मोहन भागवत म्हणतात, 'भारतात मुस्लिमांनी घाबरण्यासारखं काहीच नाही, पण....' #5मोठ्याबातम्या

मोहन भागवत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहन भागवत

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 'भारतात मुस्लिमांना घाबरण्यासारखं काहीच नाही'- मोहन भागवत

“भारतात मुस्लिमांना घाबरण्यासारखं काहीच नाही. पण, तुम्ही श्रेष्ठत्वाची मानसिकता सोडली पाहिजे. आपण देशावर एकदा राज्य केलं आणि पुन्हा राज्य करू या विचारसरणीतून बाहेर यायला हवं. आज भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना कोणतीही अडचण नाही.

भारत हा भारतच राहिला पाहिजे हे साधं सत्य आहे,” असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसरंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

माध्यमांशी बोलताना भागवत म्हणाले, “आपणच श्रेष्ठ आहोत या विचारातून मुस्लिमांनी बाहेर पडावं. सत्य हे आहे की इथं जो कोणी राहतो. मग, तो हिंदू असो वा कम्युनिस्ट, त्यानं या तर्कातून बाहेर आलं पाहिजे.

संघानं नेहमीच राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवलंय, पण जे राजकारण आपल्या देशाचं धोरण ठरवतं ते राष्ट्रहिताशी निगडीत आहे. ते हिंदूंच्या हिताचं आहे.

"आम्ही त्याच्याशी सदैव संलग्न आहोत. फरक एवढाच की, पूर्वीचे स्वयंसेवक सत्तेत नव्हते. आजच्या परिस्थितीत हा एकमेव बदल आहे. संघ समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न करतो.”

“हिंदू ही आपली ओळख, आपली सभ्यता, आपलं राष्ट्रीयत्व आहे. प्रत्येकाला आपलं मानणारा, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हा गुण आहे. फक्त आमचं बरोबर, तुमचं चूक असं आम्ही कधीच म्हणत नाही.

"तू तुझ्या जागी बरोबर आहेस, मी माझ्या जागी बरोबर आहे. शेवटी संघर्ष करण्याची काय गरज आहे, चला एकत्र पुढं जाऊया. हे हिंदुत्व आहे,” असंही भागवत पुढे म्हणाले.

2. 'या' 10 देशांतील भारतीयांना करता येणार UPI पेमेंट

युपीआय व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं योजना आखली आहे. आता परदेशातील भारतीय नागरिकांनाही व्यवहारासाठी युपीआयचा वापर करता येणार आहे.

आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकाच्या आधारे युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा वापर करत व्यवहार पूर्ण करता येणार आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

10 देशांतील अनिवासी भारतीयांना भारतीय मोबाईल क्रमांकाच्या आधारेही रक्कमेची देवाण-घेवाण करता येईल.

सिंगापूर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनाडा, हाँगकाँग, ओमान, कतर, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि इंग्लंड मध्ये UPI सेवा सुरु करण्यात आली आहे. एनडीटीव्हीनं ही बातमी दिली आहे.

3. पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

पंकजा मुंडे यांनी त्यांचे भाऊ धनंजय मुंडेंची ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे अपघातात जखमी झाले आहेत.

त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल (11 जानेवारी) धनंजय मुंडे यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एबीपी माझानं ही बातमी दिली.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे

फोटो स्रोत, twitter

पंकजा मुंडे या भेटीनंतर बोलताना म्हणाल्या की, “तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी आले होते. त्यांची तब्येत बरी आहे. मी बहीण आहे आणि मागे देखील धनंजय मुंडे अॅडमिट होते. तेव्हा मी भेटायला आली होती. मी तर बहीण आहे आणि सर्वच राजकीय नेतेमंडळी एकमेकांना भेटतात ही राजकीय संस्कृती आहे.”

4. निवेदनावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे शेरे अंतिम नसणार

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री आपल्याकडे आलेल्या निवेदनावर जो शेरा देतात तो आतापर्यंत अंतिम मानला जायचा.

मात्र यापुढे असे निवेदनावरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे शेरे अंतिम समजण्यात येऊ नये, असा स्पष्ट निर्णय राज्य सरकारने जारी केला आहे.

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

हीच बाब लक्षात घेऊन यापुढे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी निवेदनावर मारलेले शेरे अंतिम न मानता अधिकाऱ्यांनी त्याबाबत प्रचलित नियम, कायदे तपासावेत आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करावी, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

5.यवतमाळमध्ये कार्यालयातच वीज वितरण कर्मचाऱ्यांची ओली पार्टी

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात वीज वितरण कार्यालयातच भर दुपारी ओली पार्टी रंगल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओमध्ये वीज वितरण कार्यालयातील कर्मचारी कार्यालयातील टेबलवर बसून दारू पिताना दिसत आहे.

या सर्व घटनेचा व्हीडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, महागाव तालुक्यातील एका वीज कार्यालयाच्या उपकेंद्रावर कर्मचारी मद्यप्राशन करत होते. कार्यालयाच्या टेबलवरच या कर्मचाऱ्यांची पार्टी रंगली होती. मात्र अभियंत्याने कार्यालयास अचानकपणे भेट देत हा सर्व प्रकार उघडकीस आणला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)