विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर आणि शिक्षकांनी नक्की कोणाला धडा शिकवला?

देवेंद्र उद्धव

फोटो स्रोत, FACEBOOK

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर झालेल्या दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारसंघांसाठी अशा एकूण पाच विधानपरिषदेच्या जागांसाठीची निवडणूक महत्वाची मानली गेली होती. वास्तविक या जागा निवडक आणि मर्यादित मतदारांच्या असतात, पण तरीही या शिक्षित मतदारांमध्ये असलेला कल समजणं सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही गरजेचं होतं.

त्यामुळे गुरुवारी आलेला निकाल हा निसटत्या फरकानं महाविकास आघाडीच्या बाजूनं असला तरीही राज्यातली राजकीय परिस्थिती एकांगी आहे असं म्हणता येणार नाही.

नाशिकच्या जागेवर झालेल्या गोंधळानंतर नागपूरच्या जागेसाठीही महाविकास आघाडीमध्ये गोंधळ झाला. ऐनवेळेस उमेदवार शोधणं, बदलणं असं झालं. त्यानंतर महाविकास आघाडीचं काही खरं नाही अशी चर्चा असतांना त्यांनी 2 जागा पदरात पाडणं हे महत्वाचं आहे.

भाजपा विरोधकांच्या गोटात घुसून डावपेच करतं आहे आणि सरकारमध्ये परत आल्याचा त्यांना फायदा होईल असं दिसत असतांना त्यांना स्वत:च्या होम पिचवर, म्हणजे नागपूरमध्येच, शिक्षक मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला आहे.

पण तरीही हा निकाल एकतर्फी म्हणता येणार नाही. या निकालानं दोन्ही बाजूंना काही गोष्टी उघड करुन दाखवल्या आहेत. जमेच्या आणि चिंतेच्या.

भाजपासाठी 'कभी खुशी गभी गम'

भाजपानं या निवडणुकीतल्या पाचही जागा लढवल्या. काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर उमेदवार होते तर काही ठिकाणी पुरस्कृत उमेदवार होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नव्यानं प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी घेतलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुकीची जबाबदारी घेतली होती. पण तरीही अपेक्षेसारखं यश भाजपाला मिळालं नाही.

नागपुरात गेल्या का

भाजपाच्या वाट्याला आलेला सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे नागपूर शिक्षण मतदारसंघाचा. तिथे असलेले उमेदवार नागो गाणार यांना 'महाविकास आघाडी'तर्फे उभे असलेले कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पराभूत केलं.

खुद्द देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावvकुळे यांच्याच नागपुरात झालेला भाजपाचा पराभव हा चिंता करण्यासारखाच आहे.

बावनकुळे यांनी जरी माध्यमांशी बोलतांना आत्मचिंतन करण्याइतके निकाल गंभीर नसल्याचं म्हटलं असलं तरीही नागपूरचा विचार भाजपाला करावा लागेल.

नागपुरात गेल्या का

नागपुरात गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाला सातत्यानं अपयश आलं आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही कॉंग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी भाजपाच्या संदीप जोशी यांचा पराभव केला होता. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही कॉंग्रेसची सरशी झाली होती.

त्यानंतर आता शिक्षण मतदारसंघामध्येही पराभव वाट्याला आल्यानंतर चिंता करणं स्वाभाविक आहे. नागपूर हा भाजपाचा गड आहे आणि मुख्य म्हणजे ते रा.स्व.संघाचं मुख्यालयही आहे.

हे शहर फडणवीस आणि गडकरी या महाराष्ट्र भाजपाच्या सर्वात महत्वाच्या दोन नेत्यांचं आहे. तिथं आले पराभवाची चर्चा अधिक होणार.

देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावबकुळे यांच्याच नागपुरात झालेला भाजपाचा पराभव हा चिंता करण्यासारखाच आहे.

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावबकुळे यांच्याच नागपुरात झालेला भाजपाचा पराभव हा चिंता करण्यासारखाच आहे.

दोन ठिकाणी भाजपाला आनंदाच्या बातम्या आहेत. कोकण शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजय मिळाला आहे. इथे त्यांना शिवसेनेच्या शिंदे गटाचेही बळ होते.

भाजपा आणि शिंदे गटाचे अनेक आमदार आणि मंत्री ही ताकद होती. त्यामुळे शिंदे गटासोबत काही विजय मिळवता येतात हे तुलनेनं नव्याच असलेल्या युतीमध्ये दोन्ही पक्षांना समजले असेल.

