हैदराबादचं नाव भाग्यनगर होतं? भाग्यलक्ष्मी मंदिराचा खरा इतिहास काय आहे?

फोटो स्रोत, RAJA DEEN DAYAL FAMILY/BBC
तेलंगणामधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार जी किशन रेड्डी यांनी राज्यात त्यांचं सरकार आलं तर, हैदराबादचं नाव बदलून भाग्यनगर ठेवलं जाईल, असं म्हटलं आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, "आमचे मुख्यमंत्री योगीजी आणि हिमंता बिस्व सरमाजी यांनी आधीच सांगितलं आहे की, आम्ही सत्तेत आलो तर हैदराबादचं नाव बदलू."
"प्रादेशिक पक्षांनी मद्रासचे नाव बदलून चेन्नई, कलकत्ताचे कोलकाता आणि बॉम्बेचे नाव बदलून मुंबई केले आहे. आम्हीही राजपथाचं नाव कर्तव्यपथ केलं आहे, हे तुम्हाला माहितीच आहे."
"हैदराबादचं नाव का बदलायचं नाही. हैदर कोण आहे, कुठून आला आहे, हैदरचं नाव गरजेचं का आहे. भाग्यनगर जुनं नाव आहे. निजामाच्या काळात बदलण्यात आलं होतं. आमच्या हाती सत्ता आल्यानंतर आम्ही हैदराबादचं नाव भाग्यनगर करू,"असंही ते म्हणाले आहेत.
हैदराबादमधील भाग्यलक्ष्मी हे मंदिर कधी आणि कसं अस्तित्त्वात आलं, याविषयीच्या अनेक दंतकथा आहेत.
यातल्या एका कथेनुसार कोणे एके काळी जेव्हा हैदराबादवर कुण्या राजाचं राज्य होतं, तेव्हा हिंदूंची आराध्य देवता - लक्ष्मी चारमिनारला आली. शिपायांनी तिला तिथेच थांबवून राजाची परवानगी घेऊन येत असल्याचं सांगितलं.

लक्ष्मीदेवी नगरात आल्याचं समजताच राजा काळजीत पडला. देवीची भेट घेतल्यानंतर ती नगर सोडून निघून गेली, तर आपल्याकडचं सारं धन-वैभव संपुष्टात येईल, असं त्याला वाटलं. आपण राजाची परवानगी घेऊन परत येऊ, तोपर्यंत कुठेही जाऊ नये असं शिपायांनी लक्ष्मीला सांगितलं असल्याने राजाने शिपायांना चारमिनारला परतू नये, असं सांगितलं.
असं म्हटलं जातं की तेव्हापासून देवी लक्ष्मी तिथेच राहू लागली. पण ही दंतकथा सत्य असल्याचं सिद्ध करणारा एकही पुरावा उपलब्ध नाही.
पण तिथे असलेल्या एका देवळात भाग्यलक्ष्मी देवीची मूर्ती आहे. या देवळाची स्थापन कधी झाली, त्यामध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी करण्यात आली याविषयीची माहिती उपलब्ध नाही.

फोटो स्रोत, A SOUVENIR / YUNUS Y. LASANIA
या मंदिरावरूनच शहराचं नाव भाग्यनगर पडलं असा दावा भाजपने हैदराबादच्या निवडणूक प्रचारादरम्यान केला होता.
दरम्यान, बीबीसी तेलुगूने या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी अनेक जुने दस्तावेज आणि संदर्भ - फोटो तपासले.
पहिला फोटो : 'हैदराबाद - अ सुव्हिनियर'मधला फोटो
1944 मध्ये प्रसिद्ध झालेली ही प्रत. या पुस्तकात तेव्हाच्या हैदराबाद संस्थानातल्या अनेक हिंदू मंदिरांचा उल्लेख आहे. पण या फोटोमधून चारमिनार जवळ असणाऱ्या कोणत्याही मंदिराबद्दल स्पष्टपणे समजत नाही.
