मेनोपॉजमुळे या स्त्रियांवर नोकरी सोडण्याची वेळ का येत आहे?

संकल्पनात्मक छायाचित्र ( संग्रहित)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संकल्पनात्मक छायाचित्र ( संग्रहित)
    • Author, मेगन टॉटम
    • Role, बीबीसी वर्कलाईफ

मेनोपॉजची लक्षणं स्त्रियांना कमकुवत करू शकतात. अनेक जणी सांगतात की त्यांच्या कंपनीत याबद्दल काही योजना नाहीत. त्यामुळे नोकरी सोडण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो.

मधू कपूर ब्रिटिश सरकारमध्ये एका विभागात काम करायच्या.

सुमारे 23 वर्षं काम केल्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देण्याचं ठरवलं.

“मला माझं काम अतिशय आवडत होतं. मी अगदी मन लावून आणि निष्ठेने ते करत होते. पण मी त्या सगळ्या परिस्थितीचा सामना करू शकत नव्हते. त्यामुळे मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला,” आता त्या 58 वर्षांच्या आहेत.

मधू यांना दोन मुलं आहेत. साधारण पंचेचाळिशीत असताना त्यांना पेरिमेनोपॉजची ( मेनोपॉजच्या आसपासचा काळ ) लक्षणं जाणवू लागली होती.

त्यांना रात्री दरदरून घाम यायचा, अस्वस्थ वाटायचं, मायग्रेनचा त्रास व्हायचा. त्यामुळे त्यांना अशक्त आणि आळसावल्यासारखं वाटायचं. कामावर लक्ष केंद्रित करताना त्यांना त्रास व्हायचा.

रोजच्या मीटिंगला उपस्थित राहणं कठीण व्हायचं. त्या Human Resources (HR) मध्ये होत्या.

त्यामुळे त्यांच्या लोकांशी नियमित भेटी व्हायच्या. “मी आत्मविश्वास गमावला होता. मी कशातच चांगले नाही असं मला वाटायचं,” त्या सांगतात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

त्यांनी आपल्या भावना बॉस बरोबर शेअर केल्यावर त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा किंवा भावनिक आधार मिळाला नाही.

बॉसेसशी बोलल्यानंतर सहा महिन्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला. पण त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. “मी कोणाशी बोलावं, काय करावं काहीही कळत नव्हतं,” त्या सांगतात.

मेनोपॉज हा अनेक देशांमध्ये फारसा टॅबूचा विषय राहिलेला नाही. ‘मेनोपॉज मँडेट’ आणि ‘लेट्स टॉक मेनोपॉज’ या उपक्रमामुळे टॅबू जाऊन जागृती निर्माण होण्यास मदत झाली आहे.

तरीही या गोष्टीचा महिलांच्या व्यावसायिक आयुष्यावर काय परिणाम होतो याबद्दल अजूनही फारशी चर्चा झाली नाही असं तज्ज्ञांचं मत आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

2023 च्या शेवटी युकेमध्ये कामाच्या ठिकाणी आरोग्य सुविधा देणाऱ्या सिंपली हेल्थने 40 ते 60 वर्षं वयातल्या 2000 महिलांना घेऊन एक सर्वेक्षण केलं.

त्यातील 23 टक्के महिलांनी मेनोपॉजच्या परिणामामुळे राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती, तर 14 टक्के महिला राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी सांगितलं.

या वयोगटात काम करणाऱ्या महिलांची संख्या 70 लाख आहे. त्यामानाने सर्वेक्षण करण्यात आलेल्या महिलांची संख्या कमी आहे. मात्र मेनोपॉजच्या आसपास असणाऱ्या महिलांच्या मनात काय आहे हे त्यावरून लक्षात येतं.

जर या मुद्द्यावर लक्ष दिलं नाही तर लाखो महिलांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होईल आणि त्या राजीनामा देण्याचा निर्णय घेतील.

डावीकडून: लॉरेन चिरेन, मधु कपूर आणि तामसेन फडल

फोटो स्रोत, Courtesy of Chiren, Kapoor and Fadal

फोटो कॅप्शन, डावीकडून: लॉरेन चिरेन, मधु कपूर आणि तामसेन फडल

ज्या महिला राजीनामा देणार नाही त्यांनी अनेक गोष्टींची किंमत कितीतरी अधिक पटींनी मोजावी लागते. जसं की त्यांना आजारपणाच्या काळात बिनपगारी रजा घ्यावी लागते, त्यांचे वय जास्त असल्यामुळे त्यांना संधी नाकारली जाते, याचा हिशेब केला तर हे नुकसान खूपच अधिक वाटतं.

