You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
धर्मांतराची आशा की धार्मिक वर्चस्ववाद? जेडी वॅन्स यांच्या वक्तव्यावरून नवा वाद
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स हे ख्रिश्चन धर्म आणि त्यांच्या पत्नी उषा वेन्स यांच्याबाबत एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानंतर ते चर्चेत आले आहेत.
खरं तर, जेडी वेन्स हे युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसीपीमध्ये चार्ली किर्क यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.
या दरम्यान एका महिलेने वेन्स यांना ट्रम्प प्रशासनाकडून राबवण्यात येणारी कठोर मायग्रेशन पॉलिसी आणि त्यांचं स्वत:चं कुटुंब आंतरधार्मिक असण्यावरून काही बोचणारे प्रश्न विचारले.
या प्रश्नांना उत्तर देताना जेडी वेन्स यांनी म्हटलं की, त्यांच्या तिन्ही मुलांची जडणघडण ख्रिश्चन धर्मानुसार केली जाते आहे. तसेच, त्यांना अशी आशा आहे की, त्यांची पत्नीही ख्रिश्चन धर्माला समजून घेतील.
उषा वेन्स या भारतीय वंशाच्या हिंदू आहेत.
त्यांनी असं वक्तव्य केल्यानंतर उलटसुलट चर्चेला तोंड फुटलं. त्यानंतर जेडी वेन्स यांनी अधिक खुलासा करत म्हटलं की, त्यांची पत्नी 'ख्रिश्चन नाही आणि धर्म बदलण्याचा तिचा कोणताही हेतू नाही.'
याआधी एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी चर्चा करताना जेडी वेन्स यांनी म्हटलं होतं की, "ख्रिश्चन मूल्ये या देशाचा एक महत्त्वाचा पाया आहेत, असं मानण्यात मला कोणतीही चूक दिसत नाही."
पुढे त्यांनी म्हटलं की, "जो कुणी असं म्हणतो की, त्यांचा दृष्टिकोन निःपक्षपाती आहे, त्याचा उद्देश कदाचित तुम्हाला एखादा अजेंडा विकण्याचा असेल. किमान मी प्रामाणिकपणे कबूल करतो की, या देशाला ख्रिश्चन पाया असणं, ही एक चांगली गोष्ट आहे, असं मला वाटतं."
जेडी वेन्स यांच्या या उत्तरावर आता भारतातूनही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत.
सोशल मीडिया युझर्स वेन्स यांची जुनी वक्तव्यंही शेअर करत आहेत, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की, त्यांच्या पत्नीला दर रविवारी चर्चमध्ये घेऊन जाताना त्यांना वाईट वाटतं.
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी काय काय म्हटलं?
एका महिलेने जेडी वेन्स यांना एका पाठोपाठ अनेक प्रश्न विचारले आणि त्यादरम्यानच त्यांना असाही सवाल केला की, ते एका आंतरधार्मिक कुटुंबात कसं काय राहतात? सोबतच, या महिलेनं असंही म्हटलं की, मी ख्रिश्चन नाहीये, पण मी अमेरिकेवर तेवढंच प्रेम करते, जेवढं जेडी वेन्स करतात. मात्र, ख्रिश्चन असणं ही एवढी मोठी गोष्ट का झालेली आहे?
पुढे महिलेनं विचारलं की, "तुमची पत्नी आजही स्वत:ला हिंदू म्हणवून घेते. तुम्ही स्वत: आंतरधार्मिक आणि आंतरवांशिक अशा कुटुंबामध्ये तीन मुलांना वाढवत आहात. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या आईच्या धर्मापेक्षा तुमचा धर्म महत्त्वाचा आहे, हे कसं शिकवू शकता?"
या प्रश्नांवर वेन्स यांनी सांगितलं की, त्यांची दोन मोठी मुलं ख्रिश्चन शाळेत जातात आणि त्यांच्या आठ वर्षांच्या मुलाने गेल्या वर्षी पहिल्यांदाच कम्यूनियनला (चर्चमध्ये होणारा एक समारंभ) हजेरी लावली होती.
