इस्रायली लष्कराच्या हवाई हल्ल्यात 22 पॅलेस्टिनींचा मृत्यू; गाझामध्ये नेमकं काय सुरू?

फोटो स्रोत, EPA/Shutterstock
उत्तर आणि मध्य गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 22 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. हमासच्या वैद्यकीय आणि नागरी संरक्षण अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
शनिवारी (22 नोव्हेंबर) 5 ठिकाणी हल्ले झाले. त्यात निवासी भागांचा समावेश आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक सूत्रांनी सांगितले की, मृतांमध्ये हमासचा एक वरिष्ठ कमांडर आहे.
इस्रायलने ज्या ठिकाणांना लक्ष्य केलं त्यांचा संबंध शनिवारी घडलेल्या घटनेशी होता, असं इस्रायली लष्कराने म्हटलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी एका सशस्त्र व्यक्तीने गाझा पट्टीतील 'यलो लाइन' ओलांडून इस्रायलच्या नियंत्रणाखालील क्षेत्रात प्रवेश केला आणि सैनिकांवर गोळीबार केला.
मात्र, हमासने इस्रायलने केलेले आरोप फेटाळले आहेत.
दोन्ही बाजूंनी एकमेकांवर 6 आठवड्यांपूर्वी झालेल्या युद्धबंदी कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, युद्धबंदी लागू झाल्यापासून इस्रायली हल्ल्यांमध्ये 310 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये 104 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
दरम्यान, इस्रायलने 28 ऑक्टोबरला देखील रात्री गाझावर पुन्हा एकदा जोरदार हवाई हल्ले केले होते.
गाझामध्ये झालेल्या इस्रायलच्या या हल्ल्यात सुमारे 104 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाल्याचं हमास संचालित सिव्हिल डिफेन्स एजन्सी आणि रुग्णालयांनी सांगितलं होतं.
मृतांमध्ये 46 लहान मुलं आणि 20 महिलांचा समावेश होता, तर 250 जण जखमी झाले होते.
इस्रायली संरक्षण दलांनी "डझनभर कट्टरतावादी ठिकाणं आणि कट्टरतावाद्यांना" लक्ष्य केल्याचा दावा केला होता.
त्यांनी हमासवर युद्धबंदी कराराचं उल्लंघन केल्याचा आरोपही केला होता.
मात्र, 29 ऑक्टोबरला इस्रायली सैन्यानं एक्सवरील एका पोस्टमध्ये हल्ले थांबवल्याची आणि युद्धबंदी कायम ठेवल्याची माहिती दिली होती.
त्यात लिहिलं होतं, "हमासच्या उल्लंघनांना प्रत्युत्तर म्हणून कारवाई केल्यानंतर आयडीएफनं युद्धबंदी पुन्हा सुरू केली आहे. आयडीएफनं कट्टरतावाद्यांच्या 30 कमांड ठिकाणांवर हल्ला केला."
पोस्टमध्ये पुढे म्हटलं होतं, "आयडीएफ युद्धबंदी कराराचं पालन करत राहील आणि कोणत्याही उल्लंघनाला कडक प्रत्युत्तर देईल."
याआधी, आशिया दौऱ्यावर असताना, दक्षिण कोरियामध्ये जाताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की 'कोणत्याही गोष्टीमुळे युद्धबंदीला धोका निर्माण होणार नाही.'
मात्र, त्यांनी असंही म्हटलेलं की, जेव्हा इस्रायली सैनिकांना लक्ष्य केलं जाईल, तेव्हा इस्रायलनं प्रत्युत्तर दिलं पाहिजे.

फोटो स्रोत, Abdallah F.s. Alattar/Anadolu via Getty Images
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दीर्घकाळ चर्चा करून इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यात युद्धविराम घडवला होता. परंतु, हा युद्धविराम औटघटकेचाच ठरल्याचे दिसत आहे.
इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कॅट्झ यांनी हमासने इस्रायली सैनिकांवर हल्ले केले आणि ओलिसांचे मृतदेह परत देण्याबाबत ठरवलेल्या अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप केला.
तर दुसरीकडे, हमासने या हल्ल्यांत आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. आणि ते युद्धविरामासाठी 'पूर्णपणे बांधील' असल्याचं स्पष्ट केलं आहे.
हमासच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांत गाझा शहर, बेत ला आणि खान युनिससह अनेक घरं, शाळा आणि इमारतींचं मोठं नुकसान झालं.
तरीही, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. वेन्स यांनी, त्यांना अजूनही युद्धविराम कायम असल्याचा विश्वास असल्याचे म्हटले आहे.
मात्र, इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी हमासने मंगळवारी गाझात इस्रायली सैनिकांवर हल्ला करून 'मर्यादा ओलांडली' असल्याचे सांगितले.
"सैनिकांवर हल्ला करणं आणि ओलिसांचे मृतदेह परत देण्याच्या कराराचं उल्लंघन करणं, याची हमासला मोठी किंमत मोजावी लागेल," असा इशारा त्यांनी दिला आहे.
इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, मंगळवारी दुपारी दक्षिण गाझातील राफा शहरात इस्रायली सैनिकांवर अँटी-टँक क्षेपणास्त्र आणि स्नायपरने हल्ले झाले. त्याच वेळी, पॅलेस्टिनी माध्यमांनी त्या भागात इस्रायलकडून झालेल्या गोळीबाराचे वृत्त दिले.
'सामान्य नागरिकांचे बळी'
हमासच्या नियंत्रणाखालील सिव्हिल डिफेन्स एजन्सीच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं की, गाझा शहराच्या दक्षिण साब्रा भागातील एका घरावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला, त्यात तीन महिलांचा समावेश होता.
सिव्हिल डिफेन्स प्रवक्त्यांनी सांगितलं की, खान युनिसमध्ये एका वाहनावरही हल्ला झाला, ज्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन मुलं आणि एक महिला होती.
हमासने आपल्या निवेदनात म्हटलं आहे, "हमास स्पष्ट करतं की, राफा येथे झालेल्या गोळीबाराशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते युद्धविरामाच्या करारासाठी बांधील आहेत. गाझा पट्टीवरील इस्रायली लष्कराचे बॉम्बहल्ले हे युद्धविराम कराराचं उघड उल्लंघन आहे."

