शरद पवार यांची 43 वर्षांपूर्वीची ‘शेतकरी दिंडी’, ज्यामुळे त्यांच्यासाठी 'दिल्लीचे दरवाजे' उघडले

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात 25 ऑक्टोबरपासून ‘युवा संघर्ष यात्रा’ सुरु होतेय. पुणे ते नागपूर असं 800 किलोमीटरहून अधिकचं अंतर सुमारे 45 दिवसात गाठणार असून, या मार्गावरील जिल्ह्यांमधील युवकांशी संवाद साधून ते प्रश्न जाणून घेणार आहेत.
अजित पवारांच्या बंडानंतर विस्कटलेल्या राष्ट्रवादीत रोहित पवारांची यात्रा चैतन्य आणले का? की रोहित पवार स्वत:चं नेतृत्व या यात्रेतून पुढे आणतील? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रोहित पवारांच्या या यात्रेची सुरुवात 24 ऑक्टोबरला शरद पवारांच्या सभेनं होणार आहे. या ‘युवा संघर्ष यात्रे’च्या निमित्तानं चार दशकांपूर्वी शरद पवारांनी काढलेल्या ‘शेतकरी दिंडी’च्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला.
चार दशकांपूर्वी, म्हणजे अगदी नेमके सांगायचे तर 1980 साली शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत, नागपूरमध्ये तेव्हा सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर लाखोंच्या संख्येत शेतकऱ्यांची ‘दिंडी’ नेली होती.
शरद पवारांच्या या ऐतिहासिक ‘शेतकरी दिंडी’ची ही गोष्ट.
1978 साली वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून शरद पवारांनी ‘पुलोद’चा प्रयोग करत पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. मात्र, हे सरकार केवळ दोनच वर्ष टिकलं. इंदिरा गांधी केंद्रात सत्तेत आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करून नव्यानं निवडणुका घेतल्या.
शरद पवारांनी तोवर काँग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. महाराष्ट्रातल्या निवडणुकीत काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं. मात्र, पवारांच्या नवख्या समाजवादी काँग्रेसनंही 54 जागा मिळवल्या. मात्र, तरीही विरोधात बसावं लागलं आणि विरोधी पक्षनेतेपद शरद पवारांकडे आलं.
यावेळी पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यास सुरुवात केली.

फोटो स्रोत, Getty Images
शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न देशात ऐरणीवर होता. शेतकऱ्यांमधील नाराजी ओळखून शरद पवारांनी जळगाव जिल्ह्यात सभा घेतली. याचवेळी महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. पवारांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून सरकारला घेरण्याचं नियोजन केलं. सुरुवात कुठून करायची, तर जिथं पहिल्यांदा हा विचार आला, त्याच जिल्ह्यातून म्हणजे जळगावातूनच करण्याचं ठरलं. आणि या आंदोलनाचं नाव ठरलं – ‘शेतकरी दिंडी’.
शेतीमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, शेतमजुरांना किमान वेतन मिळालंच पाहिजे, ग्रामीण बेरोजगारांना काम मिळालंच पाहिजे, चळवळीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटले मागे घेतलेच पाहिजेत, या मागण्या पवारांच्या या ‘शेतकरी दिंडी’च्या केंद्रस्थानी होत्या.
टाळ-मृदंगाच्या निनादात ‘दिंडी’ निघाली नागपूरला
जळगावच्या नूतन मराठा विद्यालयाच्या मैदानातून 7 डिसेंबर 1980 रोजी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ‘शेतकरी दिंडी’ला सुरुवात झाली.
जळगाव ते नागपूर हा साडेचारशेहून अधिक किलोमीटर अंतराचा टप्पा. त्यामुळे शेतकरी दिंडीत चालण्यासाठी किती शेतकरी उपस्थिती लावतील, याची शरद पवारांसह सगळ्यांनाच शंका होती. मात्र, या दिंडीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला.
शरद पवार त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ आत्मचरित्रात सांगतात की, ही दिंडी जेव्हा जळगावातून निघाली, तेव्हा सुरुवातीला हजार-पाचशे लोक होते. जळगावातून बाहेर पडल्यावर पंधरा हजार झाली. पुढे बुलढाण्यात गेल्यावर पन्नास हजार झाली, पुढे अमरावतीला गेलो तिथे दोन अडीच लाख लोक गोळा झाले. हे एक ऐतिहासिक अशा संयमाचे गांधी विचाराचे आंदोलन होते.

