'महाराष्ट्रात टोळीयुद्धासारखी परिस्थिती'; पडळकर-आव्हाड हाणामारी प्रकरणी राजकीय विश्लेषक काय म्हणाले?

आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड

फोटो स्रोत, Facebook/ Gopichand Padalkar & Jitendra Awhad

फोटो कॅप्शन, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड
    • Author, विनायक होगाडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या हाणामारीच्या प्रकरणामुळे यंदाचं पावसाळी अधिवेशन चर्चेत आहे.

आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात आधी शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं.

विशेष म्हणजे, हा सारा प्रकार अधिवेशन सुरू असतानाच बाहेर पायऱ्यांजवळ घडला. त्यामुळे, विधानभवनाचे संकेत, प्रथा आणि शिष्टाचार शिल्लक आहे का, असा सवाल करत सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.

दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणामुळं महाराष्ट्र विधिमंडळाच्या संस्कृतीचा दर्जा खालावत चाललाय का, अशी चिंता व्यक्त केली जातेय.

माजी ज्येष्ठ आमदार, राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि घटनातज्ज्ञ यांना या प्रकरणावर काय वाटतं ते जाणून घेऊयात.

विधिमंडळात नेमकं काय घडलं?

बुधवारी (17 जुलै) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात शिवीगाळही झालेली समोर आली.

त्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी (18 जुलै) सायंकाळी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. अगदी कपडेही फाडण्यात आले. या प्रकाराची सुरुवात कुणी केली, हे तपासाअंतीच समोर येईल.

गुरुवारी (18 जुलै) विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच बाहेर पायऱ्यांजवळ या दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
फोटो कॅप्शन, गुरुवारी (18 जुलै) विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच बाहेर पायऱ्यांजवळ या दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

याआधी, महाराष्ट्राच्या विधानभवनात गोंधळाचे अनेक प्रसंग घडले आहेत, मात्र अशा प्रकारची हाणामारी यापूर्वी कधीही घडलेली नाही.

या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

मुख्यमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांकडून कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर आणि गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हे प्रकरण काहीसं शांत झाल्याचं दिसून आलं.

सुहास पळशीकर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गुरुवारी (17 जुलै) रात्री उशीरा पडळकर यांचे कार्यकर्ते सर्जेराव बबन टकले आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन हिंदुराव देशमुख यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.

मात्र, त्यानंतर रात्री उशिरा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवन परिसरात धरणं आंदोलन केलं.

"मकोकासारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी पसार होतो आणि जो मार खातो त्याला पोलीस घेऊन जातात," असं म्हणत त्यांनी आंदोलन केलं.

पोलीस त्यांना तिथून हटवताना पोलीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात बरीच झटापटही झाल्याचं पहायला मिळालं.

आता, विशेषाधिकाराचा भंग केल्याप्रकरणी पडळकर यांचे कार्यकर्ते सर्जेराव बबन टकले आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन हिंदुराव देशमुख यांच्यावर कारवाई करणार असल्याचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.

आज (18 जुलै) विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणावर भाष्य करताना आमदारांच्या नैतिक आचरणाचे उच्च मापदंड आखण्यासाठी 'एथिक्स कमिटी' स्थापन करण्याबाबत विचार करत असल्याचं म्हटलंय.

अध्यक्षांनी कानउघाडणी केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली, तर जितेंद्र आव्हाड यांनी 'घडलेल्या घटनेबाबत मला वाईट वाटत' असल्याचं विधानसभेत म्हटलं.

या दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांवर चौकशी करून विशेषाधिकाराचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचं अध्यक्षांनी म्हटलं आहे.

'मी काही बोललो तर माझ्यावर हक्कभंग लागेल'

मारहाणीच्या या प्रकारानंतर विधिमंडळातील शिष्टाचाराची संस्कृती पार रसातळाला गेली असल्याची चर्चा सुरू आहे. ज्या लोकप्रतिनिधींकडून जबाबदार वागणुकीची अपेक्षा असते, त्यांच्याकडूनच असे प्रकार का घडत आहेत, याबाबत बीबीसीनं काही ज्येष्ठ पत्रकार, वरिष्ठ माजी आमदार आणि विश्लेषकांची संवाद साधला.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर
फोटो कॅप्शन, भाजप आमदार गोपीचंद पडळकर

राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "हा प्रकार इतका लांच्छनास्पद आहे की, मला त्यावर काहीच बोलावंसंही वाटत नाहीये. मी काही बोललो तर माझ्यावर हक्कभंग लागेल, अशी माझी प्रतिक्रिया घेतली तरी चालेल, इतकी लोकशाहीच्या नावावर विदारक परिस्थिती आलेली आहे. यात बाकी काहीही म्हणण्यासारखं, विश्लेषण करण्यासारखं नाहीये."

