'I Love Muhammad' चा वाद नेमका काय आहे? देशभरात आंदोलनं, FIR आणि अटकसत्रं का सुरू आहेत?

'आय लव्ह मोहम्मद' बॅनर घेऊन महिला

फोटो स्रोत, SUMAIYYA RANA

फोटो कॅप्शन, उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये बारावफात (ईद मिलाद-उन-नबी) निमित्त 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर लावल्यावरून वाद झाला.
    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये बारावफात (ईद मिलाद-उन-नबी) निमित्त 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर लावल्यावरून वाद झाला.

यानंतर एफआयआर दाखल झाल्यानंतर उत्तर प्रदेशसह देशातील अनेक शहरांत मुस्लीम समाजानं आंदोलन केलं आहे.

विविध शहरांमध्ये काही एफआयआर दाखल झाले असून याप्रकरणी काहींना अटकही करण्यात आली आहे.

उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये रविवारी (21 सप्टेंबर) 'आय लव्ह मोहम्मद' बॅनरसह काढलेल्या मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. याप्रकणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

त्याचवेळी, उत्तर प्रदेशामधील उन्नावमध्ये रविवारी मोर्चा काढल्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अनेक लोकांचा आरोप आहे की, पोलीस मुस्लीम समाजाला त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त करण्यासाठी मुद्दाम लक्ष्य करत आहेत.

मात्र, कानपूर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, एफआयआर 'आय लव्ह मोहम्मद' बॅनर लावल्यामुळे नव्हे, तर परंपरेने लावण्यात येत असलेल्या जागेवर तंबू न उभारता दुसऱ्याच ठिकाणी तो उभारल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उत्तर प्रदेश सरकारमधील एक मंत्र्यानेही 'धर्माच्या आधारावर कोणालाही लक्ष्य केलं जात नाही', असं म्हटलं आहे.

ग्राफिक्स

गुगलवर 'BBC.com'ला तुमच्या पसंतीचा सोर्स म्हणून जोडण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

कानपूरमध्ये नक्की काय झालं होतं?

कानपूर पश्चिमचे डीसीपी दिनेश त्रिपाठी म्हणाले की, "रावतपूर परिसरात बारावफातची पारंपरिक मिरवणूक निघणार होती. परिसरातील लोकांनी नेहमीच्या जागेऐवजी वेगळ्या ठिकाणी तंबू लावला आणि 'आय लव्ह मोहम्मद'चा बॅनरही लावला. एका गटाने त्याला विरोध केला. नंतर दोन्ही गटांच्या सहमतीने बॅनर जुन्याच जागी लावला गेला."

दिनेश त्रिपाठी यांनी दावा केला की, एफआयआर 'आय लव्ह मोहम्मद' या बॅनरसाठी नाही, तर नेहमीच्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी तंबू लावल्यामुळे आणि मिरवणुकीदरम्यान एका पक्षाने दुसऱ्या पक्षाचे पोस्टर फाडल्यामुळे नोंदवण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, मुस्लीम समाजाने 'आय लव्ह मोहम्मद' बॅनर लावून नवीन परंपरेची सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचा 'दुसऱ्या समाजाने विरोध केला.

हा एफआयआर मिरवणुकीदरम्यान तिथे तैनात असलेल्या पोलिसांकडून नोंदवण्यात आली आहे.

'आय लव्ह मोहम्मद' बॅनरसोबत स्थानिक लोक

फोटो स्रोत, ABHISHEK SHARMA

फोटो कॅप्शन, कानपूरमध्ये 'आय लव्ह मोहम्मद' बॅनरवरून एफआयआर दाखल केल्यानंतर त्या विरोधात आंदोलनं झाली.

मिरवणुकीदरम्यान दुसऱ्या समाजाचे धार्मिक पोस्टर फाडण्यात आल्याचा दावाही एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

कानपूरच्या रावतपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 196 आणि 299 अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये दोन गटांमधील वैमनस्य वाढवणं आणि द्वेष पसरवण्याचा आरोप आहे.

