तिची एक 'नजर' आणि हॉलिवूडच्या इतिहासातील सर्वांत प्रसिद्ध फोटोंपैकी एक फोटोचे गूढ

फोटो स्रोत, Alamy
- Author, ग्रेगरी वेकमन
- Role, बीबीसी कल्चर
सोफिया लॉरेन आणि जेन मॅन्सफिल्ड या दोन अभिनेत्रींच्या एका प्रसिद्ध फोटोची आजही हॉलिवूडमध्ये मोठी चर्चा होताना दिसते. फोटो प्रसिद्ध होऊन 68 वर्षे उलटले तरी त्याचं आकर्षण अजूनही कायम आहे.
हा फोटो केवळ गॉसिपचा विषय नसून त्या काळातील स्त्रियांवरील सामाजिक अपेक्षा, प्रसिद्धीचा ताण आणि चित्रपट क्षेत्रातील भेद या सगळ्याच बाबी दाखवणारा आहे. या ग्लॅमरस फोटोमागची नेमकी गोष्ट काय आहे, हे आपण जाणून घेऊया.
एप्रिल 1957 मध्ये हॉलिवूडमध्ये सोफिया लॉरेनच्या स्वागतासाठी आयोजित डिनरच्या रात्री जेन मॅन्सफिल्डने बेव्हरली हिल्समधील प्रसिद्ध 'रोमॅनोफ' रेस्तराँमध्ये ठरवून एंट्री घेतली.
ही खास डिनर पार्टी पॅरामाउंट स्टुडिओनं आयोजित केली होती आणि त्यात बार्बरा स्टॅनविक, माँटगोमेरी क्लिफ्ट, शेली विंटर्स, गॅरी कूपर अशी हॉलिवूडमधील कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती.
पण या रात्रीचं सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारं आणि इतिहासात कायमचं लक्षात राहिलेले क्षण जेन मॅन्सफिल्ड आणि सोफिया लॉरेन यांच्या एका फोटोमुळे अविस्मरणीय ठरले.
'जेन मॅन्सफिल्ड: द गर्ल कुडन्ट हेल्प इट' या पुस्तकाच्या लेखिका इव्ह गोल्डन यांच्यानुसार, मॅन्सफिल्डला सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचं होतं. फेब्रुवारी 1955 मध्ये तिने वॉर्नर ब्रदर्ससोबत सात वर्षांचा करार केला होता.
त्या वेळी ती 24 वर्षांची होती, प्लेबॉय प्लेमेट राहिलेली होती आणि ती मर्लिन मन्रोची प्रतिस्पर्धी म्हणून पाहिली जात होती. मर्लिन त्या काळात 20 सेन्च्युरी फॉक्ससाठी काहीशी त्रासदायक ठरत होती, अस इव्ह गोल्डन यांनी 'बीबीसी'ला सांगितलं.
फक्त आठ महिन्यांच्या अंतराने आलेल्या दोन चित्रपटांनी – 'द गर्ल कान्ट हेल्प इट' (1956) आणि 'विल सक्सेस स्पॉइल रॉक हंटर?' (1957), जेन मॅन्सफिल्डला लवकरच एक मोठी स्टार बनवलं. या चित्रपटांनी तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं.
सोफिया लॉरेन जेव्हा हॉलिवूडमध्ये आली तेव्हा ती केवळ 22 वर्षांची होती. ती इटलीमध्ये मुसोलिनीच्या फॅसिस्ट राजवटीखाली लहानाची मोठी झाली. तिच्या आईचीही अभिनय क्षेत्रातील स्वतःची स्वप्नं होती, असं 'द ट्रान्सअटलांटिक गेझ : इटालियन सिनेमा, अमेरिकन फिल्म' या पुस्तकाच्या लेखिका मेरी अॅन मॅकडोनाल्ड कॅरोलन सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
लॉरेन किशोरवयात सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. तिथेच तिची भेट भावी पती कार्लो पाँटीशी झाली. पाँटी हा चित्रपट निर्माता होता. लॉरेननं नंतर इटलीच्या राष्ट्रीय चित्रपट विद्यालयात प्रवेश घेतला. तिच्या सुरुवातीच्या अनेक चित्रपटांची निर्मिती कार्लो पॉंटी यानेच केली होती.
दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीत हॉलिवूडच्या चित्रपटांचा पूर आला होता, कारण तिथे चित्रपट बनवण्याचा खर्च कमी होता. "त्या काळात इटली आणि अमेरिका यांच्यात कला, अर्थ, व्यापार आणि सिनेमा यांची जबरदस्त देवाणघेवाण होती," असं कॅरोलन यांनी 'बीबीसी'ला सांगितलं.
'आयडा' (1953) आणि 'द गोल्ड ऑफ नेपल्स' (1954) या चित्रपटांच्या यशानंतर, ते त्या वर्षी कान्स चित्रपट महोत्सवात दाखवले गेले, पॅरामाउंट स्टुडिओने सोफिया लॉरेनला साइन केलं.
त्यांनी ती युरोपमधील लेस्ली कॅरॉन, इंग्रिड बर्गमन आणि मार्लेन डिट्रिच यांच्यासारखीच मोठी स्टार होईल असा विश्वास ठेवला.
कपड्यांनी वेधून घेतलं लक्ष
एप्रिल 1957 मध्ये, सोफिया लॉरेन हिने पहिल्यांदा हॉलिवूडमधल्या उच्चभ्रू लोकांच्या गटात प्रवेश केला. हा कार्यक्रम बेव्हरली हिल्समधल्या रोमॅनोफ्स नावाच्या प्रसिद्ध रेस्तराँमध्ये होता.
या कार्यक्रमात जेन मॅन्सफिल्ड शेवटी आली. ती मोठ्या फरच्या कोटने झाकलेली होती, असं लेखक गोल्डन म्हणतात. पण कोट काढल्यावर तिच्या अंगावर एक अतिशय खुला आणि बॅकेलस सॅटिन गाऊन होता आणि तिला माहीत होतं की, तिच्या या लुककडे सगळ्यांचं लक्ष जाईल, विशेषतः फोटोग्राफर्सचं.
"ती सरळ सोफिया लॉरेनच्या शेजारी जाऊन बसली," गोल्डन सांगतात. "हे ठरवून केलं होतं, जेन मॅन्सफिल्डला नक्की काय करायचंय ते माहीत होतं." छायाचित्रकार डेल्मार वॉटसन आणि जो शेर यांनी दोघींनाही एकत्र फोटोमध्ये टिपलं.
जेन थेट कॅमेऱ्याकडे पाहत होती, पण लॉरेन मात्र तिच्या बाजूला बसलेल्या मॅन्सफिल्डच्या उघड्या गळ्याकडे बघत असतानाच टिपली गेली आणि तो कटाक्ष हॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध कटाक्षांपैकी एक ठरला.

फोटो स्रोत, Alamy
68 वर्षांनंतरही हा फोटो हॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध फोटोपैकी एक मानला जातो. हेडी क्लम, अॅना निकोल स्मिथ, सिडनी स्वीनी, मॉड अपॅटो, सोफिया वेरगारा आणि ज्युली बोवेन यांनी हाच फोटो पुन्हा तयार केला आहे.
हा फोटो आजही लक्षात राहिला आहे, कारण तो सोफिया लॉरेन आणि जेन मॅन्सफिल्ड यांना एकमेकांच्या विरोधात उभं करतो. एकाच फ्रेममध्ये दोन वेगवेगळ्या जगांना दाखवतो.
एकीकडे साधेपणा आणि कमनीयता (लॉरेन), तर दुसरीकडे दिखाऊपणा आणि झगमगाट (मॅन्सफिल्ड). एक युरोपची प्रतिनिधी, तर दुसरी अमेरिका. एक काळ्या केसांची, तर दुसरी सोनेरी केसांची. "जणू त्या मुद्दामच एकमेकींना विरोधात वाटावं अशा पद्धतीनं तयार होऊन आल्या होत्या," असं कॅरोलन म्हणतात.
जगावर कायमचा प्रभाव टाकलेली गोष्ट
पण हा प्रसिद्ध फोटो इतक्या वर्षांनीही चर्चेत राहिला यामागे एक चिंतेची गोष्ट आहे. हा फोटो एक गोष्ट दाखवतो की, माध्यमं महिलांमधील स्पर्धा जास्तच वाढवून दाखवतात, जणू काही स्त्रिया नेहमीच एकमेकींशी स्पर्धा करत असतात, असा चुकीचा समज पसरतो.