मेयो क्लिनिकच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत या समस्येमुळे महिलांचं 1.8 बिलियन डॉलर्सचं ( अंदाजे 15 हजार कोटी रुपये) नुकसान होत आहे.

करिअरच्या मध्यावर असताना महिलांना आधाराची गरज आहे असं काही कंपन्यांना वाटतं. या कंपन्यांतील काही लोक उच्च पदावर आहेत.

त्यांनी मेनोपॉज निगडित उपक्रम आखले आहेत. तरी तज्ज्ञांच्या मते हे बदल तातडीने करणं आवश्यक आहे. नाहीतर कपूर यांच्यासारख्या लाखो कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

‘मी त्या गतीने कामच करू शकत नव्हते.’

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नोकरी करत असताना मेनोपॉज आला तर 10 पैकी जवळजवळ आठ बायका नोकरी सोडतात असं लंडनच्या फॅकल्टी ऑफ ऑक्युपेशनल मेडिसिन विभागाचं म्हणणं आहे.

40 ते 58 या वयात असताना हा अनुभव येतो. या काळात हार्मोन्समध्ये बदल व्हायला सुरुवात होते. त्याला पेरिमेनोपॉज असं म्हणतात. ही अवस्था साधारण आठ वर्षं टिकते.

या वयोगटातील 75 टक्के महिलांना रात्री घाम येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, चिंता अशा 34 लक्षणांपैकी काही लक्षणं अगदी थोड्याफार प्रमाणात का होईना पण दिसतातच.

त्यातील 25 टक्के स्त्रिया या लक्षणांमुळे अगदी कमकुवत होतात. त्याचा त्यांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम होतो.

ही समस्या इतकी मोठी असूनसुद्धा मेनोपॉज सुरू असताना महिला कामगारांना फारसा आधार मिळत नाही.

कॉर्न फेरी कन्सलटन्सी या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 8000 महिलांपैकी फक्त 26 टक्के महिलांना कामाच्या ठिकाणी जी काही धोरणं असतात आणि त्यातून मदत मिळते.

2023 मध्ये यूके मधील ‘युनाइट’ या ट्रेड यूनियन ने 11,000 महिलांना घेऊन एक सर्वेक्षण केलं होतं.

त्यात पाच पैकी चार महिलांनी सांगितलं की मेनोपॉजची लक्षणं असताना कंपनीच्या मालकांनी त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही.

अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, या विषयावर कोणतंही धोरण किंवा उपक्रम तर सोडाच पण हा विषय काढण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही.

'मला मेनोपॉजची लक्षणं कळली नाहीत'

समांथा 40 वर्षांच्या होत्या आणि त्या एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करत होत्या, तेव्हा पहिल्यांदा तेव्हा थकवा, चेहरा आणि छातीजवळ गरम होऊ लागणं (Hot Flushes), तसंच गोष्टी लक्षात ठेवणं,स्पष्टपणे विचार करणं या गोष्टी करायला त्रास होऊ लागला होता.

ही सगळी मेनोपॉजची लक्षणं आहेत हे त्यांना कळलं नाही. जेव्हा ही लक्षणं वारंवार दिसू लागली, मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव प्रचंड प्रमाणात होऊ लागला आणि त्यामुळे त्यांना प्रचंड गळल्यासारखं वाटू लागलं तेव्हा त्या डॉक्टरकडे गेल्या आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.

मध्यमवयीन भारतीय महिलेचे प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मध्यमवयीन भारतीय महिलेचे प्रातिनिधिक छायाचित्र

दोन मुलांची आई असलेल्या समांथा यांना त्यानंतर पुढची दोन वर्ष या लक्षणांना तोंड देत नोकरी करणं त्यांच्यासाठी फारच कठीण होऊन बसलं.

त्यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू व्हायचा. त्यांना दर आठवड्याला कामाच्या निमित्ताने लंडन, न्यूयॉर्कला जावं लागायचं.

सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. “मी त्या गतीने कामच करू शकत नव्हते.” त्या म्हणतात.

त्यांनी कंपनीच्या एचआरकडे या अडचणी मांडण्याचा विचारही केला. पण ती व्यक्ती पुरुष होती आणि त्याचबरोबर त्याचं वय या सर्व गोष्टींमुळे हे सगळं थोडं अडचणीचं झालं असं त्या सांगतात.