एफआयआरमध्ये मिरवणुकीचे आयोजक आणि इतर अनेक लोकांच्या नावाचा समावेश आहे. या घटनेप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे कानपूर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

स्थानिक पत्रकार अभिषेक शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅनर लावल्यावरुन 4 सप्टेंबर रोजी वाद झाला होता आणि दुसऱ्या दिवशी बारावफात मिरवणूक काढण्यात आली. मात्र एफआयआर 10 सप्टेंबरच्या सायंकाळी दाखल करण्यात आला.

सोशल मीडियावर संताप आणि आंदोलनं

कानपूरमध्ये 'आय लव्ह मोहम्मद' बॅनरवरून वाद आणि एफआयआरनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला.

एआयएमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी 15 सप्टेंबर रोजी कानपूर पोलिसांना टॅग करत एक्सवर पोस्ट केली की, " 'आय लव्ह मोहम्मद', कानपूर पोलीस, हा गुन्हा नाही. जर तो गुन्हा असेल तर मला कोणतीही शिक्षा मला मंजूर आहे."

ओवेसींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, "तुम पर मेरी लाख जान क़ुर्बान या रसूल."

त्याचबरोबर अनेक मुस्लीम युवकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला असून अनेक शहरांमध्ये या विरोधात आंदोलनंही करण्यात आली आहेत.

लखनौमध्ये आंदोलन आणि अटकेचा आरोप

लखनौमध्ये अनेक महिलांनी हातात 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर घेऊन विधानसभा गेट क्रमांक 4 समोर आंदोलन केले. या महिलांचं नेतृत्व सपा नेते आणि दिवंगत शायर मुनव्वर राणा यांची मुलगी सुमैया राणा यांनी केलं.

बीबीसीशी बोलताना सुमैया राणा यांनी सांगितलं की, अनेक युवकांनाही या आंदोलनात सहभागी व्हायचं होतं, परंतु पोलिसांनी त्यांना रस्त्यातच रोखलं.

सुमैया राणा यांनी सांगितलं की, "आम्ही महिला कारमध्ये बसून विधानसभेपर्यंत पोहोचलो आणि आमचा विरोध नोंदवला. पण पोलिसांनी आम्हाला तिथूनही हटवलं."

सुमैया राणा यांनी दावा केला की, पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक तरुणांना काही तास ताब्यात ठेवलं. मात्र, यासंदर्भात लखनौ पोलिसांनी अजून काहीही स्पष्ट केलेलं नाही.

'आय लव्ह मोहम्मद' बॅनरसोबत महिला आंदोलक

फोटो स्रोत, SUMAIYYA RANA

फोटो कॅप्शन, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्येही अनेक महिलांनी निदर्शने केली.

सुमैया राणांनी सांगितली, "पोलिसांनी आमची नावं आणि पत्ता नोंदवून घेतले आहेत. पण याबाबत एफआयआर नोंदवण्यात आले आहे की नाही, याची आम्हाला माहिती नाही."

'आय लव्ह मोहम्मद' बॅनरमुळे कानपूरमध्ये नोंदवलेल्या एफआयआरमुळे मुस्लीम समाजात संताप आहे.

सुमैया म्हणतात, "पैगंबर मोहम्मद यांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. आज त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणं गुन्हा मानला जात आहे. लोक आपल्या नावासोबत कट्टर हिंदू असं लिहितात, तेव्हा कोणतीही कारवाई होत नाही, पण मुसलमानाने जर आपल्या पैगंबरचं नाव लिहिलं, तर पोलीस दडपशाही करतात.

मुसलमानांना त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य केलं जात आहे आणि आम्ही याच्या विरोधात आहोत."

सुमैया पुढे म्हणाल्या की, "मुसलमानांविरोधात प्रक्षोभक भाषणं केली जातात तेव्हा गुन्हा दाखल होत नाही. पण मुस्लिमांनी आपल्या घटनात्मक अधिकारांनुसार धार्मिक अभिव्यक्ती किंवा धर्म व्यक्त केला तर लगेच एफआयआर नोंदवला जातो. हा मुसलमाननांच्या धार्मिक अभिव्यक्ती व भावना दडपण्याचा प्रयत्न आहे, जो सहन केला जाणार नाही."

