कोव्हिड लस आणि हार्टअटॅक यांच्यात काय संबंध आहे? तज्ज्ञ आणि आरोग्य मंत्रालयाचे काय आहे मत?

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आनंदमणी त्रिपाठी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कोव्हिड -19 लसीकरण आणि देशात अचानक हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये कोणताही थेट संबंध आढळून आलेला नाही, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

"भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) यांनी केलेल्या दोन स्वतंत्र अभ्यासांत याची पुष्टी झाली असल्याचे," मंत्रालयाने म्हटलं आहे.

मंत्रालयाने पुढे सांगितले, "भारतामध्ये कोव्हिड -19 लस सुरक्षित आणि प्रभावी आहे आणि तिचे गंभीर दुष्परिणाम फारच कमी प्रमाणात दिसून आले आहेत."

सरकारच्या म्हणण्यानुसार, "अचानक होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा संबंध अनुवंशिकता, जीवनशैली, आधीपासून असलेल्या आजारांशी आणि कोव्हिडनंतर उद्भवलेल्या गुंतागुंतीशी संबंधित असू शकतो."

मंत्रालयाने म्हटलं आहे की, कोव्हिड-19 लसीकरणामुळे तरुण प्रौढांमध्ये अचानक मृत्यू होण्याचा धोका वाढत नाही, असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी (NIE) यांनी 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केलेल्या अभ्यासात स्पष्ट झालं आहे.

तसेच, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानने (AIIMS) अभ्यासानंतर केलेल्या प्राथमिक विश्लेषणात सांगितलं आहे की, "मायोकार्डियल इन्फेक्शन हा तरुणांमध्ये अचानक मृत्यूचे मुख्य कारण ठरत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाही या कारणांच्या पद्धतीत कोणताही मोठा बदल दिसून आलेला नाही."


आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की, कोव्हिड लशीचा आणि हार्टअटॅकचा काहीही संबंध नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की, कोव्हिड लशीचा आणि हार्टअटॅकचा काहीही संबंध नाही.

एम्सने सांगितलं आहे की, अभ्यास पूर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्ष जाहीर केले जातील, पण सध्या तरी या मृत्यूंच्या मागे 'अनुवांशिक बदल हे एक संभाव्य कारण असू शकते', असं एम्सचं म्हणणं आहे.

"या दोन्ही अभ्यासांतून हे समोर येतं की अचानक होणाऱ्या मृत्यूंसाठी कोव्हिड-19 लस जबाबदार नाही, तर यामागे पूर्वीपासून असलेल्या आरोग्य समस्या, अनुवंशिक पूर्वस्थिती आणि असंतुलित जीवनशैली यांचा मोठा सहभाग आहे," असं मंत्रालयाने म्हटलं आहे.

मात्र तज्ज्ञांमध्ये या दाव्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत, आणि अनेक तज्ज्ञांनी सरकारच्या या दाव्याशी असहमतीही दर्शवली आहे.

ॲस्ट्राझेनेकानेही मान्य केले होते लसीचे दुष्परिणाम

कर्नाटकातील हसन जिल्ह्यात एका महिन्यात सुमारे 22 तरुणांचा मृत्यू हार्टअटॅकमुळे झाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या मृत्यूंच्या मागे कोव्हिड लस कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक्सवर लिहिलं आहे की, "हसन जिल्ह्यात अलीकडेच 20 हून अधिक लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हे एक गंभीर प्रकरण आहे. या अचानक होणाऱ्या मृत्यूंमागे कोव्हिड लसीचे दुष्परिणाम तर नाहीत ना?"

ग्राफिक्स

ते पुढे लिहितात, "अलीकडील अनेक आंतरराष्ट्रीय संशोधनातून असे संकेत मिळाले आहेत की, लस ही हार्टअटॅकचं कारण ठरू शकते. लशीला घाईघाईत दिलेली मंजुरी या मृत्यूंचं कारण ठरू शकते का?"

कोव्हिड-19 लसीबाबत सेंट स्टीफन रुग्णालयाचे डॉ. जेकब पुलियाल यांचं मत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अभ्यासापेक्षा वेगळं आहे.

