You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
2025 मध्ये सोशल मीडियावर 'या' गोष्टी झाल्या व्हायरल, जाणून घ्या सरत्या वर्षातले ट्रेंड्स
- Author, अनिता सचदेव
- Role, प्रतिनिधी, दिल्ली
लाइट्स… कॅमेरा… आणि व्हायरल!
या वर्षी भारतासाठी व्हायरल होणं म्हणजे जणू बॉक्स ऑफिस हिट ठरणं!
राजेशाही सोहळ्यात अचानक घुमलेली बॉलिवूडची चाल असो किंवा सामन्यानंतरच्या एका वाक्याने पेटलेली सोशल मीडियावरील चर्चा हे सगळे क्षण काही सेकंदांत देशभर पोहोचले. नियोजनाविना घडलेले, पण परिणामाने ब्लॉकबस्टर ठरलेले हे व्हायरल मोमेंट्स 2025 मध्ये भारताच्या टाइमलाइनचे खरे स्टार बनले.
2025 मध्ये कोणत्या गोष्टींमुळे लोक सुखावले आणि कशामुळे संतापले, हे जर तुम्ही विसरला असाल, तर ही एक आठवण. या वर्षातील अशा घटनांचा आढावा ज्यांनी देशाला विचार करायला भाग पाडले, हसवले किंवा आश्चर्याने थक्क केले.
शाहरुख खानचा पहिला 'मेट गाला'
मे महिन्यात बॉलीवूड स्टार शाहरुख खान त्याच्या पहिल्या मेट गालाला उपस्थित राहिला आणि त्याच्या रेड कार्पेटवरील चालण्याचे व्हीडिओ जगभरातील चाहत्यांनी डोक्यावर घेतले.
फॅशनच्या दुनियेतील महत्त्वाचा इव्हेंट असलेल्या गालाची या वर्षीची थीम 'सुपरफाईन टेलरिंग ब्लॅक स्टाइल' अशी होती, जी पूर्णपणे पुरुषांच्या फॅशनवर आधारित होती.
शाहरुख भारतीय डिझाइनर सब्यसाची मुखर्जी यांनी तयार केलेल्या कपड्यांमध्ये रेड कार्पेटवर अवतरला आणि सोबत त्याची स्टायलिश छडी, भरपूर आभूषणं आणि डोळ्यावर सनग्लासेस होते.
जगातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असलेला SRK याआधी मेट गालाला का गेला नाही, असा प्रश्न सोशल मीडियावर अनेकांनी विचारला पण 'उशिरा का होईना, तो तिथे पोहोचला' हेच चाहत्यांसाठी महत्त्वाचे होते.
किंग चार्ल्स यांचे स्वागत बॉलीवूडच्या गाण्याने
वेस्टमिन्स्टर अॅबी येथील 'कॉमनवेल्थ डे सर्व्हिस'मध्ये तुम्हाला अनेक गाणी ऐकायला मिळतील, पण त्यात बॉलीवूडचे गाणे असेल असे कोणालाच वाटले नसेल.
म्हणूनच जेव्हा मार्चमध्ये एका पाईप बँडने राजघराण्यातील सदस्यांच्या स्वागतासाठी 'धूम मचाले' हे गाणे वाजवले तेव्हा तो व्हीडिओ भारतात सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला. ही धून संगीतकार प्रितमने 2004 च्या 'धूम' या सुपरहिट चित्रपटासाठी तयार केले होती.
हे गाणे वाजवणारा 'श्री मुक्तजीवन स्वामीबापा पाईप बँड' स्वतःला एक "आंतरराष्ट्रीय भारतीय पाईप बँड" म्हणवतो. या बँड स्कॉटिश पेहरावात भारतीय आणि स्कॉटिश संगीताचे फ्युजन सादर करतो. त्यांनी इतरही काही लोकप्रिय हिंदी गाण्यांच्या धून वाजवल्या.
कॉमनवेल्थ डे हा 56 सदस्य राष्ट्रांमधील विविधता, एकता आणि सामायिक मूल्ये साजरी करण्यासाठी आयोजित केला जाणारा एक कार्यक्रम आहे.
जेव्हा भारतीय महिलांनी वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला
नोव्हेंबरमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आपला पहिला महिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास घडवला.
