दसरा मेळावा : उद्धव ठाकरेंची टीका, 'उद्या आमचं सरकार येईल तेव्हा तुम्हाला उलटं टांगल्याशिवाय राहणार नाही'

फोटो स्रोत, FACEBOOK
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करुन भाषणाला सुरुवात केली.
ते म्हणाले, "57 वर्ष झाली पण आपण परंपरा थांबू दिली नाही. मोडता घालण्याचा प्रयत्न झाला पण तो मोडीत काढून आपण परंपरा सुरू ठेवली आणि अनेक वर्ष ती सुरुच राहणार आहे."

फोटो स्रोत, Getty Images
मेळावा झाल्यानंतर खोकासुराचं दहन करणार आहोत. रामाने रावणाचा वध केला कारण, रावण माजला होता. त्याने सीताहरण केलं होतं. त्याचप्रमाणे, आज आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय.
त्यांनी खबरदारी घेतली आहे, रामाने रावणाचा वध धनुष्यबाणाने केला होता म्हणून त्यांनी धनुष्यबाणही चोरला. पण ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची लंका जाळली, तशी हजारो धगधगत्या मशालींनी तुमची खोक्यांची लंका जाळून टाकू."
जरांगे पाटलांना धन्यवाद- उद्धव ठाकरे
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र आणि देशात सध्या खूप प्रश्न आहेत. भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून जरांगे पाटलांना धन्यवाद देत आहे. अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी आंदोलन सुरू ठेवलं आहे. आज त्यांनी धनगरांना साद घातली."
"ज्याप्रमाणे डायरने जालियनवाला बागमध्ये गोळीबार केला होता, त्याचप्रमाणे अंतरवाली सराटीमध्ये लाठीहल्ला केला. एवढ्या निर्घृणपणे कसे वागता. मी मुख्यमंत्री असतानाही आंदोलन सुरू होतं. तेव्हा मी लाठीचार्जचा आदेश दिला नव्हता. तेच पोलीस आहेत, पोलीस आदेशाशिवाय असं वागू शकत नाहीत.
काश्मीरमध्ये दंगलखोरांवर ज्या छर्ऱ्याच्या बंदुका वापरतात त्याने आंदोलकांवर गोळ्या चालवल्या. हा विषय सोडवायचा असेल तर तो लोकसभेमध्ये सोडवावा लागेल. गणपतीच्या दिवसांत जे अधिवेशन झालं, त्यात हा निर्णय होईल, असं आम्हाला वाटलं होतं. मराठा समाज, धनगर, ओबीसींना न्याय मिळेल असं वाटलं होतं."

फोटो स्रोत, FACEBOOK
भाजप किंवा जनसंघाचा कोणत्याही लढ्यात कधी सहभाग नव्हता- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, " जातीपातीच्या भिंती उभ्या करून आपसांत झुंजवण्याचं जे कारस्थान भाजप करत आहे, ते आपल्याला मोडून टाकायचं आहे.
ज्यांच्याशी आपण लढत आहोत तो कपटी आणि विघ्नसंतोषी आहे. भाजप एवढा विघ्नसंतोषी आहे, जे कोणाचंही लग्न असो तिथं जाणार, पोटभरून खाणार, ढेकर देणार पण निघताना नवरा बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात भांडण लावायला जाणार.
भाजप किंवा जनसंघाचा कोणत्याही लढ्यात कधी सहभाग नव्हता. भाजप ज्या ज्या पक्षांबरोबर जातात त्यांच्यात भांडण लावतात. त्यामुळं जरांगे पाटलांना सांगतो की, त्याच्यापासून सावध राहा.