डॉ. जेकब पुलियाल म्हणतात,"सरळ गोष्ट आहे, भारतात तयार होणारी लस मूळतः ब्रिटनमधून आली आहे. आता जी कंपनी ही लस बनवत आहे, तीच कंपनी जर म्हणत असेल की या लशीमुळे त्रास होऊ शकतो, तर मग या संदर्भात जो अभ्यास किंवा तपास करण्यात आला आहे, त्याच्या पद्धतीकडे बारकाईने पाहायला हवं."

ग्राफिक्स
हार्टअटॅकची लक्षणं

ते म्हणतात, "केंद्रीय आरोग्य मंत्रालय नेमकं कशाप्रकारे तपासणी करत आहे? कोणत्या लशीची तपासणी केली जात आहे आणि त्या तपासणीची पद्धत काय आहे? अशा परिस्थितीत, 'ब्रिटनमध्ये जे त्रास झाले ते भारतात होत नाहीत' असं म्हणणं प्रत्येकाला समजण्यासारखं आहे."

कोरोनाची लस बनवणाऱ्या फार्मास्युटिकल कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाने सुमारे एक वर्षापूर्वीच हे मान्य केलं होतं की, त्यांच्या लसीचे 'गंभीर दुष्परिणाम' होऊ शकतात.

कंपनीने ब्रिटनच्या हायकोर्टात हे मान्य केलं होतं की, लशीमुळे काही लोकांना 'थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (टीटीएस)' सारखी स्थिती उद्भवू शकते.

या स्थितीमुळे लोकांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात आणि प्लेटलेटची संख्या कमी होते. अशा परिस्थितीत मेंदूचा स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

अ‍ॅस्ट्राझेनेकाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहकार्याने भारतात कोविशिल्ड तयार केली होती.

'साईड इफेक्टशिवाय कोणतीही लस नसते'

फाउंडेशन फॉर पीपल-सेंट्रिक हेल्थ सिस्टिम्सचे संचालक डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणतात, "जगात अशी एकही लस नाही की जिचे दुष्परिणाम शून्य आहेत. प्रत्येक लशीचे काही ना काही दुष्परिणाम असतात, त्यामुळे या लशीचेही काही दुष्परिणाम असणे सहाजिक आहे."

डॉ. लहरिया म्हणतात, "एकच लस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे परिणाम आणि दुष्परिणाम दाखवते. म्हणूनच हे आवश्यक नाही की, युरोपीय देशांमध्ये जे साइड इफेक्ट्स दिसतात, तेच आशियाई देशांमध्येही दिसतील. यामागचं कारण असं आहे की, प्रत्येक व्यक्तीची जनुकीय रचना वेगळी असते."

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने वर्ष 2021 मध्ये अॅस्ट्राझेनेकासोबत एक अब्ज डोस तयार करण्याचा करार केला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने वर्ष 2021 मध्ये अॅस्ट्राझेनेकासोबत एक अब्ज डोस तयार करण्याचा करार केला होता.

ते म्हणतात, "तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी लोकसंख्येनुसार हार्टअटॅक किती येत होते आणि आता किती येतात, हे पाहणं गरजेचं आहे. जर त्याच्या प्रमाणात लक्षणीय बदल झाला असेल, तर ते चिंतेचं कारण आहे. अन्यथा नाही."

या सर्व निकषांच्या आधारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा अहवाल पाहता येऊ शकतो.

डॉ. लहरिया म्हणतात, "MRNA लशीबाबत अनेक ठिकाणी हार्टअटॅक आल्याच्या नोंदी आहेत, पण भारतात याचा आजपर्यंत कोणताही वैज्ञानिक पुरावा आढळलेला नाही आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याबद्दल बोललं जात आहे, त्याचाही भारतात अद्याप कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही."

'10 हजारांपैकी एखाद्याला त्रास होऊ शकतो'

तरुणांमध्ये हार्टअटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत ICMRने कोव्हिड-19 लशीला जरी क्लीन चिट दिली असली, तरी युरोपियन सोसायटी ऑफ कार्डियोलॉजीचं मत यापेक्षा वेगळं आहे.

युरोपियन सोसायटी ऑफ कार्डियोलॉजीने आपल्या एका संशोधनात असा निष्कर्ष काढला आहे की, मायोकार्डिटिसमुळे होणारे मृत्यू आणि कोव्हिड-19 लसीकरण यांच्यात घनिष्ठ संबंध असण्याची शक्यता आहे.