खरंतर, त्या दोघी फक्त एकदाच भेटल्या होत्या. आणि त्या वेळी सोफिया लॉरेनला असं वाटत होतं की, मॅन्सफिल्डचा कपड्यांमुळे काहीतरी बिघडेल आणि ते सगळं पत्रकारांसमोर होईल, अशी चिंता तिला होती.
2014 मध्ये 'एंटरटेनमेंट वीकली'ला दिलेल्या मुलाखतीत सोफिया लॉरेन म्हणाली होती, "ती फोटो नीट पाहा. माझे डोळे कुठे आहेत? मी तिच्या छातीकडे (स्तनाग्र) बघतेय, कारण मला वाटत होतं ते कपड्यांमधून बाहेर पडणार आहेत.
माझ्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते. मला इतकी भीती वाटत होती की, तिच्या कपड्यांमधलं सगळं काही कधीही फुटेल, क्षणात धडाम! आणि सगळं टेबलावर सांडेल."
'माय मॉम जेन' या नव्या डॉक्युमेंटरीत, अभिनेत्री जेन मॅन्सफिल्डची मुलगी मारिस्का हार्गीटे तिच्या आईच्या करिअरचा आढावा घेते. मारिया केवळ तीन वर्षांची असताना तिच्या आईचं निधन झालं होतं.
'व्हॅनिटी फेअर'ला दिलेल्या मुलाखतीत तिनं कबूल केलं की, लहानपणी ती या प्रसिद्ध फोटोबाबत गोंधळात होती आणि काही प्रमाणात त्याचा तिला त्रासही झाला होता.
"ते खूप कठीण होतं. लहानपणी दुसऱ्या एखाद्या बाईनं आपल्या आईकडे अशा नजरेनं पाहणं असह्य होतं." मोठं होताना, मारिस्कानं आपल्या आईच्या झगमगत्या प्रतिमेपेक्षा अगदी साधं आणि शांत राहणाऱ्या जीवनशैलीचा मार्ग निवडला.

फोटो स्रोत, Getty Images
या माहितीपटात मारिया कबूल करते की, तिने आपल्या आईसारखी नव्हे तर वेगळी आणि गंभीर प्रतिमा असलेली अभिनेत्री बनायचं ठरवलं. कारण आईच्या करिअरमधील अडचणी ती टाळू इच्छित होती.
आज 61 वर्षांची असलेली ही 'लॉ अॅण्ड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट' मालिकेतील अभिनेत्री, या माहितीपटातून जेन मॅन्सफिल्डची कहाणी पुन्हा समोर आणते.
तिची आई फक्त ग्लॅमरस नव्हती, तर ती व्हायोलिन आणि पियानो वाजवू शकत होती, तीन भाषा बोलू शकत होती आणि लाइफ मासिकाने तिला 'ब्रॉडवेवरील सर्वात हुशार ब्लाँड' म्हटलं होतं.
हा क्षणच असा होता, जेव्हा या दोन अभिनेत्रींच्या वाटा एकमेकांना छेदत होत्या. कारण ज्या वेळी सोफिया लॉरेनचं करिअर तेजीत होतं, त्याच वेळी मॅन्सफिल्डचं करिअर घसरायला लागलं होतं.
1960 मध्ये लॉरेनला 'टू वुमन' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. परदेशी भाषेतल्या भूमिकेसाठी ऑस्कर जिंकणारी ती पहिली कलाकार ठरली.
दरम्यान, लॉरेनच्या पार्टीत मॅन्सफिल्डने केलेली स्टंटबाजी 20 सेंच्युरी फॉक्स कंपनीला फारच खटकली. "तेव्हाच त्यांना समजलं की त्यांनी चुकीच्या व्यक्तीबरोबर करार केला आहे," असं गोल्डन म्हणतात.
"मला वाटतं, हाच तो क्षण होता जेव्हा फॉक्स कंपनीने तिचं करिअर पुढे नेण्यात रस दाखवणं थांबवलं."