फोटो स्रोत, Rajhans Prakash
या शेतकरी दिंडीला इतक्या संख्येत प्रतिसाद मिळण्याचं गुपित ‘दिंडी’ या नावातच होतं, असं शरद पवारांना वाटतं.
आंदोलन म्हटल्यावर मोर्चा, सत्याग्रह अशा मार्गांचा वापर होत असे. अशा काळात ‘शेतकरी दिंडी’ हा तसा नवा प्रयोग होता.
पवार म्हणतात तसं, ‘महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गात दिंडीला एक महत्त्वाचं आणि भक्तीभावाचं स्थान आहे. या दिंडीत गावोगावच्या शेतकरी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. दिवसभर भजन-कीर्तन होत असे. टाळ-मृदंगाच्या निनादात सगळेजण नागपूरच्या दिशेनं वाटचाल करत असल्यामुळे त्यांच्याविषयी विलक्षण कुतूहलही निर्माण झालं होतं. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी नेत्यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाषण होत.’
‘पंढरीच्या वारीतल्या दिंड्यांच्या स्वागताचा बहुमान त्यांना ठिकठिकाणी मिळत होता. शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था गावं स्वयंस्फूर्तीनं करत होती. गावातील महिला हजारो भाकऱ्या उत्शफूर्तपणे तयार करून पाठवत असत. महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रचंड पाठिंबा या दिंडीला लाभला.’
दिग्गजांची हजेरी आणि यशवंतराव चव्हाणांनाही अटक
शरद पवार 1967 साली पहिल्यांदा आमदार बनले, 1978 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. 1980 पर्यंत त्यांच्या विधिमंडळ राजकारणाची कारकीर्द एक-दीड दशकांचीच झाली होती. तरीही जेव्हा ‘शेतकरी दिंडी’ काढली, तेव्हा महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी त्यांचं नेतृत्त्व स्वीकारून दिंडीत सहभाग घेतला.
शेतकरी दिंडीत सहभागी झालेल्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील, एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख, बापूसाहेब काळदाते, अहिल्याताई रांगणेकर, मृणाल गोरे, ना. धों. महानोर अशी मातब्बर नेतेमंडळी दिंडीत सहभागी झाल्यानं तिची परिणामकारता वाढली होती. तसंच, डॉ. श्रीराम लागू, नानासाहेब गोरे, गोदाताई परुळेकर यांसारख्या कला-सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचाही पाठिंबा मिळाला होता.
जळगावातून जसजशी ही दिंडी नागपूरच्या दिशेनं जाऊ लागली, तसतशी दिंडीला मिळणारा प्रतिसाद वाढत गेला.
शरद पवार म्हणतात, त्यावेळचे मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांना परिस्थिती हाताळावी कशी हे कळेना. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचीही संख्या फुगतच चालली होती. नागपूरमध्ये विधिमंडळाचं अधिवेशनही त्या वेळी सुरू होतं.

फोटो स्रोत, Getty Images
दिंडी अमरावतीहून पुढे निघाल्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणही दिंडीमध्ये सहभागी झाले.
पोहरा इथे दिंडी पोहोचल्यावर तिथून यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि इतर अनेक सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. भंडाऱ्यातील डाकबंगल्यावर त्यांना नेण्यात आलं. मात्र, दिंडीतल्या शेतकऱ्यांनी दिंडी नियोजित मार्गानं पुढे नेली.
यशवंतराव चव्हाणांच्या अटकेचा प्रसंग शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात सांगितला आहे.
‘दिंडी अमरावतीला अडवण्यात आली. त्यावेळी सोबत यशवंतराव चव्हाण, राजाराम बापू पाटील होते. त्यावेळी आम्हा सगळ्यांना अटक केली. एसटीमध्ये बसवले.’
पवार आत्मचरित्रात पुढे लिहितात की, ‘मला एसटीची सवय होती. मी चव्हाण साहेबांनी विचारणा केली की, तुम्ही एसटीमध्ये कधी बसला होता का? तेव्हा त्यांनी सांगितले की, 1948 साली परिवहन खात्याचे मंत्री असताना एसटी प्रकल्प सुरू केला, तेव्हा पहिली गाडी सोडण्यासाठी उद्घाटक म्हणून बसलो होतो. त्या गाडीत काही किलोमीटर मी बसलो. त्यानंतर कधीही बसलो नाही.’
अटकेच्या दुसऱ्याच दिवशी कोर्टानं सोडण्याचे आदेश दिले आणि पवार, चव्हाणांसह सर्व आंदोलकांना सोडण्यात आलं. मग हे सगळेजण पुन्हा दिंडीत सहभागी झाले.

