वयाच्या 28 व्या वर्षी फेसलिफ्ट? तरुण वर्गात का वाढतोय प्लास्टिक सर्जरीचा ट्रेंड?

फोटो स्रोत, @hotgirlenhancements
सोशल मीडियावर सर्वत्र एकच ट्रेंड दिसतोय. माझ्या फीडमध्ये देखील असंख्य पोस्ट आहेत. यातील बहुतांश 20-30 वर्षे वयोगटातील लोकांच्या आहेत. सर्वजण फेसलिफ्टच्या वेगवेगळ्या मार्गांबद्दल बोलत आहेत.
कोणी मिनी फेसलिफ्टबद्दल बोलतं आहे, तर कोणी पोनीटेल किंवा डीप प्लेनबद्दल.
कधीकाळी फेसलिफ्ट फक्त श्रीमंत आणि वयस्कर लोकांपुरते मर्यादित होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता अनेक तरुणदेखील शस्त्रक्रिया करत आहेत.
अनेकजण तर बिनधास्तपणे शस्त्रक्रियेआधीचे फोटो आणि त्यानंतर चेहरा सुजलेल्या अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर टाकत आहेत.
या शस्त्रक्रियेबद्दल बोलणे आता काही फारसे गैर देखील मानले जात नाही. क्रिस जेनर, कॅट सॅडलर आणि मार्क जॅकब्ससारख्या सेलिब्रिंटीनी देखील अगदी उघडपणे आपल्या फेसलिफ्टबद्दल सांगितलं आहे.
इतर असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी शस्त्रक्रिया केल्याची चर्चा नेहमीच होत असते.
सर्वसाधारणपणे फेसलिफ्ट हा शेवटचा पर्याय मानला जातो. कॉस्मेटिक सर्जरीमध्ये याला सर्वात मोठी आणि कठीण प्रक्रिया मानलं जातं.
तरुण का करत आहेत प्लास्टिक सर्जरी?
या फेसलिफ्टच्या ट्रेंडमुळे एक गोष्ट मनात येते की या ऑनलाईन जगात लोक स्वतःला इतकं असुरक्षित मानत आहेत का, की सुंदर दिसण्यासाठी लाखो रुपये खर्चायची त्यांची तयारी असते.
का असं घडलंय, की आधीच बोटॉक्स आणि फिलरसारख्या शस्त्रक्रिया त्यांनी घेतल्या आहेत. पण आता पुढची पायरी म्हणून त्यांना आपली चेहऱ्यावरील त्वचा उघडून त्यात चरबी-टिश्यू भरण्याची त्यांची तयारी आहे.
या गोष्टींचा नक्कीच विचार करता येईल.
28 वर्षांच्या एमिली यांच्यासाठी फेसलिफ्ट करण्याचा अर्थ होता की एक 'स्नॅच्ड लूक' मिळवणं. म्हणजेच टोकदार जॉलाईन, गालाची उंच हाडं आणि फॉक्स आईज मिळवणं. त्या म्हणतात की तुर्कीयेमध्ये करण्यात आलेल्या ही शस्त्रक्रिया हा त्यांच्यासाठी 'आयुष्य बदलून टाकणारा अनुभव' होता. त्यांना याचा कोणताही पश्चताप नाही.

फोटो स्रोत, @hotgirlenhancements
एमिली म्हणतात, "मी एकाच वेळी सहा शस्त्रक्रिया केल्या. यात मिड-फेसलिफ्ट, लिप लिफ्ट आणि रायनोप्लास्टी म्हणजे नोज जॉब यांचा समावेश होता."
या प्रक्रियेबद्दल सांगताना, कॅनडाच्या टोरँटोच्या बिझनेसवुमन एमिली म्हणतात, "शस्त्रक्रियेआधी डॉक्टरांनी माझं आवडतं गाणं ऐकवलं. मग मी झोपले. जाग आल्यानंतर मला उलट्या झाल्या. मात्र आता माझ्याकडे नवीन चेहरा आणि नवीन नाक होतं."
यातून पूर्ण बरं होण्यासाठी काही काळ लागणार होता. सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये वेदना आणि सूज थोडी कमी झाली. मात्र गालाच्या काही भागात संवेदना परत येण्यासाठी सहा महिने लागले.
शस्त्रक्रिया करणाऱ्यांचा वयोगट कमी का होत चालला आहे?