पुढे त्यांनी म्हटलं की, "आता बहुतेक रविवारी उषा माझ्यासोबत चर्चला येते. मी तिला जाहीरपणे सांगितलं आहे आणि आता मी माझ्या 10 हजार जवळच्या मित्रांसमोर सांगेन की, मला आशा आहे की अखेरीस, तीदेखील (उषा) चर्चमधील त्या गोष्टीने प्रभावित होईल, जसा की मी झालो."
"होय. मी हे प्रामाणिकपणे सांगेन की, माझी अशी इच्छा आहे. कारण, मी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवतो आणि मलाही अशी आशा आहे की, माझ्या पत्नीनंही या नजरेनंच पहावं.
मात्र, जर ती असं करू इच्छित नसेल, तरीही काही हरकत नाही. कारण, ईश्वर असं सांगतो की, प्रत्येकाची स्वत:ची अशी मर्जी असते."
या कार्यक्रमादरम्यान जेडी वेन्स यांनी असंही म्हटलं की, उषा वेन्स या हिंदू कुटुंबामध्ये वाढलेल्या असल्या तरीही त्यांचं कुटुंब धार्मिक नव्हतं.
पुढे त्यांनी म्हटलं की, "मी जेव्हा माझ्या पत्नीला भेटलो, तेव्हा मी स्वत:ला नास्तिक मानायचो आणि तीदेखील स्वत:बाबत तसाच विचार करायची."
जेडी वेन्स यांच्या याच वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. या संदर्भात, माजी राजनयिक आणि परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी देखील 'एक्स'वर पोस्ट केलेली आहे.
त्यांनी वेन्स यांचा व्हीडिओ शेअर करत लिहिलंय की, "ते (वेन्स) तिला (उषा) एग्नॉस्टीक (अज्ञेयवादी) मानतात. जसं की, ते त्यांच्या पत्नीची हिंदू ओळख स्वीकारण्याला घाबरत असावेत. सरतेशेवटी, धार्मिक स्वातंत्र्याच्या सर्व चर्चा कुठे गेल्या?"
पुढे त्यांनी लिहिलं की, "ते ज्या देशात आहेत, तिथे यूएस कमीशन ऑफ इंटरनॅशनल रिलीजीयस फ्रीडमसारखी (यूएससीआयआरएफ) संस्था आहे. भलं करण्याची सुरुवात स्वत:च्या घरातूनच झाली पाहिजे."
चर्चा सुरू झाल्यानंतर काय म्हणाले जेडी वेन्स?
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी आपली पत्नी उषा वेन्सबाबत केलेल्या वक्तव्यावर जे प्रश्न उपस्थित झाले त्यावरदेखील खुलासा केला आहे.
वेन्स यांनी 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये लिहिलंय की, "ही किती वाईट टिप्पणी आहे, आणि ही अशी एकमेव टिप्पणी नाही."
वेन्स यांनी म्हटलं की, "सर्वप्रथम, प्रश्न माझ्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल होता. मी एक सार्वजनिक जीवनात वावरणारा व्यक्ती आहे. लोक स्वाभाविकपणे उत्सुक असतात आणि मी हा प्रश्न टाळणार नव्हतो."
पुढे त्यांनी म्हटलं की, त्यांची ख्रिश्चन धर्मावरील श्रद्धा त्यांना असं शिकवते की 'गॉस्पेल (सुवार्ता) सत्य आहे आणि मानवतेसाठी चांगली आहे'.
वेन्स यांचं असं म्हणणं आहे की, "माझी पत्नी ही माझ्या आयुष्यातील माझी सर्वांत मोठी ताकद आहे. अनेक वर्षांपूर्वी तिनेच मला आपल्या धर्माशी जुळवून घेण्यासाठी प्रेरित केलेलं होतं. ती ख्रिश्चन नाही आणि धर्म बदलण्याचाही तिचा कोणताही हेतू नाही.
मात्र, जसं अनेक लोक आंतरधर्मीय नात्यांमध्ये राहतात, तसंच माझीदेखील अशी इच्छा आहे की, कदाचित एखाद्या दिवशी ती जगाकडे त्याच दृष्टीकोनातून पाहिल, जसं मी पाहतो."
