नितीश कुमार यांनी आयुष डॉक्टरचा हिजाब ओढल्याचा व्हीडिओ व्हायरल; नेमकं प्रकरण काय आहे?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सोमवारी (15 डिसेंबर) एका नवनियुक्त आयुष डॉक्टरचा हिजाब ओढल्याने वादात सापडले आहेत.
या घटनेवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले असून त्यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. विरोधी पक्षांनी त्यांना 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' म्हटलं आहे.
सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात नियुक्तीपत्र देताना नितीश कुमार एका मुस्लिम महिला आयुष डॉक्टरच्या चेहऱ्यावरचा हिजाब ओढताना दिसत आहेत.
या वेळी नितीश कुमार यांच्या मागे बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी उभे आहेत आणि व्हीडिओत ते मुख्यमंत्र्यांना असं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव दीपक कुमार हसताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, @NitishKumar
हिजाब घातलेल्या एक नवनियुक्त डॉक्टर नियुक्तीपत्र घेण्यासाठी आल्या असता नितीश कुमार यांनी, 'हे काय आहे?' असा प्रश्न केला. त्यानंतर मंचावर उभे असलेले नितीश कुमार थोडंसं झुकले आणि त्यांनी त्यांचा हिजाब खाली ओढला.
नितीश कुमार यांच्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवर आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंसोबत त्यांनी लिहिलं आहे की, "आज मुख्यमंत्री सचिवालयातील 'संवाद'मध्ये 1283 आयुष डॉक्टरांना (आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी) नियुक्तीपत्रे देण्यात आली."
विरोधी पक्ष झाले आक्रमक
विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) या घटनेचा व्हीडिओ शेअर करत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने आपल्या 'एक्स' अकाऊंटवर हा व्हीडिओ शेअर करत लिहिलं आहे की, "हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आहेत. त्यांचं हे कृत्य लाजिरवाणं आहे. एक महिला डॉक्टर नियुक्तीपत्र घ्यायला आली असताना नितीश कुमार यांनी त्यांचा हिजाब ओढला."
काँग्रेसने म्हटलं आहे की, "बिहारमधील सर्वोच्च पदावर बसलेला व्यक्ती उघडपणे अशी कृती करत असेल, तर विचार करा राज्यातील महिला किती सुरक्षित असतील. या घृणास्पद कृत्याबद्दल नितीश कुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. हीन दर्जाचं त्यांचं कृत्य अक्षम्य आहे."
बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने म्हटलं आहे की, "नितीशजींना नेमकं काय झालं आहे? त्यांची मानसिक स्थिती आता अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचली आहे…"

फोटो स्रोत, @NitishKumar
'इंडियन एक्सप्रेस'या वृत्तपत्राशी बोलताना सत्ताधारी संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) प्रवक्ते नीरज कुमार यांनी मुख्यमंत्र्यांचा बचाव केला. विरोधी पक्षांनी एका ठराविक व्हीडिओ क्लिपचा विनाकारण गवगवा करू नये, असं त्यांनी म्हटलं.
"नितीश कुमार यांनी बिहारमध्ये महिला आणि अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी खूप काम केलं आहे," असं नीरज कुमार यांनी सांगितलं.
या प्रकरणावर देवबंदी मौलवी कारी इसहाक गोरा यांनी 'पीटीआय' वृत्तसंस्थेला सांगितलं की, "हा व्हीडिओ पाहून फक्त माझंच नाही तर संपूर्ण देशातील लोकांचं रक्त खवळलं असेल. एका कार्यक्रमात नितीश कुमार एका महिलेचा नकाब ओढताना दिसतात.
एकीकडे तुम्ही महिलांच्या सन्मानाबद्दल बोलता आणि दुसरीकडे एका महिलेचा अपमान करताना दिसता. या प्रकरणी नितीश कुमार यांनी देशातील सर्व महिलांची माफी मागितली पाहिजे."
पाकिस्तानमध्येही चर्चेचा विषय
या व्हीडिओवर पाकिस्तानातील लोकही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक अम्मार मसूद यांनी हा व्हीडिओ शेअर करत लिहिलं की, "भारतामध्ये मुसलमानांबरोबर होणाऱ्या गैरवर्तनाचे हे दुःखद उदाहरण आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नियुक्तीपत्र देताना एका मुस्लिम महिला डॉक्टरचा नकाब जबरदस्तीने ओढला."
पाकिस्तानी पत्रकार मोईद पिरजादा यांनी 'एक्स'वर लिहिले की, "हा व्हीडिओ खूपच लक्षवेधी आहे. तो पितृसत्तात्मक विचार आणि आधुनिकतेमधील सांस्कृतिक संघर्ष अनेक पातळ्यांवर दाखवतो.
मुख्यमंत्री जेव्हा एका महिलेचा हिजाब खाली ओढतात, तेव्हा त्यांना आपल्या पुरुषप्रधान मानसिकतेत सुरक्षित वाटतं. त्यांना वाटतं की, ते त्या महिलेला आपला चेहरा दाखवण्यासाठी आणि तिचं यश जगासमोर आणण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत! शेवटी, पुरस्कार मिळत असताना आणि यशाचा आनंद साजरा होत असताना एखादी महिला आपली ओळख का लपवेल?"
मोईद पिरजादा यांनी पुढं लिहिले की, "ते आधुनिकतेच्या नैतिक मूल्यांना अपमानजनक पद्धतीने आव्हान देतात. कारण एका प्रौढ महिलेला तिच्या गोपनीयतेचा बळजबरीने भंग करून, तिची ओळख उघड केली जाते आणि तिला लहान मुलासारखं वागवलं जातं.
"ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही! आधुनिकतेनुसार महिलांनी आपला चेहरा लपवू नये. हिजाब किंवा नकाब घालणाऱ्या महिलांना पितृसत्तात्मक अत्याचाराचा असहाय्य बळी मानला जातो."

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या काही वर्षांत सार्वजनिक सभांमधील आणि विधानसभेतील नितीश कुमार यांच्या वर्तणुकीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच वर्षी 21 ऑगस्ट रोजी नितीश कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता, ज्यात त्यांनी एका मदरशाच्या कार्यक्रमात टोपी घालण्यास नकार दिला होता.
मात्र, 2013 मध्ये जेव्हा नितीश कुमार एनडीएपासून वेगळं झाले होते, तेव्हा त्यांनी भाजपवर हल्ला करत म्हटलं होतं की, ते टिळाही लावतात आणि टोपीही घालतात. त्या वेळी नितीश कुमार इफ्तार पार्टीत उघडपणे टोपी घालत असत.
काही महिन्यांपूर्वी नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात एका आयएएस अधिकाऱ्याच्या डोक्यावर एक छोटासा फ्लॉवर पॉट ठेवला होता. याच वर्षी जानेवारीमध्ये महात्मा गांधींच्या 77व्या पुण्यतिथीला आदरांजली वाहिल्यानंतर नितीश कुमार यांनी अचानक टाळ्या वाजवायला सुरुवात केली होती.
मार्च महिन्यात राष्ट्रगीताच्या वेळी ते आपल्या प्रधान सचिवांशी बोलताना आणि हसताना दिसले होते. मागील वर्षी दरभंगा येथे नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