जेव्हा दीप्ती शर्माने नादिन डी क्लर्कची विकेट घेतली आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने शेवटचा झेल पकडला, तेव्हा मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर जो जल्लोष झाला, तो लगेचच देशभरात पसरला.
आनंदाने लोक रस्त्यावर उतरले आणि फटाक्यांचा आवाज रात्री उशिरापर्यंत येत होता.
क्रिकेटवेड्या देशासाठी, जिथे महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने उभे राहावे अशी खूप दिवसांपासून वाट पहावी लागली, हा विजय एका नव्या युगाची सुरुवात वाटत होती.
आयसीसीने शेअर केलेल्या या क्षणाच्या व्हिडिओला एकट्या इंस्टाग्रामवर जवळजवळ 90 मिलियन व्ह्यूज आणि 3 मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
पहिल्यांदाच एका भारतीयाचे ISSमध्ये पाऊल
जूनमध्ये अंतराळवीर शुभांशू शुक्ला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर (ISS) पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरले.
नासाच्या फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवरून जेव्हा त्यांनी 'अॅक्सिओम मिशन 4' (Ax-4) चे पायलट म्हणून उड्डाण केले, तेव्हा जगभरातील हजारो लोकांनी ते पाहिले. शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये कॅमेरा लेन्स कशी बदलायची, याबद्दल त्यांनी शेअर केलेला एक व्हीडिओ 25 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला.
ग्रुप कॅप्टन शुक्ला हे नासाच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नेतृत्वाखालील बहु-देशीय क्रूचा भाग होते, ज्यामध्ये पोलंडचे स्लॉवोश उझनान्स्की-विस्निव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचा समावेश होता.
भारतात त्यांची ही अंतराळ सफर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या गावी त्यांचे पोस्टर्स लावले गेले आणि परतल्यावर त्यांचे भव्य मिरवणुकीने स्वागत करण्यात आले.
ग्रुप कॅप्टन शुक्ला हे अंतराळात जाणारे केवळ दुसरे भारतीय आहेत.
1984 मध्ये कॉस्मोनॉट राकेश शर्मा रशियन सोयुझमधून गेल्यानंतर 41 वर्षांनी ही सफर झाली. त्यांच्या या प्रवासाने भारताच्या अंतराळ संशोधनातील महत्त्वाकांक्षेला एक मोठी दिशा दिली.
"अंतराळातून आजचा भारत महत्त्वाकांक्षी दिसतो. तो निर्भय, आत्मविश्वासी आणि अभिमानी दिसतो," असे त्यांनी ISS वरून देशाला संबोधित करताना सांगितले.
गुकेशकडून पराभव, मॅग्नस कार्लसनची टेबलावर मारलेली थाप
भारतीय तरुण गुकेश डोम्माराजू हा बुद्धिबळ विश्वातील चमकता तारा आहे. विशेषतः गेल्या वर्षी तो सर्वात तरुण जागतिक विजेता बनल्यानंतर.
परंतु, त्याच्या अविस्मरणीय वर्षातील एक क्षण जगभरात व्हायरल झाला.
जूनमध्ये, नॉर्वे चेस 2025 स्पर्धेत खेळताना त्याने जगातील नंबर वन बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनचा पराभव केला.
खेळ संपताच कार्लसनने अचानक संताप व्यक्त केला, त्याने टेबलावर जोरात मूठ मारली आणि गुकेशशी घाईघाईने हस्तांदोलन करून तो तिथून निघून गेला.
बुद्धिबळात सहसा दिसणाऱ्या शांत स्वभावाच्या विपरीत अशी ही कार्लसनची रागीट प्रतिक्रिया इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली.
या क्षणाचे व्हीडिओ तर व्हायरल झालेच, पण त्यावरून एक मजेशीर ट्रेंडही सुरू झाला. लोकांनी या घटनेचे रिक्रिएशन वेगवेगळ्या संदर्भात केली.उदाहरणार्थ, दूध तापवण्यावरून आई आणि मुलीमध्ये झालेले भांडण किंवा दोन मित्रांमधील सापशिडीचा खेळ.
सामन्यानंतरच्या मुलाखतीत कार्लसनने गुकेशच्या चिकाटीचे कौतुक केले, पण जर सगळं नेहमीसारखं असतं, तर तो हा सामना जिंकला असता. पण त्या दिवशी परिस्थिती किंवा खेळाची घडी वेगळी होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)