1 एप्रिलः नव्या आर्थिक वर्षात या 3 गोष्टी करुन तुम्ही पैसे वाचवू शकता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आयव्हीबी कार्तिकेय
- Role, बीबीसीसाठी
1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. आपली वेगवेगळी गुंतवणूक, त्यातून मिळणारा परतावा आणि भविष्यात मिळणारा परतावा या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी एप्रिल अतिशय योग्य ठरतो.
कारण, एप्रिल महिन्यातच अर्थसंकल्पात लागू करण्यात आलेले नवे बदल, नियम आणि कायदे लागू करण्यात येत असतात. त्यामुळे आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिना अतिशय महत्त्वाचा आहे.
नव्या आर्थिक वर्षांत आर्थिक स्वयंपूर्णता मिळविण्यासाठीचा पाया तुम्हाला एप्रिल महिन्यात घालता येतो.
त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाचं नियोजन करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. या निमित्ताने खालील 3 गोष्टींचा घेतलेला आढावा –

फोटो स्रोत, Getty Images
1. विमा पॉलिसी आणि कर
आर्थिक गुंतवणुकीचा विचार केल्यास या सगळ्यात पहिल्या क्रमांकावर असलेली गोष्ट म्हणजे विमा होय. विमा काढल्यानंतर तुम्हाला नियमांनुसार आयकरात सूटही मिळते.
त्यामुळे, तुमच्या आवश्यकतेनुसार जीवन विमा आणि आरोग्य विमा तुम्ही घेतलेला आहे, याची खात्री करा. हीसुद्धा एक प्रकारची गुंतवणूकच आहे.
अनेक जण विमा काढणं पुढे ढकलतात. भविष्यात गरज पडल्यास करू म्हणत हा विषय बाजूला पडत जातो. पण असं करणं योग्य नाही.
आरोग्य विम्याचा हप्ताही दरवर्षी वाढत असतो. काही विमा पॉलिसींमध्ये ठराविक कालावधीनंतर संरक्षण मिळतं. त्यामुळे आपल्या आवश्यकता पाहून त्याच्याशी सुसंगत अशी विमा पॉलिसी तातडीने काढून घेणं हेच योग्य ठरतं.
आपली विमा पॉलिसी आणि वैयक्तिक गुंतवणूक याची माहिती केवळ स्वतःपुरतीच असली पाहिजे असं नाही. तर आपल्या जोडीदाराला त्याविषयी संपूर्ण कल्पना असणं त्यासाठी योग्य ठरतं.
आपल्या विमा संरक्षण आणि गुंतवणुकीचे तपशील आपण आपल्या जोडीदाराकडे देऊन ठेवावेत.
हे तपशील मायक्रोसॉफ्ट एक्सेल फाईल किंवा स्मार्ट फोनमधील एखाद्या अपच्या वापर करून साठवता येऊ शकतात.
एखादा वैयक्तिक सल्लागार असल्यास त्यांचा फोन नंबरही त्याठिकाणी द्यावा.
याचा फायदा म्हणजे अनपेक्षित अशा अडीअडचणीच्या काळात आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो.
सदर माहिती सहज उपलब्ध असल्यास आणीबाणीच्या वेळी जोडीदारालाही प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
शिवाय, तुमच्या विमा पॉलिसींमध्ये तुम्ही वारसदारामध्ये बदल करू शकता. तुमच्या आवश्यकतेनुसार या सर्व गोष्टींचं नियोजन तुम्हाला करता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
एप्रिल महिन्यात लागू झालेल्या नवीन नियमांचा अभ्यास करून आपण त्या नियमांप्रमाणे योग्य ते बदल करून घ्यावेत.
आयकराच्या बाबतीत विचार केल्यास मासिक पगाराची गणना करण्यासाठी कोणत्या प्रकारची कर प्रणाली निवडावी, कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीचा तपशील सादर करायला हवा, याबाबत सर्वंकष विचार करणं यावेळी महत्त्वाचं ठरतं.
