इस्रायल-हमास युद्धविराम लागू; इस्रायली लष्कराची गाझाच्या काही भागांतून माघार

इस्रायल-हमास युद्धविराम लागू; इस्रायली लष्कराची गाझाच्या काही भागांतून माघार

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ह्युगो बशेगा
    • Role, मध्यपूर्व प्रतिनिधी, जेरुसलेम

इस्रायली लष्कराने सांगितले की, शुक्रवारी सकाळपासून इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर त्यांनी गाझाच्या काही भागांतून अंशतः माघार घेतली आहे.

इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी गाझामधील एका ठराविक भागापर्यंत माघार घेतली आहे मात्र अद्यापही गाझा पट्टीच्या अर्ध्या भागावर त्यांचे नियंत्रण आहे.

गेल्या काही महिन्यांत इस्रायली हल्ल्यांनी उद्ध्वस्त झालेल्या गाझाच्या उत्तर भागात हजारो पॅलेस्टिनी नागरिक परतताना दिसत आहेत.

गुरुवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने तयार झालेल्या शस्त्रसंधी आणि ओलिसांची सुटका याविषयीच्या कराराच्या पहिल्या टप्प्याला इस्रायली सरकारने मंजुरी दिल्यानंतर हा युद्धविराम लागू झाला. पुढील टप्प्यांबाबत अद्याप चर्चा सुरू आहे.

या करारानुसार, हमासने सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व इस्रायली ओलिसांची सुटका करायची आहे – यामध्ये सध्या जिवंत असलेल्या 20 व्यक्ती आणि अंदाजे 28 मृतदेहांचा समावेश आहे.

त्याच्या बदल्यात इस्रायलने आपल्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सुमारे 250 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करायची आहे. इस्रायली आर्मी रेडिओनुसार, यातील 100 कैद्यांना वेस्ट बँकेत आणि पाच जणांना ईस्ट जेरुसलेममध्ये सोडण्यात येणार आहे. उर्वरित कैद्यांना देशाबाहेर पाठवले जाण्याची शक्यता आहे.

तसेच, गाझामधून अटक करण्यात आलेल्या आणखी 1,700 पॅलेस्टिनी नागरिकांचीही सुटका केली जाणार आहे.

या करारानुसार, गाझामधील लोकांसाठी अत्यंत आवश्यक असलेली मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकांना निर्बंधांशिवाय गाझामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. गेल्या दोन वर्षांच्या युद्धात अनेक वेळा विस्थापित झालेल्या लोकांसाठी ही मदत अत्यावश्यक आहे.

शुक्रवारपासून दररोज सुमारे 600 मदतीचे ट्रक गाझामध्ये प्रवेश करतील, असा अंदाज आहे. मात्र, याची अंमलबजावणी कशी होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही आणि युद्धविराम लागू झाल्यापासून प्रत्यक्षात मदत पोहोचली आहे की नाही, हेही स्पष्ट झालेले नाही.

ऑगस्ट महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्याने काम करणाऱ्या तज्ज्ञांनी गाझाच्या काही भागात दुष्काळ जाहीर केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, 5 लाखांहून अधिक लोक "भयानक" परिस्थितीत आहेत – ज्यामध्ये उपासमार, दारिद्र्य आणि मृत्यू यांचा समावेश आहे.

इस्रायलने मात्र वारंवार गाझामध्ये उपासमारीची स्थिती असल्याचे नाकारले आहे.

कराराच्या घोषणेनंतर तेल अवीवमध्ये ओलिसांना समर्पित करण्यात आलेल्या चौकात लोक जमले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कराराच्या घोषणेनंतर तेल अवीवमध्ये ओलिसांना समर्पित करण्यात आलेल्या चौकात लोक जमले.

इजिप्तमध्ये दीर्घ चर्चेनंतर इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम आणि कैद्यांच्या सुटकेसंबंधी एक महत्त्वाचा करार झाला आहे.

या करारामुळे गाझामध्ये दोन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

ही एक महत्त्वाची प्रगती असली तरी युद्ध खरोखरच संपेल याची खात्री देता येत नाही.

गाझामधील युद्धविराम आणि शांततेच्या दिशेने झालेल्या या प्रगतीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्तक्षेपाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

ट्रम्प यांनी केवळ हमासवरच नव्हे तर इस्रायलवरही दबाव टाकला आहे.

ट्रम्प यांनी आपण युद्ध थांबवू इच्छितो आणि त्यासाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे.

नेतान्याहूंवर दबाव

हमासच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023रोजी गाझामध्ये युद्धाची घोषणा केली होती. त्या हल्ल्यात 1,200 लोक ठार झाले आणि 251 इस्रायली नागरिक ओलीस ठेवले गेले.

इस्रायली कारवाईत आतापर्यंत 18 हजार बालकांसह 67 हजार पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. या युद्धामुळे गाझाचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला असून एक विनाशकारी मानवी संकट निर्माण झाले आहे.

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध संपेल का?

फोटो स्रोत, Win McNamee/Getty Images

काल 9 ऑक्टोबररोजी झालेल्या करारावर गेल्या आठवड्यातच अमेरिकेत सहमती झाली होती. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू सहभागी झाले होते.