'हैदराबाद - अ सुव्हिनियर' ची पहिली आवृत्ती 1922साली प्रसिद्ध झाली होती. तेव्हाचे प्रिन्स ऑफ वेल्स हैदराबादच्या दौऱ्यावर आले असताना त्यांना या शहराच्या इतिहासाची तोंडओळख करून देण्यासाठी हे पुस्तक छापण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, A SOUVENIR / YUNUS Y. LASANIA
1944 साली ते पुन्हा प्रकाशित करण्यात आलं. हा चारमिनारचा फोटोही 1944च्या आवृत्तीमधला आहे. या फोटोमध्ये कुठलंही मंदिर नाही.
दुसरा फोटो : 'सियासत' या उर्दू वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये लावण्यात आलेला फोटो
'सियासत' या उर्दू वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये लावण्यात आलेला हा फोटो राजा दीन दयाळ यांनी काढलेला असल्याचं काही इतिहासकारांचं म्हणणं आहे. पण काही इतिहासकारांचं मत वेगळं आहे. त्यांच्या मते राजा दीनदयाळ यांचा नातू अमीचंद दयाळ यांनी हा फोटो काढला होता.
दयाळ राजघराणं हे हैदराबाद शहर आणि तिथल्या इमारतींच्या फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध होतं. या फोटमध्ये चारमिनारच्या जवळ कोणत्याही मंदिराचं अस्तित्त्वं नाही. फक्त एक पांढऱ्या रंगाची कार या भागात पार्क केलेली दिसते. ही फ्रेम म्हणजे फोटो नसून एखादं पेंटिंग असावं असंही काही जाणकारांचं मत आहे.
याला फोटो पेंटिंगही म्हटलं जातं. रंगीत फोटोग्राफी अस्तित्त्वात येण्यापूर्वी ब्लँक अँड व्हाईट फोटो क्लिक करून ते प्रिंट केले जात आणि त्यानंतर त्यावर रंगवलं जाई. हा फोटोही त्याचप्रकारे तयार करण्यात आला होता.
नोव्हेंबर 2012मध्ये या मंदिरावरून वाद सुरू झाल्यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राने हा फोटो छापला होता. याच्यासोबतच 'तेव्हा आणि आता' या कॅप्शनसह त्यावेळचा फोटोही सोबत छापण्यात आला होता.

फोटो स्रोत, Getty Images
अनेकांनी यावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर 50 आणि 60च्या दशकांतले अनेक फोटो समोर आले ज्यामध्ये कोणतंही मंदिर नव्हतं. पण 1990 आणि 1994मध्ये क्लिक करण्यात आलेल्या फोटोंमध्ये हे देऊळ आहे.
हाच फोटो नाही, तर साठच्या दशकाच्या आधी क्लिक करण्यात आलेल्या अनेक फोटो आणि व्हीडिओंमध्ये चारमिनारजवळ कोणतंही देऊळ दिसत नाही.
'इतिहासाच्या पुस्तकात मंदिराचा उल्लेख नाही'
या देवळाच्या स्थापनेविषयीची काही कागदपत्रं उपलब्ध आहेत का, ते पाहूयात.
इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात या मंदिराचा कोणताही उल्लेख आढळत नाही. ज्या लोकांनी मंदिर उभारलं, ज्यांनी यासाठी जमीन दिली किंवा मग पैसे दान दिले आहेत अशांचं नाव तिथल्या भिंतीवर कोरल्याचं भारतातल्या अनेक मंदिरांमध्ये पाहायला मिळतं. पण हैदराबादमधल्या भाग्यलक्ष्मी मंदिरामध्ये असं काहीही कोरल्याचं आढळत नाही.
हे देऊळ 1967मध्ये बांधण्यात आल्याचं हैदराबादमधले जुने लोक सांगतात. हैदराबाद शहराच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांशी बीबीसीने चर्चा केली असताना त्यांनी हे खरं असल्याचं सांगितलं. 80 वर्षांच्या अवधेश रानी या जुन्या हैदराबाद शहरात रहात. त्यांचा उर्दू साहित्याचा अभ्यास आहे. बीबीसीने त्यांच्याशी बातचित केली.

फोटो स्रोत, Getty Images
त्या सांगतात, "मी पहिल्यांदा चारमिनार पाहिला तेव्हा त्याच्या भोवती एक मजूबत लोखंडी साखळी होती. काळासोबत ती गायब झाली. या साखळीचा लहानसा तुकडाही अतिशय मौल्यवान असणार म्हणूनच लोकांनी हे लोखंड चोरायला सुरुवात केली. इथेच एक मैलाचा दगडही होता."
