You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टॅरिफ युद्धात चीनचं मोठं पाऊल, अमेरिकेच्या वस्तूंवर 125% टॅरिफ
अमेरिकेने जगातल्या अनेक देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमेरिकेलाही अनेक देश प्रत्युत्तर देण्याच्या भूमिकेमध्ये गेले होते. यात सर्वात जास्त लक्ष होतं ते चीनकडे. चीनने अमेरिकन मालावर 84 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. आता हे टॅरिफ 125 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय चीनने घेतला आहे.
चीनच्या अर्थ मंत्रालयाने अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर हा कर लादण्याचा निर्णय घेतला होता. 10 एप्रिल रोजी चिनी प्रमाणवेळेनुसार 12 वाजल्यापासून हा निर्णय अंमलात येईल असंही या मंत्रालयानं सांगितलं होतं., मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे,
तिकडे दोनच दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांवर लागू केलेले टॅरिफ 90 दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
टॅरिफची अंमलबजावणी 90 दिवसांसाठी थांबवून, या कालावधीत फक्त 10 टक्के इतका कमी टॅरिफ लावण्याचा आदेश दिला असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
मात्र, चीन या नव्या निर्णयासाठी अपवाद असणार आहे.
एकप्रकारे या निर्णयाच्या माध्यमातून अमेरिका चीनसोबत ट्रेड वॉर करण्याच्या तयारीत असल्याचं जाणकारांचं मत आहे.
नव्या निर्णयानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील टॅरिफ वाढवून तो 125 टक्के करण्याची घोषणा केली.
टॅरिफबाबतचा हा नवा निर्णय तात्काळ लागू होईल. दुसऱ्या बाजूला, जगातील इतर देशांसाठी त्यांनी नवा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार, बाकी देशांवर 90 दिवसांसाठी नवे टॅरिफ दर थांबवण्याचा निर्णय जाहीर केला.
या 90 दिवसांदरम्यान, रेसीप्रोकल टॅरिफ कमी करून तो 10 टक्के करण्यात आला.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर हा नवा निर्णय जाहीर करताना चीनवर जागतिक बाजारपेठांप्रती आदर न दाखवल्याचाही आरोप केला.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रूथ सोशल'वर पोस्ट करत म्हटलं, "चीनने जागतिक बाजारपेठेप्रती दाखवलेल्या अनादरामुळे अमेरिका आता चीनवर टॅरिफ 125 टक्क्यांपर्यंत वाढवत आहे, जो तात्काळ लागू होईल. आशा आहे की, कधीतरी नजीकच्या काळात चीनला हे लक्षात येईल की, अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस आता गेलेत."
पुढे त्यांनी म्हटलं, "याउलट, 75 पेक्षा जास्त देशांनी अमेरिकेच्या विविध प्रतिनिधींना, जसे की वाणिज्य विभाग, कोषागार आणि यूएसटीआर यांना संपर्क साधून त्यांच्याशी व्यापार, टॅरिफ, व्यापारातील अडथळे, चलनातील फेरफार आणि पैशांव्यतिरिक्त लादलेले टॅरिफ या सगळ्यांवर चर्चा करून या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला."
"माझ्या कडक इशाऱ्यानुसार, या देशांनी प्रत्युत्तरादाखल अमेरिकेवर कोणत्याही प्रकारचे टॅरिफ लावलेले नाही. याच वस्तुस्थितीच्या आधारे, मी टॅरिफची अंमलबजावणी 90 दिवसांसाठी थांबवून, या कालावधीत फक्त 10 टक्के इतका कमी टॅरिफ लावण्याचा आदेश दिला आहे, जो तात्काळ लागू होईल," असंही त्यांनी म्हटलं.
अमेरिका चीनसोबत 'टॅरिफ वॉर'च्या तयारीत?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 50 टक्के अतिरिक्त टॅरिफ दर लागू केला होता.
अमेरिकेत येणाऱ्या चिनी सामानावर आता 104 टक्के आयातशुल्क लागू होणार होते, जे आता आणखी वाढवून 125 टक्के करण्यात आलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांमधून याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.
व्हाईट हाऊसने आपल्या एका वक्तव्यात म्हटलं होतं की, "चीनने अमेरिकेच्या विरोधात प्रत्युत्तरादाखल लागू केलेल्या टॅरिफच्या घोषणेनंतर आम्ही हे पाऊल उचललं आहे."
आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी चीनवर 20 टक्के टॅरिफ लावला होता. त्यानंतर, जेव्हा ट्रम्प यांनी संपूर्ण जगावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली तेव्हा चीनवर आणखी 34 टक्के टॅरिफ लागू केला. या लावण्यात आलेल्या 50 टक्के टॅरिफनंतर एकूण आयातशुल्क 104 टक्के झालं होतं. जे आता आणखी वाढवण्यात आलं आहे.
ट्रम्प यांनी सोमवारी म्हटलं होतं की, जर चीनने अमेरिकन सामानावर आयात शुल्क लावण्याचा निर्णय परत घेतला नाही तर अमेरिका चीनवर आणखी 50 टक्के टॅरिफ दर लागू करेल.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटलं की, ते अमेरिकेच्या 'ब्लॅकमेलला बळी पडणार नाहीत' आणि याविरोधात ते अखेरपर्यंत लढा देतील.
चिनी बाजार कोसळले तेव्हा...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर भरभक्कम टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज बुधवारी (9 एप्रिल) चीन आणि हाँगकाँगमधील शेअर बाजार कोसळला.
शांघाय कंपोझिट 1.8% ने तर हँग सेंग 2.8% ने घसरला आहे. हे दोन्हीही चीनच्या शेअर बाजारातील निर्देशांक आहेत.
अमेरिकेच्या टॅरिफ कर लादण्याच्या निर्णयाविरुद्ध चीनने प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे. चीनचा हा निर्णय पुढील काही तासांत लागू होईल.
व्हॅनगार्ड इन्व्हेस्टमेंट फर्मचे आशिया पॅसिफिकचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ कियान वांग म्हणतात की, "अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव वाढल्याने चीनच्या निर्यातीत मोठी घट होईल यात शंका नाही. याचा परिणाम देशांतर्गत गुंतवणूक, लेबर मार्केट, ग्राहक, आणि एकूणच व्यापारातील विश्वासावर नकारात्मकपणे होईल."
बीबीसीचे चीन प्रतिनिधी स्टीफन मॅकडोनेल यांनी या सगळ्या परिस्थितीबाबत सांगितलंय की, "चीननं म्हटलं आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ताज्या धमक्यांना न जुमानता चीन या निर्णयाविरोधात ठामपणे उभा आहे, तसेच अमेरिका हा 'गुंडांचा समूह' असल्याचा आरोप चीननं केला आहे."
काही तासांत चीनवर अमेरिकेकडून 104% टॅरिफ कर लागू होण्याची शक्यता आहे. परंतु, या निर्णयामुळे प्रत्युत्तरादाखल लागू करण्यात आलेला टॅरिफ आम्ही मागे घेणार नाही, असं चीननं म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)