या मतदारसंघांमध्ये मराठा-ओबीसी-वंजारी यांनी एकमेकांविरोधात नाही तर एकाच बाजूला दिली मतं

प्रातिनिधीक छायाचित्र
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल आलेले आहेत. भाजप आणि मित्रपक्षांनी बहुमताचा आकडा पार केला असला तरी इंडिया आघाडीने भरपूर जागा जिंकल्या आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे आणि काँग्रेसने कमबॅक केलं आहे.

उत्तर महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांनी सहापैकी चार जागा गमावल्या आहेत आणि डॉ. भारती पवार, सुभाष देसाई अशा मातब्बर नेत्यांचा पराभव झालेला दिसून येतोय.

फक्त जळगाव जिल्ह्यातल्या दोन जागा टिकवण्यात भाजपला यश आलेलं आहे.

विश्लेषक सांगतात की भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तिन्ही मतदारसंघात विद्यमान खासदारांच्या विरोधात निगेटिव्ह रिपोर्ट गेला होता.

नाशिकमधून हेमंत गोडसे, दिंडोरीतून भारती पवार आणि धुळ्यातून सुभाष भामरे या तिन्ही उमेदवारांच्या विरोधात जनमत आहे, आणि तिथे नवे चेहरे द्यायला हवेत असं पक्षाला दिसलं होतं.

तरीही तेच उमेदवार 'रिपीट' केल्याचा फटका महायुतीला (NDA ) ला बसला.

याखेरीज उत्तर महाराष्ट्रात कोणते फॅक्टर चालले आणि कोणते नाही, ते सविस्तर पाहूया.

नाशिक – विजयी - राजाभाऊ वाजे, पराभूत – हेमंत गोडसे

हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट) गेली दहा वर्षं खासदार होते, आणि दोन्ही वेळेस मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. पण 2024 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी जवळपास 1 लाख 60 हजार मतांनी पराभव केला.

मराठवाड्यात वंजारीविरूद्ध मराठा मतदान झालं अशा बातम्यात येत असताना नाशिक हा दुर्मिळ मतदारसंघ असेल जिथे मराठा, वंजारी, ओबीसी या सर्वांनी एकाच उमेदवाराला मतदान केलं.

याबद्दल अधिक समजावून सांगताना महाराष्ट्र टाईम्स नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे म्हणतात, “ नाशिकचं सांगायचं झालं तर मुळात उमेदवारच ठाकरे गटाचा प्लस पॉईंट ठरला. आधी ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक विजय करंजकर यांना तिकीट देण्याचं ठरलं होतं. परंतु, एक अंदाज आला की ते काही चालू शकणार नाही. त्यामुळे स्वच्छ आणि साधी प्रतिमा असलेल्या राजाभाऊ वाजेंना तिकीट देण्यात आलं. ते आधी आमदारही होते. त्याचाही अनुभव त्यांच्या गाठीशी होता. ते मुळात सिन्नरचे आहेत, मतदानाची आकडेवारी पाहिली तर त्यांच्यासाठी सिन्नर तालुका पूर्ण एकवटला.”

राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे विजयी घोषित झाल्यानंतर
फोटो कॅप्शन, राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे विजयी घोषित झाल्यानंतर
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वाजेंना जवळपास एक लाख मतांची आघाडी एकट्या सिन्नर तालुक्यातून आहे.

दुसरा महत्त्वाचा फॅक्टर ठरला ते दलित-मुस्लीम, मराठा-ओबीसी मतांचं एकत्रीकरण.

तनपुरे म्हणतात, “एकतर वाजेंची उमेदवारी घोषित झाल्यानंतर जवळपास सव्वा महिन्यांनी महायुतीने आपला उमेदवार दिला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हेमंत गोडसेंचं नाव जाहीर झालं. भुजबळांना उमेदवारी हवी होती, ती न दिल्याने ओबीसी मतदार नाराज झाला आणि वाजेंकडे वळला.

