आरोपी बंदूकधाऱ्यांच्या हालचालींचा माग काढणारे असंख्य व्हीडिओ समोर; बाँडी हल्ल्याच्या कटाविषयी काय समजलं?

फोटो स्रोत, Supplied
- Author, हेलेन लिव्हिंगस्टोन, सिडनी आणि एमिली ॲटकिन्सन
ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या बॅान्डी समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या हल्ल्यातील संशयित हल्लेखोरांनी या प्राणघातक हल्ल्याच्या सुरुवातीला स्फोटकं फेकली होती.
हल्ल्याची योजना आखत असतानाच काही आठवड्यांपूर्वी त्यांनी गोळीबाराचा सरावदेखील केला होता, अशी माहिती न्यायालयातील नवीन कागदपत्रांमधून समोर आली आहे.
14 डिसेंबरला झालेल्या या हल्ल्यात 15 लोक मारले गेले होते, तर अनेकजण जखमी झाले होते. हनुक्का नावाच्या उत्सवाच्या वेळेस बाँडी समुद्रकिनाऱ्यावर बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला होता.
या हल्ल्याच्या वेळेस हल्लेखोरांकडून फेकण्यात आलेल्या 'टेनिस बॉम्ब'सह इतर स्फोटकांचा स्फोट झाला नव्हता.
नवीद अक्रमवर (24 वर्षे) 59 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात 15 हत्या आणि एका दहशवादी कृत्याचा समावेश आहे. तर दुसऱ्या बंदूकधाऱ्याचा म्हणजे नवीद अक्रमचे वडील साजिद अक्रमचा घटनास्थळी पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता.
कागदपत्रांनुसार, या दोघांनी कित्येक महिने या हल्ल्याची 'अतिशय काळजीपूर्वक आणि बारकाईनं' योजना आखली होती. तसंच हल्ल्याच्या दोन दिवस आधी त्यांनी बाँडीची पाहणीदेखील केली होती.
गेल्या आठवड्यात, हल्ल्यातील पीडितांची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी, पोलिसांच्या फॅक्ट शीट म्हणजे गुन्ह्याची माहिती देणाऱ्या अधिकृत कागदपत्राच्या प्रसिद्धीवर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले होते.
सोमवारी (22 डिसेंबर) ही बंदी उठवण्यात आली आणि त्यातील काही भाग वगळून ही कागदपत्रं प्रसिद्ध करण्यात आली.
कित्येक महिने केला सराव
हल्ल्याच्या काही महिने, दिवस आणि तास आधी या आरोपी बंदूकधाऱ्यांच्या हालचालींचा माग काढणारे असंख्य व्हीडिओंचे तपशीलांचा कागदपत्रांत समावेश आहे.
त्यापैकी एक व्हीडिओ ऑक्टोबर महिन्यात त्यांच्यापैकी एकाच्या मोबाईलमध्ये शूट करण्यात आलेला आहे. या व्हीडिओमध्ये काही लोक इस्लामिक स्टेट ग्रुपच्या (आयएस) एका झेंड्यासमोर बसलेली दिसत आहेत.
यात ते या हल्ल्यामागील त्यांच्या प्रेरणांबद्दल बोलत असल्याचं आणि 'झायोनिस्टांच्या कृत्यांचा' निषेध करत असल्याचं ऐकू येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