पानिपतमध्ये जो अब्दाली आला होता, त्याने हेच केलं होतं. भांडणं लावायची आणि बेकारी, महागाई अशा प्रश्नांवरून लक्ष हटवायचं. पेटत्या घरांच्या होळीवर पोळी भाजायचं काम त्यांनी केलं."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Facebook पोस्ट समाप्त, 1
'घराणेशाहीवर बोलताना तुम्ही डोक्यावर घेतलेली घराणेशाही आधी खाली उतरवा'
"अपात्रतेच्या निर्णयासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो. सर्वोच्च न्यायालय प्रत्येकवेळी यांचे कानफाड फोडते, पण यांचं स्वतःचंच सुरू आहे. तारीख पे तारीख सुरू आहे. तुम्हाला अपात्रतेचा निर्णय लावायचा तेव्हा लावा. पण आज संपूर्ण देश या निर्णयाकडे पाहत आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाला लवाद जुमानत नसेल तर न्यायालयाचे आणि संविधानाचे अस्तित्व राहणार की नाही, आणि लोकशाही टिकणार की नाही याकडे आमचं लक्ष आहे."
"माझं तर म्हणणं आहे निकालाआधी निवडणुका घ्या, जनताच ठरवेल ते पात्र आहेत की अपात्र आहेत. मोदी घराणेशाहीवर बोलले. होय, मी घराणेशाहीचा पाईक आहे, कारण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. जो कुटुंब व्यवस्था मानत नाहीत, ते घराणेशाहीवर बोलणारे कोण?"
"घराणेशाहीवर बोलताना तुम्ही डोक्यावर घेतलेली घराणेशाही आधी खाली उतरवा.
सध्याचे सरन्यायाधीश कर्तृत्वाने सरन्यायाधीश बनले, पण त्यांचे वडीलही सरन्यायाधीश होते आणि अत्यंत कठोर होते. कोणासमोर न झुकणारा अशी नोंद व्हावी की सत्ताधाऱ्यांचे बूट चाटणारा हे ज्याचे त्याने ठरवायचे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
"याच व्यासपीठावरून बाळासाहेब म्हणाले होते, देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. नऊ वर्षांपासून आपण ते मजबूत सरकार पाहिलं. 25 वर्षांनंतर एका पक्षाचं सरकार आलं त्यामुळं स्थैर्य येईल असं वाटलं पण तसं झालं नाही.आता जे सरकार आणायचं ते एका पक्षाचं पाशवी बहुमत असलेलं सरकार नको."
"नरसिंहराव, मनमोहन सिंह, अटलजी यांनीही चांगल काम केलंच आहे. उद्या आपलं सरकार येणार आहे, आणणार म्हणजे आणणारच. आज जे दमदाट्या देत आहेत, त्यांना सांगू इच्छितो की, त्रास देणं बंद केलं नाही तर तुम्हाला उलटं टांगल्याशिवाय सोडणार नाही. मर्द कधी विकला जात नाही, मर्दपणा रक्तात असावा लागतो. लाचारी करणारे मर्द असू शकत नाही."
'इथल्या गद्दारांना पटकन गुजरातला पळता यावं म्हणून बुलेट ट्रेन बनवत आहेत'
"शिवछत्रपतींनी महाराष्ट्रासाठी सूरत लुटली होती. पण इथून सूरतेला पळणारे लाचार महाराष्ट्राचे हित कसे सांभाळणार. इथल्या गद्दारांना पटकन गुजरातला पळता यावं म्हणून बुलेट ट्रेन बनवत आहेत.
सूरत लुटल्याचा सूड म्हणून महाराष्ट्र लुटून बकाल करण्याचा प्रयत्न. मुंबईला भिकेला लावून दिल्लीच्या दारात उभी करायची हा त्यांचा डाव आहे. मुंबई तोडता येत नाही म्हणून दुसऱ्या मार्गाने मुंबईला दाबायचं."

फोटो स्रोत, facebook
"पालकमंत्री केला तोही बिल्डर आणि त्या बिल्डरचं कार्यालय महापालिकेत थाटून मुंबई गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोना काळाच्या घोटाळ्याची चौकशी करायची असेल तर मुंबईची जरूर करा. सगळ्या महापालिकांची करा. जे नागपूर उपमुख्यमंत्र्यांनी बुडवून दाखवलं त्याचीही चौकशी करा. पीएम केअर फंडापासून सगळ्याची चौकशी करा."
