इस्रायलमधून गाझात आलेल्या मृतदेहांवर 'छळ केल्याच्या खुणा'; डॉक्टरांना द्यावं लागतंय 'या' आव्हानांना तोंड

फोटो स्रोत, AFP
- Author, लूसी विलियम्सन
- Role, पश्चिम आशिया प्रतिनिधी, जेरुसलेम
गाझामधील नासिर हॉस्पिटलमधील फॉरेन्सिक टीम एका छोट्याशा खोलीतून काम करते आहे. त्यांच्याकडे डीएनएची तपासणी करण्याची सुविधा नाही, तसंच मृतदेहांना ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेजही नाही.
आता गाझातील परिस्थिती थोडी शांत झालेली असताना डॉक्टरांसमोर अनेक प्रकारची आव्हानं उभी ठाकली आहेत.
गेल्या 11 दिवसांमध्ये इस्रायलनं गाझाला 195 मृतदेह परत केले आहेत. त्याबदल्यात पॅलेस्टिनकडून ओलीस ठेवण्यात आलेल्या 13 इस्रायली नागरिकांचे मृतदेह परत करण्यात आले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घडवून आणलेल्या शस्त्रसंधीच्या कराराअंतर्गत ही देवाण-घेवाण झाली आहे. याव्यतिरिक्त हमासनं नेपाळ आणि थायलंडच्या दोन ओलिसांचे मृतदेहदेखील परत केले आहेत.
गाझाच्या आरोग्य विभागानं प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये अनेक मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत दिसत आहेत. अनेक मृतदेह साध्या कपड्यांमध्ये किंवा फक्त अंडरवेअरमध्ये मिळाले आहेत. काही मृतदेहांवर जखमांच्या खुणा आहेत. अनेक मृतदेहांचे हात मागे बांधलेले आहेत.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, काही मृतदेह डोळ्यांवर पट्टी बांधलेली आणि मानेभोवती कपडा गुंडाळलेल्या अवस्थेत आले आहेत.
नासिर हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक टीमकडे खूप मर्यादित साधनं, सुविधा आहेत. मात्र त्यांना छळ, अत्याचार आणि ओळख पटवण्याशी निगडीत मोठ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत.
मर्यादित संसाधनांमुळे मृतदेहांची ओळख पटवण्याचे प्रयत्न
युनिटचे प्रमुख डॉ. अहमद दायर म्हणाले की, कोल्ड स्टोरेजचा तुटवडा ही त्यांच्यासमोरची सर्वात मोठी समस्या आहे.
ते म्हणाले की, गाझामध्ये जेव्हा मृतदेह येतात, तेव्हा ते पूर्णपणे गोठलेले असतात आणि त्यांना नरम होण्यासाठी अनेक दिवस लागतात. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणं कठीण होऊन बसतं. दातांच्या नोंदींवरून ओळख पटवण्यासारखी मूलभूत तपासणीदेखील होऊ शकत नाही. सखोलपणे तपासणी किंवा शवविच्छेदन करणं तर दूरचीच गोष्ट आहे.

ते म्हणाले, "परिस्थिती खूपच कठीण आहे. जर आम्ही मृतदेह नरम होण्याची वाट पाहिली, तर सडण्याची क्रिया खूप लवकर सुरू होईल. त्यामुळे त्याची तपासणी करणं जवळपास अशक्य होतं. त्यामुळे आमच्यासमोर असलेला सर्वात चांगला मार्ग म्हणजे आम्ही नमुने घ्यावे आणि मृतदेह ज्या स्थितीत आहेत, त्याचप्रकारे त्यांची नोंद करावी."
बीबीसीनं या मृतदेहांचे अनेक फोटो पाहिले आहेत. यातील अनेक फोटो गाझाच्या आरोग्य विभागानं दिले आहेत. तर काही फोटो या ठिकाणी काम करत असलेल्या पत्रकारांनी घेतलेले आहेत.
आम्ही गाझामध्ये मृतदेहांची तपासणी करणाऱ्यांशी, बेपत्ता लोकांच्या कुटुंबांशी, मानवाधिकार संघटनांशी आणि इस्रायली सैन्याव्यतिरिक्त तुरुंग विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो.
याशिवाय आम्ही या भागाबाहेरील तीन फॉरेन्सिक तज्ज्ञांशीदेखील चर्चा केली. त्यातील एक छळाशी संबंधित तपासणीतील तज्ज्ञ आहेत. यासाठीचा तपास कसा केला जातो, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. सर्व तज्ज्ञांचं म्हणणं होतं की, शवविच्छेदन केल्याशिवाय अनेक प्रश्नांची उत्तरं देणं खूप कठीण आहे.
