'मंगळसूत्र चोरी'चं प्रकरण नेमकं काय आहे, जे विधानभवन हाणामारीनंतर चर्चेत आलं?

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड
फोटो कॅप्शन, 11 जुलै रोजी विधिमंडळ परिसरात आव्हाड यांनी 'मंगळसूत्र चोरांचा, मंगळसूत्र चोरांचा' अशा घोषणा दिल्या.

महाराष्ट्राच्या विधिमंडळ परिसरात पहिल्यांदाच हाणामारी झाल्याचा प्रकार गुरूवारी (17 जुलै) घडला.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते विधिमंडळाच्या लॉबीमध्ये एकमेकांना भिडले आणि त्यातून हाणामारीचा लाजीरवाणा प्रकार घडला.

विधिमंडळाच्या लॉबीत आणि पायऱ्यांजवळ पडळकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यात हाणामारी झाली.

पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना दूर केलं असलं, तरी हे प्रकरण बरंच चिघळलं.

एकमेकांवर टीका करताना वापरण्यात आलेल्या अपशब्दांमुळे दोन आमदारांमधील वाद कार्यकर्त्यांच्या हाणामारीपर्यंत पोहोचला.

काही दिवसांपूर्वी आमदार पडळकर यांनी पुण्यातील मोर्चासमोर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती.

नंतर 10 जुलैला त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका केली होती.

दरम्यान, 11 जुलैला विधिमंडळ परिसरात जितेंद्र आव्हाड यांनी 'मंगळसूत्र चोरांचा, मंगळसूत्र चोरांचा' अशा घोषणा दिल्या होत्या.

त्यानंतर 16 जुलैला पडळकर आणि आव्हाड यांच्यात बाचाबाची झाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये आलं. त्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, "हा बालिशपणा आहे. त्यांनी दरवाजाला लाथ मारली आणि तो दरवाजा आम्हा दोघांनाही लागला. या छोट्या गोष्टींकडे कुणीही लक्ष देत नाही म्हणून मी पुढे निघून आलो."

"नंतर शिव्या देण्याची ही कुठली पद्धत आहे. त्यांनी आमच्या अंगावर गाडी का आणायची. व्हीडिओत काय झालंय सगळं दिसेल. मी मंगळसूत्र चोर ओरडलो. त्याचं त्यांना का वाईट वाटत आहे?" असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.

आव्हाडांनी नंतर मी 'मंगळसूत्र चोर' हे कोणाचं नाव घेऊन म्हटलेलं नसल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, गुरुवारी (17 जुलै) जितेंद्र आव्हाड यांनी असा आरोप केला आहे की, पडळकर समर्थकांनी मोबाइलवर त्यांना शिवीगाळ केली असून धमकी दिल्या आहेत.

'मंगळसूत्र चोर' हे प्रकरण काय?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. अनेकवेळा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत.

दुसरीकडे पडळकर यांच्यावर टीका करताना विरोधकांकडून 'मंगळसूत्र चोर' असा उल्लेख केला जातो.

मध्यंतरी आमदार पडळकरांनीच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. ही घटना तशी 15 वर्षे जुनी आहे.

या आरोपाला 2009 मध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचे आमदार पडळकर यांनी सांगितलं होतं.

ते म्हणाले होते, "मी कधी या विषयावर बोलत नाही. परंतु, माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा जो आरोप केला जातो, त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. मी 2009 साली विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभा होतो. त्यावेळी तिथे एक उमेदवार अपक्ष म्हणून उभे होते. त्यांना 17 इच्छुक उमेदवारांनी पाठिंबा दिला होता."

"निवडणुकीत त्या अपक्ष उमेदवाराचा दोन ते अडीच हजार मतांच्या फरकाने थोडक्यात पराभव झाला. मला त्या निवडणुकीत 19 हजारच्या आसपास मतं मिळाली. ते पराभूत उमेदवार तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अत्यंत जवळचे होते," असं त्यांनी सांगितलं.

आमदार गोपीचंद पडळकर

फोटो स्रोत, Sharad badhe/bbc

फोटो कॅप्शन, आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. अनेकवेळा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत.

ते पुढं म्हणाले, "निवडणुकीनंतर गावाकडे एक लग्न होतं. त्या लग्नात मी प्रमुख पाहुणा होतो. तसा उल्लेखही त्या लग्नपत्रिकेत होता. परंतु, तिथं भांडणं झाली."

त्यानंतर त्या लग्नातलं मंगळसूत्र चोरीला गेल्याचं प्रकरण पुढे आलं.

