तलाठी परीक्षेत गैरकारभाराचे आरोप, विद्यार्थी म्हणतात, ‘...तर येत्या निवडणुकीवर पडसाद’

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, पुणे
तलाठी भरती परीक्षेत पेपरफुटीचे आरोप होत असताना आणि या प्रकरणी काही ठिकाणी एफआयआर दाखल असताना परीक्षेचा निकाल का लावला गेला असा सवाल विचारत परीक्षार्थींनी निकालावर आक्षेप घेतला आहे.
या निकालात गैरकारभार झाला असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी विरोधक चौकशीची मागणी करत असतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी पुरावे सादर करावेत. पुरावे असतील तर आम्ही परीक्षा रद्द करुन असं म्हटलंय.
33 वर्षांच्या निलेश गायकवाडने यंदा दुसऱ्यांदा तलाठी भरतीची परीक्षा दिली. या परीक्षेत त्याला 200 पैक 160 हून जास्त मार्क मिळाले.
पण त्यानंतरही त्याला नोकरी लागायची शक्यता नाही. कारण यंदाचा कट ऑफ जवळपास 190च्या आसपास आहे. तर यात 48 विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त मार्क पडले आहेत.
सरकारी नोकरभरतीसाठी निलेश गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत जवळपास 75 परीक्षांना तो बसला आहे.
खरंतर 2019 मध्ये झालेल्या तलाठी परीक्षेतच तो पात्र ठरल्याचा त्याचा दावा आहे. पण तेव्हा नियु्क्तीचा आदेश निघाला नाही. आणि त्यानंतर सरकारने तो क्लाविफाय झाल्याचे मान्य केल्यानंतर प्रकरण कोर्टात गेल्यामुळे त्याला अजूनही नियुक्ती मिळाली नाही.
यंदाची परीक्षा देण्यामागे त्याचं हे महत्त्वाचं कारण होतं. पण यंदा परीक्षेत गैरप्रकार झाल्यामुळे यंदाही संधी गेल्याचं त्याचं म्हणणं आहे.
निलेश स्पर्धा परीक्षा समन्वय समितीसाठी काम करतो. या समितीच्या सदस्यांनी आतापर्यंत अनेक परीक्षांमध्ये गैरप्रकार उघडकिला आणले आहेत.
आरोग्यभरती, म्हाडापासून पेपरफुटीचे प्रकार उघड होणं सुरु झालं. पण तलाठी भरतीत गैरप्रकार झाले तरी सरकारने निकाल लावल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना निलेश म्हणाला, “पहिल्याच दिवशी पेपर फुटला होता. तलाठी भरती प्रकरणी नाशिकमध्ये पेपरफुटी झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्या विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये 186 फोटो सापडले होते. इतर ठिकाणं धरून अनेक ठिकाणी एफआयआर सुद्धा दाखल झाल्या होत्या.
नागपूरवरुन हे पेपर पुरवले गेल्याचं उघडकीला आलं होतं. पण तरीही त्याची चौकशी न होता निकाल लागला. जेव्हा हे पेपरफुटीचं उघड झालं तेव्हा आम्ही महसूल विभागात निवेदन देत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. पण तिथे कोणीच आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आम्हाला हाकलून दिलं. त्यावेळी उपाययोजना केल्या असत्या तर आता ही परिस्थिती आली नसती.”
याच परीक्षेला बसलेल्या आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समिती सोबत काम करणारा महेश घरबुडे गेले काही वर्षं स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. तलाठी भरतीची परीक्षा मात्र त्याने पहिल्यांदाच दिली होती.
त्याला देखील पात्र होण्याची कोणतीही आशा दिसत नाही.
महेश म्हणतो, “देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहात. तुमच्या होम ग्राऊंडवर पेपर फुटलेला आहे. असं असताना आणि पोलिसांनी अहवाल दिलेला असताना तुम्ही म्हणताय की पेपर कुठे फुटलाच नाही हे दुर्दैव आहे. तुम्ही गृहमंत्री आहात पोलिसांकडून अहवाल घ्या.”