"भाजप संविधान बदलणार हा मुद्दा काँग्रेसने लावून धरल्याने दलित मतदार वाजेंकडे गेला आणि मुस्लीम मतंही त्यांनाच मिळाली. शेतकरी वर्गाचे प्रश्न सुटत नसल्याने ती मतं वाजेंना गेली. वाजे स्वतः मराठा समुदायातील असल्याने महाराष्ट्रात इतर ठिकाणी झालं तसं मराठा-ओबीसी मतांचं विभाजन इथे झालं नाही, विरोधी उमेदवारांना मतदान न करता एकाच उमेदवाराला मतदान झालं," तनपुरे सांगतात.

यासगळ्यात लक्षणीय बाब अशी की शहरी मतदार, जो भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो तोही यावेळी महाविकास आघाडीकडे वळलेला दिसला.

राजाभाऊ वाजेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते ग्रामीण भागातले आहेत, पाजयमा शर्ट घालतात, त्यांना इंग्लिश बोलता येत नाही, असा उमेदवार नाशिकच्या शहरी भागात चालेल की नाही अशा चर्चा रंगल्या.

हेमंत गोडसे

फोटो स्रोत, FB

फोटो कॅप्शन, हेमंत गोडसे

नाशिक लोकसभा मतदारसंघातली जवळपास, 13 लाख म्हणजेच, 65 टक्के मतं नाशिक शहरात आहेत. नाशिक पूर्व आणि पश्चिममध्ये गोडसेंना आघाडी असली तरी नाशिक मध्यमध्ये वाजे आघाडीवर होते. इथेच मोठ्या प्रमाणात मुस्लीम-दलित मतदार आहेत. पण त्याबरोबरीने नाशिक शहरातले उच्चभ्रू समजले जाणारे कॉलेज रोड आणि गंगापूर रोड हे भागही इथेच येतात. इथे वाजेंना मिळालेल्या आघाडीने महायुतीला धक्का बसला.

याबद्दल विश्लेषण करताना नाशिक शहरातले जेष्ठ पत्रकार सांगतात, “महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना सध्या उद्धव ठाकरे आपलेसे वाटतात. त्यामुळेच राजाभाऊ वाजे निवडणूक जिंकल्यानंतर जुन्या नाशिक भागात (मुस्लीमबहुल भाग) हिरवा गुलाल उधळला गेला.”

तर शहरी उच्चभ्रू वर्ग तोडफोडीच्या राजकारणाला वैतागला होता त्यामुळे महाविकास आघाडीकडे वळला असं मत तनपुरे व्यक्त करतात.

नाशिकमध्ये आणखी एक फॅक्टर चालला तो म्हणजे महायुतीतली अंतर्गत धुसफूस. गोडसेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भुजबळ नाराज होते आणि त्यांनी ती नाराजी बोलूनही दाखवली होती.

मुळात सहापैकी पाच विधानसभेच्या जागा महायुतीकडे असताना नाशिकची लोकसभेची जागा सर्वात सुरक्षित समजली जात होती, पण प्रत्यक्षात काही वेगळाच निकाल आला.

तनपुरे म्हणतात, “पक्षाची संघटना बांधण्यात, सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्यात गोडसे कमी पडले. भाजपच्या आमदारांशी त्यांचं कधी पटलं नाही. भाजपच्या आमदारांचा विरोध होता. शिंदे गटांच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचं जमलं नाही, उदाहरणार्थ दादा भुसे. मध्येच भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा झाली. त्यांना अमित शहा यांनी सांगितलं असल्याचं म्हटलं गेलं. पण एकनाथ शिंदेनी गोडसेंची उमेदवारी प्रतिष्ठेचा विषय बनवला. सिन्नरचे मातब्बर नेते माणिकराव कोकाटे आणि गोडसे यांच्यातही धुसफूस होती. या सगळ्या गोष्टी नकारात्मक वातावरण तयार करत गेल्या. भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही त्यांना कोणी विचारेना. गोडसेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी अर्ज भरायला जाताना जो काही फलक लावला त्यात भुजबळांचा फोटो लावला नाही. त्यानंतर भुजबळ महायुतीविरोधात स्टेटमेंट करायचे.”

