाहेरून येणारा अनुभव आपल्याला प्रत्यक्ष जगतानाही येत नाही. त्यासाठी वेगळी सिद्धी लागते. नाटकात मात्र तो सहज येऊ शकतो आणि कुणालाही येतो, हीच त्याची थोरवी.
आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बुद्ध जे म्हणतो की, जग अनित्य आहे, ते तत्त्व तर नाटकाचा प्राण असतो. रंगमंचावर निर्माण झालेला प्रत्येक क्षण इतका टवटवीत असतो की दुसऱ्याच क्षणी तो मरून जातो.

फोटो स्रोत, Getty Images
दुसरा क्षण तितकाच नवा आणि मरणारा असतो. त्यामुळे नाटकात सतत नवे क्षण जन्म घेतात. चित्रपटात चिरकालिकता असेल पण ही नित्यनूतनता नाही.
असं हे नाटक आजच्या जागतिकीकरणोत्तर कालखंडात अरिष्टात सापडलंय खरं. कारण तंत्रयुगानं असे काही दिव्य चमत्कार घडवले आहेत की नाटकासारख्या गरीब माणसाला ते झेपणारे नाहीत. भव्यता, नेत्रदीपकता हा आज परवलीचा शब्द आहे.
महाइव्हेंटच्या जमान्यात बाजाराने खूप महागडी आव्हानं कलामाध्यमांच्यासमोर उभी केली आहेत. तुमच्यासमोर सतत जागतिक होण्याचं आव्हान ठेवलं जात आहे आणि हे जागतिकीकरण बाजारकेंद्री आहे.
मार्केट मिशनरीजचे फोर्सेस वापरून कला जगवण्याचे नवे फंडे शोधले जात आहेत. यात नाटक मागे पडणार हे साहजिकच आहे. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, गरीब असणं हीच नाटकाची शक्ती आहे. ते कमी नेपथ्यात, मोजक्या प्रकाशात, कमीत कमी अवडंबर करून खेळलं जाऊ शकतं.
नाटक कोणीही करू शकतं. नटाच्या शरीराचा, लेखकाच्या शब्दाचा वापर पूर्ण क्षमतेने करून छोट्याशा रंगमंचीय वर्तुळातही दिव्य अनुभव देण्याची ताकद नाटकात आहे.
मुळात नाटक हे कम्युनिटी रिच्युअल असतं. ते विशिष्ट समूहाचं, त्याच्या अभिव्यक्तीचं, त्याच्या शैलीचं असतं. ते पूर्णपणे प्रादेशिक असतं. त्या त्या मातीतलं असतं. ते जागतिक नसतं.

फोटो स्रोत, Getty Images
म्हणूनच प्रत्येक ठिकाणचं नाटक वेगळं असतं. विख्यात नाट्यदिग्दर्शक बी. व्ही. कारंथ म्हणायचे, "नाटक झाडासारखं असतं. आधी त्याची मुळं मातीत खोल रुजली पाहिजेत, तरच त्याच्या फांद्या आकाशात जातील."
मला वाटतं, नाटकाचं हे सर्वसामान्यांशी असलेलं नातं आणि दिव्य अनुभूती देण्याची क्षमता हे गुणच जागतिकीकरणात नाटकाला टिकवू शकतील. नाटक हे जागतिकीकरणाला आव्हान ठरेल. कारण त्यातली कलातत्त्वं वैश्विक असली तरी त्याचं सत्त्व हे प्रादेशिकच असेल.
यावर्षी जागतिक रंगभूमी दिनाला नाट्यविचार मांडण्याची संधी आशिया खंडातून आपल्या देशातील रंगकर्मी आणि दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक राम गोपाल बजाज यांना मिळाली आहे.
आपल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे, "नाटकाचा रूपबंध (form) ही आजच्या नाटकाची समस्या नाही. आजच्या नाटकाची समस्या ही त्यात आशय भरण्याची आणि विधान करता येण्याची आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