"त्याला हैदराबादचा झिरो माईल म्हटलं जाई. 1967 मध्ये एका बस ड्रायव्हरने त्या दगडाला धडक दिली आणि तो निखळला. हा दगड भाग्यलक्ष्मी मंदिराचा असल्याचा दावा नंतर आर्य समाजाच्या लोकांनी केला. त्या लोकांनी तिथे चार खांबांच्या आधारे एक तात्पुरतं देऊळ उभारलं. हे बांधकाम फक्त अडीच फुटांचं होतं."
अवधेश रानी सांगतात, "भाग्यलक्ष्मी मंदिराचं सध्याचं बांधकाम उभं राहण्याआधी तिथे दोन बायका भीक मागायच्या. देवाचं नाव घेऊन भीक मागण्यासाठी त्या शेंदूर आणि हळद वापरायच्या. नंतर एका पुजाऱ्याने तिथे लक्ष्मी देवीचा फोटो ठेवत ही भाग्यलक्ष्मी देवी शहर वाचवण्यासाठी आल्याचं सांगायला सुरुवात केली. अशाप्रकारे इथे देवीच्या मूर्तीची स्थापना झाली."
फॅक्ट फाइंडिंग कमिटी
पण या देवळाचं बांधकाम होत असताना कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतल्याचंही अवधेश रानी सांगतात. कम्युनिस्ट पक्षाच्या पाच सदस्यांची एक फॅक्ट फाईंडिंग कमिटी - सत्यशोधक समिती तयार करण्यात आली होती. या समितीच्या तपासात काही गोष्टी समोर आल्या.
अवधेश रानी सांगतात, "त्यांना असं आढळलं की कामाच्या शोधात हैदराबादला आलेल्या एका महिला मजुराचा मृत्यू झाला आणि तिचा दहनविधी त्याच ठिकाणी करण्या आला होता. तिथेच हळद आणि शेंदूर टाकण्यात आला होता. तिच्याच दोन मुली त्याच जागी भीक मागायच्या आणि त्यांच्या आईला एखाद्या संन्यासाप्रमाणे मृत्यू आल्याचं त्यांना वाटायचं."
"या गोष्टी सरकारच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न कम्युनिस्ट पक्षाने केला पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. चारमिनारांच्या जवळ कोणतंही भाग्यलक्ष्मी मंदिर नव्हतं. हो, पण मक्का मशीदीजवळ एक शिव मंदिर होतं. या शिव मंदिराच्या देखरेखीचा खर्च कुतुबशहा घराण्याचे राजे करायचे."
"इतिहासाच्या पुस्तकांत या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख आहे. हो, हैदराबादच्या पुराणांमध्ये अनेक जुन्या हिंदू मंदिरांचा उल्लेख आढळतो. मंदिरांमध्ये शिलालेख असतात. पण भाग्यलक्ष्मी मंदिराबाबत अशी कोणतीही ऐतिहासिक माहिती मिळत नाही."
मंदिराचे पुजारी काय म्हणतात?
भाग्यलक्ष्मी मंदिराचे पुजारी सूर्यप्रकाश यांच्याशीही बीबीसीने संवाद साधला. ज्या जागी मंदिर आहे तिथे पूर्वी एक दगड होता आणि देवीचा फोटो होता असं त्यांनी सांगितलं. या दगडालाच देवी मानत भाविक पाचशे वर्षांपासून पूजा करत असल्याचं सूर्यप्रकाश यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भाग्यलक्ष्मी मंदिराच्या बाहेर देवीच्या चरणांमध्ये चांदीची आभूषणं दिसतात. सूर्यप्रकाश सांगतात, "चांदीच्या या आभूषणांमागे असणारा दगड तुटला होता. भंग पावलेल्या दगडाची पूजा करता येत नाही म्हणून तिथे एक फोटो ठेवण्यात आला आणि मग नंतर तिथे एका मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली."
हे देऊळ 80 वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचं पुजारी सूर्यप्रकाश यांचं म्हणणं आहे. पण आम्ही त्यांना देऊळ न दिसणाऱ्या चारमिनारच्या फोटोंबद्दल सांगितल्यानंतर आम्ही कोणत्या फोटोंबद्दल बोलतोय हे आपल्याला माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलं.
