बारामुल्लापासून, भुजपर्यंत आढळून आले ड्रोन, फिरोझपूरमध्ये नागरी भागावर हल्ला

ड्रोन (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ड्रोन (फाईल फोटो)

शुक्रवारी (9 मे) रात्री बारामुल्लापासून भुजपर्यंत 26 ठिकाणी सशस्त्र ड्रोन्स आढळून आले. पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळची ही ठिकाणं आहेत.

यामध्ये काही सशस्त्र ड्रोन असल्याचा संशय असून ते नागरी तसेच लष्करी ठिकाणांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.

या ठिकाणांमध्ये बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोझपूर, पठाणकोट, फाजिल्का, लालगढ जट्टा, जैसलमेर, बाडमेर, भुज, कुवारबेट आणि लखी नाला यांचा समावेश आहे.

एका सशस्त्र ड्रोनने फिरोझपूरमध्ये नागरी भागावर हल्ला केला. त्यात एका स्थानिक कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी पाठवण्यात आलं असून सुरक्षादलांनी परिसराची पूर्णपणे तपासणी केली.

भारतीय संरक्षण दलं सतर्क असून हवेतून येणाऱ्या संभाव्य धोक्यांवर नजर ठेवून आहेत. तसंच गरज भासल्यास त्वरित कारवाईसाठी सज्ज असल्याचंही सांगण्यात आलं.

सीमा भागांतील नागरिकांना घरामध्येच राहण्याचा, अनावश्यक हालचाल टाळण्याचा आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सुरक्षिततेसंबंधी सूचना काटेकोरपणे पाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. घाबरण्याचे काही कारण नाही, मात्र सतर्कता आणि काळजी आवश्यक आहे, असं लष्करानं स्पष्ट केलं आहे.

सैन्यदल

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीचे सहयोगी पत्रकार रविंदर सिंग रॉबिन यांनी अमृतसरमध्येही मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याची माहिती दिली.

तसंच फिरोजपूरमधील स्थानिकांनी किमान तीन स्फोटांचे आवाज ऐकल्याचं पंजाबमधील बीबीसीच्या स्थानिक पत्रकारांनी म्हटलं आहे.

फिरोजपूर प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानंही तीन स्फोटांचे आवाज ऐकल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

बीबीसीच्या पत्रकार नवजोत कौर यांच्या मते, उपायुक्त निशांत यादव यांच्या आदेशानुसार, चंदीगडमधील बाजारपेठा संध्याकाळी 7 वाजता पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत

याशिवाय आज शुक्रवारी रात्री (9 मे) जम्मू आणि काश्मीरमधून पुन्हा एकदा गोळीबाराच्या बातम्या समोर आल्या आहेत.

सध्या श्रीनगरमध्ये असलेले बीबीसी प्रतिनिधी माजिद जहांगीर यांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाडा, उरी आणि पूंछमध्ये संध्याकाळी 7.20 वाजता गोळीबार सुरू झाला.

ANI वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरमध्ये गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू आले.

याशिवाय, पठाणकोटमधील बीबीसी टीमला स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत.

संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संग्रहित छायाचित्र

त्याआधी शुक्रवारी दुपारी (9 मे) भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी यांनी गुरुवारी रात्री भारताच्या विविध भागात झालेल्या हल्ल्यांची माहिती दिली.

सोफिया कुरेशी म्हणाल्या, "गुरुवारी (8 मे) रात्री पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केले."

पाकिस्तानकडून 300 ते 400 ड्रोन सोडण्यात आल्याचं त्या म्हणाल्या. पण पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी असे हल्ले केल्याचं नाकारलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि सैन्य प्रमुखांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान कार्यालयाने X वर केलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिली.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या काय स्थिती? बीबीसीच्या प्रतिनिधींनी काय पाहिले, ऐकले?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पठाणकोटमधून जुगल पुरोहित:

पठाणकोटमधून बीबीसीसाठी वार्तांकन करणारे जुगल पुरोहित म्हणाले, थोड्यावेळापूर्वीच आमच्यासमोर आकाशाच्या दिशेने अनेक स्फोट पाहिले.