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या मते, कोव्हिड-19 लसीकरणाचा मायोकार्डिटिस आणि पेरिकार्डिटिस या हृदयाशी संबंधित आजारांशी काही प्रमाणात संबंध आहे. जरी हा धोका अतिशय कमी प्रमाणात असला, तरी यूकेची 'ग्रीन बुक ऑन व्हॅक्सिन' सांगते की, 25 वर्षांखालील तरुण पुरुषांमध्ये हा धोका तुलनेने थोडा अधिक आहे.

ब्राझीलमधील रिओ डी जेनेरियोमध्ये एक आरोग्य कर्मचारी अॅस्ट्राझेनेकाच्या लसीची मात्रा तयार करताना (हा फोटो 20 एप्रिल 2021 चा आहे).

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, ब्राझीलमधील रिओ डी जेनेरियोमध्ये एक आरोग्य कर्मचारी अॅस्ट्राझेनेकाच्या लसीची मात्रा तयार करताना (हा फोटो 20 एप्रिल 2021 चा आहे).

पेरिकार्डिटिस म्हणजे हृदयाभोवती असलेल्या आवरणाची सूज होय, तर मायोकार्डिटिस म्हणजे हृदयाच्या स्नायूंमध्ये होणारी सूज आहे.

फाउंडेशनच्या मते, पहिल्या डोसच्या तुलनेत दुसऱ्या डोसमध्ये जोखमीचं प्रमाण अधिक आढळलं आहे. दोन कंपन्यांच्या लसींचा उल्लेख करताना असंही सांगितलं आहे की, हा धोका दर 10 हजारांपैकी एकाला होऊ शकतो.

तथापि, यूकेमधील मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीचं म्हणणं आहे की, बहुतेक लोकांसाठी कोव्हिड-19 लस घेण्याचे फायदे कोणत्याही जोखमींच्या तुलनेत जास्त आहेत.

तरुणांमध्ये हार्टअटॅक

गेल्या काही वर्षांत भारतात हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक जणांचे बसताना, नाचताना किंवा व्यायाम करताना अचानक हार्टअटॅक येऊन मृत्यू झाल्याचे व्हीडिओदेखील समोर आले आहेत.

व्हीडिओमध्ये दिसतं की, लोकांना अचानक हार्टअटॅक येतो आणि ते कोसळतात, त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. या घटनांपैकी अनेक व्यक्तींचं वय खूपच कमी होतं. तरुणांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्येही हार्टअटॅकचं प्रमाण वाढताना दिसून आलं आहे.

  • 46 वर्षांचे कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांना हृदयविकाराचा झटका आला.
  • 41 वर्षीय टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला हार्टअटॅक.
  • 59 वर्षीय विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव जिममध्ये व्यायाम करताना त्यांना हार्टअटॅक आला.
  • जम्मू-काश्मीरमध्ये एक 21 वर्षीय मुलगा स्टेजवर नाचत नाचताच खाली कोसळला. त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
  • मुंबईत गरबा खेळताना एका 35 वर्षीय व्यक्तीचा हार्टअटॅकने मृत्यू झाला.
  • 33 वर्षाचा एक जिम ट्रेनर बसल्या बसल्या बेशुद्ध पडला. हार्टअटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाला.

परंतु, यापैकी कोणत्याही प्रकरणात कोव्हिड लशीचा थेट संबंध असल्याचे ठोस पुरावे सापडलेले नाहीत, पण भारतामध्ये कोरोना संसर्गाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, याबाबत डॉक्टर्स पूर्वीपासून सतत इशारा देत आले आहेत.

गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हार्टअटॅकमुळे होणाऱ्या आकस्मिक मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

फोटो स्रोत, iStock

फोटो कॅप्शन, गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हार्टअटॅकमुळे होणाऱ्या आकस्मिक मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

जरी हृदयविकाराच्या झटक्यात छातीत तीव्र वेदना जाणवणं ही सामान्य लक्षणं असली, तरी काही लोकांना फक्त सौम्य वेदना किंवा अस्वस्थता जाणवते.

काही वेळा छातीत वेदना अजिबात होत नाहीत, विशेषतः महिलांमध्ये, वयोवृद्धांमध्ये आणि मधुमेह असलेल्या लोकांमध्ये हे अधिक पाहायला मिळतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)