बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने ब्रेस्ट मिल्क केलं दान; कुणाला करता येतं दान, काय आहेत नियम?

बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टाने अलीकडेच मिल्क बँकेला सुमारे 30 लीटर ब्रेस्ट मिल्क दान केलं आहे.

फोटो स्रोत, X/@Guttajwala

फोटो कॅप्शन, बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टाने अलीकडेच मिल्क बँकेला सुमारे 30 लीटर ब्रेस्ट मिल्क दान केलं आहे.

'आईच्या दुधाने प्रीमॅच्युअर (अकाली जन्मलेल्या) आणि आजारी बाळांचा जीव वाचवता येऊ शकतो. ते दान केल्यास एखाद्या गरजू कुटुंबासाठी तुम्ही हिरो बनू शकता. याबाबत अधिक माहिती मिळवा आणि मिल्क बँकेची मदत करा.'

दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर भारताची प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टाने ब्रेस्ट मिल्क दान करण्याबाबत अलीकडेच सोशल मीडियावर ही पोस्ट केली होती.

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, ज्वाला गुट्टाने सुमारे 30 लिटर ब्रेस्ट मिल्क बँकेला दान केलं आहे.

तिने ब्रेस्ट मिल्क दान करतानाचे फोटोही शेअर केले आहेत आणि इतर महिलांनाही ही कृती करण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे.

दान केलेलं ब्रेस्ट मिल्क त्या नवजात बाळांसाठी उपयोगी ठरतं, जे वेळेआधी जन्माला येतात किंवा ज्यांचं वजन जन्माच्या वेळी कमी असतं. ज्या बाळांनी जन्मताना आईला गमावलेलं असतं, त्यांच्यासाठीही हे दूध खूप गरजेचं असतं.

दान केलेलं ब्रेस्ट मिल्क, मिल्क बँकेत ठराविक तापमानात ठेवलं जातं, जेणेकरून गरजेनुसार ते वापरता येईल.

बाळांना दूध पाजणाऱ्या माता जास्तीचं म्हणजेच अतिरिक्त ब्रेस्ट मिल्क डोनेशन बँकेत जाऊन दान करू शकतात. यासाठी निश्चित केलेले नियम पाळून ते ब्रेस्ट मिल्क बँकेत पाठवलं जाऊ शकतं.

'आवश्यकतेनुसार दान मिळत नाही'

आईचं दूध मुलांसाठी सर्वोत्कृष्ट मानलं जातं. आईचं दूध मिळालं नाही, तर डोनर (दाता) ब्रेस्ट मिल्क दिलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आईचं दूध मुलांसाठी सर्वोत्कृष्ट मानलं जातं. आईचं दूध मिळालं नाही, तर डोनर (दाता) ब्रेस्ट मिल्क दिलं जातं.

ब्रेस्ट मिल्क फक्त स्वेच्छेनेच दान करता येतं आणि त्या महिलाच हे दान करू शकतात ज्यांचं बाळ निरोगी आहे आणि ज्यांच्याकडे जास्त दूध तयार होतं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मातांना आपल्या बाळाच्या गरजेसाठीही जास्तीचं ब्रेस्ट मिल्क बँकेत साठवून ठेवता येतं आणि गरजेनुसार ते वापरता येतं.

दिल्लीतील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमधील निओनॅटोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा नांगिया म्हणतात, "बाळांसाठी त्यांच्या आईचं दूधच सर्वोत्कृष्ट असतं. पण काही कारणाने आईचं दूध मिळालं नाही, तर बाळांना डोनेट केलेलं ब्रेस्ट मिल्क दिलं जातं."

भारतात ब्रेस्ट मिल्क डोनेशनविषयी राष्ट्रीय स्तरावर कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र काही मिल्क बँकांमध्ये केलेल्या संशोधनातून काही माहिती मिळते.

इंटरनॅशनल ब्रेस्टफीडिंग जर्नलमध्ये छापलेल्या एका लेखानुसार, भारतात कोविड काळात ब्रेस्ट मिल्क डोनेशनचं संकलन कमी झालं होतं, पण पाश्चराइज्ड डोनर ह्युमन मिल्कची (पीएचडीएम) मागणी वाढली होती.

या लेखानुसार, 80 बेडच्या एनआयसीयूला (नवजात अतिदक्षता विभाग) एका महिन्यात साधारण 15 लिटर पीएचडीएमची (दूध) गरज भासते.

आणखी एका अहवालानुसार, त्रिची येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (एमजीएमजीएच) जुलै 2025 मध्ये 639 मातांनी एकूण 192 लिटर दूध दान केलं, ज्याचा फायदा एनआयसीयूमध्ये दाखल असलेल्या 634 नवजात बाळांना झाला.

'डोनेशनसाठी जागरूकता गरजेची'

भारतातली पहिली मानवी दूध बँक (ह्युमन मिल्क बँक) 1989 साली मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात सुरू झाली होती.