लष्कराने दिलेल्या नाहितीनुसार पठाणकोट परिसरात पाकिस्तानची ड्रोन्स आली होती ती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज सकाळपासून आम्ही इथून वार्तांकन करत आहोत.

काल संध्याकाळपासून लोकांनी या परिस्थितीला तोंड दिलंय. लोकांच्या मनामध्ये भीती होती. पुढे काय होईल याची काळजी त्यांच्या मनात होती. इथं ब्लॅकआऊट असून पोलीस तसेच सिव्हिल डिफेन्सचे लोक रस्त्यावर आहेत.

जम्मूहून दिव्या आर्य:

आम्ही जम्मूच्या ज्या भागात आहोत तिथं आम्ही स्वतः स्फोटाचे आवाज नाही ऐकले. पण लोकांशी बोललो तर त्यांनी स्फोटांचे आवाज आणि आकाशात स्फोट झाल्याचं सांगितलं.

पण आम्ही आहोत, तिथं प्रचंड सामसूम आहे. कोणीही बाहेर नाही, अगदी स्मशान शांतता आहे. त्यामुळं लोकांना दिलेल्या सूचनांचे लोक गांभीर्याने पाळत असल्याचं दिसले.

दिवसा मात्र काहीशी सामान्य स्थिती जाणवली. काही पर्यटक आम्हाला भेटले, तेही परतत असल्याचं त्यांनी सांगितलं. एक तणाव असल्याचं स्पष्टपणे जाणवलं.

काश्मीरहून माजीद जहांगीर:

बीबीसी प्रतिनिधी माजीद जहांगीर यांनी सांगितलं की, अर्धा तासापासून काश्मीर खोऱ्यातील अनेक ठिकाणी आम्ही फोन करून माहिती घेतली तर वीज गेल्याचं समजलंत. अवंतीपोरामध्ये स्फोटाचे आवाज ऐकल्याची माहिती मिळाली. लोकांनीही त्याला दुजोरा दिला.

त्याची निश्चित माहिती मात्र मिळाली नाही. पण काश्मीरच्या जवळपास सर्व जिल्ह्यांत वीज नाही. दिवसभर काश्मीरमध्ये दुकानं उघडी होती, पण फार लोक रस्त्यावर नव्हते. लोकांमध्ये असलेली भीती स्पष्ट दिसत होती.

पूंँछहून राघवेंद्र राव:

राघवेंद्र राव बीबीसीसाठी पूंँछमधून वार्तांकन होते, ते आता सुरनकोट येथून वार्तांकन करत आहेत.

राघवेंद्र म्हणाले, "काल पूँछमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले, तिथं एका व्यक्तीचा मृत्यूही झाला.

त्यामुळे लोकांनी आज मोठ्याप्रमाणात शहरातून बाहेर जाण्यास सुरुवात केली. सुरनकोट थोड्याबाजूला असल्यामुळे इथपर्यंत स्फोट झालेले नाहीत. इथेही ब्लॅकआऊट करण्याचे आदेश दिले आहेत."

अमृतसरहून रविंदर सिंग रॉबिन:

रविंदर सिंग रॉबिन बीबीसीसाठी अमृतसरमधून वार्तांकन करतात.

