10 हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेले डायर वूल्फ पुन्हा 'तयार' करण्यात आलेत का? वाचा

डायर वूल्फ

फोटो स्रोत, Colossal Biosciences/TMX

    • Author, व्हिक्टोरिया गिल
    • Role, विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज

जगप्रसिद्ध टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर 8 एप्रिल रोजी दोन पांढऱ्याशुभ्र लांडग्यांचा फोटो छापण्यात आला. हा फोटो होता तब्बल दहा हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायर वूल्फचा.

डायर वूल्फ हे लांडगे आजच्या राखाडी रंगांच्या लांडग्यांपेक्षा वेगळे होते, ते आकाराने मोठे होते आणि बर्फाळ प्रदेशात त्यांचा अधिवास होता.

तुम्ही 'गेम ऑफ थ्रोन्स' ही इंग्रजी वेब सिरीज बघितली असेल तर तुम्हाला हे पांढऱ्या रंगाचे लांडगे चांगलेच ठाऊक असतील. त्या मालिकेत दाखवण्यात आलेले लांडगे प्रत्यक्षात आता जिवंत नसले, तरी दहा हजार वर्षांपूर्वी अमेरिकन उपखंडात या लांडग्यांचा अधिवास होता.

सध्या कोलोसल बायोसायन्सेस या अमेरिकन कंपनीने नामशेष झालेल्या या लांडग्यांच्या प्रजातीला पुनरुज्जीवित केल्याचा दावा केला आहे. डायर वूल्फचा प्राचीन डीएनए आणि जेनेटिक इंजिनियरिंगचा वापर करून या कंपनीने डायर वूल्फच्या तीन पिल्लांना जन्म दिल्याची घोषणा केली आहे. हे करून नामशेष झालेल्या प्राण्याच्या प्रजातीला पुन्हा एकदा जिवंत केल्याचं या कंपनीने म्हटलं आहे.

या तीन पिल्लांची नावं आहेत रोम्युलस, रेमस आणि खलिसी. तंत्रज्ञानाचा अद्भुत अविष्कार म्हणून या प्रयोगाकडे बघितलं जात असलं तरी काही स्वतंत्र संशोधकांनी हे खरेखुरे डायर वूल्फ नसल्याचंही म्हटलं आहे.

न्यूझीलंडमधील ओटागो विद्यापीठातील प्राणीशास्त्रज्ञ फिलिप सेडन यांनी स्पष्ट केलं की, हे प्राणी 'अनुवांशिकरीत्या सुधारणा करण्यात आलेले राखाडी रंगाचे लांडगेच' आहेत.

एका महिन्याची दोन पिल्ले

फोटो स्रोत, Colossal Biosciences

फोटो कॅप्शन, एका महिन्याची दोन पिल्ले

कोलोसल बायोसायन्सेस या कंपनीने अत्याधुनिक जेनेटिक तंत्रज्ञानाचा वापर करून नामशेष झालेल्या वूली मॅमथ आणि टास्मानियन वाघाला पुन्हा जिवंत करत असल्याचं सांगितलेलं आहे. यासाठी ही कंपनी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे.

दरम्यान या क्षेत्रातील तज्ज्ञांनी टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेला लांडगा आणि हिमयुगातला मूळ डायर वूल्फ यांच्यातील काही महत्त्वाचे जैविक फरक देखील दाखवून दिले आहेत.

ओटागो विद्यापीठातील पॅलियोजेनेटिकिस्ट डॉ. निक रॉलन्स यांनी डायर वूल्फच्या डीएनएबाबत भाष्य केलं आहे. ज्या प्राचीन जीवाश्मांमधून हा डीएनए घेण्यात आला तो डीएनए अत्यंत खराब झाल्यामुळे त्याची जैविकदृष्ट्या कॉपी किंवा क्लोन करणं अवघड आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

डॉ. निक रॉलन्स यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "एखाद्या 500 अंश सेल्सियस तापमानाच्या भट्टीत एखादा ताजा डीएनए रात्रभर ठेवला तर त्या डीएनएची ज्याप्रकारे राख बाहेर येईल अगदी त्याच स्वरूपात एखादा प्राचीन डीएनए असतो."

"अर्थात हा डीएनए तुम्ही जसा होता तसा बनवू शकता पण त्याचा वापर करून इतर गोष्टी करणं अशक्य आहे."

त्यामुळे या कोलोसल बायोसायन्सेसच्या टीमने नवीन सिंथेटिक बायोलॉजी टेक्नॉलॉजी (कृत्रिम जीवशास्त्र तंत्रज्ञान)च्या सहाय्याने, डायर वूल्फच्या डीएनएमधील जेनेटिक कोडचा महत्त्वाचा भाग ओळखला आणि तो एडिट करून जिवंत प्राण्याचं (या घटनेत राखाडी रंगाच्या लांडग्यांचं) ब्लूप्रिंट तयार केलं आहे.