2019 पर्यंत भारतात फक्त 22 ह्युमन मिल्क बँक सुरू होत्या, तर 2021 पर्यंत हा आकडा जवळपास 90 वर पोहोचला होता.

अंदाजानुसार, सध्या भारताच्या विविध भागांत सुमारे 100 मिल्क बँक आहेत. पण अहवालानुसार, या बँकांना पुरेसं ब्रेस्ट मिल्क गोळा करण्यात मोठ्या अडचणी येतात.

दिल्लीमध्ये फक्त 2 सरकारी मिल्क बँक आहेत, एक लेडी हार्डिंग हॉस्पिटलमध्ये आणि एक एम्समध्ये. याशिवाय सफदरजंग हॉस्पिटलमध्ये लेक्टेशन मॅनेजमेंट युनिट (स्तनपान व्यवस्थापन युनिट) आहे.

दिल्लीतील बिगरसरकारी अमारा मिल्क बँकेचे प्रमुख डॉ. रघुराम मलाया यांच्या मते, "त्यांच्या मिल्क बँकेत दर महिन्याला सुमारे 40 लिटर ब्रेस्ट मिल्क दान केलं जातं, पण हे प्रमाण मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे."

फ्रिजमध्ये ठेवलेलं ब्रेस्ट मिल्क (प्रतिकात्मक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फ्रिजमध्ये ठेवलेलं ब्रेस्ट मिल्क (प्रतिकात्मक फोटो)

डॉ. रघुराम म्हणतात, "आम्ही एक एनजीओ आहोत आणि दिल्ली एनसीआरमधील सुमारे 100 रुग्णालयांना गरजेप्रमाणे ब्रेस्ट मिल्क पुरवतो आणि हे फक्त प्रिस्क्रिप्शनवर दिलं जातं. एनआयसीयूमध्ये दाखल बाळांसाठी ब्रेस्ट मिल्कची मागणी खूप जास्त आहे, पण आम्ही फक्त मर्यादित प्रमाणातच प्रोसेस करू शकतो."

अमारा मिल्क बँक घरबसल्या किट वापरून ब्रेस्ट मिल्क गोळा करतं.

डॉ. मलाया म्हणतात, "ब्रेस्ट मिल्क डोनेशनबाबत जागरूकता वाढवायला हवी कारण हे अनेक मुलांचे प्राण वाचवण्यास मदत करते."

डॉ. सुषमा नांगिया म्हणतात, "मिल्क बँकला पुरेसं ब्रेस्ट मिल्क मिळत नाही. ब्रेस्ट मिल्क डोनेशनबाबत जागरूकता हवी, पण हे फक्त स्वेच्छेनं होणं गरजेचं आहे आणि फक्त त्या मातांनी दान करावं ज्या आपल्या बाळाच्या गरजा पूर्ण करू शकतात आणि ज्या पूर्णपणे निरोगी आहेत."

अशक्त किंवा आजारी बाळांसाठी जीवनरक्षक

भारतात ब्रेस्ट मिल्क डोनेशनचे नियम स्पष्ट आहेत. ब्रेस्ट मिल्क खरेदी-विक्रीवर सध्याच्या नियमांनुसार बंदी आहे. एका अंदाजानुसार, एनआयसीयूमध्ये दाखल बाळांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसं ब्रेस्ट मिल्क दान होत नाही.

डॉ. सुषमा म्हणतात, "नवजात आयसीयू म्हणजेच नियोनॅटल केअर युनिटमध्ये (एनआयसीयू) दाखल बाळांना आईचं दूध मिळत नाही आणि जे कमी वजनाचे असतात, त्यांना ब्रेस्ट मिल्क दिलं जातं. ही गरज ह्युमन मिल्क बँकेकडून भागवली जाते."

जर एखाद्या बाळाचा 37 आठवड्यांपूर्वी जन्म झाला, तर त्याला प्रीमॅच्युअर म्हणतात. भारतात जन्म घेणाऱ्या बाळांपैकी 1 टक्क्यांपेक्षा कमी बाळांना एनआयसीयूमध्ये दाखल होण्याची गरज पडते.

ब्रेस्ट मिल्क कोण दान करू शकतं?

फोटो स्रोत, Getty Images

डोनेट केलेल्या ब्रेस्ट मिल्कची गरज याच बाळांना असते.

डॉ. सुषमा नांगिया म्हणतात, "एनआयसीयूमध्ये दाखल बाळांसाठी ब्रेस्ट मिल्क जीवन वाचवणारं म्हणजे जीवनरक्षक असतं. दात्याचे दूध प्रामुख्याने प्रीमॅच्युअर (अकाली जन्मलेले) किंवा गंभीर आजार असलेल्या नवजात बाळांसाठी वापरलं जातं."