पण आपल्या कुटुंबातल्या चार पिढ्या या मंदिरात पूजा करत असल्याचं सूर्यप्रकाश आवर्जून सांगतात.
कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र
या वादाचा उल्लेख असगर अली इंजिनियर यांनी त्यांच्या 'कम्युनल रायट्स इन पोस्ट इंडिपेन्डन्स इंडिया' या पुस्तकात केलेला आहे. ते लिहीतात, "तुलनेने या मंदिराची निर्मिती इतक्यातच करण्यात आलेली आहे. 1965 साली मिनाराजवळ एका दगडाला केशरी लेप देण्यात आला."
"परिवहन मंडळाची एक बस धडकल्याने हा दगड भंग पावला. त्यानंतर 1970मध्ये पक्क्या मंदिराचं बांधकाम करण्यात आलं. या बसचा ड्रायव्हर मुसलमान होता, त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं."
आपले वडील महंत रामचंद्र दास यांनी स्वतःच्या पैशांतून हे मंदिर उभारलं असल्याचा दावा 2018 मध्ये बबिता शर्मा नावाच्या महिलेने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करत केला होता.
पण चारमिनार उभारण्यात आले तेव्हा तिकडे असा कोणता दगड होता का, याविषयीचा कोणताही दाखला उपलब्ध नाही. मीर मोमीन यांनी चारमिनार उभारला होता. तिथे कोणतीही मूर्ती असल्याचं सांगणारा कोणताही दस्तावेज नाही. पण या दस्तावेजांमध्ये संपूर्ण तेलंगणामधल्या मंदिरांचा उल्लेख आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पण चारमिनारच्या नकाशात भाग्यलक्ष्मी मंदिराचं अस्तित्त्वं सांगणारा कोणताही उल्लेख नाही. पुरातत्त्व विभागाच्या अहवालांमध्येही याविषयी काहीही लिहीण्यात आलेलं नाही.
उस्मानिया विद्यापिठामध्ये इतिहासाचे प्राध्यापक म्हणून काम केलेल्या अडपा सत्यनारायण यांनी हैदराबादच्या इतिहासावर मोठं संशोधन केलंय. राजाच्या दरबारात काम करणारे मंत्री आणि महाजनांच्या मंदिरांसाठी दान देण्यात आल्याचा उल्लेख असला तरी भाग्यलक्ष्मी मंदिराबद्दल कोणताही ऐतिहासिक उल्लेख नसल्याचं ते सांगतात.
ते म्हणतात, "सत्तरच्या दशकापर्यंतच भाग्यलक्ष्मी मंदिराबद्दल कोणतीही चर्चा नव्हती. नव्वदच्या दशकामध्ये लोकांनी याबद्दल बोलायला सुरुवात केली. पण ज्या मजुरांनी चारमिनार बांधायचं काम केलं त्यांनीच तिथे मूर्तीची स्थापना केली होती का, हा प्रश्न उरतोच."

फोटो स्रोत, Getty Images
"कारण जेव्हा उस्मानिया विद्यापीठाच्या आर्ट्स कॉलेजच्या इमारतीचं बांधकाम सुरू होतं, तेव्हा तिथे एका मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. बांधकामादरम्यान काही विपरीत होऊ नये म्हणून कदाचित ही मूर्ती स्थापन करण्यात आली असावी."
स्थानिक काय म्हणतात?
चारमिनारच्या चारही बाजूंना मैलाचे दगड होते, असं हैदराबाद शहरातले लोक सांगतात. या मैलाच्या दगडांना वाहन धडकल्याचंही काही जण सांगतात.
अलीजाकोटचे एक वयस्कर गृहस्थ सांगतात, "त्यावेळी जुन्या शहरात दंगली झाल्या होत्या. चारमिनारजवळ रात्रीमध्ये एक मंदिर कसं उभं राहिलं यावर मुसलमानांनी आक्षेप घेतला होता. शुक्रवारच्या नमाजनंतर त्या तात्पुरत्या मंदिरावरून वाद झाला होता. हा तो काळ होता जेव्हा तेलंगणासाठीची मोहीम ऐन भरात होती."