पुन्हा अशी शस्त्रक्रिया करायची आहे का? या प्रश्नावर एमिली थोडा विचार करतात. त्या म्हणतात, "शस्त्रक्रियेनंतर माझं आयुष्य बदललं आहे. मी आता अधिक निरोगी आहे. पूर्वीपेक्षा अगदी थोडीच दारू पिते. त्वचेची काळजी घेते आणि चांगली झोप घेते. मला वाटतं की आज मला जी माहिती आहे, ते सर्व जर मला आधीच माहीत असतं तर कदाचित मी ही शस्त्रक्रिया केली नसती."
एमिली म्हणतात, "माझ्या आईलादेखील याबद्दल नंतरच कळालं. माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन दिवसांनी मी तिला सांगितल्यावर तिला हे माहीत झालं."
मग त्या थोडा वेळ थांबल्या, विचार केला आणि म्हणाल्या, "मला फक्त अधिक चांगलं व्हायचं होतं, चांगलं दिसायचं होतं. आता मला वाटतं की मी तशी झाले आहे."

फोटो स्रोत, Julia Gilando
ब्रिटिश असोसिएशन ऑफ ॲस्थेटिक प्लास्टिक सर्जन्स यांच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात ब्रिटनमध्ये फेसलिफ्ट करणाऱ्यांच्या संख्येत 8 टक्के वाढ झाली आहे.
वयोगटानुसार आकडेवारी देण्यात आलेली नाही. मात्र अनेक डॉक्टर म्हणतात की आता शस्त्रक्रिया करणाऱ्यांचं सरासरी वय आधीच्या तुलनेत कमी होत चाललं आहे.
जगाच्या इतर भागात देखील हाच ट्रेंड दिसतो आहे. अमेरिकन सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जन्स यांच्या मते, आता जनरेशन एक्स म्हणजे 45 ते 60 वर्षांच्या लोकांमध्ये देखील फेसलिफ्टचा ट्रेंड वाढतो आहे.
ब्रिटिश असोसिएशनच्या अध्यक्ष नोरा न्यूजेंट म्हणतात की या बदलामागे अनेक कारणं आहेत. यात वजन कमी करणाऱ्या औषधांच्या वाढत्या ट्रेंडचाही समावेश आहे.
त्या म्हणतात, "या औषधांमुळे वजन खूप वेगानं कमी होतं. त्यामुळे शरीरावरील त्वचा सैल होते. फेसलिफ्टद्वारे ती व्यवस्थित केली जाऊ शकते. आता शस्त्रक्रियेच्या पद्धती खूप विकसित झाल्या आहेत."
अर्थात नोरा न्यूजेंट म्हणतात की फेसलिफ्ट ही अजूनही एक मोठी शस्त्रक्रिया आहे. ती फक्त तज्ज्ञ, नोंदणीकृत प्लास्टिक सर्जन, योग्य उपकरणं असणाऱ्या नोंदणीकृत सेंटरमध्येच केली पाहिजे.
डॉक्टरची निवड करणं खूप महत्त्वाचं
कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन सायमन ली यांनी ब्रिस्टलमधील त्यांच्या क्लिनिकमध्ये आतापर्यंत शेकडो फेसलिफ्ट शस्त्रक्रिया केल्या आहेत. ते एका शस्त्रक्रियेचा व्हीडिओ दाखवतात.
ही संपूर्ण प्रक्रिया होत असताना रुग्ण पूर्णपणे शुद्धीत असतो. त्याला फक्त थोडासा लोकल ॲनेस्थेशिया दिला जातो. त्याचा परिणाम फक्त त्वचा आणि त्याच्या वरच्या ऊतींवरच होतो.
सायमन ली म्हणतात की ते चेहऱ्यावर छोटे छोटे काप देतात. मग त्वचा, चरबी आणि सुपरफिशियल एरिया म्हणजे एसएमएएसपर्यंत पोहोचतात. हाच भाग चेहऱ्यावरील भावांचं नियमन करतो. त्यानंतर ते आणखी खोल जात ऊती आणि स्नायू पुन्हा नीट करतात. जेणेकरून चेहऱ्याचा आकार चांगला व्हावा.
जवळपास चार तास होणारी ही शस्त्रक्रिया आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होते, तेव्हा रुग्ण दिलासा मिळत स्मितहास्य करत उठतो.