अपूर्ण राहिलेल्या इच्छा
1962 मध्ये, मर्लिन मन्रोच्या मृत्यूनंतर तीन वर्षे चित्रपट चालले नाहीत म्हणून फॉक्स स्टुडिओने मॅन्सफिल्डला नाकारलं. मग तिच्यावर मोठं घर चालवायचं आणि तीन मुलांची जबाबदारी होती.
त्यामुळे ती कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी सुपरमार्केट्स आणि पेट्रोल पंपांची उद्घाटनं करायला लागली.
गोल्डन यांचं मत आहे की मॅन्सफिल्डच्या करिअरच्या योजना, महत्त्वकांक्षा अपूर्ण राहिल्या, कारण "तिला काय मिळवायचं हे माहिती होतं, पण ते कसं करायचं याची कल्पनाच नव्हती. तिला खरोखरच हुशार आणि मजबूत मॅनेजरची गरज होती."
दरम्यान, लॉरेनला ऑस्करविजेता निर्माता पाँटीकडून मार्गदर्शन मिळत होतं. "त्याला चित्रपटसृष्टीचं विलक्षण ज्ञान होतं," असं कॅरोलन म्हणतात. "माध्यमांच्या गोंधळात कसं वागायचं हे लॉरेनला माहीत होतं. ती कोणाच्या हातचं बाहुलं बनली नाही. ती ना पत्रकारांच्या गळी पडली ना मॅनेजरच्या."
लॉरेन इतकी हुशार होती की, तिनं हॉलिवूड आणि इटालियन दोन्ही प्रकारचे चित्रपट एकत्र करत आपली कारकीर्द मजबूत ठेवली आणि ती जवळपास 70 वर्षे लोकप्रिय राहिली.

फोटो स्रोत, Getty Images
मॅन्सफिल्डचं केवळ नावसुद्धा हरवलं नाही, तर तिचा शेवटही दु:खद झाला. 29 जून 1967 रोजी, वयाच्या फक्त 34व्या वर्षी ती कार अपघातात मरण पावली. ती मिसिसिपीमधल्या एका नाइट क्लबमधील कार्यक्रम संपवून न्यू ऑर्लिन्समध्ये दुपारच्या रेडिओ मुलाखतीसाठी जात होती.
परंतु, असा प्रवास तिच्यासाठी काही नवीन नव्हता. कारण एकदा का ती स्टार बनली, की तिला मिळालेली प्रसिद्धीचा प्रत्येक क्षण जगायचा होता, त्यातला एकही क्षण वाया जाऊ द्यायचा नव्हता.
"तिला सतत लोकांचं लक्ष आपल्याकडे असावं असं वाटायचं. ती आपल्या चाहत्यांना खूप आवडायची. ती जशी पडद्यावर दिसायची, तशीच प्रत्यक्ष आयुष्यातही वागायची," असं गोल्डन म्हणतात.
"तिला पहिली 'रिअॅलिटी स्टार' म्हणता येईल, कारण ती सतत लोकांसमोरच जगत होती. ती काहीही करत असेल, तरी तिच्यासोबत नेहमी छायाचित्रकार आणि पत्रकार असायचे."
कॅरोलन म्हणतात की, "मॅन्सफिल्डने सोफिया लॉरेन, ब्रिजिट बार्डोट आणि क्लॉडिया कार्डिनेल यांसारख्या अभिनेत्रींसाठी वाट मोकळी करून दिली." कारण पुरुषप्रधान सिनेसृष्टीत तिनं आपलं सौंदर्य आणि कामुकता अभिमानाने स्वीकारली आणि त्यातून अनेक बंधनंही तोडली.
त्यांची भेट फक्त एकदाच झाली होती, तरी सोफिया लॉरेन यांनी 'एंटरटेनमेंट वीकली'ला सांगितलं की लोक अजूनही त्यांच्याकडून तो प्रसिद्ध फोटो सही करून घ्यायचा आग्रह करतात.
पण त्या नेहमी नकार देतात. त्या म्हणाल्या, "मला त्याच्याशी काही देणं-घेणं ठेवायचं नाही. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, जेन मॅन्सफिल्डचा आदर म्हणून, कारण ती आता आपल्या सोबत नाही."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











