पूरग्रस्तांच्या मदतीला गेला आणि 35 वर्षांपूर्वी हरवलेली आई सापडली; जिला तो मृत समजत होता

फोटो स्रोत, Gurpreet Chawla/BBC
- Author, गुरप्रीत चावला
- Role, बीबीसी असोसिएट्स
जगजीत सिंह 35 वर्षांनी आई हरजीत कौर यांना भेटला. हा क्षण या मायलेकांसाठी अत्यंत भावनिक होता.
या मायलेकांना एकमेकांच्या मिठीसाठी 35 वर्षे वाट पाहावी लागली. परिस्थितीनं त्यांची ताटातूट घडवली आणि नियतीनं त्यांना पुन्हा एकत्र आणलं.
मधल्या काळात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या होत्या. हा मधल्या काळाचा विरहाचा पट या मिठीमागच्या भावनांमध्ये दिसून आला.
या भेटीचा व्हीडिओ एव्हाना सर्वत्र व्हायरल झाला आहे.
या मायलेकांची भेट कशी झाली?
पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील कादियान तालुक्यातील जगजीत सिंह पूरग्रस्तांना एका संस्थेच्या माध्यमातून मदत करत होता. यादरम्यान जगजीत जेव्हा पटियालाच्या दिशेनं गेला, तेव्हा त्याची गाठ त्याच्या आईशी पडली.
35 वर्षांपासून आईचा ठावठिकाणा त्याला माहित नव्हता. तिचं निधन झाल्याचं त्यानं स्वीकारलं होतं. मात्र, अशी अचानक आई समोर आल्यानंतर त्याला आनंदाचा धक्का बसला.
वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जगजीत पटियालाकडील भागात पोहोचला होता.
‘मी माझ्या आजीला माझ्या आई सारखं मानत असे’
जगजित सिंह गतआयुष्याकडे वळून पाहताना सांगतो की, आजवर बरीच वळणं आयुष्यात पाहिली आहेत.
जगजित सांगतो, “आयुष्यातल्या प्रत्येक वळणाला आतल्या आत दडपून ठेवलं. हृदय अगदी दगडासारखं बनलं. मात्र, आता आईला भेटल्यानंतर गेल्या 35 वर्षात कधीही रडलो नाही, इतकं रडलो."
“लहानपणापासून मला सांगितलं गेलं होतं की, माझे आई-वडील एका रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले. माझ्या आजी-आजोबांनी मला मी सहा महिन्यांचा असल्यापासून सांभाळलं. आजोबा हरियाणा वेगळं राज्य बनण्याआधी पंजाब पोलिसांमध्ये काम करत होते. जेव्हा हरियाणा राज्य अस्तित्वात आलं, तेव्हा त्यांची बदली हरियाणात झाली."

फोटो स्रोत, Gurpreet Chawla/BBC
“मला नातेवाईकांनी सांगितलं की, माझे वडील ट्रान्सपोर्टर म्हणून काम करत असतं. मात्र, वडिलांचं निधन झालं आणि आजोबा सेवानिवृत्त झाले. मग ते कादियानमध्ये येऊन राहिले.”
जगजीत सिंह भावनिक होत सांगतो की, एखाद्या सिनेमाच्या कथानकापेक्षा माझं आयुष्य कमी नाहीय.
लहानपणी जगजीतला हेही सांगितलं गेलं होतं की, त्याच्या आईचं निधन झालंय.
जगजीत सांगतो की, माझ्या आजीलाच मी आई मानत आलोय.
जेव्हा आई-वडिलांबाबत आजोबांनी सांगितलं
जगजीत सिंहच्या माहितीनुसार, आजी-आजोबांनीच जगजीतचा सांभाळ केला आणि जगजीतही त्यांनाच आई-वडील मानत आला.
बीबीसीशी बोलताना जगजीत सांगतो की, “जेव्हा माझ्या आजीचं निधन झालं, तेव्हा अचानक माझ्या हाती काही जुने फोटो लागले. आजोबांना या फोटोंबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मौन सोडलं आणि मला माझ्या आई-वडिलांबाबत सांगितलं.”
जगजीत पुढे सांगतो की, “ज्या लोकांना सत्य माहित होतं, त्यांना विचारण्याचं मला धाडसही झालं नाही. पुढे काळाच्या ओघात आजी-आजोबांचंही निधन झालं. जवळपास पाच वर्षांपूर्वी जेव्हा आणखी एक सत्य समोर आलं की, माझ्या आईचं निधन झालं नाहीय आणि मी चार वर्षांचा असताना आई काही कारणास्तव घर सोडून गेली होती.
“माझा सांभाळ आजी-आजोबांनी केला. आजी-आजोबांचं निधन झालंय. त्यानंतर जेव्हा कधी माझ्या मित्रमंडळीचं त्यांच्या आईबाबतचं प्रेम पाहतो, तेव्हा माझे डोळे भरून यायचे. माझी आई असती, तर तिच्याशी माझे सुख-दु:ख व्यक्त केले असते, असं वाटत राहायचं.”