'छळ केल्याच्या खुणा'
नासिर हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक टीमचे सदस्य डॉ. आला अल-अस्तल यांनी सांगितलं की, काही मृतदेहांवर 'छळ केल्याच्या खुणा' दिसल्या आहेत. उदाहरणार्थ शरीरावर निळ्या खुणा आणि हातपाय दोरीनं बांधल्याच्या खुणा.
ते म्हणाले, "काही प्रकरणं तर खूप भयानक होती. त्यात मृतदेहांवर दोऱ्या इतक्या घट्ट आवळून बांधण्यात आलेल्या होत्या की हातांमधील रक्तप्रवाहदेखील थांबलेला होता. यामुळे हाताच्या ऊतींचं नुकसान झालं. मनगट आणि कोपरांवर सर्वत्र दाबाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या."
"डोळ्यांवरील पट्ट्या जेव्हा काढण्यात आल्या, तेव्हा खोल खुणा दिसल्या. विचार करा की, पट्ट्या किती जोरात बांधण्यात आल्या असतील ज्यामुळे इतक्या खोलवर खुणा झाल्या आहेत," असंही ते म्हणाले.
डॉ. अस्तल यांनी असंही सांगितलं की, काही मृतदेहांच्या मानेला ढिलेपणानं बांधलेले कपडे सापडले आहेत. त्यांचा पुढे तपास होण्याची आवश्यकता आहे.
ते पुढे म्हणाले, "एका मृतदेहावर मानेवर सर्वत्र खोल खुण होती. मृत्यू फाशीमुळे झाला की गळा आवळल्यामुळे हे जाणण्यासाठी आम्ही शवविच्छेदन करण्याची आवश्यकता होती. मात्र मृतदेह गोठलेला होता. त्यामुळे तपास होऊ शकला नाही."
हमासच्या सरकारच्या समितीचे सदस्य असलेले समेह यासिन हमद म्हणाले की, त्यांची टीम मृतदेह परत आणण्याचं काम करते आहे. अनेक मृतदेहांवर अशा खुणा आढळल्या आहेत की त्यातून स्पष्टपणे लक्षात येतं की मृत्यूपूर्वी त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली होती. काही मृतदेहांच्या छातीवर आणि चेहऱ्यावर चाकूच्या खुणादेखील होत्या.
युनिटमधून मिळालेल्या फोटोंमध्ये स्पष्ट दिसतं की काही मृतदेहांच्या मनगट, दंड आणि कोपरावर खोलवर खुणा आहेत. जणूकाही त्यांनी केबल किंवा दोरीनं घट्ट आवळून बांधण्यात आलं असावं. एका फोटोमध्ये जखम आणि रगडल्याच्या खुणा दिसतात. त्यातून हे स्पष्ट होतं की ती व्यक्ती जिवंत असताना त्याला बांधण्यात आलं होतं.

काही मृतदेहांवर फक्त खोल खुणा दिसल्या. त्यातून, त्यांना मृत्यूपूर्वी बांधण्यात आलं होतं की नंतर बांधण्यात आलं होतं, हे समजणं कठीण आहे. इस्रायलमध्ये मृतदेहांना घेऊन जाताना कधी-कधी केबल-टायचा वापर केला जातो.
आम्ही जेव्हा इस्रायलच्या सैन्याला या पुराव्यांबाबत प्रश्न विचारले, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की, ते आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार काम करतात.
आम्ही जे फोटो पाहिले, ते फॉरेन्सिक तज्ज्ञांना देखील दाखवण्यात आले. रेड क्रॉसच्या मदतीनं जे मृतदेह गाझामध्ये पोहोचवण्यात आले, त्या मृतदेहांचा हे फोटो म्हणजे एक छोटासा भाग आहे.
सर्व तिन्ही फॉरेन्सिक तज्ज्ञांचं म्हणणं होतं की, मृतदेहांवर दिसलेल्या काही खुणांमधून प्रश्न उपस्थित होतात. मात्र शवविच्छेदन केल्याशिवाय छळ केल्याचा किंवा त्रास दिल्याचा कोणताही ठोस निष्कर्ष काढणं कठीण आहे.
मायकल पोलनन, कॅनाडातील टोरंटो विद्यापीठात फॉरेन्सिक पॅथॉलॉजीचे प्राध्यापक आहेत. मायकल म्हणाले, "गाझामध्ये जे घडतं आहे, ती एक आंतरराष्ट्रीय फॉरेन्सिक आणीबाणी आहे. अशा फोटोंच्या आधारे, पूर्णपणे वैद्यकीय-कायदेशीर शवविच्छेदन करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की, मृत्यू कसा झाला. सत्य जाणून घेण्याचा तोच एक मार्ग आहे."