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेचे उपाध्यक्ष वेन्स यांनी वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांना सांगितलं की, "युद्धविराम कायम आहे. पण याचा अर्थ असा नाही की, अधूनमधून छोटे हल्ले किंवा चकमकी होणार नाहीत."
ते पुढे म्हणाले, "आम्हाला माहीत आहे, हमास किंवा गाझातील इतर कोणीतरी इस्रायली सैनिकांवर हल्ला केला. आम्हाला अपेक्षा आहे की, इस्रायल त्याला प्रत्युत्तर देईल, पण मला विश्वास आहे, राष्ट्राध्यक्षांनी प्रस्थापित केलेली शांतता यानंतरही टिकून राहील."
याआधी इस्रायलच्या पंतप्रधानांनी हमासविरुद्ध 'काही ठोस पावलं' उचलण्याचे आश्वासन दिले होते.
'हमासकडून युद्धविरामाचं उल्लंघन'
इस्रायलचा आरोप आहे की, हमासने सोमवारी (27 ऑक्टोबर) रात्री एक शवपेटी सोपवली, पण त्यात गाझातील 13 मृत ओलिसांपैकी कोणाच्याही अवशेषांचा समावेश नव्हता.
नेतन्याहू यांच्या कार्यालयानं सांगितलं की, फॉरेन्सिक तपासणीत हे अवशेष इस्रायली ओलीस ओफिर झरफाती याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा मृतदेह 2023 च्या शेवटी इस्रायली सैन्याने गाझातून शोधून काढला होता. कार्यालयाने हे युद्धविराम कराराचं 'स्पष्ट उल्लंघन' असल्याचं म्हटलं आहे.
इस्रायली लष्कराने एक ड्रोन व्हीडिओही प्रसिद्ध केला आहे. त्यांचा दावा आहे की, त्या फुटेजमध्ये हमासचे सशस्त्र सदस्य 'आधीच तयार केलेल्या जागेतून मृतदेहाचे अवशेष काढून जवळच पुरताना' दिसत आहेत. ही घटना सोमवारी पूर्व गाझा शहरात घडल्याचं सांगितलं जातं.
इस्रायली सैन्याने सांगितलं, "थोड्याच वेळानंतर त्या सशस्त्र सदस्यांनी रेड क्रॉसच्या प्रतिनिधींना बोलावलं आणि जणू त्यांनी एखादा ओलिसाचा मृतदेह बाहेर काढल्यासारखं एक खोटं नाटक केलं."

फोटो स्रोत, JACK GUEZ/AFP via Getty Images
हमासने हे आरोप 'निराधार' असल्याचं म्हटलं आहे. ते 'नवे हल्ले करण्यासाठी खोटे बहाणे तयार करत आहे,' असा इस्रायलवर त्यांनी आरोप केला आहे.
नंतर आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीनं 'बनावट मृतदेह सापडल्याचा' घटनेचा निषेध केला. त्यांची टीम 'हमासच्या विनंतीवरून आणि पूर्ण निष्ठेने' तिथे गेल्याचे स्पष्ट केले.
रेड क्रॉस समितीनं सांगितलं, "आमच्या टीमला या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी तिथे आधीच मृतदेह ठेवला गेला होता, याची काहीही माहिती नव्हती, जसं व्हीडिओमध्ये दिसतं. सामान्यपणे, एक तटस्थ मध्यस्थ म्हणून मृतदेहांचं उत्खनन करणं किंवा तो बाहेर काढण्याचं आमचं काम नसतं."
युद्धविरामाच्या अटी
अमेरिका, इजिप्त, कतार आणि तुर्किये यांच्या मध्यस्थीने झालेला युद्धविराम करार हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 20 मुद्द्यांच्या गाझा शांतता योजनेचा भाग आहे. हा करार युद्धविरामाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
या योजनेनुसार, युद्धविराम लागू झाल्यानंतर 72 तासांच्या आत हमासने एकूण 20 जिवंत ओलीस आणि 28 ओलिसांचे मृतदेह परत देण्याच निर्णय झाला होता.

फोटो स्रोत, ATEF SAFADI/EPA/Shutterstock
सर्व 20 जिवंत इस्रायली ओलिसांना 13 ऑक्टोबरला सोडण्यात आलं. त्याच्या बदल्यात 250 पॅलेस्टिनी कैदी आणि गाझातील 1,718 ओलिसांना मुक्त करण्यात आलं.
याशिवाय, हमासकडून परत मिळालेल्या 13 इस्रायली ओलिसांच्या आणि दोन परदेशी ओलिसांच्या (एक थाई आणि एक नेपाळी) मृतदेहांच्या बदल्यात इस्रायलने आतापर्यंत 195 पॅलेस्टिनींचे मृतदेह परत दिले आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