नेतान्याहूवर याआधीच्या शांतता प्रयत्नांना कमजोर करण्याचा आरोप आहे. वृत्तांनुसार, यावेळी अध्यक्ष ट्रम्प नेतान्याहूवर नाराज होते आणि त्यांचा संयमही संपला होता.

अमेरिकेचा इस्रायलवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे इस्रायली पंतप्रधानांसमोर शांतता प्रक्रियेत सहभागी होण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

हमासवरही दबाव

ट्रम्प यांनी अत्यंत कठोर भाषेत हमासला 'पूर्णपणे नष्ट' करण्याची धमकी दिली होती, त्यामुळे हमासही मोठ्या दबावाखाली आहे. अरब आणि इतर मुस्लीम देशांनी ट्रम्प यांच्या योजनेला मान्यता दिली असून इजिप्त, कतार आणि तुर्कस्थाननेही चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या नव्या कराराचे तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत, पण यात सर्व ओलिसांची सुटका होणार आहे, ज्यात 20 जण जिवंत असल्याचे सांगितले जात आहे.

सर्व जिवंत ओलिसांना एकत्रितपणे, कदाचित रविवारीपर्यंत मुक्त केले जाईल, तर 28 जणांचे मृतदेह अनेक टप्प्यांत परत दिले जातील.

या करारानुसार इस्रायलच्या तुरुंगामध्ये अटकेत असलेल्या शेकडो पॅलेस्टिनींची सुटका केली जाईल. तसंच इस्रायलचं सैन्य गाझाच्या काही भागातूनही माघार घेईल आणि त्याठिकाणी मदत वाढवली जाईल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे शांततेसाठीचा नोबेल मिळविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा पुरस्कार शुक्रवारी जाहीर होणार आहे.

गाझा

फोटो स्रोत, BASHAR TALEB/AFP via Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ट्रम्प यांनी त्यांच्या पारंपरिक शैलीत सोशल मीडियावर या घटनेचे वर्णन 'ऐतिहासिक आणि अभूतपूर्व' असं केलं आहे. तसंच हे 'शाश्वत शांततेच्या दिशेनं पहिलं पाऊल" असल्याचंही म्हटलं आहे.

नक्कीच हा एक महत्त्वाचा क्षण आहे. पण गाझा शांतता करार पूर्णपणे लागू होईल याची खात्री देता येणार नाही. त्याचं कारण म्हणजे अजूनही बऱ्याच मुद्द्यावर बरंच काम शिल्लक आहे.

हमासला शस्त्र टाकण्यास तयार करणं, इस्रायलच्या लष्कराच्या परतण्यासंदर्भातील कालमर्यादा ठरवणं आणि गाझा नेमकं कुणाच्या ताब्यात असेल आणि त्याठिकाणी कुणाचं राज्य असेल अशा काही गोष्टींवर अद्याप स्पष्टीकरण नाही.

गाझामधील पॅलेस्टिनींनी मध्यरात्री हमास-इस्रायलमध्ये झालेल्या शांतता कराराची घोषणा झाल्यानंतर आनंद साजरा करत त्यांच्या वेदना कमी होण्याची आशा व्यक्त केली.

तेल अवीवमध्ये ओलिसांना समर्पित करण्यात आलेल्या चौकात जमत लोकांनी आनंद साजरा केला.

बंधकांना सोडल्यानंतर वाटाघाटींमध्ये आपलं स्थान दुबळं ठरणार असल्याची जाणीव हमासला आहे.

त्यामुळंच ओलिसांना सोडल्यानंतर इस्रायल पुन्हा युद्ध सुरू करणार नाही, अशी हमी त्यांच्याकडून मागण्यात आली आहे.

गाझा

फोटो स्रोत, AFP

याबरोबरच संशयाची अनेक कारणं आहेत. इस्रायलनं मार्च महिन्यात युद्धबंदी रद्द करत प्रचंड प्राणघातक हवाई हल्ले सुरू केले.

पण आता इस्रायलतचे नागरिकही युद्धाला कंटाळले असून बहुतांश इस्रायलींना युद्धाचा अंत हवा असल्याचं, अनेक सर्वेक्षणांत स्पष्ट झालं आहे.

तर नेतान्याहूंसमोर अजूनही राजकीय संकटं उभीच आहेत.त्यांचं सरकारला अतिराष्ट्रवादी विचारांच्या लोकांचा पाठिंबा आहे.

हा करार झाला तर पाठिंबा काढण्याची घमी त्यांच्याकडून दिली जात आहे. त्यामुळंच युद्ध जास्तीत जास्त काळ चालवणं हा नेतान्याहू यांचा नाइलाज आहे.

नेतान्याहू यांनी हमासविरुद्ध 'पूर्ण विजय' मिळवण्याचं आश्वासन दिलं आहे. सर्व काही साध्य केल्याचा दावा करता येईल, असा करार त्यांना हवा आहे.

ही घोषणा म्हणजे 'इस्रायलसाठी राष्ट्रीय, नैतिक आणि राजनैतिक विजय' असल्याचं नेतान्याहू म्हणाले आहे. पण युद्ध संपल्याचं मात्र त्यांनी स्पष्टपणे म्हटलं नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)