दुसरीकडे नाशिकमध्ये शेवटपर्यंत स्वत:चा उमेदवार न दिलेल्या भाजपाला सत्यजित तांबेंना अंतिम टप्प्यात पाठिंबा देणं भाजपाला फायद्याचं ठरलं आहे.

तांबेंनी जरी अद्याप पुढचा राजकीय निर्णय घेतला नसला तरीही आपल्याला नवा मित्र मिळाला ही भाजपाची या निवडणुकीनिमित्तानं जमेची बाजू आहे. ती तांबेंच्याच नव्हे तर भाजपाच्या राजकारणावरही परिणाम करणारी आहे.

तांबेंचा विजय आणि कॉंग्रेसचा आनंद-दु:खाचा खेळ

बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अखेरीस सत्यजित तांबेंनी जिंकली.

सत्यजित यांनी आपली राजकीय वाट त्यांची मुळं असलेल्या कॉंग्रेस पक्षापासून वेगळी का केली हा प्रश्न पक्षांतर्गत अतिमहत्वाचा आहे. सत्यजित तांबे आणि कुटुंबीय यांची बाजू वेगळी आणि कॉंग्रेसची बाजू वेगळी आहे.

पक्षानं तांबे पिता-पुत्रांचं निलंबन केलं आहे. बाळासाहेब थोरात अजूनही या विषयावर बोलले नाही आहेत. त्यामुळे हा कुटुंबातला वाद होता की पक्षातला हे अद्याप स्पष्ट नाही. पण हातचा तरुण आमदार पक्षापासून लांब गेला आहे हे मात्र सत्य आहे.

बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अखेरीस सत्यजित तांबेंनी जिंकली.

फोटो स्रोत, twitter

फोटो कॅप्शन, बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अखेरीस सत्यजित तांबेंनी जिंकली.

नागपूरचा विजय कॉंग्रेससाठी आशादायी आहे यात शंका नाही. शिवाय विदर्भातून राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' गेल्यानंतर मिळालेला हा विजय आहे.

अगोदर तांबे प्रकरणावरुन फियास्को झालेला असतांना ऐनवेळेस उमेदवार देऊन निवडून आणण्याचं काम कॉंग्रेसनं केलं आहे. पण त्यातच कॉंग्रेस पक्षांतर्गत एक फरक स्पष्ट होतो.

तांबे प्रकरणामध्ये कॉंग्रेसच्या मातब्बर जुन्या नेत्यांचे अंतर्गत हेवेदावे असल्यानंच उमेदवारीपासून चौकशीपर्यंत सगळं चिघळत गेलं असं म्हटलं जातं. पण तिकडे नागपूरमध्ये सुनील केदार आणि तुललेनं तरुण इतर नेत्यांनी एकत्र काम केल्यावर विजय खेचून आणता येऊ शकतं हेही दिसलं.

नव्या दम्याच्या नेत्यांना मोठ्या जबाबदा-या देण्यास पक्ष आता पश्चिम, उत्तर महाराष्ट्रासारख्या इतर भागांमध्येही तयार होईल का या प्रश्नाचा खल पक्षांतर्गत होण्याची आवश्यकता दिसते आहे.

'महाविकास आघाडी'ला कधी 'सेम पेज'वर येणार?

जरी निसटती बाजी महाविकास आघाडीनं मारली असली तरीही तीन वर्षांनंतर अजूनही त्यांच्यात एका राजकीय युतीत व्हावं लागतं तसं एकत्र मिसळणं झालं नाही आहे हे पुन्हा स्पष्ट झालं आहे. निर्णयप्रक्रियेत अजूनही भेगा आहेत. त्यामुळेच उमेदवारीमध्ये गोंधळ उडाला.

कोकणात सेना, राष्ट्रवादी आणि शेकाप यांची ताकद असतांना मोठ्या फरकानं पराभव स्वीकारावा लागला. एकत्र असण्याच्या विजयाच्या जागांवर किती आणि कसा फायदा झाला हेही गणित मांडावं लागेल. पण येणा-या मुंबई आणि तर महानगरपालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांकडे पाहता 'आघाडी'तल्या मित्रांना लवकरच एकवाक्यता करुन 'सेम पेज'वर यावं लागेल.

भाजपाला शिंदे गटाचा या निवडणुकीत किती फायदा झाला?

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भाजपाला शिंदे गटाचा या निवडणुकीत किती फायदा झाला?

हाच धडा भाजपा आणि शिंदे गटासाठीही असू शकतो. एकत्र येण्याचा त्यांना किती फायदा मतदारांच्या संख्येनं कमी असल्या तरीही या निवडणुकांच्या गणिताचा करावा लागेल. तो फायदा झाला आहे किंवा नाही यावर या मैत्रीचं भविष्यही अवलंबून असेल.