मर्यादित माहिती असूनही, नासिर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, मृतदेहांची स्थिती आणि हात मागे बांधल्याच्या खुणांमधून त्यांचा किती छळ करण्यात आला होता हे दिसतं.
डॉ. अहमद दायर म्हणाले, "जेव्हा एखादी व्यक्ती नग्नावस्थेत असेल, त्याचे हात मागे बांधलेले असतील आणि मनगट, कोपरांवर बांधल्याच्या स्पष्ट खुणा असतील, तर त्यातून दिसून येतं की त्याचा मृत्यू त्याच अवस्थेत झाला होता. हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन आहे."
इस्रायलच्या कैदेत असणाऱ्या लोकांचा छळ केल्याचे आरोप
अनेक सबळ पुराव्यांमधून दिसून येतं की, ऑक्टोबर 2023 मध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलच्या ताब्यात असलेल्या लोकांमध्ये सर्वसामान्य लोकांचाही समावेश होता. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अत्याचार, छळ झाला. यातील सर्वाधिक प्रकरणं सदे तेमान नावाच्या एका लष्करी केंद्राशी निगडीत आहेत.
नाजी अब्बास, फिजिशियन्स फॉर ह्युमन राईट्स (पीएचआरआय) या इस्रायलच्या मानवाधिकार संघटनेच्या 'कैदी आणि बंदिवान कार्यक्रमा'चे प्रमुख आहेत.
अब्बास म्हणतात, "युद्ध सुरू झाल्यानंतर पहिले किमान 8 महिने गाझामधून आणण्यात आलेल्या बंधकांचे हात मागच्या बाजूस बांधलेले असायचे. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असायची. ती दिवसरात्र, आठवड्याचे सातही दिवस, अनेक महिन्यांपर्यंत होती."
ते म्हणाले, "आम्हाला माहीत आहे की, बेड्या इतक्या घट्ट आवळलेल्या असायच्या की अनेकजणांच्या हात, पाय आणि त्वचेवर गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाला."
ज्या लोकांनी गेल्या 2 वर्षांमध्ये सदे तेमान केंद्रात काम केलं होतं, अशा अनेकांशी बीबीसी बोललं. त्या लोकांनीदेखील पुष्टी केली की बंधकांचे हात आणि पाय नेहमीच बांधलेले असायचे. इतकंच काय उपचार करताना किंवा शस्त्रक्रिया करतानादेखील ते बांधलेल्या अवस्थेत असायचे.
तिथे काम करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्यानं सांगितलं की, त्या लोकांनी अनेकदा बेड्या ढिल्या करण्याचं आवाहन केलं होतं. ते म्हणाले की, कैद्यांवर करण्यात येत असलेले अत्याचार हे 'माणुसकी संपवण्यासारखे' होते.
गाझा युद्धाच्या काळात पकडण्यात आलेल्या अनेकजणांना कोणत्याही आरोपाशिवाय बेकायदेशीर बंडखोर किंवा सैनिक म्हणून ताब्यात ठेवण्यात आलं आहे.
आता नासिर हॉस्पिटलमधील डॉक्टरांसमोरची एक मोठी समस्या आहे. ती म्हणजे परत करण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये कोण हमासचे सदस्य आहेत, जे लढाईत मारले गेले आहेत, कोण सर्वसामान्य नागरिक आहेत आणि असे कोण आहेत ज्यांचा मृत्यू इस्रायलच्या कैदेत झाला याची ओळख पटवणं.

फोटो स्रोत, AFP
काही मृतदेहांवर हमासचा हेडबँड किंवा लष्करी बूट आहेत. मात्र डॉक्टरांचं म्हणणं आहे की, बहुतांश मृतदेह एकतर नग्नावस्थेत आहेत किंवा साध्या कपड्यांमध्ये आहेत. त्यामुळे ते नेमके कोण होते, त्यांना कोणत्या जखमा झाल्या आणि त्यात काही मानवाधिकारांचं उल्लंघन झाल्याच्या खुणा आहेत का, हे ठरवणं खूप कठीण होतं.
बीबीसीनं जे फोटो पाहिले, त्यातील बहुतांश मृतदेह एकतर नग्नावस्थेत आहेत किंवा सडलेले आहेत. एक मृतदेह तर साध्या कपड्यांमध्ये होता, पायात बूट होते. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, त्याच्या पाठीवर दोन छोट्या गोळ्यांच्या खुणा आहेत.