राखाडी लांडगा

फोटो स्रोत, Colossal Biosciences

फोटो कॅप्शन, कोलोसलच्या मते, राखाडी लांडगा हा नामशेष झालेल्या डायर वूल्फच्या सर्वात जवळचा जिवंत नातेवाईक आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉ. रॉलन्स म्हणाले, "त्यामुळे कोलोसलने राखाडी रंगाचा लांडगाच बनवला आहे पण त्यात काही डायर वूल्फचे गुणधर्म देखील आहेत. डायर वूल्फचा पांढरा रंग असो किंवा मग मोठ्या आकाराची कवटी या नवीन प्राण्यामध्ये दिसून येते. हा एक संकरित (हायब्रीड) प्राणी आहे."

कोलोसल बायोसायन्सेसच्या जीवशास्त्रज्ञ डॉ. बेथ शापिरो म्हणाल्या की, 'नामशेष झालेल्या प्राण्याला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रक्रियेमधील हे महत्त्वाचं पाऊल आहे.'

विलुप्त झालेल्या प्राण्यांचे गुणधर्म वापरून एक संपूर्णतः नवीन प्राणी तयार करण्याची ही प्रक्रिया असल्याचं त्या म्हणाल्या.

डॉ. शापिरो म्हणाल्या, "सध्या जिवंत असणाऱ्या प्राण्यांमध्ये राखाडी रंगाचा लांडगा हा डायर वूल्फचा सगळ्यात जवळचा नातेवाईक आहे. अनुवंशिकदृष्ट्या या दोन्ही प्राण्यांमध्ये बऱ्याच समानता आहेत. त्यामुळे डायर वूल्फचे गुणधर्म दर्शविणाऱ्या डीएनएला आम्ही लक्ष्य केलं आणि नंतर राखाडी लांडग्यांच्या पेशींमध्ये बदल केला. त्यानंतर आम्ही हुबेहूब तशाच पेशी तयार केल्या आणि आमचे डायर वूल्फ जन्माला घातले."

पण डॉ. रॉलन्स म्हणतात की, 25 ते 60 लाख वर्षांपूर्वीच डायर वूल्फ आणि राखाडी लांडगे अनुवंशिकदृष्ट्या एकमेकांपासून वेगळे झाले होते.

डॉ. रॉलन्स म्हणाले, "राखाडी रंगाच्या लांडग्यांपेक्षा डायर वूल्फ पूर्णपणे वेगळे आहेत, ही एक वेगळी प्रजाती आहे. कोलोसलने डायर वूल्फ आणि राखाडी रंगाच्या लांडग्यांच्या जनुकांची तुलना केली. जवळपास 19 हजार जनुकांमधून त्यांनी 14 जनुकांमध्ये झालेले 20 बदल शोधले आणि त्यांना डायर वूल्फ मिळाला."

डायर वूल्फ

फोटो स्रोत, Colossal Biosciences/TMX

या सगळ्या प्रक्रियेतून एक गर्भ तयार झाला आणि मग या गर्भाचं पाळीव कुत्र्यांच्या गर्भात रोपण करण्यात आलं. या मादी कुत्र्यांचा वापर सरोगेट म्हणून करण्यात आला. टाईम मासिकाने दिलेल्या माहितीनुसार ही तीनही पिल्लं सिझेरियनचा वापर करून जन्माला घालण्यात आली. या प्रक्रियेतील जोखीम कमी करण्यासाठी सिझेरियन केल्याचं कोलोसलने सांगितलं आहे.

जानेवारी महिन्यात कोलोसल बायोसायन्सेस या कंपनीची किंमत 10 अब्ज डॉलर्स एवढी होती. या कंपनीने डायर वूल्फच्या या पिलांना एका अज्ञात ठिकाणी ठेवलं आहे. उत्तर अमेरिकेतील एका 2,000 एकरच्या परिसरात ही पिलं ठेवलेली आहेत.

अनेकांसाठी आजवर काल्पनिक असणाऱ्या डायर वूल्फसारखीच ही पिलं दिसत आहेत. डायर वूल्फच्या या बातमीने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. मग ही घटना वैज्ञानिकदृष्ट्या वेगळी कशी ठरते?

डॉ. रॉलन्स यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, "प्राण्यांचं विलुप्त होणं हे अजूनही महत्त्वाचं आहे. असं घडलंच नाही तर आपण आपल्या चुकांमधून कसे शिकणार आहोत? या प्रयोगामुळे आता कदाचित असं वाटेल का? की आपण काहीही करू शकतो, आपण पर्यावरणाचा नाश करू शकतो, प्राणी विलुप्त होऊ शकतात आणि असं झालं तरीही आपण या प्राण्यांना परत आणू शकतो?"

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.