वेन्स यांनी असंही म्हटलं की, कदाचित असं होवो अथवा न होवो, ते आपल्या पत्नीवर नेहमीच प्रेम करत राहतील आणि तिला पाठिंबा देत राहतील.
"मी तिच्याशी आयुष्य, श्रद्धा आणि इतर प्रत्येक गोष्टीवर बोलत राहिन कारण ती माझी पत्नी आहे."
आपल्या स्पष्टीकरणात वेन्स यांनी टीकाकारांचं वर्णन "ख्रिश्चन धर्माविरोधात पक्षपाती" असं केलं आहे.
जेडी वेन्स यांच्याबाबत उपस्थित होणारे प्रश्न
उषा वेन्स यांनी काही महिन्यांपूर्वीन मेगन मकेन यांच्या पॉडकास्टमध्ये त्यांची मुलं एका आंतरधर्मीय कुटुंबाच्या वातावरणात कशी मोठी होत आहेत, हे सांगितलं होतं.
त्यांची मुलं कॅथलिक शाळेत जातात, असं उषा यांनी सांगितलं होतं. पण त्याचवेळी हिंदू धर्म आणि परंपरांबाबतही त्यांना माहिती असल्याचं त्या म्हणाल्या होत्या.
येल विद्यापीठात शिकत असताना उषा जेडी वेन्स यांना भेटल्या तेव्हा जेडी वेन्स ख्रिश्नच नव्हते, असं उषा यांनी याच पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं.
"मी जेडीला भेटले तेव्हा चे कॅथलिक नव्हते. त्यांनी नंतर धर्मांतर केलं. त्यांनी धर्मांतर केलं तेव्हा आम्ही याबाबत खूप चर्चा केली. ख्रिश्चन धर्म स्वीकारताना त्याच्यासोबत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येतात.
उदाहरणार्थ तुमच्या मुलांनाही त्याच आस्थेनं किंवा परंपरेनं वाढवणं. हे सगळं कसं करायचं याबाबत आम्हाला चर्चा करावी लागली. कारण मी कॅथलिक नाही आणि धर्मांतर किंवा असं काही करण्याचा माझा विचार नाही."
गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी जेडी वेन्स यांनीही त्यांच्या आणि पत्नी उषा यांच्या धर्माबाबत अनेकदा मत व्यक्त केलं आहे.
जेडी वेन्स यांनी 2018 मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचं फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. यासाठी पत्नीनं दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांनी उषा यांचे आभारही मानले होते.
"मी दीक्षा घेतली नव्हती. ख्रिश्चन म्हणून वाढलो पण बाप्तिस्मा झालेला नव्हता. 2018 मध्ये माझा बाप्तिस्मा झाला.
उषा ख्रिश्चन म्हणून वाढलेली नाही. पण मी जेव्हा पुन्हा माझ्या धर्माशी एकरुप झालो, तेव्हा उषाने खूप पाठिंबा दिल्याचं मला आठवतं," असं ते मुलाखतीत म्हणाले होते.
तर याच मुलाखतीत उषा म्हणाल्या होत्या की, त्याही एका धार्मिक वातावरण असलेल्या कुटुंबातील आहेत. त्यामुळं पालकांच्या प्रभावामुळं पतीच्या या प्रवासात त्यांनी साथ दिली होती.
"माझे आई वडील हिंदू आहेत. त्यामुळंच ते चांगले व्यक्ती आणि चांगले पालकही आहेत. मी स्वतः आयुष्यात ही शक्ती अनुभवली आहे," असं उषा म्हणाल्या होत्या.
तर दुसऱ्या एका मुलाखतीत वेन्स यांनी, "दर रविवारी हिंदू पत्नीला चर्चमध्ये घेऊन जाण्याचं त्यांना वाईट वाटतं", असंही म्हटलं होतं.
या वक्तव्याचा एक जुना व्हीडिओ चंद्रा आर. श्रीकांत नावाच्या एका सोशल मीडिया यूझरनं शेअर केला होता. त्यात उषा त्यांनी हिंदू कुटुंबाबात केलेलं वक्तव्य होतं. तर दुसरं वक्तव्य जेडी वेन्स यांचं होतं.