उन्नावमध्ये आंदोलन, अनेकांना अटक

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कानपूरमधील एफआयआरच्या विरोधात उन्नावमध्येही मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पाच जणांना अटक केली आहे.

यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली.

सोशल मीडियावर असे अनेक व्हीडिओ शेअर केले गेले आहेत. त्यात उन्नावच्या गंगाघाट पोलीस ठाण्याच्या परिसरात अनेक मुले आणि महिला 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर घेऊन घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

उन्नावचे अप्पर पोलीस अधीक्षक (उत्तर) अखिलेश सिंह म्हणाले, 'उन्नावमध्ये कलम 163 लागू करण्यात आले आहे, ज्यात परवानगीशिवाय कोणताही मोर्चा किंवा आंदोलन करता येत नाही.

गंगाघाट परिसरात परवानगीशिवाय मोर्चा काढला जात होता.

पोलीस जेव्हा तिथे पोहोचले, तेव्हा काही महिला आणि मुलांनी सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

याबाबत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा नोंदवून त्यांना अटक केलं आहे. याप्रकरणी आठ जणांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू आहे."

अखिलेश सिंह म्हणाले की, आता परिस्थिती सामान्य आहे आणि पोलीस दल गस्तही घालत आहेत.

उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री धर्मपाल सिंह म्हणाले, 'कायद्याशी कुणालाही छेडछाड करू देणार नाही, माहिती मिळताच कडक कारवाई झाली, अनेक जणांना अटक झाली आणि पुढे तपास करून कठोर कारवाई केली जाईल.'"

काशीपूरमध्येही हिंसाचार आणि एफआयआर

उत्तराखंडच्या काशीपूर शहरातही रविवारी (21 सप्टेंबर) सायंकाळी स्थानिक मुस्लिमांनी 'आय लव्ह मोहम्मद' बॅनर घेऊन मोर्चा काढला. यावेळी पोलिसांबरोबर धक्काबुक्कीही झाली.

स्थानिक पत्रकार अबू बकर यांच्यानुसार, घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि पोलीस बंदोबस्त तैनात केला. सायंकाळपर्यंत अनेक जणांना अटकही करण्यात आली होती.

अबू बकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काशीपूरच्या अल्लीखान परिसरात काढल्या जाणाऱ्या मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली, त्यात एक पोलीस जखमी झाला.

काशीपूरमध्येही लोक हातात 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर आणि फलक घेऊन आंदोलन करत होते.

अबू बकर यांनी सांगितलं की,"मोर्चाची माहिती मिळताच जेव्हा पोलीस तिथे पोहोचले, तेव्हा काही तरुण आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पोलिसांच्या गाड्यांच्या काचाही फुटल्या."

उधमसिंह नगर जिल्ह्याचे एसएसपी मणिकांत मिश्रा

फोटो स्रोत, Abu Bakar

फोटो कॅप्शन, उधमसिंह नगर जिल्ह्याचे एसएसपी मणिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ जणांना अटक करण्यात आली असून 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस तैनात केले गेले आणि लाठीचार्ज करून जमावाला पांगवण्यात आलं.

उधमसिंह नगरचे एसएसपी मणिकांत मिश्रा म्हणाले, "काशीपूरमध्ये परवानगीशिवाय मोर्चा काढला गेला. त्यात सुमारे 400 लोक सहभागी झाले होते. जमावाने पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला. नदीम अख्तर आणि 7 जणांना अटक झाली आहे आणि 10 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे."

एसएसपी म्हणाले, "नदीमची चौकशी सुरू आहे. हा धार्मिक उन्माद पसरवण्यात आणखी कोणाचा सहभाग याची त्याच्याकडे चौकशी केली जात आहे."

