डोनाल्ड ट्रम्प इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंवर खरंच नाराज आहेत? अरब मीडियात चर्चांना उधाण

डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, बीबीसी मॉनिटरिंग

पॅलेस्टिनी प्रदेशात इस्रायलनं उचललेल्या पावलांमुळे अमेरिका आणि इस्रायलमध्ये तणाव निर्माण झाल्याचं काही वृत्तांमध्ये म्हटलं आहे. अरब प्रदेशातील प्रसारमाध्यमांनी अशा बातम्या प्रामुख्यानं दाखवल्या आहेत.

काही प्रसारमाध्यमांनी अमेरिकेची 'कडक भूमिका'ही बातम्यांतून मांडली आहे. इस्रायलच्या संसदेनं (क्नेसेट) ताब्यात असणाऱ्या वेस्ट बँकेवर सार्वभौमत्व लागू करणाऱ्या विधेयकाला प्राथमिक मंजुरी दिल्यानंतर अमेरिकेनं ही भूमिका घेतली आहे.

डाव्या विचारसरणीकडे कल असणाऱ्या हारेत्झ या इस्रायलमधील वृत्तपत्रानुसार, हे विधेयक अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वेन्स यांच्या दौऱ्याच्या वेळी विरोधी पक्षाचे खासदार अविगडोर लिबरमॅन आणि अवि माओज यांनी मांडलं होतं.

बहुतांश अरब प्रसारमाध्यमांनी वेन्स यांनी केलेल्या टीकेला महत्त्व दिलं. वेन्स यांनी हे पाऊल म्हणजे 'अत्यंत मूर्खपणाचा राजकीय स्टंट' असल्याचं म्हटलं.

तसंच त्यांनी इशारा दिला की विलीनीकरणाचा प्रयत्न, गाझामधील संघर्ष संपवण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेला अडचणीत आणू शकतो.

वेन्स म्हणाले, "मला हे वैयक्तिकदृष्ट्या अपमानास्पद वाटलं. वेस्ट बँकवर इस्रायलचा कब्जा होणार नाही."

इस्रायलला इशारा

आखाती प्रदेशातील प्रमुख अरब वृत्तवाहिन्यांनी सकाळच्या बातम्यांमध्ये वेस्ट बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रयत्नांसंदर्भात अमेरिकेनं दर्शविलेल्या विरोधाला महत्त्व दिलं.

अबू धाबीमधील स्काय न्यूज अरेबियानं त्यांच्या सकाळच्या न्यूज बुलेटिनमध्ये ट्रम्प यांच्या 'तीव्र आक्षेपा'ला मुख्य स्थान दिलं आणि म्हटलं की 'इस्रायल असं कोणतंही पाऊल उचलणार नाही.'

स्काय न्यूज अरेबियानं ट्रम्प यांचा संदर्भ म्हटलं, "वेस्ट बँकेची चिंता करू नका. इस्रायल वेस्ट बँकेबाबत काहीही करणार नाही."

या वृत्तवाहिनीनं सांगितलं की, ट्रम्प यांनी आधीच इशारा दिला आहे की जर इस्रायलनं विलीनीकरणाची योजना पुढे रेटण्याचा प्रयत्न केला तरी त्याला अमेरिकेचा पाठिंबा गमावावा लागू शकतो.

नेतन्याहू

फोटो स्रोत, Getty Images

वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे की, अरब देशांना दिलेल्या आश्वासनांसाठी ट्रम्प कटिबद्ध आहेत आणि विलीनीकरणाला 'मर्यादा ओलांडणं' मानतात.

23 ऑक्टोबरच्या अल तासिआ (रात्री 09:00 वाजता) या कार्यक्रमात स्काय न्यूज अरेबियानं म्हटलं की ट्रम्प यांनी दिलेला हा इशारा म्हणजे 'एक राजकीय थप्पड' आहे आणि ही नेतन्याहूंसाठी एक 'नवीन परीक्षा' आहे.

कतारच्या अल जजीजा या वृत्तवाहिनीनं त्यांच्या सकाळच्या न्यूज बुलेटिनमध्ये एका अमेरिकन अधिकाऱ्याचा संदर्भ देत म्हटलं की, अमेरिकेला चितां वाटते की इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या वागण्यामुळे 'गाझा शांतता करार मोडला जाऊ शकतो.'