ब्रेस्ट मिल्क कोण दान करू शकतं?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. नांगिया म्हणतात, "प्रत्येक बाळासाठी त्याच्या आईचं दूध, ज्याला आपण 'मॉम्स ओन मिल्क' (आईचं स्वतःचं दूध) म्हणतो, ते सर्वोत्तम आहे. हे दूध एखाद्या कवचासारखं काम करतं आणि नवजात बालकांना अनेक आजारांपासून वाचवतं.

काही कारणाने आईचं दूध मिळत नसेल, विशेषतः नवजात आयसीयूमध्ये दाखल बाळांसाठी, तेव्हा डोनर मिल्क वापरता येतं, जे आईच्या दूधाला पूरक असतं. हे दूध बदली नाही, तर गरज भासल्यावर मदत करणारं असतं."

हे दूध बाळांना गरज भासल्यावर मिल्क बँकेच्या माध्यमातून दिलं जातं, जिथे दूध पाश्चरायझेशन आणि तपासलं जातं, जेणेकरून संसर्गापासून बचाव होईल. ही प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक आणि स्वच्छतेने केली जाते.

ब्रेस्ट मिल्क कोण दान करू शकतं?

डॉक्टरांच्या मते, फक्त त्या मातांनाच ब्रेस्ट मिल्क दान करता येतं, ज्या आपल्या बाळाच्या गरजा पूर्ण करू शकतात आणि जास्त दूध तयार करतात.

डोनेशनपूर्वी डोनर महिलेची वैद्यकीय तपासणी अनिवार्य आहे, ज्यात हेपॅटायटिस बी, सी, एचआयव्ही, सिफिलिससारख्या संसर्गांसाठी रक्ततपासणी केली जाते. तंबाखूचं सेवन करणारी किंवा जास्त प्रमाणात मद्यपान करणारी महिला दान करू शकत नाही.

डॉ. सुषमा नांगिया म्हणतात, "फक्त पूर्णपणे निरोगी, कोणत्याही संसर्ग, आजार किंवा व्यसनापासून मुक्त महिला ब्रेस्ट मिल्क दान करू शकतात. तसेच दूध निश्चित म्हणजेच विहित प्रक्रियेनुसारच दान करावं."

ब्रेस्ट मिल्क दान करण्याची इच्छा असलेल्या माता मिल्क बँकेत जाऊन आपली तपासणी करून दूध दान करू शकतात. तसेच, मिल्क डोनेशनसाठी किटही उपलब्ध आहेत.

ब्रेस्ट मिल्क कसं जतन केलं जातं?

ब्रेस्ट मिल्क स्टरलाइज्ड (निर्जंतुकीकरण) पंपने काढलं जातं आणि बॅचमध्ये साठवून वजा 20 अंश तापमानात ठेवलं जातं. नंतर गोळा केलेलं दूध पाश्चराइज्ड केलं जातं, जेणेकरून त्यातील बॅक्टेरिया म्हणजेच जिवाणू नष्ट होतात आणि संसर्गापासून त्याचा बचाव होईल.

हे पाश्चराइज्ड दूध योग्य तापमानात ठेवल्यास साधारण तीन महिन्यांपर्यंत टिकतं. म्हणजे दान केल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत याचा वापर करता येतो.

Photo Caption- ह्युमन मिल्क बँकेत ब्रेस्ट मिल्क ठराविक तापमानात ठेवलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ह्युमन मिल्क बँकेत ब्रेस्ट मिल्क ठराविक तापमानात ठेवलं जातं.

डॉ. सुषमा नांगिया म्हणतात, "ब्रेस्ट मिल्क योग्य पद्धतीने काढलं गेलं आहे आणि ते सुरक्षित तापमानात ठेवलेलं आहे, हे निश्चित करणं खूप महत्त्वाचं आहे. हे फक्त प्रगत (अॅडव्हान्स) मिल्क बँकेत शक्य आहे."

ह्युमन मिल्क बँकांची संख्या मर्यादित आहेत. उदाहरणार्थ, दिल्लीसारख्या मोठ्या शहरात फक्त 2 ब्रेस्ट मिल्क बँक आहेत.

पण जवळपास प्रत्येक एनआयसीयूमध्ये याची गरज असते. डॉ. सुषमा म्हणतात की, ही गरज भागवण्यासाठी ब्रेस्ट मिल्क बँकिंगमध्ये हब-एंड-स्पोक मॉडेल प्रभावी ठरू शकतं.

डॉ. नांगिया म्हणतात, "एक मोठी ब्रेस्ट मिल्क बँक किंवा सेंटर असावं आणि आजूबाजूच्या रुग्णालयांमधून दूध गोळा करून ते पाश्चराइज्ड आणि वितरित करावं. एक मिल्क बँक 10 किलोमीटरपर्यंतच्या एनआयसीयूमधील गरजा भागवू शकते."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)