काशीपूरमध्ये जिल्हा प्रशासन, नगर पालिका आणि वीज विभागाचे पथकंही तैनात करण्यात आले आहेत. कुठे बेकायदेशीर काम सुरू आहे का, हे पाहिलं जात आहे, असं एसएसपी यांनी सांगितलं.

बीबीसीने स्थानिक नेते आणि आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. स्थानिक पत्रकार अबू बकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या कारवाईनंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गोध्रा आणि मुंबईत आंदोलने

'आय लव्ह मोहम्मद' वादानंतर गुजरातमधील गोध्रा आणि महाराष्ट्रातील मुंबईत निदर्शने, एफआयआर आणि अटक झाली आहे.

बीबीसीचे सहयोगी पत्रकार दक्षेश शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोध्रा येथील एका पोस ठाण्याबाहेर निदर्शने आणि तोडफोड केल्यानंतर 87 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 17 जणांना अटक करण्यात आली आहे.

एका स्थानिक पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या झाकीर जाबा या स्थानिक तरुणाने 'आय लव्ह मोहम्मद' वादावर सोशल मीडियावर पोस्ट केले होते, त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला जाण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु पोलीस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर त्याने पोलिसांवर छळ आणि गैरवर्तनाचा आरोप करणारा आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे स्थानिकांचा राग उफाळून आला.

पंचमहाल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. हरेश दुधात यांनी सांगितले की, जमावाने चार नंबरच्या चौकीत तोडफोड केली, पोलिसांना लाठीचार्ज करून परिस्थिती हाताळावी लागली.

एसपी म्हणाले, "हा तरुण सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. नवरात्रोत्सव लक्षात घेऊन आम्ही त्यांना फोन केला होता आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करू नका असे सांगितले होते. पण यामुळे पोलिसांनी झाकीरला मारहाण केल्याचा गैरसमज पसरला. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Dakshesh Shah

फोटो कॅप्शन, 'आय लव्ह मोहम्मद' वादाच्या दरम्यान गुजरातमधील गोध्रा येथील पोलीस ठाण्याबाहेर तोडफोड आणि निदर्शने झाली होती.

दरम्यान, मुस्लिमांच्या निदर्शनानंतर मुंबईतील भायखळा भागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

बीबीसीचे सहयोगी पत्रकार अल्पेश करकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "21 सप्टेंबर रोजी मुंबईच्या भायखळा भागात काही महिला आणि पुरुषांनी मोर्चा काढला. भायखळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परवानगी न घेता रॅली काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

'आय लव्ह मोहम्मद' मोहिमेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आल्याचा आरोप मुस्लीम संघटनांनी केला आहे.

या निषेधार्थ एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांसह मुस्लीम संघटनांचे सदस्य भायखळा पोलीस ठाण्याबाहेर जमले होते.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला नोटीस बजावून सोडण्यात आले आहे.

बहराईचमध्ये निवेदन देणाऱ्यांवर गुन्हा

उत्तर प्रदेशमधील बहराईच जिल्ह्यातील कैसरगंज तालुक्यात एसडीएम यांना निवेदन देणाऱ्या तरुणांच्या गटावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलीगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष फैझुल हसन यांनी बीबीसीला सांगितलं की, "आम्ही शांततेने मोर्चा काढला आणि 'आय लव्ह मोहम्मद' बॅनरप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या विरोधात आंदोलन केलं.

आम्ही घोषणा दिल्या नाहीत किंवा कायदा मोडला नाही. नंतर आम्हाला समजलं की, आमच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

फैजुल हसन आंदोलकांसोबत

फोटो स्रोत, FAIZUL HASAN

फोटो कॅप्शन, फैजुल हसन यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

फैझुल हसन यांनी आता हा एफआयआर रद्द करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

फैझुल म्हणतात, "मुस्लीम पैगंबर मोहम्मद यांच्यावर प्रेम करतात. आम्ही आमच्या पैगंबरावर प्रेम व्यक्त केल्यामुळे आम्हाला लक्ष्य केलं जात आहे."