मोदींमुळे आपण तरून जाऊ शकतो असा अतिआत्मविश्वास गोडसेंना नडला असंही मत ते व्यक्त करतात.

दिंडोरी – विजयी भास्कर भगरे, पराभूत – डॉ भारती पवार

भारती पवारांना हरवून भास्कर भगरे 'जायंट किलर' ठरलेत. भारती पवारांना दिंडोरीत कोणी रडवलं असेल तर कांद्याने.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दिंडोरी, निफाड, कळवण, नांदगाव, चांदवड-देवळा आणि येवला असे विधानसभा मतदार संघ येतात. इथलं मुख्य पिक कांदा आहे.

भारती पवार

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भारती पवार

नाशिक जिल्ह्यात कांद्यांचं सर्वाधिक उत्पादन होत असल्याने कांदा निर्यातबंदीचा विषय गेल्या वर्ष सहा महिन्यांपासून अत्यंत तापलेला होता.

“भारती पवार मंत्री झाल्यानंतर त्यांचा जमिनीवरील संपर्क कमी झाला. त्यात त्यांच्या वतीने जे काम करायचे ते फारसे बरोबर वागले नसावेत. त्यामुळे लोकांच्या मनात रोष निर्माण झाला. बरं, लोक सतत कांदा निर्यातबंदीबद्दल विचारायचे. भाजप सरकारचं धोरण असल्याने त्याही फारसं काही करू शकल्या नाहीत, पण किमान आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतो असं दाखवायला हवं होतं त्यांनी. ते त्यांना जमलं नाही. सगळे जण मोदी ब्रँडच्या इतक्या प्रभावाखाली होते की आपण जिंकून येऊ अशी भारती पवारांनाही खात्री वाटत असावी. सुरुवातीला तर खेड्यापाड्यात भारती पवारांना येऊ देईनात,” तनपुरे सविस्तर उलगडून सांगतात.

त्यात गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी दिली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणखी संतापले.

नाशिकचे एक जेष्ठ पत्रकार म्हणतात की, “नाफेडकरवी कांदा खरेदी सरकारने केली खरी, पण एकतर व्यापाऱ्यांनी कांदा मातीमोल भावाने खरेदी करून आपल्या ताब्यात ठेवला होता आणि नाफेडची अनेक गोदामं भाजप नेत्यांच्या मालकीची असल्याने हे आपल्याच नेत्यांची पोतडी भरण्याचा भाजपचा डाव आहे असं पसरत गेलं. त्यामुळे हवा आणखीन फिरली.”

कांदाप्रश्न दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खूप गाजला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कांदाप्रश्न दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खूप गाजला

भारती पवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांनीही पिंपळगाव बसवंत इथे सभा घेतली. पण तिथेही एका शेतकरी आंदोलकाने कांद्याच्या भावाविषयी प्रश्न विचारला.

भाजपच्या अनेक मातब्बर नेत्यांनी या भागात सभा घेतल्या पण कांदा प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळत नाही अशी भावना इथल्या स्थानिकाच्या मनात बळावली.

दुसरीकडे शरद पवारांनी मात्र आपल्या निष्ठावंत आणि साध्या कार्यकर्त्याला, भास्कर भगरे यांना तिकीट दिलं. साधेपणाची जादू इथेही चालली.

कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी (शरद पवार गट) ने रान उठवलं होतं, त्याची परिणीती भास्कर भगरेंच्या विजयात झाली.

धुळे - डॉ शोभा बच्छाव – विजयी, पराभूत – डॉ सुभाष भामरे

उत्तर महाराष्ट्रातली ही लढाई सगळ्यात रंजक म्हटली पाहिजे कारण ज्या शोभा बच्छाव इथे खासदार म्हणून निवडून आल्या त्या मुळात इथे उमेदवार म्हणून गेल्याच नव्हत्या.