"उषा एका हिंदू कुटुंबात वाढली, पण ते धार्मिक नव्हते आणि उषाही नास्तिक होत्या", असं जेडी वेन्स म्हणत असल्याचं या पोस्टमध्ये लिहिलं होतं.
इमिग्रेशनबद्दल काय म्हणाले जेडी वेन्स?
ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील विदेशी नागरिकांबाबत अनेक पावले उचलली आहेत. त्यात ज्यात H-1B व्हिसा शुल्क वाढवणे, एम्प्लॉयमेंट ऑथरायझेशन डॉक्टुमेंट्सचं ऑटोमॅटिक अपडेट थांबवणे आणि विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशांवर निर्बंध लादणे यांचा समावेश आहे.
जेडी वेन्सला यांना धर्माबद्दल प्रश्न विचारणाऱ्या एका महिलेने असंही विचारलं होतं की, "अमेरिकेत खूप स्थलांतरित आहेत असं तुम्ही म्हणता, तेव्हा तुम्हाला काय म्हणायचे आहे? तुम्ही ही संख्या कधी ठरवली? आणि तुम्ही हे स्वप्न आम्हाला का विकले?
तुम्ही आमच्यावर उपकार केले नाही, आम्ही इथं राहण्यासाठी खूप कष्ट केले. आम्ही पैसे दिले. मग उपाध्यक्ष म्हणून तुम्ही असे कसे म्हणू शकता की, इथं खूप जास्त स्थलांतरित आहेत आणि आम्ही त्यांना हाकलून लावू?"
यावर जेडी वेन्स म्हणाले होते की, "अमेरिकेतील स्थलांतरितांची संख्या कमी व्हावी असं माझं मत आहे. पण अमेरिकेनं एखादा कायदा केला असेल आणि वचन दिले असेल तर अर्थातच आपण त्या वचनाचं पालन केले पाहिजे.
मी बेकायदेशीररित्या अमेरिकेत आलेल्यांबद्दल, तसंच भविष्यात स्थलांतरितांची संख्या कमी करण्याबद्दल बोलत होतो."
पण, त्या महिलेनं वेन्स यांना थांबवत म्हटलं की, "तुम्ही म्हणत आहात की, कायदेशीररित्या आलेल्या लोकांना बाहेर काढणार नाही.
पण तुम्ही अशी धोरणं लादत आहात ज्यानं आमचं नुकसान होत आहे. ही धोरणं समस्यांवरील तोडगा नाही, तर अशांतता वाढवणारी आहेत."
त्यावर, "अमेरिकेनं भविष्यात स्थलांतरितांची संख्या कमी करावी आणि कायदेशीररित्या इथं येणाऱ्यांचा आदर करावा असं माझं मत आहे.
पण एक, 10 किंवा 100 लोक कायदेशीररित्या इथं आले आणि अमेरिकेसाठी योगदान दिलं तर त्याचा अर्थ आपण भविष्यात इथं एक कोटी किंवा 10 कोटी लोकांना येऊ द्यावं असा होत नाही, ते योग्य नाही," असं उत्तर वेन्स यांनी दिलं होतं.
जगभरातून अनेक लोक अमेरिकेत येऊ इच्छितात आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून माझं काम जगाबद्दल नव्हे तर अमेरिकेतील लोकांबद्दल विचार करण्याचं आहे, असंही ते म्हणाले होते.
वेन्स आणि उषा यांचं नातं
जेडी वेन्सने यांनी 2014 मध्ये भारतीय वंशाच्या उषा चिलुकुरी यांच्याशी लग्न केलं.
दोघांची भेट 2013 मध्ये येल विद्यापीठात झाली होती. उषा आणि जेडी यांना तीन मुलं आहेत. इवान, विवेक आणि मिराबेले अशी त्यांची नावं आहेत.
उषा यांचे पालक आंध्र प्रदेशातून अमेरिकेत स्थलांतरित झालेले आहेत. उषा सॅन दिएगोमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या.
उषा यांची कौटुंबीक पार्श्वभूमी पतीपेक्षा खूपच वेगळी होती. त्यांनी येलमधून पदवी प्राप्त मिळवली आणि नंतर केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्याकडे त्यांनी लिपिक म्हणूनही काम केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)