2. गुंतवणुकीवरील परताव्याचे पुनरावलोकन
गुंतवणुकीवर परतावा समजून घेण्यासाठी विविध प्रकारची समीकरणं वापरली जातात.
यामध्ये परिपूर्ण परतावा, वार्षिक वाढीचा दर, अंतर्गत परतावा दर, विस्तारित परतावा दर आदींचा समावेश आहे.
कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीच्या एकच पद्धत वापरता येत नाही. यासाठी तुम्हाला एखाद्या सल्लागाराकडून मदत घेता येईल. अन्यथा मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरूनही ते सहज काढता येतात.
तुम्ही म्युच्युअल फंड किंवा SIP मध्ये गुंतवणूक केलेली असल्यास त्याचा समावेश विस्तारित परताव्यात करायला हवा. तसंच योग्य परतावा नसलेल्या गुंतवणुकीचाही अभ्यास केला पाहिजे.

फोटो स्रोत, Getty Images
बाजार आधारित गुंतवणूक मार्गांच्या परताव्याची तुलना करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, या गुंतवणुकीवरील परतावा हा बाजारपेठेतील घडामोडींशी जोडलेला असतो.
भारतीय शेअर बाजार गेल्या दोन महिन्यांपासून तोट्यात आहे, हेसुद्धा लक्षात घ्या.
त्यामुळे अशा स्थितीत बाजार आधारित गुंतवणुकीत परतावा कमी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणुकीचे हे पर्याय आपल्या आर्थिक उद्दिष्टांशी सुसंगत आहेत की नाही हे पुनःश्च तपासावं लागेल.
3. गुंतवणूक आणि खर्चाचा समतोल
खर्चावर नियंत्रण असावं, अशी आपली सर्वांची इच्छा असते. पण बऱ्याच वेळा विविध कारणांमुळे आपलं खर्चावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे संपूर्ण महिन्याचं बजेट कोलमडतं.
सध्या आपल्या राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे. पूर्वीच्या पीढीला उपलब्ध नसलेल्या अनेक सुविधांचा लाभ आपण आता घेत आहोत.
पण, त्यासोबतच चैनीच्या वस्तूंचा उपयोग करण्याची सवयही वाढीस लागली आहे. या सुविधांची किंमत जास्त असते. वाढत्या महागाईमुळे EMI आणि इतर खर्च वाढत चालले असताना चैनीच्या सुखसोयींना खर्चाचा किती वाटा द्यायला हवा, याचा विचार करायला हवा.
या खर्चामुळे आपली गुंतवणूक कमी होत असेल, तर आपल्या आर्थिक उद्दीष्टांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
खर्च आणि गुंतवणुकीचा समतोल राखण्यासाठी खालील उपाय करता येतील. –
आपण आर्थिक उद्दिष्टांपासून किती दूर आहोत, याचा सुरुवातीला अभ्यास करा.
हे अंतर कमी करण्याच्या दृष्टीकोनातून योग्य ते आर्थिक निर्णय घ्या.
आपल्या कोणत्याही गुंतवणुकीची रक्कम ही थेट बँकेतन इलेक्ट्रॉनिक डेबिटमधून जाते, याची खात्री करा. यामुळे गुंतवणुकीत कोणताही अडथळा येत नाही.
तुमच्याकडे क्रेडीट कार्ड असल्यास त्याचा पुरेपूर फायदा घ्या. क्रेडिट पॉईंट, कॅशबॅक आदी बाबी तपासून खरेदी करा. क्रेडिट कार्ड पॉईंटद्वारे प्रवास खर्च कमी केला जाऊ शकतो.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक नियोजन योग्यरित्या करायचं असल्यास आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आजारी पडू नका. कारण, निरोगी राहून औषधोपचारासाठी लागणारा खर्च बचत करण्यासाठी तोच एक सर्वोत्तम पर्याय आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