ते म्हणाले, "संध्याकाळी 9 च्या सुमारास स्फोटांचे आवाज आले. गोळीबाराचाही आवाज आला. कदाचित हा गोळीबार ड्रोन पाडण्यासाठी केला असेल मात्र त्याची खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. फिरोजपूरमधूनही स्फोटांचे आवाज ऐकल्याच्या बातम्या आल्या आहेत. तेथेही ड्रोन पाडल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण

फिरोजपूरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. पंजाबच्या सीमाप्रदेशात सर्वत्र पूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आला आहे."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

या संघर्षावर बोलताना डायरेक्टर ऑफ जर्नालिझम मुकेश शर्मा म्हणाले, "पाकिस्तानात जी पत्रकार परिषद झाली, त्यात पाकिस्तान कोणताही हल्ला करत नसल्याचं म्हटलं. म्हणजेच पाकिस्तानने अधिकृतरित्या आपण हल्ले करत असल्याची भूमिका घेतलेली नाही.

"भारतात मात्र परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आणि स्थानिकांच्या माहितीनुसार ते असे हल्ले, स्फोट पाहात आहेत. हा संघर्ष शमवावा असं आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हटलं जात आहे मात्र दोन्ही देश अजून या मनस्थितीत नाहीत. आपण रहिवासी क्षेत्र नसलेल्या प्रदेशात हल्ले करत आहोत असं भारताचं म्हणणं आहे, तर पाकिस्तान मात्र रहिवासी भागात हल्ले करतोय असा भारताचा आरोप आहे.

'माझ्या घराजवळून स्फोटांचे आवाज येत आहेत'

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मूमध्ये ब्लॅकआउट झाल्याची माहिती दिली आहे. तसंच सायरनचे आवाज ऐकू येत असल्याचंही ते म्हणाले.

"जम्मूमध्ये ब्लॅकआउट आहे, संपूर्ण शहरात सायरन ऐकू येत आहेत," असं ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या X अकाऊंटवरील एका पोस्टमध्ये लिहिले.

ग्राफिक्स

"मी जिथे आहे तिथं थोड्या थोड्या वेळानं स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत," अशी माहितीही त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये दिली.

"जम्मू आणि आसपासच्या भागातील सर्व लोकांना माझी विनंती आहे की, त्यांनी रस्त्यांवर बाहेर पडू नये. घरीच किंवा एखाद्या अशा ठिकाणी राहा जिथं काही तास सहजपणे राहता येऊ शकेल," असंही त्यांनी म्हटलं आहे.

लोकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये आणि निराधार माहिती किंवा अफवा पसरवू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.

गुरुवारी रात्री पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या स्थितीनंतर आज संध्याकाळपासून अनेक जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.

'पाकिस्तानने 300-400 ड्रोन्सचा हल्ला केला'

भारतीय परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज संध्याकाळी साडेपाचवाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये कालपासून घडलेल्या घटनांची माहिती माध्यमांना देण्यात आली.

ऑपरेशन सिंदूरमधील घडामोडींबद्दल भारत सरकारच्या वतीनं भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासोबत कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली.

पाकिस्ताननं तीनशे ते चारशे ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं या परिषदेत सांगण्यात आलं. यात तुर्कीयेच्या ड्रोन्सचा समावेश असल्याचं लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तर कर्तारपूर कॉरिडॉरची सुविधा रद्द करण्यात आल्याचा निर्णयही विक्रम मिस्री यांनी जाहीर केला.

पाकिस्ताननं भारताविरोधात तुर्कीयेची ड्रोन्स वापरली- सोफिया कुरैशी

फोटो स्रोत, ANI

यावेळेस बोलताना सोफिया कुरेशी म्हणाल्या, 8 ते 9 मे च्या मध्यरात्री पाकिस्ताननं भारताच्या पश्चिमेकडील विविध लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

लेहपासून सर खाडीपर्यंत भारतीय वायूसीमेचं उल्लंघन करुन ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 36 जागांवर 300 ते 400 ड्रोनद्वारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे. भारतीय लष्करानं कायनेटिक आणि नॉन कायनेटिक

पद्धतीचा वापर करून यातील काही ड्रोन पाडली. या ड्रोनद्वारे पाकिस्तान गुप्तमाहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या ढिगाऱ्यांचं परीक्षण सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार हे ड्रोन्स तुर्कीयेची SONGAR असल्याची माहिती मिळाली आहे. भटिंडा लष्करी तळावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न भारताने हाणून पाडला.