धारावीत गिरणी कामगारांना घरं द्या- उद्धव ठाकरे
"एकही मायेचा पूत पीएम केअर फंडाचा हिशेब मागत नाही. एकट्या टाटांनी दीड हजार कोटींचा चेक दिला. भाजपच्या नेत्यांनीही पंतप्रधान निधीला पैसे दिले. या जनतेच्या पैशाचा हिशेब जनतेला द्यायला नको का. आजही आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत."
"तुमचे नेते लोकांना थाळ्या बडवायला सांगत होते, तेव्हा आमच्या सरकारने लोकांना पाच रुपयांत भरलेली थाळी दिली. हा आमच्या आणि तुमच्या हिंदुत्वातील फरक आहे. रिकाम्या थाळ्या बडवणारे तुमचे हिंदुत्व आहे, आणि शिवभोजनाची थाळी देणारं आमचं हिंदुत्व आहे. तुम्ही मंदिरं उघडायला सांगत होता, तेव्हा आम्ही आरोग्य मंदिरं उघडत होतो. हे आमचं हिंदुत्व आहे. कोणी आपल्यासमोर तळमळत असेल, तर त्याला जाती धर्माचा विचार न करता आम्ही त्यांना वाचवलं, हे आमचं हिंदुत्व आहे."
"हे लोक आता धारावीही गिळायला निघाले आहेत. आता ज्याच्या घशात धारावी यांनी घातली आहे, तो यांचा मित्र आहे. 150 कोटी स्क्वेअर फूटचा एफएसआय मिळणार आहे. हा विकास फक्त तुमच्या मित्राचे खिशे भरायला होऊ देणार नाही."
"धारावीत जो झोपडीत राहतो, त्याला हक्काचे घर मिळालेच पाहिजे. पण प्रत्येक घरात जे उद्योगधंदे आहेत, त्यांनाही तिथं जागा मिळावी.धारावीच्या एका जागेत घरं बांधा, पण गिरणी कामगारांच्या मुलांनाही तिथं घरे द्या. पोलिसांना घरे कमी पडत असतील तर त्यांनाही तिथं घरे द्या. फक्त धनदांडग्यांची मुंबई करू नका."

फोटो स्रोत, FACEBOOK
'भावनांशी खेळ केला तर तुमचा कोथळा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही'
"विरोधी पक्षांची आघाडी केली त्यावर मोदी म्हणाले हे इंडियन मुजादीहीन आहेत. देशाला असा विचार करणारा पंतप्रधान मिळू शकतो, हेच दुर्दैव आहे. तुम्ही आमची तुलना देशद्रोह्यांशी करणार असाल, आणि शत्रू देशाशी क्रिकेट खेळणार असाल, तर आमच्यापेक्षा मोठे देशद्रोही तुम्ही आहात.
गद्दार त्यांच्या कर्माने जाणार आहेत. त्यांच्या पिढ्यांच्या कपाळावर गद्दार हा शिक्का लागला आहे. छत्रपतींच्या भगव्याशी गद्दारी करणारा महाराष्ट्रात शिल्लक ठेवायचा नाही. आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. जो देशासाठी मरायला तयार आहे, तो आमचा हिंदु आहे. देशाच्या मुळावर असला तो देशद्रोही आहे. कुरुलकर बद्दल संघाची आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका काय. त्याने देशाची गुपितं शत्रूला दिली असेल तर तो मराठी असला तरी त्याला फासावर लटकवा. संपूर्ण देश आपल्याकडे पाहत आहे.
वाघनखं नक्की आणा, पण नखांच्या मागे वाघ नसेल आणि मुनगंटीवार असेल, तर त्याला काही अर्थ नाही. नसता भावनांशी खेळ केला तर तुमचा कोथळा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही."

फोटो स्रोत, FACEBOOK
दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू होण्याआधी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर यांचीही भाषणं झाली.
सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना ड्रग्जचा मुद्दा समोर आणला.