शेवटी त्यांनी कामाची विभागणी करावी आणि कामाचा भार हलका करण्यासाठी आणखी एखादी व्यक्ती नेमावी अशी शिफारस केली.

मात्र कंपनीच्या सीईओंनी ही विनंती धुडकावून लावली. त्यामुळे नोकरी सोडण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच पर्याय उरला नाही.

सहा महिन्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्या फ्रीलान्स पीआर आणि मार्केटिंग सल्लागार म्हणून काम करू लागल्या.

‘कुणालाच याबद्दल बोलायचं नव्हतं.’

तामसेन फदाल या अमेरिकेतल्या पत्रकार, लेखक आहेत. मेनोपॉज काळात आधार मिळावा याविषयी त्या सतत बोलत असतात.

त्यांच्या मते मेनोपॉज या विषयावर फारसं बोललं जात नाही, लिहिलं जात नाही.

हा विषयच दुर्लक्षित आहे. “जेव्हा या वयातील स्त्रिया किंवा हे बदल होत असतानाच्या काळात स्त्रिया का नोकरी सोडतात तेव्हा आपल्यापैकी कोणीही का बोलत नाही असा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. हे खरं समस्येचं मूळ आहे,” त्या म्हणतात.

अनेक लोकांसाठी मेनोपॉज हा विषय टॅबू आहे. फदाल म्हणतात की लोक त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यात कमी पडतात.

“आपली आई असो की डॉक्टर असो, कुणालाच याविषयी बोलायचं नाहीये, मग कामाच्या ठिकाणी लोक का बोलतील?” आपलं आता वय होतंय या भीतीमुळे ही अडचण आणखीच वाढते असंही त्या पुढे म्हणतात.

“जाऊन आपल्या गरजा नीट सांगणं हे भीतीदायक वाटतं. त्यातच कामाच्या ठिकाणी आता आपण म्हातारे होत आहोत ही भीती आपल्या डोक्यातून गेलेली नाही,” त्या म्हणतात.

मिटिंग

फोटो स्रोत, Getty Images

त्याचप्रमाणे अजूनही बहुतांश ठिकाणी पुरुषमंडळी उच्च पदावर आहेत.

त्यामुळे महिला मौन बाळगणं पसंत करतात असं लॉरेन चेरिअन म्हणतात.

त्या युकेमधील कॉर्पोरेट मेनोपॉज ट्रेनर तसंच व्यावसायिक प्रशिक्षक आहेत.

“बहुतांश क्षेत्रात उच्च पदावर बहुतांश पुरुष आहेत. त्यामुळे मेनोपॉज ही एक आरोग्याची गंभीर समस्या असू शकते हे कदाचित त्यांना समजत नाही किंवा त्यांना त्याचं काही वाटत नाही,” लॉरेन चेरिअन म्हणतात.

ही दरी मिटवायची कशी?

मेनोपॉजमधून जात असलेल्या महिलांसाठी काही कंपन्यांनी त्यांची धोरणं बदलत आहेत, त्यांच्यासाठी काही योजना आणत आहेत.

अडोब, बँक ऑफ अमेरिका, आणि ब्रिस्टल माय स्किव्ब या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कंपन्यांनी मेनोपॉज विषयक काही योजना सोयीसुविधा आणल्या आहेत.

वैद्यकीय सल्ला, पगारी रजा, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा विम्यात समावेश, अशा सुविधांचा त्यात समावेश आहे.

काही छोट्या कंपन्यांनासुद्धा या उपक्रमाचे फायदे कळले असून तेसुद्धा अशी पावलं उचलत आहेत.

तरीही या क्षेत्रात बरंच काही होणं गरजेचं आहे.

मात्र फदाल यांच्या मते, “अशा प्रकारची मदत करण्यात काही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. काहींना याची गरज वाटत नाही. तर काहींना सुरुवात कुठून करावी यांची कल्पना नाही.”

म्हणूनच अनेक कंपन्या, सेवाभावी संस्था आणि कंपन्या ही दरी मिटवण्यासाठी काम करत आहेत.

‘मेनोपॉज वर्कप्लेस प्लेज’ या उपक्रमात यूकेतील कंपन्यांचे मालक त्यांच्या कर्मचाऱ्यांना मेनोपॉज विषयी मदत करण्याची प्रतिज्ञा करतात.