मुसलमानांविरोधात निवडक कारवाई, कार्यकर्त्यांचे आरोप

मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, लहानसहान घटना मोठ्या करून मुस्लिमांना लक्ष्य केलं जात आहे आणि त्यांच्या धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

'युनायटेड अगेन्स्ट हेट'शी संबंधित नदीम खान यांनी बीबीसीला सांगितलं, "आम्हाला अनेक ठिकाणी मुस्लिमांविरुद्ध पोलीस कारवाईची माहिती मिळाली आहे. एकूण किती एफआयआर दाखल झाले किंवा किती लोकांना अटक झाली, याची खात्रीशीर माहिती आम्ही अद्याप गोळा करू शकलेलो नाही."

नदीम खान म्हणतात, "कानपूरमध्ये जे घडलं, त्यामुळे मुसलमानांमध्ये संताप आणि नाराजी आहे. पण ही पहिली घटना नाही.

हळूहळू परिस्थिती इथपर्यंत आली आहे. रमजानमध्ये मुरादाबादमध्ये घरात नमाज अदा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.

 आय लव्ह मोहम्मद बॅनर

फोटो स्रोत, FAIZUL HASAN

फोटो कॅप्शन, कानपूरमध्ये एफआयआर नोंदवल्यानंतर अनेक शहरातील मुस्लीम बहुल भागात 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर लावण्यात आले आहेत.

मग गच्चीवर नमाज अदा करण्यापासूनही रोखलं गेलं. आता पैगंबरांचे पोस्टर लावल्याप्रकरणीही गुन्हे दाखल झाले आहेत. असं दिसतं की, मुस्लिमांना निवडक पद्धतीने लक्ष्य करून त्यांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे."

कानपूरच्या घटनेबाबत नदीम खान म्हणतात, "'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर फाडले गेले, मुस्लिमांनी तक्रार दिली, त्यावर एफआयआर नोंदवला गेला नाही. उलट त्यांच्या विरोधातच गुन्हा दाखल केला गेला.

आमचं शिष्टमंडळ कानपूर पोलीस आयुक्तांना भेटणार आहे. जर बॅनर फाडल्याबाबत एफआयआर नाही नोंदवला गेला, तर आम्ही आमच्या घटनात्मक अधिकारांतर्गत न्यायालयात जाऊन खटला दाखल करू."

दरम्यान, कानपूर पोलिसांनी नदीम खान यांच्या आरोपांना उत्तर दिलं नाही.

30 कोटी मुस्लिमांवर गुन्हे दाखल करणार का?- प्रतापगढी

काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी प्रश्न उपस्थित करतात की, पैगंबर मोहम्मद यांच्यावर प्रेम व्यक्त केल्याबाबत गुन्हे दाखल होत असतील, तर भारतातील 30 कोटी मुस्लिमांवर खटले दाखल करणार का? कारण प्रत्येक मुस्लीम पैगंबरांवर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो.

इम्रान प्रतापगढी यांनी मुस्लीम तरुणांनाही आवाहन केलं. "मुस्लीम तरुणांनी परवानगीशिवाय मोर्चा काढू नये, असं केल्यास ते स्वतः कायदेशीर अडचणीत सापडू शकतात," असं ते म्हणाले.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अनेक एफआयआर दाखल झाल्यामुळे इम्रान म्हणतात की, प्रशासन मुस्लिमांना लक्ष्य करत आहे, म्हणून लोकांनी आपली भावनाही काळजीपूर्वक व्यक्त करावी.

इम्रान प्रतापगढी म्हणतात, "तुम्हाला विरोध करायचा किंवा धरणे आंदोलन करायचं असेल, तर त्यासाठी आधी परवानगी घ्या. प्रत्येक राज्य, जिल्ह्यात शांततेने आंदोलन करण्यासाठी काही ठिकाणं असतात. तिथे बसूनही निषेध नोंदवता येतो. सोशल मीडियावरही विरोध व्यक्त करण्याचे मार्ग आहेत, त्यांचा वापर करा."

