पंकजा मुंडे : 'एकवेळ ऊसतोड करायला जाईन, पण निष्ठा गहाण टाकणार नाही'

FACEBOOK/PANKAJA MUNDE

फोटो स्रोत, FACEBOOK/PANKAJA MUNDE

"शिवशक्ती परिक्रमा केली तेव्हा एवढं भव्य स्वागत होईल असं वाटलं नव्हतं. माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा दोन दिवसांत अकरा कोटी रुपयांचे चेक जमा केले.

तुम्ही उन्हात बसले म्हणून स्टेजवरच्या सर्वांना उन्हात ठेवलं आणि मीही उन्हात आहे. एकवेळ मला काही देऊ नका पण माझ्या माणसांना सत्तेपासून आणि हक्कापासून दूर ठेवता येणार नाही."

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवानगडावरून दसरा मेळाव्यात बोलताना हे विधान केलं.

भगवान भक्ती गडावर भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केलं.

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा दरवर्षी दसऱ्याला भगवान गडावर मेळावा होत असे. त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांचं जन्मगाव असलेल्या सावरगाव इथं भगवान भक्ती गडाची स्थापना करून त्याठिकाणी ही परंपरा सुरू ठेवली.

आपल्या भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या," नाजाने कैसे परखता है मुझे मेरा उपरवाला, इम्तेहान भी सख्त लेता है, पर हारने नही देता...पराभव म्हणजे खुर्चीतून पडले असेन, पण माझ्या लोकांच्या नजरेतून पडले नाही..."

"देशात सगळं आलबेल असेल तर तुम्ही का आलात. शेतकरी खरंच आनंदात आहेत का? शेतमजुरी करणाऱ्यांना शेतात काम आहे का? त्यांना मजुरी द्यायला शेतकऱ्यांकडे दाम आहे का? अशी सध्या शेतकऱ्यांची स्थिती असल्याचे म्हटले. पैसे वाढवून दिल्याशिवाय ऊसतोड मजूर ऊसतोडीला जाणार नाही," असं पंकजा यांनी म्हटलं.

सभेत आवाजाचा प्रॉब्लेम झाला तर माझा आवाज कोणी दाबला असा चिमटा त्यांनी काढला.

FACEBOOK/PANKAJA MUNDE

फोटो स्रोत, FACEBOOK/PANKAJA MUNDE

पंकजा मुंडे हेलिकॉप्टरद्वारे भगवान भक्तीगड याठिकाणी दाखल झाल्या. सावरगाव येथील तरुण कार्यकर्त्यांनी जेसीबीमधून पंकजा मुंडेवर पुष्पवृष्टी केली. भगवान बाबांच्या ध्यान मंदिरात पंकजा मुंडेंच्या हस्ते पुजा आणि आरती करण्यात आली. भगवान भक्तीगड ट्रस्टच्या वतीने साडी-चोळी आणि त्रिशूळ देऊन स्वागत करण्यात आलं.

मी फक्त आणि फक्त स्वाभिमान देऊ शकते- पंकजा मुंडे

"महाराष्ट्रात अनेक गंभीर प्रश्न आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत असताना, सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. परिक्रमेसाठी महाराष्ट्रात गेले तेव्हा कोणतेही पद नसताना प्रचंड प्रेम दिलं. मला वाटायचं मी लोकांना काय देणार? तेव्हा मला कळलं की, मी फक्त आणि फक्त स्वाभिमान देऊ शकते," असं पंकजा यांनी म्हटलं.

त्यांनी पुढे म्हटलं की, "राजकारणात आणलं तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं की, ही जनता तुझ्या पदरात टाकत आहे. माझ्यासाठी गावोगावी पैसे जमा होत होते, तेव्हा बाहेर शिकणाऱ्या मुलाने फोन करून म्हटलं, तू हे पैसे घेणार का? मी म्हटलं मी पैसे नाही सगळ्यांचे आशीर्वाद घेणार.

त्यादिवशी मी मुलाला सांगितलं, तुझ्याआधी माझ्यासाठी ही मुलं आहेत. जेवढं प्रेम तू आई म्हणून माझ्यावर करतो त्यापेक्षा जास्त हे लोक करतात, असं मी सांगितलं."

