वर्ल्ड कप 2023 : टीम इंडियामध्ये बदल, आर. अश्विनला मिळाली संधी

रोहित शर्मा, अजित आगरकर

फोटो स्रोत, Getty Images

क्रिकेट वर्ल्ड कप 2023 साठी घोषित झालेल्या भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. आयसीसीने त्याची माहिती दिली आहे.

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 साठी भारताचा 15 जणांचा पुरुष संघ जाहीर झाला असून टीममध्ये सात फलंदाज, पाच गोलंदाज आणि तीन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे.

अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला आशिया चषकादरम्यान दुखापत झाली होती, तो त्यातून पूर्ण बरा होऊ शकलेला नाही त्यामुळे त्याच्या जागी आर. आश्विनला संधी मिळाली आहे.

भारतीय संघात रोहितसोबतच शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या मुंबईच्या चार खेळाडूंना स्थान मिळालं आहे.

मे 2023 पासून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये न खेळूनही केएल राहुलचा भारतीय संघात समावेश झालाय. राहुलसोबतच इशान किशन यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात असेल.

युजवेंद्र चहल यांना अंतिम पंधरा जणांत स्थान मिळालेले नाही.

त्यामुळे विश्वचषकात कुलदीप यादव या एकमेव मुख्य फिरकी गोलंदाजावर भारताची मदार राहील. भारतीय संघात स्पेशलिस्ट ऑफस्पिनरचा समावेश झालेला नाही.

बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी श्रीलंकेत पत्रकार परिषदेत भारतीय संघ जाहीर केला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही यावेळी उपस्थित होता.

आशिया चषकासाठी भारतीय संघ सध्या श्रीलंकेत आहे. या स्पर्धेत भारतीय संघात असलेला वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि मधल्या फळीचा फलंदाज तिलक वर्मा या दोघांना विश्वचषकासाठीच्या संघात मात्र स्थान मिळालेलं नाही.

कोण कोण आहेत संघात?

  • रोहित शर्मा (कर्णधार)
  • हार्दिक पंड्या (उप-कर्णधार)
  • शुभमन गिल
  • विराट कोहली
  • श्रेयस अय्यर
  • सूर्यकुमार यादव
  • के.एल. राहुल (यष्टीरक्षक)
  • इशान किशन (यष्टीरक्षक)
  • रवींद्र जाडेजा
  • आर. अश्विन
  • कुलदीप यादव
  • शार्दूल ठाकूर
  • जसप्रीत बुमरा
  • मोहम्मद सिराज
  • मोहम्मद शमी

के. एल. राहुल आणि इशान दोघंही संघात

विश्वचषकासाठीच्या संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुल आणि इशान किशनपैकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती, पण दोघांचाही टीममध्ये समावेश झाला आहे.

खरंतर केएल राहुल यंदा मार्चमध्ये अखेरचा वन डे सामना खेळला होता. आयपीएलदरम्यान मांडीतील स्नायू दुखावल्यानं त्याला शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं. तेव्हापासून तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही.

KL Rahul Ishan Kishan

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राहुल आणि इशान किशन या दोघांचाही विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश झाला आहे.

बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत रिहॅब आणि सरावानंतर राहुलचा आशिया चषकासाठीच्या भारतीय संघात समावेश झाला होता, पण पुन्हा छोटी दुखापत उफाळून आल्यानं पहिल्या दोन सामन्यांमधून तो बाहेर झाला.

4 सप्टेंबरला झालेल्या फिटनेस टेस्टनंतर राहुलचा संघात समावेश करण्यात आला आहे.

दुसरीकडे इशान किशननं आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या रद्द झालेल्या सामन्यात भारतासाठी 82 धावांची खेळी केली होती आणि ते वनडेत त्याचं सलग चौथं अर्धशतक ठरलं होतं.

28 सप्टेंबरपर्यंत संघात बदल करण्याची मुभा

विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्यासाठी आयसीसीनं सर्व टीम्सना 5 सप्टेंबरची मुदत दिली होती. तसंच 28 सप्टेंबरपर्यंत आयसीसीच्या परवानगीशिवाय संघात बदल करण्याची सूटही दिली आहे.

त्यामुळे आशिया कप आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत खेळाडूंची कामगिरी पाहून संघात बदल करण्याची संधी अजित आगरकर यांच्या निवड समितीकडे असेल. राहुल आणि श्रेयस अय्यर सारखे खेळाडू या सामन्यांमध्ये कसे खेळतात यावरही भारतीय चाहत्यांची नजर राहील.

वन डे विश्वचषकाला 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरूवात होत असून, 8 ऑक्टोबरला भारत स्पर्धेतल्या आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नईत ऑस्ट्रेलियाचा मुकाबला करेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)