फोटो स्रोत, GANESH WASALWAR
विद्यार्थ्यांनी आता थेट परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली आहे. या परीक्षेला पहिल्यांदाच बसलेला रमेश पाटील म्हणाला,
“संबंधित खात्याने जर मान्य केलं असेल की गोंधळ झालेला आहे आणि पारदर्शकता नाहीये तर महसूल विभाग आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ झालेली जबाबदारी स्वीकारून परीक्षा रद्द करावी आणि परिक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी अशी उमेदवार म्हणून मागणी आहे.”
“तुम्ही आता विद्यार्थ्यांची परीक्षा किंवा संयम पाहू नका. विद्यार्थी आता काही विरोध करणार नाही. पण माझ्यामते 10 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे. त्यातल्या साडेआठ लाख मुलांनी परीक्षा दिली आहे. त्यानुसार एका कुटुंबातला एक विद्यार्थी पकडला तर घरटी 5 मतदार होतात. जर सरकारने याचा गंभीर्यानं विचार केला नाही तर त्याचे पडसाद येत्या निवडणुकीत पडतील याची मला खात्री आहे,” असं तो पुढे म्हणतो.
नेमका आक्षेप काय?
राज्यभरातून तलाठी भरतीसाठी जवळपास साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यापैकी दहा लाख 41 हजार छाननी नंतर ग्राह्य धरले गेले.
एकूण 57 सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली. साडेदहा लाख विद्यार्थ्यापैकी 8 लाख 63 हजार विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. साडेआठ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या तलाठी भरतीच्या जागा होत्या 4,466.
या पार्श्वभूमीवर तलाठी भरती प्रकरणी उमेदवारांनी प्रामुख्याने 3 आक्षेप घेतले आहेत.
यातला पहिला आक्षेप आहे तो म्हणजे या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे उघड झालं होतं. असं असताना देखील चौकशी पूर्ण होण्याचा आधी पेपरफुटी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी घेतलेला दुसरा आक्षेप आहे तो म्हणजे इतर सरकारी परीक्षांमध्ये अगदी कमी गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत क्वालिफायिंगपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
तिसरा आक्षेप आहे तो परीक्षेत रफ शीटद्वारे केंद्र मालक उत्तरं पुरवत असल्याचा. परीक्षेदरम्यान कच्चं काम करण्यासाठी दिल्या गेलेल्या कागदावर उत्तरे पुरवली गेल्याचा दावा हे उमेदवार करत आहेत.
वस्तुस्थिती काय
ही परीक्षा झाली तेव्हा अनेक केंद्रावर गैरप्रकार होत असल्याचे आरोप झाले होते.
यावरून नाशिक, श्रीगोंदा, छत्रपती संभाजीनगर, सांगली अशा वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.
17 सप्टेंबरला नाशिकमध्ये करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये पोलीस हवालदार जो या प्रकरणात तक्रारदार आहे त्याच्या जबाबात उल्लेख आहे की नाशिक मधल्या वेब इन्फोटेक सोल्युशन्समध्ये तलाठी भरतीची परीक्षा सुरु असताना काही अंतरावरुन ऑनलाईन कॉपी पुरवली जात होती.
यासाठी वॉकीटॉकी आणि इतर तांत्रिक डिव्हाईसचा वापर केला जात होता. केंद्रापासून जवळ पकडलेल्या एका 25 वर्षांच्या तरुणाकडे मोबाईल गॅलरीत फोटो आढळले ज्यात तलाठी भरतीच्या वस्तुनिष्ठ प्रश्नाचे फोटो होते.
श्रीगोंदा केंद्रावर झालेल्या एफआयआरमध्ये तहसीलदार हेमंत ढोकले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या केंद्रावर विद्यार्थी थेट पुस्तक घेऊन पेपर सोडवत होता. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई करत पोलिस तक्रार दाखल केली.
संभाजीनगर मधल्या एफआयआरमध्ये पुन्हा परीक्षा केंद्राबाहेर एका माणसाकडे मोबाईलवर परीक्षेचा पेपर सापडल्याचा आरोप आहे. यात एकूण 34 प्रश्न पाठवण्यात आले होते. आणि मोबाईल वरून त्याची उत्तरं दिली जात होती.
