हँडशेक वाद : ICC चे मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानी टीमची मागितली माफी

ICC चे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ICC चे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट

ICC चे मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांनी अखेर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकांची आणि कर्णधाराची माफी मागितली आहे. आयसीसीने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीय.

अँडी पायक्रॉफ्ट यांनी भारत आणि पाकिस्तानच्या कर्णधारांना त्यांच्या सामन्यादरम्यान हस्तांदोलन करण्यापासून रोखलं, असा आरोप होता. त्यांच्या कृतीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं तीव्र प्रतिक्रिया दिली होती.

अँडी पायक्रॉफ्ट यांनी 14 सप्टेंबरला घडलेल्या घटनेला चुकीच्या संवादाचे परिणाम म्हणत माफी मागितली.

पायक्रॉफ्ट यांच्याबाबत पाकिस्तानने आयसीसीकडे तक्रार केली होती. तसंच, मॅच रेफ्रींना न हटवल्यास यूएईविरोधातील सामना खेळणार नाही.

'हँडशेक'वरून वाद

आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 'हँडशेक'मुळे वादाचं केंद्र ठरलाय.

सामन्यानंतर हात न मिळवण्याबाबत विचारलं असता, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये एका ओळीत थेट आणि साधं उत्तर दिलं.

सूर्यकुमार म्हणाला, "भारत सरकार, बीसीसीआय आणि आमचं याबाबत एकच मत होतं. आम्ही इथे आलो आणि एक निर्णय घेतला होता. माझ्या मते आम्ही इथे फक्त खेळायला आलो होतो आणि मैदानात त्यांना चांगलं उत्तर दिलं आहे."

आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यापेक्षा जास्त चर्चा नाणेफेकीवेळी आणि सूर्यकुमार यादवच्या विजयी शॉटनंतर घडलेल्या गोष्टींची होत आहे.

दुबईतील सामन्यावेळी पाकिस्तानची टीम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुबईतील सामन्यावेळी पाकिस्तानची टीम

सामना संपल्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू पुढे आले, पण तोपर्यंत भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले होते. नाणेफेकीच्या वेळीही सूर्यकुमार आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांच्यात कोणताही औपचारिक 'हँडशेक' झाला नव्हता.

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेला पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा नव्हे, तर प्रशिक्षक माइक हेसन आले होते. तेव्हा ते म्हणाले की, "आम्ही सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करायला तयार होतो, परंतु, विरोधी टीमने तसं केलं नाही यामुळे आम्ही निराश झालो."

हेसन म्हणाले, "आम्ही हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आलो होतो, पण तोपर्यंत भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले होते. सामना निराशाजनक पद्धतीने संपला. आमच्या खेळामुळे आम्ही आधीच नाराज झालो होतो, पण एकमेकांना हस्तांदोलन करण्यासाठी आम्ही तयार होतो."

'हँडशेक वादा'नंतर पाकिस्तानच्या निशाण्यावर रेफ्री

हा वाद पुढे नेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आता मॅच रेफ्रींविरोधात (सामनाधिकारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) तक्रार केली आहे.

पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी 'एक्स'वर लिहिलं की, 'मॅच रेफ्रींनी आयसीसी कोड ऑफ कंडक्ट आणि 'स्पिरिट ऑफ क्रिकेट'शी संबंधित एमसीसी नियमांचं उल्लंघन केलं आहे. याबाबत पीसीबीने आयसीसीकडे तक्रार केली आहे.'

नक्वी यांनी पुढे लिहिलं की, 'माझ्यासाठी आमच्या देशाच्या सन्मानापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही.'

पाकिस्तानचा आरोप आहे की, मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांनी नाणेफेकीवेळी दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन न करण्यास सांगितलं होतं. पण 'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार भारतीय संघातील सूत्रांनी सांगितलं की, रेफ्रीकडून असे कोणतेही निर्देश देण्यात आले नव्हते.

Photo Caption- दुबईमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याच्या नाणेफेकीच्यावेळी दोन्ही कर्णधार आणि मॅच रेफ्री उपस्थित होते.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, दुबईमध्ये भारत-पाकिस्तान सामन्याच्या नाणेफेकीच्यावेळी दोन्ही कर्णधार आणि मॅच रेफ्री उपस्थित होते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नाणेफेकीवेळी दोन्ही कर्णधार हात मिळवतात आणि सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांशी 'हँडशेक' करतात, ही जुनी परंपरा आहे. कोरोनाच्या काळात काही काळासाठी ती थांबवली होती, पण त्यानंतर ही प्रथा सुरूच आहे.

'काही गोष्टी या खेळभावनेपेक्षाही मोठ्या असतात,' असं हँडशेक न करण्याबद्दल विचारलं असता भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव सामन्यानंतर म्हणाला.

दरम्यान, बीसीसीआयनेही स्पष्ट केलं की, भारतीय कर्णधार किंवा संघाने हस्तांदोलन न करून कोणताही नियम तोडलेला नाही.

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, सामना संपल्यानंतर हात मिळवणं हा फक्त एक 'गुडविल जेश्चर' असतो.

त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'रूल बुकमध्ये विरोधी टीमशी हात मिळवण्याबद्दल कुठेही स्पष्ट नियम नाही. हे जगभर दिसणारं एक 'गुडविल जेश्चर' आहे, परंपरेसारखं आहे, पण हा काही कायदा नाही.'

ते पुढे म्हणाले, 'जर याबाबत कुठला कायदा नाही, तर भारतीय टीमवर हस्तांदोलन करण्याचे बंधन नाही. विशेषतः अशा संघासोबत, ज्यांच्याशी आधीपासूनच तणावपूर्ण संबंधांचा इतिहास आहे.'

'एमसीसीचे नियम काय सांगतात?

क्रिकेट कोणत्याही देशात खेळला जात असला, कोणताही देश जरी खेळत असला तरी तो काही नियमांनुसार खेळला जातो, आणि हे नियम एमसीसी ठरवते. एमसीसी म्हणजे मेरिलीबोन क्रिकेट क्लब.

याला जगातील सर्वात सक्रिय क्रिकेट क्लब, लॉर्ड्स मैदानाचा प्रमुख आणि क्रिकेटच्या नियमांचा रक्षक म्हणून ओळखलं जातं.

त्यांची वेबसाइट तपासल्यानंतर हँडशेक किंवा हस्तांदोलनबाबत कोणताही नियम दिसत नाही, पण त्याच्या प्रीएम्बलमध्ये (प्रस्तावना) 'द लॉ' हा एक भाग आहे आणि त्याखाली काही महत्त्वाचे नियम दिले आहेत-

  • सन्मान, आदर हा क्रिकेटच्या भावनेचा केंद्रबिंदू आहे.
  • आपला कर्णधार, विरोधी टीम आणि पंचांच्या अधिकारांचा सन्मान करा.
  • भरपूर खेळा आणि निःपक्षपातीपणे खेळा
  • आपल्या वर्तनाने सकारात्मक वातावरण तयार करा आणि इतरांनाही तसं करण्यासाठी प्रोत्साहित करा.
  • शिस्त पाळा, जरी परिस्थिती आपल्या बाजूने नसेल तरी.
  • विरोधी संघ जिंकला तर त्यांचं अभिनंदन करा, आणि आपल्या संघ जिंकला तर आनंद साजरा करा.
  • सामना संपल्यानंतर निकाल काहीही लागला तरी, अधिकारी आणि विरोधी संघाचे आभार मानावेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)