फोटो स्रोत, Jagjeet Singh
आईला भेटल्यानंतर...
पटियालामध्ये पूरग्रस्तांसाठी मदत करताना जगजीत सिंहला त्याच्या मावशीनं सांगितलं की, तुझं आजोळ सुद्धा बोहरपूर गावीच आहे.
जगजीत पुढे सांगतो की, “मी माझ्या आजोळच्या आजी-आजोबांचा शोध सुरू केला आणि बोहरपूर गाव पोहोचलो. माझे दूरचे नातेवाईक असलेल्या सुरजित सिंहला फोन केला. त्याने माझ्या आजी-आजोबांची ओळख सांगत म्हटलं की, त्यांच्या चेहरा लकवाग्रस्त आहे.”
या माहितीच्या आधारे जगती त्याच्या आजोळच्या घरी पोहोचला. तिथं एका वृद्ध स्त्रीने घराचं दार उघडलं. ती स्त्री म्हणजे जगजीतची आजी होती.

फोटो स्रोत, Gurpreet Chawla/BBC
त्यावेळी आजीनं कुटुंबाबत सांगितलं की, माझी मुलगी हरजीत कौरचं लग्न हरियाणाच्या करनालमध्ये झालं होतं. मात्र, एका दुर्घटनेत तिच्या पतीचं निधन झालं. हरजितला एक मुलगाही आहे, त्याचं नाव सोनू आहे.
त्यानंतर जगजीतनं आजीला सांगितलं की, “तो सोनू मीच आहे.”
जगजीतच्या माहितीनुसार, यानंतर सर्व वातावरणच बदलून गेलं. त्यानंतर जगजीतनं आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

फोटो स्रोत, Gurpreet Chawla/BBC
जगजीत पुढे सांगतो की, “आईसोबतची भेट दुसऱ्या दिवशी होणार होती. त्यापूर्वीची रात्री माझ्या 35 वर्षांतील सर्वात मोठी रात्र होती. ती रात्र सरता सरत नव्हती. जेव्हा मी दुसऱ्यांदा आईला भेटण्यासाठी गेले, तेव्हा तिथे अत्यंत भावनिक वातावरण होतं. आईची तर रडून रडून वाईट अवस्था झाली होती. आम्ही दोघे एकही शब्द बोलू शकत नव्हतो. वातावरण अत्यंत भावनिक होतं.
“भलेही मला अनेक वर्षांनी सत्य कळलं असेल आणि भलेही कुठल्याही परिस्थिती माझ्या आईने मला सोडलं असेल, पण याबाबत मी तिला काहीही विचारू इच्छित नव्हतो. माझी कुणाबद्दल काहीच तक्रार नव्हती.
“35 वर्षांचा विरह सर्वाधिक माझ्या आईनंच भोगला आणि हे माझ्या आईचेच आशीर्वाद असतील, ज्यामुळे मी आज यशस्वी व्यक्ती आहे आणि आईपर्यंत पोहोचू शकलो.”
पंजाबच्या इतर भागातही पूरग्रस्त स्थिती आहे, मात्र मी इथेच मदतीसाठी आलो, हे ईश्वर आणि आईच्या प्रार्थनांमुळेच झाल्याचं जगजीत म्हणतो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