त्याबाबत बोलताना पडळकर पुढे म्हणाले, "भांडण झालं तेव्हा मी तिथं उपस्थितही नव्हतो. मी एक तास उशिरानं तिथं गेलो होतो. तरीसुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हे राष्ट्रवादीचंच पाप आहे."

"माझ्यावर जो मंगळसूत्र चोरीचा आरोप केला गेला तेव्हा 2009 मध्ये त्यांचा तिथं अपक्ष उमेदवार होता. त्याला 17 इच्छूक उमेदवारांनी पाठिंबा दिला होता. तेव्हा मीही विधानसभा निवडणूक लढवली होती. मला 19 हजार मतं पडली आणि त्यांचा उमेदवार दोन अडीच हजार मतांनी पडला. त्यामुळे माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता," असा आरोप पडळकरांनी केला.

"14 एप्रिल 2010 रोजी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये माझ्यासह 8 जणांच्या विरोधात चोरी आणि मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये मला अटक देखील झाली होती. या प्रकरणी सांगली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये खटला देखील सुरू होता, पण माझी निर्दोष मुक्तता झाली आहे. कारण माझा त्यामध्ये कोणताही सहभाग नव्हता," अशी माहिती पडळकरांनी दिली.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणाबाबत आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "हा गुन्हा 2010 मधला आहे. त्यावेळी हस्तलिखित स्वरूपात तक्रार दाखल करून घेतल्या जायच्या."

"2017 नंतर ऑनलाईन सिस्टीम निर्माण झाली. जुने पोलीस ठाणे नवीन इमारतीत स्थलांतर झाले. त्यामुळे या गुन्ह्याचे कागदपत्र शोधावे लागतील. त्याला थोडा उशिरा लागेल. मिळाल्यावर ते देण्यात येतील," असं सांगण्यात आलं.

बीबीसीनं ज्या तक्रारदार महिला आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

2010 च्या अ‍ॅडिशनल सेशन जज यांच्या आदेशात काय म्हटलं?

गोपीचंद पडळकर वि. महाराष्ट्र सरकार या प्रकरणात सांगली अ‍ॅडिशनल सेशन जज बी. एम. सरदेशपांडे यांनी त्यांच्या एका आदेशात काही मुद्दे नोंदवले होते.

1. अर्जदारानं (गोपीचंद पडळकर) फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम 438 अंतर्गत आटपाटी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीसंदर्भात जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणात आटपाडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 34 सह 143, 147, 148, 149, 341, 324, 395 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. असा आरोप करण्यात आला आहे की, अर्जदारानं इतर 8 जणांबरोबर लाठ्यांसारख्या शस्त्रांचा बेकायदेशीर वापर करत 14 एप्रिल 2020 ला संध्याकाळी 5.30 ते 5.45 सुमारास दरोडा घातला.

2. अर्जदाराच्या वतीनं म्हटलं की आहे की, अर्जदाराकडून करण्यात आलेलं विशिष्ट उघड कृत्य, ज्यातून गुन्ह्याचा हेतू स्पष्ट होतो, हे एफआयआरमध्ये सांगण्यात आलेलं नाही. तसंच सहआरोपी पंढरीनाथ गुरव याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम 438 अंतर्गत जामीन देण्यात आला आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्यात आली आणि नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी आरोपींना अटक केली तेव्हा कथित लाठ्या ताब्यात घेण्यात आल्या. पुढे असं म्हटलं आहे की, काही राजकीय वैमनस्यातून अर्जदाराचं नाव एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलं आहे. अर्जदार राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष आहेत आणि ते एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. जर काही अटी लावण्यात आल्या, तर अर्जदार त्याचं पालन करण्यास तयार आहे.

3. या प्रकरणात तपास प्रलंबित आहे. याच्या आधारे अर्जदारानं विरोध केला आहे. अर्थात सहआरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. दरोड्यातील सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी, मोबाईल फोन आणि मनगटी घड्याळ अद्याप सापडलेलं नाही. घटना घडल्यापसून अर्जदार फरार होता. तपास प्रभावी व्हावा यासाठी अर्जदाराची कोठडीत चौकशी करणं आवश्यक आहे. या आधारे आटपाटी पोलिसांनी अर्ज फेटाळण्याची मागणी केली आहे.

4. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर, मी पोलिसांनी सादर केलेली कागदपत्रं पाहिली आहेत. सर्वात आधी हे नमूद करणं आवश्यक आहे की, एफआयआरमध्ये अर्जदाराचं नाव आहे आणि त्यामुळे प्रथमदर्शनी, अर्जदारावर खोटा आरोप करण्यात आल्याची बाब फेटाळण्यात येते. दुसरं कारण म्हणजे, या गुन्ह्याची नोंद भारतीय दंड संहितेच्या कलम 149 अंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे या टप्प्यावर, प्रत्येक आरोपीचं उघड कृत्य लक्षात घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. पोलिसांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, या दरोड्यातील वस्तू अद्याप हस्तगत करण्यात आलेल्या नाहीत. ही विशिष्ट परिस्थिती लक्षात घेता अर्जदाराची कोठडीत चौकशी होणं आवश्यक आहे. त्यामुळे फौजदारी दंड संहितेच्या कलम 438 नुसार, अर्जदाराला जामीन देता येणार नाही.

5. या प्रकरणातील सहआरोपी पंढरीनाथ गुरव याला फौजदारी दंड संहितेच्या कलम 438 अंतर्गत कदाचित जामीन देण्यात आला असेल, मात्र त्या आदेशाची प्रत न्यायालयासमोर ठेवण्यात आली नाही.

या कारणांमुळे अर्जदार जामिनास पात्र नाही आणि त्याचा अर्ज फेटाळण्यात येतो आहे.

आटपाटी पोलीस ठाण्यातील अर्ज आणि अहवालानुसार, पी. ए. सुतार यांनी अर्जदाराची बाजू मांडली आणि ए. डी. वाघमोडे यांनी सरकारच्या वतीनं बाजू मांडली. अर्जदारानुसार, हा त्यांचा जामिनासाठीचा पहिला अर्ज आहे.

''मंगळसूत्र चोर' म्हणताना मी कोणाचं नाव घेतलं नाही'

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, असं माध्यमांशी बोलताना सांगितलं.

मी 'मंगळसूत्र चोर' म्हणालो, पण मी त्यावेळी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं.

हे वाक्यही मी त्यांच्यापासून 50 मीटर दूर अंतरावर म्हटलं, असं ते म्हणाले.

"पडळकर हे गेटवर मुलाखत देत उभे होते. मी त्यांच्याबाजूने जात होतो. त्यावेळी लगेच त्यांच्या मुलाखतीचा टोन बदलला आणि त्यांनी तिथं मुसलमानांचा विषय आणला आणि मला अप्रत्यक्षपणे ते बोलले," असं आव्हाड म्हणाले.

आमदार जितेंद्र आव्हाड

फोटो स्रोत, Facebook/Jitendra Awhad

फोटो कॅप्शन, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, असं माध्यमांशी बोलताना सांगितलं.

पडळकरांनी 10 जुलै रोजी आव्हाडांना उद्देशून 'अर्बन नक्षल' आणि 'मुसलमानांचा एक्स' असं वक्तव्य केलं होतं.

दरम्यान, हाणामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीश देशमुख यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले होते. त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोरच ठिय्या आंदोलन केलं होतं.

त्यावेळी पोलिसांनी आव्हाड यांना अक्षरशः खेचून त्या वाहनासमोरून बाजूला केलं.

आव्हाड हे वाहनाखाली गेले होते. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होतं.

पडळकरांची दिलगिरी तर आव्हाडांनी केली तक्रार

हा प्रकार गुरूवारी (17 जुलै) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विधानभवनाच्या तळमजल्यावर घडला. त्यावेळी आव्हाड समर्थक नितीन देशमुख तिथे उभे होते. तिथे जवळच पडळकरांचे समर्थक ऋषिकेश टकलेही उभे होते.

त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि नंतर हे प्रकरण हाणामारीवर गेलं.

घटनेनंतर पडळकरांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर पडळकर यांनी या घटनेबद्दल माध्यमांसमोर दिलगिरीही व्यक्त केली.

हाणामारी झाली तो क्षण.
फोटो कॅप्शन, विधिमंडळाच्या लॉबीत आणि पायऱ्यांजवळ पडळकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यात हाणामारी झाली.

तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांसह जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. हे मलाच मारण्याचे षडयंत्र होते, असा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला.

यंदाचे पावसाळी अधिवेशन या ना त्या कारणामुळे सातत्यानं चर्चेत राहिलं आहे.

आमदार भवनाताल कँटीनमध्ये आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला केलेली मारहाण, त्यानंतर विधिमंडळ आवारात आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्यात झालेली तु-तु-मैं-मैं.

यामुळे लोकांमधून नाराजी व्यक्त होत असतानाच पुन्हा हा हाणामारीचा प्रकार घडला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)