वामनराव चटप

महाराष्ट्र विधिमंडळाचे माजी सचिव डॉ. अनंत कळसे यांनी या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला.

गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना विधिमंडळात प्रवेश करण्यासाठीचे पास देऊच नयेत, असं ठाम मत त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

ते म्हणाले, "विधिमंडळाच्या इतिहासात अशाप्रकारे हाणामारीचा प्रकार कधीही घडलेला नाही. आत्ता घडलेला प्रकार अत्यंत खेदजनक आहे. विधिमंडळातील सुरक्षारक्षकांना पोलिसांप्रमाणे कारवाई करण्यासाठीचे अधिकार किंवा तशी तरतूद नसल्यामुळे सुरक्षा रक्षक संबंधितांना पोलिसांच्या ताब्यात देतील."

"भारतीय दंड संहितेनुसार या संबंधितांवर कारवाई केली जाईल. तसेच सभागृहाने याची दखल घेऊन हक्कभंग आणि अनुशासन समितीकडे हे प्रकरण पाठवल्यास, त्यानुसारही शिक्षेची कारवाई संबंधितांवर होऊ शकते."

'लोकशाहीची नैतिक अध:पतनाकडे वाटचाल'

विधानसभेचे तीनवेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप यांनी या प्रकाराचा निषेध केला तसेच, या परिस्थितीबाबत चिंताही व्यक्त केली.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मी 15 वर्षे विधानभवनात होतो. विधानभवनाच्या प्रथा, परंपरा आणि नियमांचं काटोकोरपणे पालन होत आलेलं आहे. मात्र, आता जे काही घडतंय, ते लोकशाहीला मारक आहे."

"ही थेट नैतिक अध:पतनाकडे सुरू असलेली वाटचाल आहे. त्यामुळे, विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींनी या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई करायला हवी."

राजेंद्र साठे

अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आमदारांवर अशी कठोर कारवाई व्हायला हवी, की त्यांच्यावर जरब बसायला हवी, अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात.

मात्र, 'हे कधी ना कधी होणारच होतं,' अशा प्रकारची उद्विग्न प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांनी दिली.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "भाषेच्या स्तरावर विधिमंडळाचा दर्जा खालावलेला होताच. त्यामुळे, कधी ना कधी ही शिवीगाळ आणि हिंसा प्रत्यक्षात उतरण्याच्या टप्प्यावर आलेलीच होती. आता ते फक्त प्रत्यक्षात उतरलंय."

"विधिमंडळात पवित्र शब्द बोलू आणि रस्त्यावर शिवागाळ-हाणामारी करू, असं होत नाही. हे समाजाच्याच दांभिक वास्तवाचं दु:खद चित्र आहे, त्याचं विधिमंडळातही प्रतिबिंब उमटतं."

तीनवेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप

फोटो स्रोत, Facebook/ Wamanrao Chatap

फोटो कॅप्शन, तीनवेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप

गुन्हेगार कार्यकर्ते विधिमंडळात येण्याबाबत राजेंद्र साठे म्हणाले, "गुन्हे दाखल असलेले कार्यकर्ते विधिमंडळात येतच होते, फक्त त्यांचं येणं या प्रकरणामुळे अधिक अधोरेखित झालं, इतकंच. 2014 नंतर जे बदल झालेले आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात टोकाचे विरोधक तयार झालेले आहेत."

"अशी टोळीयुद्धासारखी परिस्थिती महाराष्ट्रात कधी नव्हती, हे खरंय. पण आता गेल्या चार-पाच वर्षातल्या राजकारणाने त्याला मोठी गती मिळाली आहे. आपण विधिमंडळातही असा राडा घातला तरीही आपल्याला काही होऊ शकत नाही, हे अभय त्यांना मिळणं, हे यामागचं कारण आहे."

"गणपतराव देशमुख, मृणाल गोरे किंवा नरसय्या आडम यांसारख्या अभ्यासू आणि नैतिकता असलेल्या आमदारांचा काळ आता नाहीये, हे वास्तव आहे," असं मत राजेंद्र साठे यांनी व्यक्त केलं.