विक्रम मिस्री म्हणाले की, पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना भारतानं पुरेशाप्रमाणात, योग्य जबाबदारीसह उत्तर दिले आहे. भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला.

"जम्मूच्या अनेक भागांमध्ये गुरुवारी रात्री वीज नव्हती."

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानने गुरुवारी (8 मे) रात्री उशिरा जम्मू-कश्मीरमधील उधमपूर, काश्मीरमधील अनेक भाग आणि पंजाबमधील पठाणकोट इथं डझनभर क्षेपणास्त्रं डागल्याचा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला आहे. ही क्षेपणास्त्र निष्प्रभ केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानने भारताने केलेल्या या आरोपांचे खंडन केले आहे. भारतीय लष्कराच्या प्रवक्त्याने एका निवेदनात दावा केला की, पाकिस्तानने 16 भारतीय संरक्षण तळांवर रॉकेट आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला, मात्र हे हल्ले आधुनिक उपकरणांच्या मदतीने निष्प्रभ करण्यात आले.

नियंत्रण रेषेजवळील पुंछ भागात काल रात्री जोरदार गोळीबार सुरू होता, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि एक महिला जखमी झाली.

पुंछचे पोलीस अधिकारी नवीद अहमद यांनी बीबीसीला सांगितले की, गोळीबारात लोहाल बेला येथील रहिवासी मुहम्मद अबरार यांचा मृत्यू झाला आणि बेलियां गावातील शाहिदा अख्तर नावाच्या महिलेला गोळीबारात दुखापत झाली असून त्यांच्यावर मंडी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घरांचं झालेलं नुकसान

फोटो स्रोत, Getty Images

नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या बाजूकडून झालेल्या गोळीबारात अनेक घरांचं नुकसान झालं आहे.

नियंत्रण रेषेजवळील बारामुला, कुपवाडा आणि बांदीपोरा भागात परिस्थिती तणावपूर्ण आहे. कुपवाड्यातील काही सेक्टरमध्ये गोळीबारामुळे इमारतींचे नुकसान झाले आहे.

उरी इथे आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने बीबीसी उर्दूला सांगितले की, गोळीबारात नर्गीस बेगम नावाच्या महिलेचा मृत्यू झाला.

या संपूर्ण परिस्थितीत भारतीय लष्कराने जम्मू-कश्मीरमध्ये रेड अलर्ट जाहीर केला असून नागरी प्रशासनाने ब्लॅकआउटची घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण प्रदेशात रात्री वीज नव्हती. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

पुंछमध्ये संपूर्ण रात्री झालेल्या गोळीबारानंतर आज (9 मे) सकाळीही जोरदार गोळीबार झाला, मात्र अद्याप जीवितहानीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. जम्मू-कश्मीरमधील सर्व शैक्षणिक संस्था दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या असून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानकडून 8 आणि 9 मेच्या मध्यरात्री संपूर्ण पश्चिम सीमेवर हल्ले; भारतीय लष्कराची माहिती

पाकिस्तानच्या लष्कराने 8 आणि 9 मेच्या मध्यरात्री संपूर्ण पश्चिम सीमेवर हल्ला केल्याची माहिती भारतीय लष्कराच्या अतिरिक्त जनसंपर्क महासंचालनालयाने (ADG PI) दिली आहे.

भारतीय लष्कराच्या ADG PI यांनी एक्सवर एक व्हीडिओ शेअर करत म्हटलं की, "पाकिस्तानी सशस्त्र दलांनी 8 आणि 9 मे रोजी मध्यरात्री संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रांचा वापर करून अनेक हल्ले केले. पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले."