सायमन ली म्हणतात की आता फेस आणि नेक लिफ्टची प्रक्रिया सोपी झाल्यामुळे, लोक त्यांना पसंती देत आहेत. आधी या शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये जनरल ॲनेस्थेशिया देऊन केली जात असे. मात्र आता ते त्यांच्या क्लिनिकमध्ये बेशुद्ध न करताच फेस आणि नेकलिफ्ट करतात.
ते म्हणतात, "हा या उद्योगासाठी अत्यंत गतिमान काळ आहे. नवनवे बदल वेगानं होत आहेत."
ते म्हणतात की क्लासिक फेसलिफ्ट, यात खालचा जबडा आणि मानेवर लक्ष केंद्रीत केलं जातं, अजून देखील ही लोकप्रिय प्रक्रिया आहे. मात्र आता अशा ट्रीटमेंटदेखील उपलब्ध आहेत, ज्यात चेहऱ्याच्या वरच्या दोन भागांवर काम केलं जातं. त्यांच्या मते, वयाचा परिणाम सर्वात आधी तिथेच दिसू लागतो.

फोटो स्रोत, Caroline Stanbury
अर्थात डॉक्टर ही गोष्टदेखील स्पष्ट करतात की फेसलिफ्ट 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांसाठी उपयुक्त असतं. 20 किंवा 30 वर्षांच्या वयातच इतकी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करणं सामान्य बाब नसते.
अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत अनेक धोके आणि अडचणी असतात. यात हेमेटोमा म्हणजे त्वचेच्या खाली रक्त होण्यासारख्या समस्यांचा समावेश आहे. जर त्यावर उपचार झाले नाहीत, तर ऊतींचा मृत्यू म्हणजे नेक्रोसिस होऊ शकतो. याशिवाय संसर्ग, नसांचं नुकसान आणि केस गळतीसारख्या समस्यादेखील उद्भवू शकतात.
ब्रिटनमध्ये फेसलिफ्टसाठी येणारा सरासरी खर्च 15,000 ते 45,000 पौंडांदरम्यान असते. अर्थात काही क्लिनिक या शस्त्रक्रिया फक्त 5,000 पौडांमध्ये देखील करतात.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की शस्त्रक्रिया करण्याआधी संपूर्ण माहिती घेणं आणि फेसलिफ्टमध्ये तज्ज्ञ डॉक्टरकडून ती करून घेणं खूप महत्त्वाचं असतं.
तुर्कियेमध्ये शस्त्रक्रिया करण्याचा ट्रेंड का वाढला?
34 वर्षांच्या ज्युलिया जिलांडो यांनी देखील फेसलिफ्ट करण्याचं ठरवलं. लहानपणी जबड्यांची रचना योग्य नसल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यात थोडासा असमानता होती.
त्यांच्या अनेक मैत्रिणींचं म्हणणं होतं की त्यांच्या चेहऱ्यात कोणताही दोष दिसत नाही. मात्र ज्युलिया यांना स्वत:ला मात्र तो फरक जाणवायचा. त्या म्हणतात की त्यांनी ठरवलं की तुर्कियेमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करायची. यासाठी 8,000 डॉलर म्हणजे जवळपास 6,000 पौंड खर्च येणार होता.
अर्थात तुर्कियेमध्ये कॉस्मेटिक सर्जरी करण्याशी निगडित धोक्यांबद्दल इशारे दिले गेले आहेत. मात्र तरीदेखील तिथे शस्त्रक्रिया करण्याचा ट्रेंड सातत्यानं वाढतो आहे. यामागचं एक मोठं कारण म्हणजे तिथे खर्च कमी येतो.
हेल्थकेअर क्षेत्राशी संबंधित ज्युलिया जिलांडो म्हणतात, "सुरूवातीला मला ही कल्पना म्हणजे वेडेपणा वाटली होती. मात्र मी माहिती घेतली आणि ठरवलं की मी ते करणार आहे. मी घाबरलेली होते. एका अनोळखी देशात मी एकटी होते. मला तिथली भाषादेखील येत नव्हती."
त्या म्हणतात, "शस्त्रक्रियेनंतर मी दोन दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि सर्वकाही आपोआपच ठीक झालं. चेहरा इतका सुजला होता की मी पाहूदेखील शकत नव्हते. काही दिवस खूपच कठीण होते. तो भावनिकदृष्ट्या चढउतारांचा प्रवास होता."
