इस्रायलचा हमासवर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा आरोप, हमासनं काय उत्तर दिलं?

रविवारी इस्रायलने गाझामध्ये हवाई हल्ले केले होते.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

गाझावर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने शस्त्रसंधी पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली.

इस्रायली सैन्याने (आयडीएफ) ने रविवारी (19 ऑक्टोबर) हमासवर शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता आणि गाझामध्ये हवाई हल्ले केले होते.

आयडीएफचं म्हणणं आहे की, रफाहमधील त्यांच्या सैनिकांवर 'दहशतवाद्यांनी' अँटी-टँक क्षेपणास्त्र डागलं आणि गोळीबार केला". या हल्ल्यात दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, हमासने सांगितलं की इस्रायलच्या नियंत्रणाखालील भागात झालेल्या कोणत्याही चकमकीची त्यांना 'काहीच माहिती नाही'.

हमासने म्हटलं की ते शस्त्रसंधीसाठी कटिबद्ध आहेत. इस्रायलवर उल्लंघनाचा आरोप करत त्यांनी इशारा दिला की अशा हल्ल्यांमुळे 'स्थिती पूर्णपणे बिघडू शकते'.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी इस्रायली सैन्याने सांगितलं की त्यांनी संपूर्ण गाझामध्ये हमासच्या ठिकाणांवर हल्ले केले. रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये 44 जणांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलकडून दक्षिण गाझावर हल्ले

इस्रायली सैन्याने दक्षिण गाझातील रफाह भागात हवाई हल्ले केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच, हमासवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

इस्रायली सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की हमासने 'यलो लाईन' ओलांडून इस्रायली सैनिकांवर अनेक हल्ले केले. हा तोच परिसर आहे, जिथून इस्रायली सैन्य अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या कराराच्या पहिल्या टप्प्यानुसार मागे हटले होते.

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू यांनी आपल्या सुरक्षा अधिकाऱ्यांना निर्देश दिले की त्यांनी 'गाझा पट्टीतील दहशतवादी ठिकाणांविरोधात कठोर कारवाई करावी.'

इस्रायल आणि हमास यांनी एकमेकांवर शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायल आणि हमास यांनी एकमेकांवर शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, हमासने आपण शस्त्रसंधीचे पालन करत असल्याचं सांगतानाच इस्रायल वारंवार कराराचं उल्लंघन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दुसरीकडे एका सुरक्षा अधिकाऱ्यानं सांगितलं की, "राजकीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार, हमासने कराराचे खुले उल्लंघन केल्याने गाझा पट्टीतील मानवीय मदत पुरवठा थांबवण्यात आला आहे."

शस्त्रसंधीच्या दुसऱ्याच दिवशी इस्रायलकडून गोळीबार

हमास आणि इस्रायलने एकमेकांवर शस्त्रसंधी भंग केल्याचे आरोप केले आहेत.

गाझा सिव्हिल डिफेन्सने बीबीसीला सांगितले की, खान युनिसमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये इस्रायली सैन्याच्या गोळीबारात सात लोकांचा मृत्यू झाला आहे.

एक दिवस आधीच इजिप्तमध्ये अनेक देशांचे मध्यस्थ एकत्र आले होते आणि शांतता करारावर स्वाक्षरी झाली होती.

रमल्ला येथील कुद्स न्यूज नेटवर्कने हमासचे प्रवक्ते हाझेम कासेम यांच्या हवाल्याने सांगितले की, "शस्त्रसंधीचा भंग करत इस्रायली सैन्याने गोळीबार केला ज्यात गाझा पट्टीतील अनेक लोक मारले गेले."

हमासच्या अल-अक्सा टीव्हीच्या माहितीनुसार, गाझा सिटी आणि खान युनिसमध्ये इस्रायली गोळीबारात पाच लोकांचा मृत्यू झाला.

शस्त्रसंधी केवळ कागदावर? दुसऱ्याच दिवशी इस्रायलकडून झालेल्या गोळीबारात 7 मृत्युमुखी

फोटो स्रोत, Getty Images

दरम्यान, इस्रायली चॅनल 13 ने वृत्त दिले आहे की, जोपर्यंत हमास ओलिसांचे मृतदेह इस्राइलकडे सुपूर्द करत नाही, तोपर्यंत इस्रायलने गाझा आणि इजिप्तला जोडणाऱ्या रफाह क्रॉसिंगला बंद ठेवण्याचा आणि मानवीय मदत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चॅनल 13 च्या माहितीनुसार, मृतदेह सुपूर्द न करणे हे शस्त्रसंधीचा भंग आहे. त्यात कासेम यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, (मृतांचे) अवशेष गोळा करण्यात हमासला अडचणी येत आहेत.