भारतीय लष्कराने सांगितले की, पाकिस्तानी ड्रोन हल्ले प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आले असून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला ठोस प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

भारतीय लष्कराची माहिती

फोटो स्रोत, Getty Images

श्रीनगरमध्ये उपस्थित असलेले बीबीसीचे प्रतिनिधी माजिद जहांगीर यांनी माहिती दिली की, गुरुवारी (8 मे) रात्री सुमारे 11 वाजता उरी सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार सुरू होता आणि सीमेजवळील नागरी भागांना लक्ष्य करण्यात आले होते.

त्याचवेळी, जम्मू-कश्मीरच्या राजौरीमध्ये असलेल्या बीबीसीच्या पत्रकार दिव्या आर्या यांनी सांगितले की, तिथे पूर्णतः ब्लॅकआउट करण्यात आले होते.

8 मे रोजी जम्मू-कश्मीरमध्ये स्फोट आणि ब्लॅकआउटच्या बातम्या आल्यानंतर काही वेळातच बीबीसीने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्याशी संवाद साधला.

या संवादात ख्वाजा आसिफ यांनी जम्मू-कश्मीरमधील कोणत्याही हल्ल्याची जबाबदारी नाकारली.

'फ्लाईटसाठी तीन तास आधी पोहोचा' - विमान कंपन्यांनी काय निर्देश जारी केले?

व्हीडिओ कॅप्शन, 'फ्लाईटसाठी तीन तास आधी पोहोचा' - विमान कंपन्यांनी काय निर्देश जारी केले?

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी सूचना प्रसिद्ध केल्या आहे. या सूचना काय आहेत,विमान प्रवास करताना प्रवाशांनी कोणती खबरदारी घ्यायची आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.

तणाव वाढला, पाकिस्तान सुपर लीगचे सामने हलवले देशाबाहेर; आता 'या' देशात होणार मॅचेस

पीसीबी सामने

फोटो स्रोत, Getty Images

भारत आणि पाकिस्तानमधील सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) चे उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये (यूएई) खेळवले जाणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे.

पीएसएलचे रावळपिंडी, मुल्तान आणि लाहोरमध्ये होणारे अंतिम आठ सामने आता यूएईमध्ये खेळवले जातील.

पीसीबीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार सामन्यांचे वेळापत्रक, तारीख आणि स्थळ यांची माहिती योग्य वेळी देण्यात येईल.

दुसरीकडे भारतात आयपीएलबाबत काय होणार याचीही चर्चा सुरू आहे. त्याविषयी येथे जाणून घ्या.

गुरुवारी (8 मे) रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये होणारा पीएसएलचा सामना रद्द करण्यात आला होता. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळील एका फूड स्ट्रीटवर भारतीय ड्रोन कोसळल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने केला होता.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक़वी यांनीही यासंबंधी एक निवेदन दिले आहे.

त्यांनी म्हटलं की, "पीसीबीने आमच्या तसंच परदेशी क्रिकेटपटूंना भारताकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी उर्वरित सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे."

मोहसिन नक़वी यांनी सांगितले की, लीग सातत्याने पुढे जात राहावी यासाठी पीसीबी कटिबद्ध आहे.

रावळपिंडीत एक कथित ड्रोन कोसळल्यानंतर स्टेडियमजवळच्या एका शेडची अशी अवस्था झाली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रावळपिंडीत एक कथित ड्रोन कोसळल्यानंतर स्टेडियमजवळच्या एका शेडची अशी अवस्था झाली.

या पीएसएल सामन्यांचे वेळापत्रक नव्याने जाहीर केले जाईल:

• कराची किंग्ज विरुद्ध पेशावर झाल्मी

• पेशावर झाल्मी विरुद्ध लाहोर कलंदर्स

• इस्लामाबाद युनायटेड विरुद्ध कराची किंग्ज

• मुल्तान सुल्तान विरुद्ध क्वेटा ग्लॅडिएटर्स

• क्वालिफायर

• एलिमिनेटर 1

• एलिमिनेटर 2

• फायनल

याआधी भारतानेही गुरुवारी, आठ मे रोजी, हिमाचल प्रदेशमधील धरमशालामध्ये खेळला जात असलेला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा सामना मध्येच रद्द केला होता.