सुरुवातीला तर शोभा बच्छाव धुळे मतदारसंघाच्या ऑब्झर्वर होत्या. इथून काँग्रेससाठी योग्य उमेदवार निवडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

पण काँग्रेस नेतृत्वाला धुळे मतदारसंघासाठी योग्य तो उमेदवार न मिळाल्याने शोभा बच्छाव यांना नाशिकहून आयात करण्यात आलं.

डॉ शोभा बच्छाव

फोटो स्रोत, Shobha Bachhav Social Media Team

फोटो कॅप्शन, डॉ शोभा बच्छाव नाशिकच्या पहिल्या महिला महापौर होत्या, नाशिकच्या पहिल्या महिला आमदार आणि आता धुळ्याच्या पहिल्या महिला खासदार ठरतील.

शोभा बच्छावांसंबधी आणखी एक रंजक किस्सा म्हणजे त्या नाशिकच्या पहिल्या महिला महापौर होत्या, नाशिकच्या पहिल्या महिला आमदार आणि आता धुळ्याच्या पहिल्या महिला खासदार ठरतील.

त्यांच्या विजयातही कांद्यांने महत्त्वाची भूमिका बजावली.

कांद्याच्या प्रश्नाचं लोण या मतदारसंघातही पोचलं होतंच. कारण नाशिकच्या ग्रामीण भागातले तीन विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदार संघात येतात.

त्यापैकी मालेगाव बाह्य आणि बागलाण या दोन्ही विधानसभा मतदारसंघात बहुतांश कांदा उत्पादक शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांचाही रोष भाजपच्या विरोधात गेला.

मालेगाव शहराबद्दल बोलायचं झालं तर इथल्या मुस्लीमबहुल भागातलं एकगठ्ठा मतदान काँग्रेसला गेलं.

मालेगाव बाह्य हिंदुबहुल मतदार संघ आहे. दादा भुसे (शिंदे गट) इथले आमदार आहे. मालेगाव शहरापेक्षा इथे मतदानाची टक्केवारी फारच कमी होती.

“शोभा बच्छाव यांचं सासर मालेगाव तालुक्यात आहे आणि सासर देवळा तालुक्यात. काँग्रेसने असाच विचार केला की जाणारच आहे आपलं सीट तर मग द्या शोभा बच्छावांना. पण त्या चक्क निवडून आल्या. त्यांना तिकीट दिल्यानंतर धुळे काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, जे खासदारकीसाठी इच्छुक होते, ते भाजपत निघून गेले. काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांनी राजीनामे दिले, की शोभा बच्छावांना प्रचार करणंही अवघड झालं. पण एकूण वातावरण भाजपच्या विरोधात असल्याने प्रचार उठत गेला. आणि त्यांचं नशीब असं की तिथे एमआयएम आणि वंचितचा उमेदवार नव्हता, त्यामुळे दलित-मुस्लीम मतं काँग्रेसला मिळाली.”

नंदुरबार – विजयी – गोवाल पाडवी, पराभूत –हीना गावित

नंदुरबार मतदारसंघ प्रकाशझोतात आला ते प्रियंका गांधींच्या सभेनंतर. तिथल्या अभुतपूर्व गर्दीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि तेव्हापासूनच चर्चा सुरू झाल्या की इथला निकाल फिरला आहे आणि ही जागा काँग्रेस परत खेचून आणणार.

आणि झालंही तसंच!

गोवाल पाडवी

फोटो स्रोत, FB

फोटो कॅप्शन, गोवाल पाडवी

नंदुरबार मतदारसंघ पारंपारिकरित्या काँग्रेसचा बालेकिल्ला होत्या. काँग्रेस काळात अनेक योजनांची सुरुवातही नंदुरबारपासून व्हायची. पण 2014 च्या मोदी लाटेत ही जागा भाजपकडे गेली आणि गेली दहा वर्षं ही जागा भाजपकडेच होती.

राज्यातले मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या हीना गावित इथून खासदार होत्या.