संशोधकांना या गोष्टीची चिंता आहे की कॉस्मेटिक उद्योग ज्या प्रकारचा दावा करतो, त्याप्रमाणे याप्रकारची कॉस्मेटिक सर्जरी केल्यामुळे खरोखरंच आत्मविश्वास आणि आत्मसन्मान मिळतो का.
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंग्लंडमधील सेंटर ऑफ अपीयरन्स रिसर्चमधील तज्ज्ञ डॉ. किर्स्टी गार्बेट म्हणतात, "मला वाटतं की आजच्या काळात प्रचंड दबाव आहे. विशेषकरून चेहऱ्याबाबत. व्हीडिओ कॉल्स आणि सोशल मीडियावर आपण स्वत:ला वारंवार पाहतो. त्यामुळे आपण सहजपणे इतरांशी तुलना करू लागतो."
त्या म्हणतात, जे आपल्याला स्क्रीनवर दिसतं, ते नेहमीच खरं चित्र नसतं.
"एआय आणि फिल्टरमुळे एक खोटं ऑनलाईन जग बनवलं आहे. त्यामुळेच कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा ट्रेंडदेखील वाढतो आहे."
डॉ. गार्बेट म्हणतात, "सेलिब्रिटीज यावर उघडपणे बोलतात, ते एका मर्यादेपर्यंत चांगलं आहे. मात्र या गोष्टीचं सामान्यीकरण करणं, जणूकाही तो आयुष्याचाच एक भाग झाला आहे असे मानणे मात्र सर्वाधिक चिंताजनक आहे."
कमी वयात शस्त्रक्रिया करणाऱ्यांची वाढती संख्या
टीव्ही प्रेझेंटर आणि 'रिअल हाऊसवाईव्ह्ज ऑफ दुबई'च्या स्टार कॅरोलीन स्टॅनबरी यांनी दोन वर्षांआधी वयाच्या 47 व्या वर्षी फेसलिफ्टची शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळेस अनेकजणांनी त्यांना असं न करण्याचा सल्ला दिला होता.
कॅरोलीन म्हणतात, "तो माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय होता. मी वयाच्या 60 व्या वर्षापर्यत वाट का पाहू? मला जेव्हा गरज असेल तेव्हाच करू? मला अजूनही छान दिसायचं आहे आणि तसंच वाटून घ्यायचं आहे."
20 वर्षे नियमितपणे बोटॉक्स आणि फिलर केल्यानंतर त्यांना वाटू लागलं की त्यांचा चेहरा 'विचित्र' दिसू लागला आहे. त्यांनी अमेरिकेत डीप प्लेन फेसलिफ्ट करण्यासाठी 45,000 डॉलर म्हणजेच जवळपास 40 लाख रुपये खर्च केले.
त्या म्हणतात, "मला अजूनही तसंच, छान दिसायचं आहे. मात्र या शस्त्रक्रियेमुळे मला पुढील 20 वर्षे आत्मविश्वासानं भरलेला चेहरा मिळाला आहे."
बेल्जियमचे प्लास्टिक सर्जन एलेक्सिस वर्पाल यांच्याकडे जगभरातून लोक येतात. ते म्हणतात की कमी वयात किंवा तरुण वयात शस्त्रक्रिया करणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्याची त्यांना चिंता वाटते.
ते म्हणतात की ते अनेकदा त्यांच्या तरुण रुग्णांशी प्रदीर्घ चर्चा करतात. ते त्यांना समजवतात की काही लूक्स शस्त्रक्रियेशिवाय देखील मिळवले जाऊ शकतात.
वर्पाल म्हणतात, "जर कोणी त्याच्या वयाच्या विशीत फेसलिफ्ट करून घेतलं आणि समजा त्याचा प्रभाव 10-15 वर्षे राहिला, तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत त्या व्यक्तीला तीन वेळा फेसलिफ्ट करवून घ्यावं लागेल."
ते म्हणतात, "चेहऱ्यासाठी हा खूप मोठा परिणाम असतो. शिवाय ते अशा स्थितीत केलं जातं, जेव्हा सर्वकाही ठीक चाललेलं असतं आणि कोणतीही समस्या नसते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