फोटो स्रोत, SUPPLIED
नवीद अक्रम "अरबी भाषेतील कुराणमधील एक उतारा वाचत असल्याचंही रेकॉर्ड झालं आहे."
पोलीस म्हणाले की ऑक्टोबरमधील एका वेगळ्या फुटेजमध्ये वडील आणि मुलगा, "आडबाजूला ग्रामीण भागात बंदूक चालवण्याचा सराव करत असल्याचं" दिसतं आहे.
हे ठिकाण न्यू साऊथ वेल्समध्ये असल्याच मानलं जातं आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की यात ते दोघेही "शॉटगननं गोळीबार करत आहेत आणि हल्ला करताना डावपेचांच्या दृष्टीनं हालचाली करताना" दिसत आहेत.
हल्ल्याआधी हल्लेखोरांकडून घटनास्थळाची टेहळणी
12 डिसेंबरच्या संध्याकाळच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं की, हे दोन जण, "जे आरोपी आणि त्याचे वडील असल्याचं मानलं जातं आहे", बाँडी समुद्रकिनाऱ्याजवळ त्यांच्या कारमध्ये होते.
"आरोपी आणि त्याचे वडील एस अक्रम दोघेही वाहनातून उतरून पादचारी पुलावरून चालत असल्याचं दिसतं आहे. दोन दिवसांनी ते याच जागी परत आले होते आणि लोकांवर गोळीबार केला होता," असं कागदपत्रांमध्ये म्हटलं आहे.
"या दहशतवादी कृत्यासाठी टेहळणी केल्याचा आणि नियोजन केल्याचा हा पुरावा आहे, असा पोलिसांचा आरोप आहे."
असा केला हल्ला
हल्ल्याच्या दिवशी पहाटे साधारण 2:00 वाजता (जीएमटी प्रमाणवेळेनुसार, 15:00 वाजता) दोन व्यक्ती सिडनीतील कॅम्पसी या उपनगरातील भाड्याच्या घरातून बाहेर पडत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसलं.
त्यांच्या हातात, "ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या लांब आणि जड वस्तू दिसत आहेत", त्या त्यांनी कारमध्ये ठेवल्या.
यामध्ये दोन सिंगल बॅरल शॉटगन, एक बेरेटा रायफल, चार इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइसेस (आयईडी) आणि आयएसच्या दोन झेंड्यांचा समावेश होता.
संध्याकाळी 17:00 वाजेनंतर (जीएमटी प्रमाणवेळेनुसार 8:00 वाजता) ही माणसं भाड्याच्या घरातून बाहेर पडताना दिसली.
दुसऱ्या एका स्वतंत्र फुटेजमध्ये ते 18:50 (जीएमटी प्रमाणवेळेनुसार, 9:50 वाजता) वाजता बाँडी इथं पोहोचल्याचं दिसतं. तिथे त्यांनी त्यांची कार पार्क केली आणि गाडीच्या पुढील आणि मागच्या खिडकीवर आतल्या बाजूला झेंडे लावले.
त्यानंतर ते कारमधून आयईडी आणि बंदूका बाहेर काढताना आणि नंतर पादचारी पुलाच्या दिशेनं चालत जाताना दिसतात.

फोटो स्रोत, SUPPLIED
पोलिसांच्या मते, या ठिकाणाहून आरोपींनी गर्दीच्या दिशेनं स्फोटकं फेकली होती. मात्र, यातील कोणत्याही स्फोटकाचा स्फोट झाला नव्हता. यात तीन पाईप बॉम्ब आणि एका 'टेनिस बॉल बॉम्ब'चा समावेश होता.
त्यानंतर त्यांनी बंदुकींद्वारे गर्दीच्या दिशेनं गोळीबार केला. या गोळीबारात 14 जणांचा घटनास्थळीच मृ्त्यू झाला. तर आणखी एकाचा नंतर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनास्थळी न्यू साऊथ वेल्स पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत साजिद अक्रम मारला गेला.
तर पोलिसांच्या गोळीबारात नवीद अक्रम गंभीररित्या जखमी झाला होता. सोमवारी (22 डिसेंबर) त्याला हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं आणि तुरुंगात पाठवण्यात आलं.
हल्ल्यानंतर शस्त्रं, आंदोलनांवर बंधनं आणणारे कायदे
बाँडीच्या समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर बंदुकीच्या मालकीवर कठोर बंधनं घालण्याची आणि ज्यूविरोधी भावनांपासून ज्यू समुदायाचं संरक्षण करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सोमवारी (22 डिसेंबर), न्यू साऊथ वेल्स राज्यानं गोळीबाराच्या घटनेनंतर, नवीन बंदूक आणि आंदोलनासंबंधीच्या प्रस्तावित कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलावलं.

फोटो स्रोत, SUPPLIED
काही नागरी अधिकार गट आणि बंदूका बाळगण्यास पाठिंबा देणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की या कायद्यामुळे बंदुका आणि आंदोलनांवर अनावश्यक बंधनं येतील.
न्यू साऊथ वेल्सचे प्रमुख ख्रिस मिन्स म्हणाले की काहीजणांना कदाचित वाटेल की 'खूपच अधिक' बदल करण्यात आले आहेत, मात्र समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते आवश्यक होते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