हा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स दरम्यान खेळला जात होता.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला जम्मूसाठी रवाना

ओमर अब्दुल्ला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

आज (9 मे) सकाळी आपण जम्मूला जात असल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, "जम्मू शहर आणि विभागातील इतर भागांवर काल (8 मे) रात्री झालेल्या अयशस्वी पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता जम्मूकडे जात आहे."

भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क विभागाने गुरुवारी (8 मे) रोजी एक्सवर पोस्ट करून सांगितले होते की, जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांवर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला होता. तो निष्फळ ठरवण्यात आला.

8 मे ला रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी जम्मू शहरातून एअर रेड्सबाबत माहिती मिळायला सुरुवात झाली होती.

व्हीडिओ कॅप्शन, स्फोट आणि ब्लॅकआऊटनंतर जम्मूत नेमकं काय घडतंय? पाहा ग्राउंड रिपोर्ट

जम्मू-कश्मीरमधील राजौरी येथे असलेल्या बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्या यांनी सांगितले होते की, ८ मेच्या सकाळी त्या जम्मूमध्येच होत्या आणि त्यांनी त्या गावांचा दौरा केला जिथे लोक सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाले होते.

दिव्या आर्या यांनी सांगितले की, "जम्मू शहरात अनेक स्फोटाचे आवाज ऐकायला आले, त्यानंतर संपूर्ण परिसराची वीज बंद करण्यात आली. आणि फक्त व्हॉट्सअ‍ॅप कॉल सेवा सुरु होती. स्थानिक रहिवाशांनी काही व्हिडिओही पाठवले ज्यामध्ये अंधारात आकाशात लहान लहान प्रकाश ठिपके दिसत होते, जे ड्रोन असल्याचा अंदाज रहिवाशांनी लावला होता.

'अमेरिका युद्धात सहभागी होणार नाही,' उप-राष्ट्राध्यक्ष व्हेन्स यांची स्पष्टोक्ती

अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी भारत-पाकिस्तान संघर्षावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत-पाकिस्तानच्या संघर्षात आपण सहभागी होणार नसल्याचे अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांनी स्पष्ट केले आहे.

फॉक्स न्यूजला दिलेल्या इंटरव्यूमध्ये व्हेन्स म्हणाले, "दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी या देशांना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करू शकतो. परंतु आम्ही अशा गोष्टींमध्ये पडणार नाहीत, ज्याच्याशी आम्हाला काहीही कर्तव्य नाही."

या स्थितीवर नियंत्रण मिळवण्याची अमेरिकेची क्षमता आहे किंवा नाही हा प्रश्न या ठिकाणी गैरलागू आहे. मुत्सद्देगिरीच्या पातळीवर आम्ही प्रयत्न करत राहू.

जे. डी. व्हेन्स

फोटो स्रोत, Getty Images

ज्या ही वेळी दोन अणुशक्ती एकमेकांविरोधात उभ्या ठाकतात त्यावेळी आम्ही नक्कीच त्याची दखल घेतो. भारत-पाकिस्तान संघर्षाचे पर्यावसन अणुयुद्धात होणार नाही अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे ही परिस्थिती लवकरच नियंत्रणात यावी अशी आम्ही आशा करतो, असं व्हेन्स म्हणाले.

22 एप्रिल रोजी जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळी जे. डी. व्हेन्स आपल्या कुटुंबासोबत भारत दौऱ्यावर होते.