अनेक एफआयआर दाखल झाल्यामुळे इम्रान म्हणतात की, प्रशासन मुस्लिमांना लक्ष्य करत आहे, म्हणून लोकांनी आपली भावनाही काळजीपूर्वक व्यक्त करावी.

'युनायटेड अगेन्स्ट हेट'चे नदीम खान म्हणतात की, ही कायद्याची निवडक अंमलबजावणी (सिलेक्टिव्ह अ‍ॅप्लिकेशन ऑफ लॉ) आहे. त्यांच्या मते, मुस्लिमांना लक्ष्य केलं जात आहे.

कोणालाही वातावरण बिघडवू देणार नाही-भाजप

सरकार आणि पोलिसांवरील भेदभावाचे आरोप नाकारत उत्तर प्रदेश भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी म्हणाले की, "सरकार धर्म पाहून कारवाई करत नाही, जो कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई केली जाईल."

या घटनेला मुद्दा बनवून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा आणि राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राकेश त्रिपाठी यांनी केला आहे.

बीबीसीशी बोलताना राकेश त्रिपाठी म्हणाले, "कोणालाही त्यांच्या श्रद्धेच्या आधारावर लक्ष्य केलं जाऊ शकत नाही. कोणत्याही धार्मिक घोषणेमुळे कुणालाही आक्षेप नाही. पण जर ती घोषणा कायद्याच्या कक्षेबाहेर गेली, तर निश्चितपणे कारवाई होईल.

कोणते पोस्टर, बॅनर किंवा घोषणा कुठं लावायच्या हे ठरवलेलं आहे. जर ते नियम मोडून लावले जात असतील तर कारवाई होणारच. काही लोक जाणूनबूजून मोहीम राबवून लोकांच्या भावना भडकवत आहेत, जे योग्य नाही."

मुस्लिमांच्या संतापाची कारणं काय?

कानपूरच्या घटनेनंतर फक्त उत्तर प्रदेशच नाही, तर इतर अनेक राज्यांमध्येही आंदोलनं झाली. उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही 'आय लव्ह मोहम्मद'च्या मुद्द्यावरून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर मुस्लीम लोक 'आय लव्ह मोहम्मद'चे फोटो शेअर करत आहेत आणि आपली भावना व्यक्त करत आहेत. अनेकांनी हे पोस्टर आपलं प्रोफाइल फोटो म्हणूनही ठेवलं आहे.

या प्रतिक्रियेचं कारण मुसलमानांमध्ये वेगळेपणाची भावना बळकट होत आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की, फक्त मुस्लीम आंदोलकांवरच अशी कारवाई होत नाही, तर देशात दलित, आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यानही गुन्हे दाखल झाले आहेत.

आय लव्ह मोहम्मद बॅनर

फोटो स्रोत, Social Media

फोटो कॅप्शन, कानपूरच्या मुस्लीमबहुल भागात 'आय लव्ह मोहम्मद'चे बॅनर लावण्यात आले आहेत.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. विवेक कुमार म्हणतात, "हे असं सांगता येणार नाही की, केंद्र सरकारच्या कोणत्यातरी धोरणानुसार मुस्लिमांना लक्ष्य केलं जात आहे किंवा अशी काही मोहीम चालू आहे, पण छोट्या-छोट्या घटनांमुळे आणि त्यावरील प्रतिक्रियांमुळे अल्पसंख्यकांमध्ये एकटेपणाची आणि वेगळं केलं जात असल्याची भावना निर्माण होत आहे."

प्रा. विवेक कुमार म्हणतात, "एका गटाला असं जाणवून दिलं जात आहे की, ते कमकुवत किंवा वेगळे आहेत."

प्रा. विवेक कुमार असंही म्हणतात की, हे समजणं महत्त्वाचं आहे की एक गट एफआयआर एवढं गांभीर्याने का घेत आहे. एफआयआर झाल्यानंतर आपल्या संवैधानिक किंवा घटनात्मक अधिकारांवर हल्ला झाला आहे, असं त्यांना का वाटतं?"

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.