'पंकजा मुंडेंची निष्ठा एवढी लेचीपेची नाही'

"ग्रामविकास मंत्री असताना गावागावात कामे केली. सगळ्यांना बोलावून बोलावून कामे केली. निवडणुकीत मी पडले, माझा पाय मोडला तर मला कुबड्यांची गरज होती.कुबड्या पक्ष देऊ शकतो किंवा लोक देऊ शकतात, लोकांनी एवढ्या कुबड्या दिल्या की, मॅरेथॉनही पळू शकते असं वाटलं. दरवेळी लोकांना आशा वाटते आणि दरवेळी तुमचा अपेक्षाभंग होतो, त्याचा तुम्हाला त्रास होतो, त्यासाठी मी तुमची माफी मागते. रोज वेगवेगळ्या पक्षात जाण्याची अफवा उडते, पण पंकजा मुंडेंची निष्ठा एवढी लेचीपेची नाही."

आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत- पंकजा मुंडे

"एकवेळ मला काही देऊ नका पण माझ्या माणसांना सत्तेपासून आणि हक्कापासून दूर ठेवता येणार नाही. आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत. माझी माणसं शिवशंकराचं रुप आहेत. शिवशंकर भोळा आहे पण त्याला तिसरा डोळा आहे. मोहन भागवत म्हणाले, नितिमत्ता बाजुला ठेवून राजकारण करणं देशाच्या हिताचं नाही. जिंकण्यासाठी काहीही करता येतं, पण जिंकण्यासाठी नितिमत्ता गहाण ठेवता येणार नाही. शिवशक्ती परिक्रमा केली नव्हती तेव्हा वाटायचं, मी बँकांची कर्जदार आहे, वाटायचं पक्षाची कार्यकर्ता आहे. पण लोकांनी जेव्हा माझ्यासाठी पैसा गोळा केला तेव्हा कळलं मी तुमची कर्जदार आहे."

'एकवेळ ऊसतोड करायला जाईन, पण निष्ठा गहाण टाकणार नाही'

"पराभवानंतर 5 वर्ष झाली त्यात खूप काम केलं. मध्यप्रदेशात काम केलं, इतर ठिकाणी काम केलं. वेळ आली तेव्हा भगवान बाबालाही वेगळी जागा शोधावी लागली. आपल्यालाही आता तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर मी शोधत आहे. मी तुमची ताई नाही तुमची आई आहे. बाप संकटाने आत्महत्या करतो, पण आईला जीव देता येत नाही, कारण तो लेकरांत अडकलेला असतो. त्यामुळं माझ्या लोकांचं हित बघणं हे माझं कर्तव्य आहे. इकडची जागा लढा, तिकडची जागा लढा, प्रितमताई घरी बसतील तुम्ही लढा, असं काही चालणार नाही. मी कुणाच्या मेहनतीचं खात नाही. एकवेळ ऊसतोड करायला जाईन, पण स्वाभिमान गहाण टाकणार नाही. ."

'जाती, धर्माच्या वाढत चाललेल्या भिंती पाडा हेच मुंडे साहेबांचं खरं स्मारक'

"मुंडे साहेबांचा गोपिनाथ गड तीन महिन्यांत बनवला पण सरकारकडून 10 वर्षांत स्मारक बनलं नाही. आता स्मारक बनवूच नका, बनवायचं असेल तर माझ्या शेतकऱ्यासाठी काही तरी करा... जाती, धर्माच्या वाढत चाललेल्या भिंती पाडा हेच मुंडे साहेबांचं खरं स्मारक होईल. जातीपातीच्या भिंती मोडून जनतेला आधार देणाऱ्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे. तुमच्यासाठी मुंडे साहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरणार. पडले ते झालं आता पाडणार आहे... शिवशक्ती परिक्रमेत जिथं जाता आलं नाही, तिथं जाऊन दौरा करणार. आता घरी बसणार नाही, आता मी तुम्हाला मैदानात दिसेन. "

पंकजाताई ज्योतीप्रमाणे भासू लागल्या आहेत- प्रीतम मुंडे

प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.

त्या म्हणाल्या, "लाखोंचा जनसागर कमावला हीच आमची खरी संपत्ती आहे. हा पाण्याचा शांत सागर नाही, तर हा स्फुल्लिंगाचा सागर आहे. मुंडेसाहेबांनंतर पंकजाताई 10 वर्षे संघर्ष करत आहेत, त्याला सर्व समर्थकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली.

सर्व समर्थक भगवान बाबांनी दिलेल्या स्वाभिमानाचे स्फुल्लिंग आहेत. ताईंवर संकटाची वेळ आली तर दोन दिवसांत कोट्यवधी रुपये जमा केले. शिवशक्ती परिक्रमेनंतर पंकजाताई ज्योतीप्रमाणे भासू लागल्या आहेत."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)