फोटो स्रोत, Getty Images
या शेतकरी दिंडीमुळेच तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी शेतकरी कर्जमाफी केली.
अंतुलेंनी केलेली कर्जमाफी ही महाराष्ट्रातली पहिली शेतकरी कर्जमाफी मानली जाते. मात्र, शेतकरी दिंडीचा या घोषणामागे किती वाटा होता, याबद्दल मतमतांतरं दिसून येतात. मात्र, शेतकरी दिंडीनं शरद पवारांना राज्यात नेतृत्त्व प्रस्थापित करण्याची संधी दिलीच, सोबत राष्ट्रीय राजकारणातही प्रवेश दिला.
मध्यंतरी जेव्हा शिखर बँकेच्या प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) शरद पवारांवर गुन्हा दाखल केला, तेव्हा पवारांनी शेतकरी दिंडीची आठवण काढत सांगितलं होतं की, “ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे माझ्यावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल होण्याची नोंद झाली. 1980 साली शेतकरी प्रश्नावर दिंडी काढली, तेव्हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता (शिखर बँक प्रकरण) गुन्हा दाखल झाला.”
पवारांसाठी ‘दिल्लीचे दरवाजे उघडले’
ही शेतकरी दिंडी नागपूरमध्ये पोहोचल्यावर मोठ्या प्रमाणात धरपकड झाली. समाजवादी आणि शेतकरी चळवळीतले बरेच नेते तिथं हजर होते. एस. एम. जोशी, कर्पुरी ठाकूर, जॉर्ज फर्नांडिस, देवीलाल, राजेश्वर राव, चंद्रजित यादव असे अनेक नेतेही नागपुरात दिंडीत सहभागी झाले. या सर्व नेत्यांनागी अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे, हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवीलाल, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, तसंच कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय नेते नागपुरात आले. देशाच्या राजकारणात नेतृत्त्व करणारी माणसे आल्यानं पवारांची शेतकरी दिंडी देशभरात पोहोचली.
शरद पवार सांगतात की, ‘राष्ट्रीय राजकारणाताली नेत्यांनी याच सुमारास शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीत एका प्रचंड मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्याचं अध्यक्षस्थान भूषवण्याची संधी मला या नेत्यांनी दिली.’

फोटो स्रोत, Getty Images
माझ्यासाठी दिल्लीमधला हा खऱ्या अर्थानं पहिला प्रवेश होता, असं शरद पवार त्यांच्या आत्मचरित्रात सांगतात.
दिल्लीतल्या मोर्चात इंडिया गेट ते संसदेपर्यंतच्या मार्गावर लाखोंच्या संख्येत पंजाब-हरियाणसह देशभरातून शेतकरी जमा झाले होते. या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी प्रकाशसिंह बादल, देवीलाल यांनी बरीच मेहनत केली होती. याबाबतचा उल्लेख करत पवार म्हणतात, “देवीलाल आणि बादल या ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर नेतृत्वाची जबाबदारी दिली. आपण राष्ट्रीय पातळीवर एका जेमतेम चाळीशीतल्या राजकीय नेत्याचं महत्त्व वाढवत आहोत, असा क्षुद्र विचार न करता त्यांनी ताकद पणाला लावली.”
दिल्लीत येऊन राजकारण करण्याचा आत्मविश्वास मला दिल्लीतल्या याच मेळाव्यानं दिला, असं पवार म्हणतात.
हेही नक्की वाचा
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