यावेळेस बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "गेला महिना दीड महिना मी महाराष्ट्र नशामुक्त व्हावा अशी भूमिका मांडत आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ नये म्हणून भूमिका मांडत आहोत. पण सध्याची परिस्थिती बिकट आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा साठा जप्त केला जात आहे."
"आम्ही यावर प्रश्न विचारले तर मंत्री धमकावतात, अब्रुनुकसानीचा दावा करू असं, म्हणतात. नोटीस पाठवण्याची धमकी देणारे लोक अंधारात माझ्याशी मानडौली करण्याचा प्रयत्न करतात. माध्यमांसमोर एक बोलतात आणि मागे दुसरे बोलतात. गृहमंत्री म्हणून मला सांगा, ललित पाटीलला कोणता आजार होता की ज्यासाठी त्याला नऊ महिने रुग्णालयात ठेवलं. माझ्याकडेही बरीच माहिती आहे, 'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी...' देवेंद्रजींना लोक चाणक्य म्हणतात, मला ते चाणक्य वाटत नाहीत. "
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Facebook पोस्ट समाप्त, 2
"चाणक्यांनी माणसं घडवायची असतात. देवेंद्रजींनी कुणाला घडवलं नाही. त्यांनी फक्त जमवलं. त्यांनी विनोद तावडे, पंकडा मुंडे असे अनेक नेते संपवले. तुमच्याकडे एवढा मोठा पक्ष आहे, तर इतर पक्षांतून उचलेगिरी का करता? देवेंद्रजींनी मला थांबवण्यासाठी त्यांची बार्किंग ब्रिगेड पुढे केली. पण मी थांबणार नाही, नशामुक्तीसाठी मी लढा लढत राहील. किमान या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस उत्तर देतील अशी अपेक्षा आहे."
अब की बार ठाकरे सरकार- संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.
"आजचा अतिविराट मेळावा असं सांगतोय की, अब की बार ठाकरे सरकार. महाराष्ट्रात आणि दिल्लीत सुद्धा. हिम्मत असेल तर या टक्कर घ्या. शिवसेना फक्त शिवतिर्थावरचा. चायनीज माल येतो आणि जातो, चायनीज फटाका फुटत नाही. आपला मेळावा म्हणजे, मराठा तितुका मेळवावा... आणि तिकडे सुरुय ते मराठा तितुका लोळवावा... इथे सुरुय तो शिवसेनेचा दसरा मेळावा, तिकडे सुरुय तो भारतीय जनता पार्टीचा दोन वेळच्या सत्तेचा माज आहे, तो उतरवला जाईल....शंभर दिवस तुरुंगात राहिलो पण हा बाळासाहेबांचा शिवसैनिक मोडला नाही. भ्रष्टाचार हा भारतीय जनता पक्षाचा शिष्टाचार बनला आहे.अमित शाह दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडला गेले, तिथं ते म्हणाले छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आली तर भ्रष्टाचार करणाऱ्यांना उलटे लटकवू, मग महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर का घेताय? एकनाथ शिंदे हाच एक मोठा घोटाळा आहे."
मोदींनी खोटी आश्वासनं देऊन लोकसभा निवडणूक जिंकली- भास्कर जाधव
"2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधीचा हा आपला दसरा मेळावा आहे. त्यात आपल्याला विचार घेऊन जायचा आहे. ज्यांनी शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला आहे, त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, असा संकल्प आपल्याला करायचा आहे." असं भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितलं.
ते म्हणाले, "मोदींनी खोटी आश्वासनं देऊन लोकसभा निवडणूक जिंकली. 2019 मध्ये पुलवामामध्ये 40 जवान मारले गेले. त्यावेळी पंतप्रधान सिनेमाच्या कामात व्यग्र होते. त्या जवानांच्या बलिदानानंतर मतं मिळवण्यासाठी भाजपने त्याचा फायदा करून घेतला. यावेळी लालकिल्ल्यावरून मोदींनी पुन्हा मीच पंतप्रधान होणार असं सांगितलं. पण गेल्या दोन वेळी शिवसेनेची आणि महाराष्ट्राची साथ तुम्हाला होती, हे ते विसरले. यावेळी त्यांना ही साथ नसेल. कॅगने भाजपचे भ्रष्टाचार बाहेर काढले त्यामुळं कॅगचं कामकाजही चालू नये म्हणून सरकारने आदेश काढला."