भारतातील 24 विमानतळं नागरी सेवांसाठी बंद,

भारत आणि पाकिस्तानातील वाढत्या तणावानंतर पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, गुजरात, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातील 24 विमानतळांवरील नागरी सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (बीसीसएएस) ने सर्व एअरलाईन्स आणि विमानतळांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

विमानाचे प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

या सूचनांनुसार सर्व विमानतळांवर प्रवाशांची सेकंडरी लॅडर पॉइंट चेकिंग केली जाणार आहे. टर्मिनल बिल्डिंगमध्ये अनियोजित भेट देणाऱ्यांना प्रवेश करण्यास मनाई असेल.

त्याचबरोबर एअर मार्शल देखील तैनात करण्यात येणार आहेत. एअर इंडियाने बीसीएएसच्या हवाल्याने एक्सवर माहिती दिली आहे की देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासाआधी तीन तास विमानतळावर यावे लागेल. उड्डाणाआधी 75 मिनिटे चेक इन बंद करण्यात येईल.

भारतातील विविध विमानतळं 7 मे 2025 ते 9 मे 2025 पर्यंत वाहतुकीसाठी बंद असतील. त्यांची यादी खालीलप्रमाणे.

ग्राफिक्स

जम्मू, पठाणकोट, उधमपूरमधील लष्करी तळांवर पाकिस्तानचा क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ला : संरक्षण मंत्रालय

भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 'पाकिस्ताननं सतवारी, सांबा, आरएसपुरा आणि अर्निया इथं 8 क्षेपणास्त्रं डागली. ही सर्व क्षेपणास्त्रं भारतीय हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीनं पाडण्यात आली.' तर सध्या जम्मू आणि काश्मीरमधील राजौरीमध्ये असलेल्या बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी त्याठिकाणी पूर्णपणे ब्लॅकआऊट झाल्याची माहिती दिली.

गेल्या काही तासांत पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेले सर्व लोक याच भागातील आहेत. पुंछमध्येही पूर्ण ब्लॅकआऊट असून त्याठिकाणीही सायरनचे आवाज येत आहेत.

जम्मू विमानतळावर स्फोट झाल्याची सूत्रांची माहिती, संपूर्ण शहरात ब्लॅकआऊट

फोटो स्रोत, ANI

भारतीय लष्करानं दिलेल्या माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरमधील लष्करी तळांवर पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून हल्ला केला. यात कोणतंही नुकसान झाले नाही. भारतीय सशस्त्र दलांनी एसओपीनुसार हा धोका परतवून लावला, असं एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, जम्मू विमानतळावर स्फोट झाल्याची माहिती, संपूर्ण शहरात ब्लॅकआऊट, नेमकं काय घडलं?

याबरोबरच चंदीगड शहरातही सायरन वाजवण्यात आले असून तात्काळ ब्लॅकआऊटचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुजरातच्या कच्छ भागातील भुजमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

@HQ_IDS_India

फोटो स्रोत, @HQ_IDS_India

क्रिकइन्फोच्या माहितीनुसार धर्मशालामध्ये सुरू असलेला आयपीएलचा पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना थांबवण्यात आला आहे.

त्याआधी, गुरुवारी बीसीसीआयनं धरमशालामध्ये होणारा 11 मे रोजीचा IPL सामना रद्द केला. हिमाचल प्रदेशातील कांगडा इथला विमानतळ बंद असल्यानं खेळाडू धरमशालामध्ये पोहोचू शकणार नसल्यामुळे हा सामना रद्द झाल्याचं सांगितलं आहे.

पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांचा सामना 11 मे रोजी धरमशाला येथे होणार होता. तो आता अहमदाबाद येथे 11 मे रोजी 3.30 वा. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

दरम्यान, एका सूत्रानं एएफपी वृत्तसंस्थेला जम्मू विमानतळावर स्फोट झाल्याचं सांगितलं आहे. प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितले की, बाजारपेठा बंद होत्या आणि त्यांनी लोकांना पळताना पाहिले. सायरन वाजून शहरात वीज गेल्याचंही ते म्हणाले.

