लाँग कोव्हिड : MRI स्कॅनमुळे लक्षणांची नवी माहिती आली समोर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉमिनिक ह्युजेस
- Role, आरोग्य प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
दीर्घकाळ कोव्हिडसोबत जगणाऱ्या लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या अवयवांना इजा पोहोचल्याचं दिसून येतंय, असं एका नव्या अभ्यासात समोर आलंय.
एमआरआय स्कॅनमध्ये असं दिसून आलंय की, दीर्घकाळ कोव्हिडशी झगडणाऱ्या रुग्णांच्या फुफ्फुस, मेंदू आणि मूत्रपिंड यांसारख्या अनेक अवयवांमध्ये काही ना काही इजा असल्याची शक्यता तिपटीनं आहे.
या रुग्णांच्या आजाराच्या तीव्रतेचा संबंध दीर्घकाळ कोव्हिडशी असल्याचं संशोधकांना वाटतं.
यूकेमधील संशोधकांचा हा अभ्यास दीर्घकाळ कोव्हिडवर परिणामकारक उपचार विकसित करण्यासाठी मदत करेल, अशी आशा व्यक्त केली जातेय.
MRI स्कॅनमधून काय समोर आलं?
‘लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, अशा 259 रुग्णांचं निरीक्षण करण्यात आलं, जे कोव्हिडमुळे आजारी पडले होते की, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं.
या रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पाच महिन्यांनी त्यांच्या प्रमुख अवयवांचं एमआरआय स्कॅन करण्यात आलं. या एमआरआय स्कॅनची तुलना ज्यांना कधीच कोव्हिडची लागण झाली नव्हती, अशा 52 लोकांच्या एमआरआय स्कॅनसोबत करण्यात आली.
यात असं दिसून आलं की, कधीच कोव्हिडची लागण न झालेल्या 52 लोकांच्या तुलनेत कोव्हिडची लागण झालेल्या 259 रुग्णांच्या अवयवांमध्ये काही लक्षणीय फरक दिसून आले. सर्वात मोठा परिणाम फुफ्फुसांवर दिसून आला, म्हणजे जवळपास 14 पटीने असामान्यतेची शक्यता दिसली.
कोव्हिडनं गंभीररित्या आजारी पडलेल्या लोकांच्या एमआरआय स्कॅनमध्ये मेंदूमध्ये असामान्यतेची शक्यता तिपटीने जास्त होती, मूत्रपिंडात हीच शक्यता दुप्पट होती.

फोटो स्रोत, Getty Images
हृदयाच्या किंवा यकृताच्या आरोग्यामध्ये विशेष फरक पडलेला स्कॅनमधून दिसला नाही.
या अभ्यासगटातील एक प्रमुख संशोधक आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील डॉ. बेट्टी रमन सांगतात, “हे स्पष्ट आहे की, दीर्घकाळ कोव्हिडची लक्षणे असलेल्या व्यक्तींना काही अवयवांचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
“रुग्णाचे वय, ते कोव्हिडने किती गंभीर आजारी होते, तसंच त्यांना त्याच वेळी इतर आजार असल्यास शरीरातील या महत्त्वाच्या अवयवांचे नुकसान झाले आहे की नाही, हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत.”
नवीन उपचारपद्धती
कोव्हिडमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या आणि नंतर बराच काळ ज्यांच्यावर परिणाम दिसून आले, त्यांचा अभ्यास करून हे काढलेले निष्कर्ष एका मोठ्या संशोधनयुक्त अभ्यासाचा भाग आहे. हा अभ्यास फॉस्प-कोविड अभ्यास म्हणून ओळखला जातो.
संशोधकांना एमआरआय स्कॅनमध्ये अवयवांच्या नुकसानीच्या लक्षणांशी जुळणारी काही लक्षणे आढळली. उदाहरणार्थ – जखडलेली छाती आणि फुफ्फुसात बिघाडासह खोकला. तरीही, दीर्घकाळ कोविडसह जगणाऱ्यांनी अनुभवलेली सर्व लक्षणे स्कॅनवर दिसलेल्या गोष्टींशी थेट जोडली जाऊ शकत नाहीत.
डॉ. रामन म्हणतात की, असंही दिसतंय की, ज्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि सुरुवातीच्या संसर्गातून बरे झाल्यानंतरही ते शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांची तक्रार करत होते, अशा लोकांमध्ये एकापेक्षा जास्त अवयवांमध्ये बिघाड होणं ही सामान्य गोष्ट होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्या पुढे म्हणाले की, “आम्हाला असं लक्षात आलंय की, एमआरआयवर मल्टी-ऑर्गन पॅथॉलॉजी असलेले लोक, म्हणजे ज्यांच्या दोनपेक्षा जास्त अवयवांमध्ये बिघाड झालीय, त्यांच्यात गंभीर आणि अतिशय गंभीर मानसिक, शारीरिक कमतरतेची शक्यता चारपट जास्त होती.
“आमचे निष्कर्ष फुफ्फुसाच्या आणि एक्स्ट्रापल्मोनरी हेल्थ (मूत्रपिंड, मेंदू आणि मानसिक आरोग्य) वर केंद्रित दीर्घकालीन मल्टी-डिसिप्लेनरी फॉलो-अप सेवांची आवश्यकता देखील अधोरेखित करतात, विशेषत: कोव्हिड झाल्यानं हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्यांसाठी.”
लीसेस्टर विद्यापीठातील प्रोफेसर आणि फॉस्प-कोव्हिड अभ्यासगटाचे नेतृत्व करणारे प्रो. ख्रिस ब्राइटलिंग म्हणतात की, हे संशोधन लाँग कोव्हिड म्हणून ओळखले जाणारे सिंड्रोम बनवणाऱ्या विविध लक्षणांचा समूह समजून घेण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे.
ते पुढ म्हणतात की, “संपूर्ण-शरीर इमेजिंगचा हा तपशीलवार अभ्यास पुष्टी करतो की, कोव्हिडमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अनेक अवयवांमध्ये बदल दिसून येतात.
“हे का घडते, तसंच दीर्घ कोव्हिडच्या चाचण्या आणि नवीन उपचार कसे विकसित करू शकतो, हे समजण्यासाठी आता फॉस्प-कोव्हिड अभ्यासगट काम करतंय”
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