गाझाच्या फॉरेन्सिक समितीचे सदस्य असलेले समेह यासिन हमद म्हणाले की, इस्रायलनं जे 195 मृतदेह परत केले आहेत, त्यातील फक्त सहांबरोबर ओळख पटवणारी कागदपत्रं पाठवण्यात आली होती. त्यातही 5 नावं चुकीची निघाली.
डॉ. अहमद दायर म्हणाले, "हे मृतदेह इस्रायलच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते. त्यांच्याकडे यांचे सर्व रेकॉर्ड्स असतील. मात्र त्यांनी रेड क्रॉसच्या माध्यमातून ही माहिती आम्हाला दिली नाही. आम्हीला फक्त अर्ध्या मृतदेहांचे डीएनए प्रोफाइल पाठवण्यात आले आहेत."
"मात्र मृत्यूची तारीख, कोणत्या परिस्थितीत झाला किंवा कैदेत कधी घेतलं ती वेळ आणि ठिकाण, यापैकी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही."
बीबीसीनं इस्रायलच्या सैन्यानं दिलेल्या माहितीवर प्रश्न उपस्थित केले. यात गाझामधील फॉरेन्सिक टीमच्या गंभीर आरोपांचाही समावेश होता. ते म्हणजे इस्रायलनं डीएनए तपासणीसाठी काही मृतदेहांची बोटं आणि पायांची बोटं कापली होती.
इस्रायलच्या सैन्यानं म्हटलं, "आतापर्यंत परत करण्यात आलेले सर्व मृतदेह गाझा पट्टीत मारले गेलेले हल्लेखोरांचे होते."
इस्रायलच्या सैन्यानं ही गोष्टदेखील नाकारली की मृतदेह परत करण्यापूर्वी त्यांचे हात-पाय बांधण्यात आले होते.
इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाचे प्रवक्ते शोश बेड्रोसियन यांनी बुधवारी (22 ऑक्टोबर) गाझामधून येत असलेल्या या वृत्तांना 'इस्रायलला बदनाम करण्याचा आणखी प्रयत्न' ठरवलं. ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांनी इस्रायली ओलिसांच्या अनुभवांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
बेपत्ता असलेल्या लोकांच्या कुटुंबांसमोरील अडचणी
यादरम्यान, बेपत्ता झालेल्या लोकांचे कुटुंबीय नासिर हॉस्पिटलच्या बाहेर गोळा होत आहेत. डॉ. अहमद दायर आणि त्यांच्या टीमवर मृतदेहांची ओळख पटवण्याचा आणि त्यांच्या कुटुंबियांना उत्तर देण्याचा खूप दबाव आहे.
आतापर्यंत जवळपास 50 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. तेदेखील फक्त उंची, वय किंवा आधीच्या जखमां यासारख्या सामान्य माहितीच्या आधारे झालं आहे.
उर्वरित 54 मृतदेहांचं ओळख न पटवताच दफन करण्यात आले आहेत. कारण हॉस्पिटलच्या युनिटमध्ये जागेचा प्रचंड तुटवडा आहे.

बेपत्ता झालेल्या लोकांचे अनेक कुटुंबीय या आठवड्यात करण्यात आलेल्या अज्ञात मृतदेहांच्या दफनविधीमध्ये सहभागी झाले. त्यांना आशा होती की, त्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती असेल.
रामी अल-फरा अजूनही त्यांच्या चुलत भावाचा शोध घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे, "खरं सांगायचं तर, जोपर्यंत हे कळत नाही की मृतदेह त्याच व्यक्तीचा आहे की नाही, त्याला दफन करणं खूपच कठीण असतं."
हुवैदा हमद त्यांच्या भाच्याचा शोध घेत आहेत. हुवैदा म्हणाल्या, "जर डीएनए चाचणी झाली असती, तर आम्हाला हे माहीत झालं असतं की, तो आहे की नाही. माझ्या बहिणीला हे तर माहीत झालं असतं की ज्याला आम्ही दफन करत आहोत, तो खरोखरंच तिचा मुलगा आहे की नाही."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेल्या शस्त्रसंधीमुळे गाझाला थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या कुटुंबातील व्यक्ती अजूनही बेपत्ता आहेत, त्यांना मात्र अजूनही दिलासा मिळालेला नाही. त्यांना त्यांचे भाऊ, पती किंवा मुलाच्या जागी एखाद्या अनोळखी मृतदेहाला दफन करावं लागतं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