एशियन न्यूज इंटरनॅशनल या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान जम्मूला दारुगोळ्याचा मारा करून लक्ष्य करत आहे. शस्त्र वाहून नेणाऱ्या ड्रोनचा वापर ते करत आहेत.ही ड्रोन्स किंवा loitering munitions (लॅायटरिंग म्युनिशन्स) आहेत. कामिकाझे ड्रोन्स म्हणूनही ओळखली जातात. टार्गेट शोधून मग त्याला धडकतात. यासाठीच जम्मूत ब्लॅकआऊट केलं आहे.

भारतीय हवाई संरक्षण दलाची सुरक्षा यंत्रणा प्रत्युत्तर देत असल्याचंही वृत्त वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

रात्री 8.45 च्या सुमारास जम्मू शहरातून हवाई हल्ल्यांची माहिती येऊ लागली होती.

राजौरीमध्ये असलेल्या बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य म्हणाल्या की,"सकाळी आम्ही जम्मूमध्ये होतो. तिथं ज्या गावांना भेट दिली तिथून लोक सामानासह सुरक्षित ठिकाणी निघून गेले होते. त्या भागात आणि जम्मू शहरात अनेक स्फोट ऐकू आले. तिथल्या स्थानिक रहिवाशांनी सांगितलं पाऊने नऊच्या सुमारास अनेक स्फोट झाले."

त्यांनी पुढं म्हटलं की, "त्यानंतर संपूर्ण परिसरात वीजपुरवठा बंद करण्यात आला. फक्त व्हॉट्सअॅप कॉल सेवा उपलब्ध आहे. स्थानिक रहिवाशांनी पाठवलेल्या काही व्हीडिओमध्ये ब्लॅकआउट दरम्यान आकाशात लहान दिव्यांसारखा प्रकाश दिसला. त्यामुळं ते ड्रोन असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला."

दिव्या यांच्या माहितीनुसार, जम्मूपासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या कठुआ परिसरातही ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. इथंही किमान दोन स्फोट झाल्याची माहिती मिळाली. स्थानिक रहिवाशांनी ड्रोन उडत होते याची पुष्टी केली आहे. सध्या परिस्थिती प्रचंड तणावपूर्ण आहे. तसंच लोकांना घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जम्मू शहरातील ज्या रहिवाशांशी आम्ही बोललो त्यांच्यामध्ये खूप दहशत होती. कारण हा एक शहरी भाग असून आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे.

राजौरीमधील माहिती आणि जनसंपर्क विभागाने X या सोशल मीडिया अकाऊंटच्या पोस्टमध्ये लोकांना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला. "सामान्य जनतेला विनंती आहे की, त्यांनी परिसरात ब्लॅकआऊट करावे. घरातील सर्व दिवे आणि खिडक्या बंद करावा म्हणजे काहीही प्रकाश घराबाहेर पडणार नाही", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पाकिस्तानने काय म्हटले?

दरम्यान, हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे. ख्वाजा आसिफ यांनी बीबीसी बरोबर बोलताना म्हटलं की, "आम्ही हे आरोप नाकारतो. आम्ही अद्याप काहीही केलेले नाही.

"पाकिस्तान हल्ला करण्याचा निर्णय घेईल तेव्हा तो संपूर्ण जगाला समजेल.आम्ही हल्ला करून नंतर नकार देणार नाही," असंही ते म्हणाले.

पाकिस्तानच्या मित्र राष्ट्रांनी देशाला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे, असंही ते म्हणाले.

त्यांनी पुढं म्हटलं की, आम्ही स्वतःला रोखलं आहे, पण यावर काहीही तोडगा निघत नाहीये.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यांच्या चर्चेतून काही फायदा होईल, असं वाटलं होतं. पण भारताकडून माघार घेतली जात नसल्यानं पाकिस्तानला प्रतिक्रिया द्यावी लागेल, असंही आसिफ म्हणाले.

(ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)