अधिकाऱ्यानं संकेत दिला की, जर नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्या योजनेत व्यत्यत आणला तर 'त्यांना त्याची शिक्षा दिली जाईल.'

नेतन्याहू यांच्याविरोधातील 'संताप'

अनेक प्रादेशिक आणि देशांतर्गत प्रसारमाध्यमांनी इस्रायलच्या पंतप्रधानांविरोधात अमेरिकेतील 'वाढत्या संतापा'ला अधोरेखित केलं आहे.

संयुक्त अरब अमिरातमधील ईरम न्यूज या वेबसाईटनं व्हाईट हाऊसमधील एका सूत्राच्या आधारे लिहिलं आहे की 'ट्रम्प याआधी नेतन्याहू यांच्यावर इतके नाराज कधीच झाले नव्हते.'

नेतन्याहू

फोटो स्रोत, Getty Images

वृत्तात म्हटलं आहे की, दोन्ही नेत्यांमध्ये 'एक दुरावा' आहे. एका बाजूला पश्चिम आशियातील देशांबरोबर शांतता करार करवून ट्रम्प यांना इस्रायलच्या सुरक्षेची खातरजमा करून घ्यायची आहे. तर दुसऱ्या बाजूला नेतन्याहू यांना वाटतं की 'तणाव वाढवल्यामुळे आणि युद्ध केल्यानं' इस्रायलची सुरक्षा होते.

अशरक अल-अवसत या सौदी अरेबियातील वृत्तपत्रानं त्यांच्या प्रमुख मथळ्यात लिहिलं, 'वेस्ट बँकेच्या विलीनीकरणाविरोधात अमेरिकेच्या कडक भूमिकेनं इस्रायलला धक्का दिला.'

इस्रायल 'नियंत्रणाबाहेर'

रशियाच्या आरटी अरेबिक वृत्तवाहिनीनंदेखील अमेरिका आणि इस्रायलमधील 'वाढत्या तणावा'ला बातम्यांमध्ये सर्वात वरचं स्थान दिलं. त्यांनी म्हटलं की अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनुसार, 'इस्रायल नियंत्रणाबाहेर गेला आहे.'

वृत्तवाहिनीनं पॉलिटिकोच्या एका वृत्ताचा संदर्भ देत म्हटलं की इस्रायलच्या अलीकडच्या काळातील पावलांबाबत अमेरिकेत 'संताप वाढतो' आहे. गाझामध्ये इस्रायलच्या सैन्याची 'काउंटर-अटॅक कारवाई' आणि क्नेसेटमध्ये वेस्ट बँकेच्या विलीनीकरणाच्या बाजूनं झालेलं मतदान ही त्यामागच्या कारणांपैकी एक आहेत.

जेडी वेन्स यांनी इस्रायलच्या या पावलाला 'अत्यंत मूर्खपणाचा राजकीय स्टंट' म्हटलं आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेडी वेन्स यांनी इस्रायलच्या या पावलाला 'अत्यंत मूर्खपणाचा राजकीय स्टंट' म्हटलं आहे

या गोष्टी 'इस्रायल-हमासमधील संवेदनशील करारासाठी नुकसानकारक असल्याचं' ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

23 ऑक्टोबरच्या आणखी एका वृत्तात आरटी अरेबिकनं टाइम मासिकाला ट्रम्प यांनी दिलेल्या वक्तव्याचा समावेश केला. त्यात ट्रम्प नेतन्याहूंना म्हणाले की, "बीबी, तुम्ही सर्व जगाशी लढू शकत नाहीत. तुम्ही काही लढाया जिंकू शकता, मात्र जग तुमच्या विरोधात आहे आणि जगाच्या तुलनेत इस्रायल खूप छोटा देश आहे."

याचप्रकारे, अल-कुद्स अल-अरबी वृत्तपत्रानं देखील टाइममधील मुलाखतीला वरचं स्थान दिलं. त्यात त्यांनी लिहिलं की या संवादातून स्पष्टपणे दिसतं की 'अरब देशांबरोबरचे संबंध मजबूत करता यावेत, यासाठी अमेरिकेला त्यांचा सर्वात महत्त्वाचा सहकारी असलेल्या इस्रायलवर नियंत्रण ठेवायचं आहे.'

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)