"कोणीही या धार्मिक वादाची दखल घेतली नाही. तिथे त्या फोटोची पूजा अखंड सुरू राहिली. 1979साली काबाची घटना घडली. सौदी अरेबियामध्ये काही बंदुकधारी एका मशीदीत घुसले. यावरून हैदराबादमध्येही निदर्शनं झाली होती. त्यावेळीही मंदिराचा मुद्दा समोर आला होता."
"1979 मध्ये मंदिरातल्या फोटो फ्रेमची नासधूस झाल्याने तिथे देवीची मूर्ती स्थापना करण्यात आली. मग हळुहळू हे मंदिर मोठं होत गेलं. चारमिनारच्या आतमध्ये मुसलमानांचा एक दर्गा आहे जिथे मोठ्या संख्येने लोक जातात. हिंदूही याच प्रकारे मंदिराचा विस्तार करू लागले."
यादरम्यान चारमिनारच्या जवळच एका निरंजन नावाच्या स्थानिक व्यक्तीची भेट झाली. ते तिथेच लहानाचे मोठे झाले आहेत. इथे शेकडो वर्षांपासून पूजा होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
निरंजन तेलंगणा काँग्रेसशी संबंधित आहेत.
त्यांनी सांगितलं, "माझ्या मते हे देऊळ तेव्हा नव्हतं पण इथे एक शिळा होती जिला देवी मानून लोक पूजा करत. हैदराबादमध्ये अनेक ठिकाणी दगडांची पूजा करण्याची पद्धत आहे. हुसैनसागरमध्ये कट्टा माईसम्मा आहे, गोलकोंडामध्ये अम्मावारी, आलियाबाद बुरुजाच्या दरबारातलं माईसम्मा मंदिर हे याचं उदाहरण आहे."
1979 साली काबाची घटना झाली तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री चेन्ना रेड्डी यांनी या मंदिराच्या बांधकामामध्ये महत्त्वाची भूमिका निभावल्याचं ते सांगतात.
ते म्हणतात, "कर्फ्यू असतानाही मंदिरातली पूजा कधी थांबवण्यात आली नाही. शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मंदिरातले पुजारी घंटा वाजवणार नाहीत याची पोलीस खात्री करत."
चारमिनारच्या ज्या फोटोंमध्ये भाग्यलक्ष्मी मंदिर दिसत नाही त्याबद्दल बोलताना ते म्हणतात, "हा फोटो दुरून क्लिक करण्यात आला होता. मग मंदिर होतं की नाही हे कसं कळणार? खरं म्हणजे तिथे कोणतंही मंदिर नव्हतं पण एका दगडाची पूजा मात्र नक्की व्हायची. लांबून क्लिक करण्यात आलेल्या फोटोमध्ये दगडाबद्दल समजणार नाही."
पुरातत्व विभाग काय म्हणतो?
चारमिनारची देखरेख करण्याची जबाबदारी 1951पासून भारतीय पुरातत्व विभागाकडे आहे. तेव्हापासून चारमिनारच्या प्रत्येक रेकॉर्डचीही देखरेख करण्यात येते. सध्याच्या वादावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
ASIच्या हैदराबाद सर्कल सुप्रिंटेंडंट स्मिता यांनी बीबीसीला सांगितलं, "याबद्दल काही बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही. तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही दिल्लीतल्या मुख्यालयाशी संपर्क साधू शकता."
पण या मंदिराची उभारणी नंतर झाल्याचं ASI ला माहिती आहे, हे सत्य आहे. 2019 मध्ये 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वर्तमानपत्राने ASIच्या तेव्हाच्या हैदराबाद सर्कल सुप्रिंटेंडंटचा दाखला देत वृत्त दिलं होतं, "आम्ही साठच्या दशकापासूनच जिल्हा प्रशासनाला हे मंदिर हटवण्याबद्दल लिहीत आलोय, पण त्यांनी असं केलं नाही."

त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा बीबीसीने प्रयत्न केला पण त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही.
या मंदिराचं बांधकाम अधिकृतरित्या करण्यात आलेलं आहे का आणि ASIने यासाठी परवानगी दिली होती का, असा प्रश्न डिसेंबर 2019मध्ये माहितीच्या अधिकाराखाली ASI ला विचारण्यात आला होता. याचं उत्तर देताना ASIने म्हटलं होतं - 'नाही.'
पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार या मंदिरासाठीचा कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