इस्रायल आणि पॅलेस्टाइनसाठी सोमवारचा (13 ऑक्टोबर) दिवस विशेष होता. गेल्या दोन वर्षांपासून युद्धाने ग्रासलेल्या या दोन्ही भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दोघांमध्ये मध्यस्थी करत शस्त्रसंधी घडवून आणल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. पण ट्रम्प यांना मात्र इस्रायलच्या संसदेत विरोधाचा सामना करावा लागला.

Photo Caption- अयमान ओदेह (उजवीकडे) यांना संसदेतून बाहेर काढताना कर्मचारी.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अयमान ओदेह (उजवीकडे) यांना संसदेतून बाहेर काढताना कर्मचारी.

सोमवारी (13 ऑक्टोबर) इस्रायलच्या संसदेत डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. परंतु, या भाषणादरम्यानच संसदेत दोन खासदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केला. या खासदारांच्या घोषणाबाजीमुळे संसदेत काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

या गोंधळामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना काही वेळ आपलं भाषण थांबवावं लागलं. त्यानंतर दोन्ही विरोधी खासदारांना संसदेतून बाहेर काढण्यात आलं.

ओफर कासिफ आणि अयमान ओदेह अशी दोन्ही खासदारांची नावे आहेत.

अयमान ओदेह यांनी ट्रम्प यांच्यासमोर घोषणाबाजी केली आणि 'पॅलेस्टाइनला मान्यता द्या' असा मजकूर असलेला कागदही त्यांना दाखवला.

यानंतर ओदेह हे मागे बसलेल्या कासिफ यांच्याकडे गेले. नंतर दोघांनाही इस्रायली संसद 'क्नेसेट'मधून बाहेर काढण्यात आलं.

दोघांनाही बाहेर काढल्यानंतर संसदचे अध्यक्ष आमिर ओहाना यांनी ट्रम्प यांची माफी मागितली.

"हे खूप वेगानं आणि यशस्वीरित्या केलं गेलं," असं ट्रम्प यांनी यावेळी गमतीने म्हटलं.

ट्रम्प काय म्हणाले?

"दीर्घ आणि वेदनादायक स्वप्न अखेर संपलं आहे," अशा शब्दांत युद्धाचा संदर्भ देत डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या खासदारांना संबोधित केलं.

2008 नंतर इस्रायलच्या संसदेत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं हे पहिलं भाषण होतं.

ट्रम्प यांनी म्हटलं की, 'हा दिवस तो क्षण आहे, जेव्हा सर्व काही बदलायला सुरू होईल आणि ते खूप चांगल्या दिशेनं बदलेल.'

अयमान ओदेह (उजवीकडे) यांना संसदेतून बाहेर काढताना कर्मचारी.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अयमान ओदेह (उजवीकडे) यांना संसदेतून बाहेर काढताना कर्मचारी.

क्नेसेटमध्ये 'ट्रम्प, ट्रम्प, ट्रम्प' अशा घोषणांच्या दरम्यान, ते म्हणाले की, हा प्रदेश 'नव्या मध्य पूर्वेचा ऐतिहासिक सूर्योदय' पाहत आहे.

"अखेर, फक्त इस्रायलीच नाही तर पॅलेस्टिनी नागरिकही दीर्घ आणि वेदनादायक स्वप्नातून बाहेर आले आहेत."

ही शस्त्रसंधी केली ती 'आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वात आव्हानात्मक यशस्वी गोष्ट' होती, असं त्यांनी सांगितलं.

रशिया आणि युक्रेनचं युद्ध संपवणं, हे आपलं पुढील लक्ष्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

विरोध करणारे खासदार कोण आहेत?

या खासदारांनी सोशल मीडियावर आपला कृतीचा बचाव केला. एक्सवर एका पोस्टमध्ये, कासिफ यांनी सांगितलं की, ते आणि ओदेह 'अडथळा आणायला नव्हे, तर न्याय मागायला आले होते.'

त्यांनी पुढं लिहिलं, "खरी आणि न्यायपूर्ण शांतता, जी या प्रदेशातील दोन्ही लोकांना त्रासापासून वाचवेलती फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा ताबा पूर्णपणे संपुष्टात येईल आणि इस्रायलसह पॅलेस्टाइन देशाला संपूर्ण जगात मान्यता मिळेल."

त्याचबरोबर त्यांनी कागदाचा तो फोटोही पोस्ट केला जो त्यांनी संसदेत दाखवला होता.

तर दुसरीकडे ओदेह यांनीही एक्सवर लिहिलं की, "त्यांनी मला संसदेतून फक्त यासाठी बाहेर काढलं की, मी एक साधी मागणी केली होती. अशी मागणी ज्यावर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदाय सहमत आहे; पॅलेस्टाइन देशाला मान्यता देणं. ही सत्य स्वीकारा."

