2026 पासून फॉर्म्युला 1 च्या अनेक नियमांमध्ये बदल, पर्यावरणस्नेही इंधन वापरण्याचा निर्णय

फोटो स्रोत, formula1.com
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
2026 पासून F-1 म्हणजे फॉर्म्युला 1 च्या अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. आणि यातला एक मोठा बदल म्हणजे F-1 कार आता नवीन सस्टेनेबल फ्युअल म्हणजे पर्यावरणस्नेही इंधन वापरतील.
फॉर्म्युला कार रेसिंगमध्ये हा बदल का आणला जातोय? हे 100% पर्यावरणस्नेही इंधन काय आहे आणि त्याचा या कारच्या परफॉर्मन्सवर काही परिणाम होईल का?
एफ1 रेसेस 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल करण्याचं (कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं) उद्दिष्टं या स्पर्धांची नियामक संस्था असणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल महासंघ (एफआयए) ने जाहीर केलं होतं. आणि पर्यावरणस्नेही इंधन हा त्याच बदलांचा एक भाग म्हणून 2026 पासून लागू केलं जाईल.
कार्बन न्यूट्रल म्हणजे उत्सर्जनाद्वारे वातावरणात सोडला जाणारा कार्बन डायऑक्साइड आणि वातावरणातून शोषून घेतला जाणारा कार्बन यांच्यामध्ये संतुलन साधणं.
जितका कार्बन डायऑक्साइड सोडला जातो, तितकाच शोषूनही घेणं.

इंधनात हा बदल करण्याची सुरुवात खरंतर दोन वर्षांपूर्वीच सुरू झालीय. 2022 F-1 ने यासाठीचं इंधन विकसित केलंय.
2023 साली फॉर्म्युला 2 आणि 2024 वर्षामध्ये फॉर्म्युला 3 रेसेससाठी 55% 'सस्टेनेबल बायो-सोर्स फ्युअल' वापरण्यात आलं. म्हणजे असं इंधन ज्यातले 55% घटक जैविक इंधनाचे होते.
त्यानंतर 2025 मध्ये या दोन्ही स्पर्धांसाठी 100% 'अॅडवान्स सस्टेनेबल फ्युअल' वापरण्यात आलं.
आता 2026 च्या स्पर्धांसाठी एफ 1 ने स्वतःचं पर्यावरणस्नेही इंधन विकसित केलंय. F-1 कारच्या हायब्रिड इंजिन्ससाठी हे विशेषतः तयार करण्यात आलंय. F-1 कारचं हे हायब्रिड इंजिन IC म्हणजे अंतर्गत ज्वलन इंजिन (इंटरनल कंबशन इंजिन) आणि 2 इलेक्ट्रिक मोटर जनरेटर्स वापरतात.

फोटो स्रोत, Getty Images
2026 च्या सीझनपासून नव्या नियमांनुसार F-1 मध्ये अशा कार वापरल्या जातील ज्यांमध्ये इलेक्ट्रिक आणि इंटरनल कंब्शन पॉवर या दोन्हींचा 50% वापर करता येत असेल. आणि या पर्यावरणपूरक गाड्यांसाठी जीवाश्म इंधन वापरता येणार नाही.
या नव्या इंधनामुळे वातावरणातल्या कार्बनमध्ये भर पडणार नसून उलट या नव्या इंधनात वापरण्यात येणारा कार्बन हा आता अस्तित्त्वात असलेल्या स्त्रोतांमधून काढून वापरण्यात येणार असल्याचं F-1 ने म्हटलंय.
घरगुती, कृषी वा इंडस्ट्रियल कचरा, वातावरणातला कार्बन काढून मग त्याचा वापर सिंथेटिक फ्युएल म्हणजे कृत्रिम इंधन तयार करण्यासाठी वापरला जाईल. हे इंधन सध्या वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलसारखंच काम करेल. सध्या F-1 कार्ससाठी E10 म्हणजे 10% इथेनॉल असणारं पेट्रोल वापरलं जातं.
फॉसिल फ्युअल म्हणजे जीवाश्म इंधनाचा वापर न करणं, ग्रीनहाऊस गॅसेसचं उत्सर्जन आटोक्यात आणणं आपलं उद्दिष्टं असल्याचं एफआयएने म्हटलंय.

हे नवं पर्यावरणस्नेही इंधन लगेच वापरता येण्याजोगं असून त्यासाठी टीम्सना त्यांच्या कारच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल करावे लागणार नसल्याचं F-1 ने म्हटलंय. शिवाय या इंधनामुळे कारच्या परफॉर्मन्सवर परिणाम होत नसल्याचं एफ 2, एफ 3 रेसेसमध्ये आढळून आल्याचं फॉर्म्युला 1 ने त्यांच्या सस्टेनिबिलिटी रिपोर्टमध्ये म्हटलंय.
पण ट्रॅकवरच्या रेसिंग कार्समुळे होणारं उत्सर्जन आणि त्यातून तयार होणारी कार्बन फुटप्रिंट ही एकूणच फॉर्म्युला 1 स्पर्धेमुळे निर्माण होणाऱ्या कार्बन फुटप्रिंटच्या फक्त 1% आहे.
मग फक्त रेसिंगसाठीच्या गाड्यांचं इंधन बदलून किती फरक पडेल? कारण या फॉर्म्युला वन स्पर्धांसाठीचं सामान, अवजड किट्स आणि उपकरणं आणि टीम्स एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करतात. सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन यामधून होतं. शिवाय F-1 चे दर्दी फॅन्स प्रवास करून वेगवेगळ्या ठिकाणी जातात ते वेगळंच.
सामान आणि लोकांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्या, ट्रक्स आणि विमानांसाठी आपण आधुनिक इंधन तंत्रज्ञान वापरण्यात गुंतवणूक करत असल्याचं F1 ने म्हटलंय.

फोटो स्रोत, Getty Images
शिवाय जवळच्या देशांमधल्या स्पर्धांचं आयोजन एकापाठोपाठ एक करून वाहतुकीसाठी पुन्हापुन्हा लांबचा प्रवास करावा लागणार नाही, याची काळजीही घेतली जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.
शिवाय ब्रॉडकास्टसाठी दरवेळी इक्विपमेंट आणि लोकांना वाहून न्यावं लागू नये म्हणून रिमोट ब्रॉडकास्टींग स्टुडिओ सुरू करण्यात आल्याने या सगळ्या उपायांचा फायदा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी होणार असल्याचं F1 चं म्हणणं आहे.
या सगळ्या उपायांचा वापर करत 2018 च्या तुलनेत 2024 चा सीझन संपताना 26% कार्बन उत्सर्जन कमी केल्याचं F-1 ने म्हटलंय.
पण मग आता वापरलं जाणारं हे इंधन फक्त F-1 कारपुरतंच मर्यादित राहील का? तर हे इंधन 'ड्रॉप इन' म्हणजे सध्या असणाऱ्या इंजिनांमध्ये कोणताही बदल न करता वापरता येण्याजोगं असल्याचं F-1 ने म्हटलंय.
म्हणजे भविष्यात तुम्ही-आम्ही वापरत असलेल्या गाड्यांसाठीही याचा वापर करता येण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही F-1 साठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान, नंतरच्या काळात रोजच्या आयुष्यातही वापरलं गेलंय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