तर सांगलीमधल्या परीक्षेच्या वेळी एका विद्यार्थ्याकडे सापडलेल्या डिव्हाईसद्वारे प्रश्न पत्रिका पाठवून तो कॅापी करण्याचा प्रयत्न करत होता असा उल्लेख एफआयआर मध्ये आहे.
या सगळ्या प्रकरणांमध्ये अद्याप कोर्टात चार्जशीट दाखल झाली नसल्याचा उमेदवारांचा दावा आहे. तर संभाजीनगरमध्ये चार्जशीट दाखल झाले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणातील आरोपी अद्याप कैदेतच असल्याचंही त्यांनी सांगितलं. तर इतर ठिकाणी मात्र पोलिसांकडून काही प्रतिसाद देण्यात आला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
नागपूरमधून हे पेपर सर्क्युलेट झाल्याचा आरोप होतो आहे. हे पेपर किती आणि कोणापर्यंत पोहोचले होते याची माहिती नाही. तसंच पेपरचा उपयोग कोणी आणि कसा केला असेल याची गॅरेंटी नसल्याचं देखील उमेदवारांचं म्हणणं आहे. त्यामुळेच परीक्षा रद्द करण्याची मागणी उमेदवार करत आहेत.
याबरोबरच दुसऱ्या आक्षेपानुसार अनेक विद्यार्थ्यांना 200 हून अधिक मार्क मिळाले आहेत. यातल्या काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी दिलेल्या सरकारी परीक्षेत मात्र ते 50 मार्कही पाडू शकले नाहीत असा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समिती तर्फे करण्यात आला आहे.
राजकीय आरोप प्रत्यारोप
यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी तलाठी भरतीची यादी ट्वीट करत तलाठी भरती मध्ये 200 पैकी 214 मार्क कसे मिळाले असा सवाल विचारत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केलीय.
राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी ट्वीट करत म्हटलं की, "याबाबत किती एफआयआर झाल्या आणि त्यावर काय कारवाई झाली याची माहिती गृह मंत्रालयाने घ्यावी. पावसाळी अधिवेशनात हा विषय मांडला असताना पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरची कॉपी देऊनही आपण हक्कभंगाची भाषा केली होती. दोषींवर कारवाई करून वर्षानुवर्षे कष्ट करणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय द्यावा."
याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर आम्ही चौकशी करु. नुसत्या विधानाने चौकशी करता येत नाही. आम्ही महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेतल्या.
पारदर्शक पद्धतीने आम्ही पूर्णपणे सगळ्या परीक्षा घेतल्या आहेत. पण कुठल्याही परीक्षेत कोणीही पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल. त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावे.”
सरकारचे स्पष्टीकरण
महसूल विभागाने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'या परीक्षेत विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीतर्फे तीन वेळा शंका समाधान प्रक्रिया पार पाडण्यात आली. 4 जानेवारीला ही प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल जाहीर झाला. या परीक्षेत 57 सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे 57 प्रश्न पत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
त्यानंतर ती महाभूमी या वेबसाईटवर प्रसिद्ध देखील करण्यात आली. सामान्यीकरण केलेल्या गुणांनुसार हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. काठिण्य पातळी नुसार गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात.
तलाठी भरती परीक्षेत एकूण 47 उमेदवारांना 200 पेक्षा दास्त गुण मिळाले आहे. सदर परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली असून जेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी परीक्षा देत असतात आणि त्यामुळे सत्र संख्या अधिक असते त्या वळी सामान्यीकरण प्रक्रिया करणे भाग पडते.
कारण वेगवेगळ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सत्रात घेतलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी विचारात घेता उमेदवारांवर अन्याय न करता सर्व उमेदवारांना एकच मोजमाप लावण्यासाठीची ही वैज्ञानिक प्रक्रिया आहे. गुण सामान्यीकरणाची ही कार्यपद्धती सर्व प्रकारच्या मोठ्या परीक्षांमध्ये वापरली जाते.'
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