ओदेह हे विरोधी पक्षाचे खासदार आहेत. ते पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचं समर्थन करतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ओदेह हे विरोधी पक्षाचे खासदार आहेत. ते पॅलेस्टाइनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचं समर्थन करतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दोन्ही खासदार विरोधी गटाच्या हदाश पक्षाशी संबंधित आहेत. त्यांनी ताब्यात असलेल्या पॅलेस्टाइन प्रदेशांवरील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंच्या धोरणांवर कडक शब्दांत टीका केली आहे.

हदाश इस्रायलमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इस्रायल (माकी) आणि इतर डाव्या गटांनी मिळून स्थापन केलेली एक अत्यंत डावी राजकीय आघाडी आहे.

50 वर्षीय अयमान ओदेह हदाशचे प्रमुख नेते आहेत आणि इस्रायली संसदेचे सदस्य आहेत. ते एक प्रमुख इस्रायली अरब नेते आहेत आणि इस्रायलच्या संसदेत अरब समुदायाचा आवाज म्हणून ओळखले जातात.

ते पॅलेस्टिनींसाठी स्वतंत्र देश स्थापन करण्याचे समर्थन करतात. प्रगतिशील आणि शांतताप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

60 वर्षांचे ओफर कासिफ इस्रायली कम्युनिस्ट आणि अरब-ज्यू नेते आहेत. ते 2019 पासून इस्रायलच्या संसदेत हदाश पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहेत.

कासिफ हे सामाजिक न्याय, समानता आणि पॅलेस्टिनींच्या हक्कांसाठी सक्रियपणे काम करतात.

ते पॅलेस्टिनींसाठी स्वतंत्र देश स्थापन करण्याचे समर्थन करतात. तसेच इस्रायलमध्ये अरब आणि ज्यू समुदायांमध्ये शांतता आणि सहअस्तित्वासाठीही ते आवाज उठवत असतात.

'डोनाल्ड ट्रम्प इस्रायलचे सर्वात चांगले मित्र'

ट्रम्प यांच्या आधी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी भाषण केलं.

यावेळी पंतप्रधान नेतन्याहू यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले आणि म्हणाले की, "आम्ही या क्षणाची बऱ्याच काळापासून वाट पाहत होतो. मी संपूर्ण देशाच्या वतीने तुमचे वैयक्तिकरित्या आभार मानू इच्छितो."

"आत्तापर्यंतच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायलचे सर्वात चांगले मित्र आहेत," असं त्यांनी म्हटलं.

नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्या गाझा प्रस्तावाला शांततेच्या दिशेनं टाकलेलं एक 'महत्त्वाचं' पाऊल असल्याचं म्हटलं, "मी शांततेसाठी कटिबद्ध आहे, तुम्हीही या शांततेसाठी वचनबद्ध आहात आणि आपण सर्वांनी मिळून ही शांतता कायम ठेवू."

नेतन्याहू यांनी पुढे म्हटलं, "आज ज्यू कॅलेंडरनुसार दोन वर्षांपासून चालत असलेल्या युद्धाचा शेवट होत आहे."

नेतन्याहू म्हणतात की, ट्रम्प यांच्या नेतृत्वामुळे इस्रायलला अरब देशांशी संबंध सुधारण्यास मदत होईल.

ओलिसांची सुटका

शुक्रवारपासून (10 ऑक्टोबर) लागू झालेल्या शस्त्रसंधी करारानुसार हमासने 48 इस्रायली ओलिसांना सोडायचं आहे. दोन वर्षांच्या युद्धानंतरही त्यांना गाझामध्ये ठेवलं गेलं होतं. यापैकी फक्त 20 जण जिवंत असल्याची पुष्टी झाली आहे.

सोमवारी सकाळी हमासने 20 जिवंत ओलिसांना दोन गटात विभागून आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीच्या (आयसीआरसी) स्वाधीन केलं.

इस्रायली अधिकार्‍यांच्या मते, पहिल्या गटात- एथन मोर, गली बर्मन, झिव्ह बर्मन, ओम्री मिरान, अलोन ओहेल, गाई गिल्बोआ-दलाल आणि माटन अँग्रेस्ट यांचा समावेश होता.

दुसऱ्या गटात- बार कूपरस्टीन, अवयातार डेव्हिड, योसेफ हाइम ओहाना, सेगेव कॅल्फॉन, अविनाटन ऑर, एल्कानाह बोहबोट, मॅक्सिम हार्किन, निमरॉड कोहेन, माटन झांगाउकर, डेविड क्यूनियो, इतान हॉर्न, रोम ब्रासलाब्स्की आणि एरियल क्यूनियो.

ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायलने आपल्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 250 पॅलेस्टिनी कैदी आणि गाझातून 1,718 कैद्यांना सोडण्याचे मान्य केलं आहे. यात 15 अल्पवयीनही आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)