दुसरीकडे, स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्र विधानसभेत झालेल्या प्रकाराची खिल्ली उडवणारा एक व्हीडिओ प्रसिद्ध केला. या व्हीडीओमध्ये त्याने आपल्या वादग्रस्त ठरलेल्या स्टॅण्डअप कॉमेडी शोमध्ये गायलेल्या 'हम होंगे कामयाब' या गाण्यावर हाणामारीचा व्हीडिओ जोडला आहे. या व्हीडिओला त्यानं 'लॉ ब्रेकर्स' असं कॅप्शन दिलं आहे.

विधानसभेचे अध्यक्ष काय म्हणाले?

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (18 जुलै) रोजी दीड वाजता या प्रकरणावर भाष्य केलं.

ते म्हणाले, "अधिकृत प्रवेशिका नसताना सदस्यांसोबत आलेल्या आरोपींनी मारामारी करून आक्षेपार्ह स्वरुपाचं कृत्य केलेलं आहे. विधिमंडळाच्या सर्वोच्च परंपरेचं पालन करणं हे उत्तरदायित्त्व आणि जबाबदारी आहे. विधिमंडळाला लोकशाहीचं मंदिर संबोधलं जातं."

"त्याचं काटेकोरपणे पालन करणं अपेक्षित आहे. आमदारांच्या नैतिक आचरणाचे उच्च मापदंड आखण्यासाठी एथिक्स कमिटी गठीत करणं सध्या विचाराधीन आहे. याविषयाचा निर्णय एक आठवड्यात घेण्यात येईल."

तसेच, आता इथून पुढे सदस्य, शासकीय अधिकारी, स्वीय सहाय्यक यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल, इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही, असा निर्णयही अध्यक्षांनी घेतला आहे.

"नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले या दोघांचे वर्तन सभागृहाची प्रतिमा मलीन करणारे असून अवमान करणारे आहे. हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करत आहे." असंही त्यांनी म्हटलंय.

याआधी या प्रकरणावर भाष्य करताना ते गुरुवारी (17 जुलै) म्हणाले होते, "अतिशय कडक कारवाई होणार. या सर्व प्रकरणासंदर्भातील मी अहवाल मागवला आहे. हा अहवाल आला की, पुढील भूमिका स्पष्ट करेन."

"या प्रकरणाचा अहवाल येईपर्यंत मी या प्रकरणावर जास्त बोलणार नाही. अहवाल आल्यानंतर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. माझ्याकडे जे अधिकार आहेत, त्या स्थरावर योग्य ती कारवाई होईल."

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर

फोटो स्रोत, Facebook.com/rahulnarwekarbjp

फोटो कॅप्शन, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर

या साऱ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी (17 जुलै) म्हणाले, "विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. या संदर्भात जी कडक कारवाई असेल ती कारवाई करावी, अशी मी विनंती केली आहे."

"मला असं वाटतं की, अशाप्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात. हे विधानसभेला शोभणारं नाही. त्यामुळे या प्रकणावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे," असं ते म्हणाले.

दुसऱ्या बाजूला, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, "गुंडगिरी विधानभवनापर्यंत पोहोचली आहे. मुख्यमंत्र्यांनी या गुंडांवर आणि त्यांच्या पोशिंद्यांवर कडक कारवाई केली पाहिजे."

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं, "अचूक आकडेवारी जरी माझ्याकडे नसली, तरी एका जुन्या अंदाजानुसार अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च हा किमान दीड ते दोन कोटी रुपये असतो. हे पैसे तुमच्या व्यक्तिगत शेरेबाजीसाठी वाया घालवायचे?"

"महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबित आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाहीये. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का?"

"या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केलं गेलं, तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही!"

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळात बोलताना या प्रकरणावर भाष्य केलं. ते म्हणाले, "इथे जे काही झालं त्यामुळे केवळ एका माणसाची प्रतिष्ठा गेली नाहीये. तर, संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागलं आहे. हे काही बरं नाही."

"आज बाहेर एकट्या पडळकर यांना शिव्या पडत नाहीयेत. आपल्या सर्वांनाच शिव्या पडत आहे. लोक म्हणतायत की, सगळे आमदार माजलेत. त्यामुळे या गोष्टी गांभीर्याने घ्या. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून आपण महाराष्ट्रातील जनतेला काय सांगणार आहोत?" अशा शब्दात फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)