इथलं विश्लेषण करताना महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे म्हणतात, “गावित घराण्याकडे अनेक वर्षं सत्ता होती. त्यांनी स्वपक्षीय आणि इतर पक्षातल्या नेत्यांना जुमानणं सोडून दिलं होतं. वडील मंत्री, आई जिल्हा परिषद अध्यक्ष, एक बहीण जिल्हा परिषद सदस्य, स्वतः हीना गावित खासदार. एकाच कुटुंबात सत्ता केंद्रित झाली होती. त्यामुळे यांना धडा शिकवायचा असा निर्णय तिथल्या स्थानिक नेत्यांनी केला होता. काहींनी उघड, आणि काहींनी छुपेपणाने पाडवींना मदत केली.”

हीना गावित

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, हीना गावित

केसी पाडवी यांचीही प्रतिमा नंदुरबारमध्ये फार चांगली नव्हती. पण त्यांनी आपल्या मुलाला उमेदवारी दिली. गोवाल पाडवी मुंबईत हायकोर्टात प्रॅक्टिस करतात. त्यांचा नंदुरबारशी एवढा संपर्क नव्हता. पण ही गोष्ट त्यांच्या फायद्याची ठरली. लोकांना एक नवा चेहरा मिळाला.

“भाजपने आपले प्रश्न दहा वर्षांत सोडवले नाहीत अशी भावना आदिवासी मतदारांच्या मनात बळावली आणि ते काँग्रेसकडे परतले,” तनपुरे पुढे सांगतात.

रावेर – विजयी – रक्षा खडसे, पराभूत – श्रीराम पाटील

उत्तर महाराष्ट्रात ज्या दोन जागा राखण्यात भाजपला यश आले आहे, त्यापैकी एक जागा रावेरची आहे,

एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे या जागेवरून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. लेवा-पाटील आणि गुर्जर जातीची समीकरणं इथे कामी आल्याचं म्हटलं जातंय.

रावेर मतदार संघात लेवा-पाटील आणि गुर्जर या जातींचं प्राबल्य आहे.

रक्षा खडसे (मध्यभागी)

फोटो स्रोत, FB

फोटो कॅप्शन, रक्षा खडसे (मध्यभागी)

रक्षा खडसे स्वतः गुर्जर समुदायातून येतात तर त्यांचं सासर म्हणजे खडसे कुटुंब लेवा-पाटील समुदायातलं आहे.

रक्षा खडसेंच्या विरोधात त्यांचीच नणंद रोहिणी खडसेंना शरद पवार गटाकडून तिकीट दिलं जाईल अशी चर्चा होती.

पण शेवटी राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून मराठा समाजाच्या श्रीराम पाटील यांची उमेदवारी घोषित झाली.

त्यातच एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) मधून राजीनामा देत सुनेच्या प्रचाराची जबाबदारी हाती घेतली त्यामुळे या दोन्ही जातींची एकगठ्ठ मतं त्यांना मिळाल्याचं म्हटलं जातंय.

त्याच बरोबर गिरीश महाजनांनी केललं काम आणि भाजपचं संघटन याचाही फायदा रक्षा खडसेंना झाला.

जळगाव विजयी – स्मिता वाघ, पराभूत - करण पवार

भाजपच्या स्मिता वाघ यांनी ठाकरे गटाच्या करण पवार यांचा जवळपास अडीच लाख मतांनी पराभव केला.

विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघांना संधी देण्यात आली होती आणि त्याचं त्यांनी सोनं केलं.

स्मिता वाघ (डावीकडे)

फोटो स्रोत, FB

फोटो कॅप्शन, स्मिता वाघ (डावीकडे)

तनपुरे म्हणतात, “2019 साली भाजपने स्मिता वाघांना ऐनवेळी संधी नाकारली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल मतदारांच्या मनात सहानुभुती होती. त्यातही त्या भाजपशी एकनिष्ठ राहिल्या आणि त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांची प्रतिमा उजळली. त्यात जळगावमध्ये असलेला भाजपचा कोअर व्होटर भाजपपासून दुरावला नसल्याचाही फायदा स्मिता वाघांना झाला.”