2011 पासून 2600 कंपन्यांनी हा पुढाकार घेतला आहे. त्यात टेस्को, रॉयल मेल, आणि एनएचएस इंग्लंड या कंपन्यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेतील TBWA\Chiat\Day या जाहिरात कंपनीने मेनोपॉज इन्फॉर्मेशन पॅक फॉर ऑर्गनायझर्स(Mipo) बरोबर भागीदारी केली आणि #HotResignation ही चळवळ उभी केली.

त्यात एचआर विभागातील उच्चाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं. राजीनामा आणि मेनोपॉज यांचा काही संबंध आहे का याची पडताळणी करायला सांगितलं.

तसंच लोकांना कंपनीत जास्तीत जास्त प्रमाणात टिकवून ठेवण्यासाठी एक टूलकिट आणि इतर संसाधनं देण्यात आली.

मेनोपॉज

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फदाल यांच्या मते कंपन्यांकडून इतक्या लवकर बदल होऊ शकत नाही.

“मेनोपॉजबाबत समाजात असणाऱ्या भूमिकेचे दडपण आणि येणारे वृद्धत्व या दोन्हींचा ताण महिलांनी एकाच वेळी हाताळावी ही अपेक्षा ठेवून त्यांच्या समस्या वाढवू नयेत. त्यांना काय हवे, नाही हे पाहण्यासाठी कामाच्या ठिकाणी समुपदेशन, डॉक्टरांच्या सुविधा उपलब्ध करुन द्यायला हव्यात."

फदाल यांच्यासारखेच अनेक लोक या बदलासाठी आग्रही आहेत कारण, कामाच्या ठिकाणी त्यांना अजिबात मदत मिळत नसल्याचा त्यांचा अनुभव आहे.

'या विषयी जनजागृती होणे महत्त्वाचे आहे'

आर्थिक क्षेत्रातील एका माजी उच्चाधिकारी असलेल्या शिरेन यांना मेनोपॉजचा खूप त्रास झाला. म्हणून प्रचंड तणावपूर्ण असलेली नोकरी त्यांनी सोडली.

मेनोपॉजमुळे त्यांना विस्मरण होतंय की काय असं वाटू लागलं. त्या मीटिंगमध्ये जायच्या आणि त्यांना बोलायला सुचायचं नाही.

काळजीमुळे त्यांना घशात काहीतरी अडकल्यासारखं व्हायचं, जडपणा यायचा.

“एकदा तर मी खुर्चीला धरून फक्त घड्याळाचे काटे फिरताना पाहत होते. ती मीटिंग का बोलावली आहे हेही मला कळत नव्हतं. असा अनुभव मला कधीही आला नव्हता,” त्या सांगतात.

शिरेन म्हणतात की या अवस्थेतल्या लक्षणाबद्दल जागृती निर्माण केली असती तर बराच फरक पडला असता, “जर मेनोपॉज हा विषय मी ज्या कंपनीत काम करत होते त्या कंपनीच्या अजेंड्यावर असता, मेनोपॉज म्हणजे काय हे माहिती असणारे मॅनेजर्स असते, याविषयी त्यांनी संवाद साधला असता आणि मला मदत केली असती, आधार दिला असता तर आज मी तुमच्याशी बोलत नसते,” त्या सांगतात.

नंतर शिरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर काही आठवड्यातच काही विशिष्ट वयोगटातल्या स्त्रिया शोधल्या.

त्यांना प्रशिक्षण दिलं, तसंच कंपन्यांना याविषयी माहिती देण्यासाठी तसंच महिलांना मदत करण्यासाठी काही कोर्सेस आणि उपक्रम तयार केले.

कपूर सुद्धा त्यांचा एचआर क्षेत्रातला 20 वर्षांच्या अनुभवाचा वापर करून एम फॉर मेनोपॉज या व्यासपीठाच्या माध्यमातून कार्यशाळा घेतात आणि प्रशिक्षण देतात.

त्यांनी जी आव्हानं पेलली त्याबद्दल इतर स्त्रियांनाही सल्ला देतात.

“मी अगदी पारंपरिक आशियाई कुटुंबातली आहे. आमच्याकडे सेक्स, पाळी मेनोपॉज याबद्दल बोललं जात नाही. अधिकाधिक स्त्रियांना मेनोपॉजची लक्षणं कळावीत, त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी मी हे सगळं करतेय,” त्या सांगतात.

हे जर सगळं आठ वर्षांपूर्वी झालं असतं तर, आज कदाचित त्या त्यांच्या आवडीचं काम करत असत्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.