शिवसेना एकच, शिवसेना फक्त ठाकरेंचीच-नितीन बानगुडे पाटील
"शिवसेना 57 वर्षांची झाली. समोरची अथांग गर्दीच सांगते की, शिवसेना एकच, शिवसेना फक्त ठाकरेंचीच. आम्ही कुणााच्याच वाटेला जात नाही, पण कुणी आमच्या वाटेला गेला तर त्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही. गेली ती झाडाची फळं आणि उरली ती शिवसेनेला घट्ट करणारी मुळं. ज्या राज्याने देशाला दिशा दिली त्या राज्याला आपण कुठल्या दिशेने घेऊन चाललो आहोत.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून घालवलं. पण कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी केलेलं काम जनतेच्या मनातून कसं घालवणार. तुम्ही एका रात्रीत पक्ष फोडता, सत्ता टिकवता. सत्ता टिकवता तर मराठ्यांना टिकणारं आरक्षण का देत नाही." असं नितीन बानगुडे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विरोधकांना दाखवून देऊ-किशोरी पेडणेकर
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गट आणि सत्ताधारी पक्षांवर टीका केली. त्या म्हणाल्या, "मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विरोधकांना दाखवून देऊ. याठिकाणी जे विचार मिळतील ते बूथनुसार मतदारांपर्यंत पोहोचवायचे. राजकीय वातावरण तापवले जात आहे. मुंबई महापालिकेत मी अनेक बजेट पाहिली."
"मुंबईच्या विकासासाठी आपण ठेवी ठेवल्या. त्यातील पैसा उधळपट्टी केली आहे. मुंबईच्या ठेवी हलवून प्रकाश करण्याचा प्रयत्न असला तरी बुडाखाली अंधार आहे. आपण केलेल्या कामामुळे मुंबईत पाणी साचलं नाही. कोविड काळात उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला.
मुंबईकर, महाराष्ट्राची जनता हुशार आहे. तिथं बाळासाहेबांची खुर्ची असेल, पण शिवाजी पार्कवर जो आत्मा आहे, तो कुठे मिळणार," असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.
गद्दारांनी फक्त दिल्लीतील पातशाह्यांच्या चाकऱ्या कराव्या- अंबादास दानवे
गद्दारांनी फक्त दिल्लीतील पातशाह्यांच्या चाकऱ्या कराव्या, अशा शब्दांत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीका केली.
ते म्हणाले, "महाराष्ट्रात दसरा मेळावा एकच असतो, तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा. गद्दारांचे दसरा मेळावे नसतात, गद्दारांनी फक्त दिल्लीतील पातशाह्यांच्या चाकऱ्या कराव्या. आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाराष्ट्रावर भगवा फडकणार. निवडणुकीच्या आधीच तुम्हाला घरी बसावं लागू शकतं. तुमच्याकडून महाराष्ट्राच्या हिताचे काही, झाले नाही. पण तुम्ही महाराष्ट्राच्या विचारांचे गद्दार आहात."
त्यांनी पुढे बोलताना म्हटलं, "यंदाही निसर्ग कोपला आहे. भूमीवर पाप असलं की निसर्ग कोपत असतो, त्यामुळं यावेळीही निसर्ग कोपला आहे. राज्यात दुष्कारी स्थिती आहे. स्थितीत एक रुपयात पीक विम्याचे गाजर दाखवले. पण विमा कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आखलेला हा डाव आहे. जे हे सरकार देत नाही, ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारकडून मिळणार. ते म्हणतात सरकार आपल्या दारी, पण सध्याची परिस्थिती मृत्यू दारोदारी.अनेक ठिकाणी रुग्णालयांमध्ये औषधांअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. औषध खरेदीकडे दुर्लक्ष केलं जात आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Facebook पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








