You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आमच्या गुरुजींची बदली रद्द करा,' विद्यार्थ्यांच्या भरपावसातल्या 'आंदोलना'मुळे शिक्षक भावुक
- Author, संपत मोरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
आंदोलनाच्या चर्चा तर आपण अनेक वेळा ऐकतो. पण हे आंदोलन मात्र वेगळं आहे. भरपावसात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि शाळाला टाळे लावले.
'आमच्या गुरुजींची बदली रद्द करा', यासाठी या बाळगोपाळांनी आपले पालक, इतर शिक्षक आणि अधिकाऱ्यांकडेच हट्ट धरला. या मुलांचे आपल्यावरील प्रेम पाहून संबंधित शिक्षक देखील भारावले आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली गाव गेल्या दोन दिवसापासून चर्चेत आहे.
समाजमाध्यमावर या गावातील एका आंदोलनाची चर्चा सुरू आहे. या गावातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकाची बदली रद्द व्हावी म्हणून गावातील लोकांनी शाळेला टाळे ठोकले आणि विद्यार्थ्यांसोबत भरपावसात आंदोलन केले.
गावकऱ्यांनी एका शिक्षकाच्या बदली रद्द होण्यासाठी केलेलं आंदोलन कोल्हापूर जिल्ह्यात लक्षवेधी ठरत आहे.
एकूण 85 विद्यार्थी संख्या असलेली पहिली ते सातवीपर्यंतची ही शाळा आहे.
नेमकं काय झालं ते आपण आता पाहू.
ज्या शिक्षकाच्या बदलीसाठी गावकऱ्यांनी आंदोलन केले त्या शिक्षकांचे नाव कानिफ अंकुश काकडे.
त्यांचे मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील आहे. प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीच्या निमित्ताने 2014 सालापासून ते कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत आहेत.
सोंडोली या गावात ते 21 मे 2022 रोजी शिक्षक म्हणून आले. ते शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्यांच्यामुळे आमची मुलं हुशार झाली,' असं गावातील हनुमंत जाधव म्हणतात.
"गुरुजींनी आमच्या पोरांना मन लावून शिकवलं. त्यांनी शनिवारी रविवारी सुट्टी न घेता ज्यादा तास घेतले. प्रज्ञा शोध परीक्षेत तालुका स्तरावर आमची मुलं झळकली. अशा गुरुजींची बदली होणं आमच्या पोरांचं नुकसान आहे," असं जाधव यांनी सांगितलं.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय नेर्लेकर गुरुजींच्या बदलीबद्दल म्हणतात, "कोरोना काळात शाळा बंद होती. मुलांची अभ्यासाची सवय बंद झाली होती. मुले अजिबात अभ्यासात रमत नव्हती. मुलांची प्रगती थांबलेली. काकडे गुरुजी आले आणि त्यांनी वातावरण बदलवलं. त्यांच्यामुळे मुलं अभ्यास करायला लागली.
"तेव्हा मुलांना गणित इंग्रजी विषय बऱ्यापैकी अवघड जायचे. गुरुजींनी त्या विषयात मुलं तयार केली. शेजारच्या हायस्कूलला गेलेल्या मुलांच्याबाबत तेथील शिक्षक लोकही म्हणायला लागली की आता तुमच्या शाळेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यात खूप बदल झालाय. हा बदल कानिफ काकडे गुरुजींमुळे झाला आहे," असं नेर्लेकर सांगतात.
गावकरी महेंद्र चोरगे म्हणाले, "गुरुजींमुळे आमच्या गावातील मुली-मुलं इंग्रजी पेपर वाचायला लागलीत. विद्यार्थ्यांची इंग्रजीमध्ये गुरुजींनी खूप तयारी करून घेतली आहे. असा गुरुजी पुन्हा नाही मिळाला तर आमच्या मुलांचं अवघड होईल."
मूळचे याच गावचे असलेले पण मुंबईत स्थायिक असलेले दत्ता जाधव म्हणाले, "आमचे शिक्षण याच शाळेत झाले आहे. एका शिक्षकाच्या बदलीला विरोध म्हणून पहिल्यांदाच गावकरी एकत्रित येऊन आंदोलन करत आहेत. मुळात आमचे गाव शांत आहे."
"आमच्या गावाचे नाव आंदोलनात कधी आले नाही. पण एक चांगला शिक्षक गमावला तर आपल्या मुलांचे नुकसान होईल असे त्यांना वाटतं आहे, त्यामुळे मुलांनी हे पाऊल उचलले आहे. ही त्या शिक्षकांच्या कामाला दिलेली पोहोच पावती आहे," जाधव सांगतात.
या बदलीचा विषय असा आहे की कोल्हापूर जिल्ह्यात विनंती बदलीसाठी मे महिन्याच्या दरम्यान काही शिक्षकानी अर्ज केले होते. त्यावेळी सोंडोली शाळेतील शिक्षक कानिफ काकडे यांनीही अर्ज केला होता, त्यांच्या विनंतीनुसार त्यांची बदली झाली.
मात्र त्यांच्या बदलीबाबत गावकऱ्यांना समजले तेव्हा त्यांना धक्का बसला.
त्यांनी काकडे यांना विनंती केली, काहीही करा पण आमची शाळा सोडून जाऊ नका. गावकऱ्यांनी शाहूवाडी पंचायत समितात जाऊन 'काकडे गुरुजींची बदली रद्द करा,' असा अर्ज दिला.
ग्रामसभा आणि शालेय शिक्षण समितीचा ठराव दिला. पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विश्वास सुतार यांनी प्रस्ताव तयार करून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवला.
सोंडोलीचे गावकरी कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मिना शेंडकर यांनाही भेटले.
आमदार विनय कोरे यांच्याकडेही त्यांनी गुरुजींबद्दल घडलेला प्रसंग सांगितला.
मात्र प्रशासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने गावकरी एकत्र आले आणि त्यांनी शाळेला टाळे लावले. विद्यार्थीसोबत घेऊन पावसात आंदोलन केले.
याबाबत गटशिक्षणअधिकारी विश्वास गुरव म्हणतात, "लोकांची भावना बरोबर आहे. मात्र जिल्ह्यात एकूण 3600 शिक्षकांच्या विनंती बदल्या झाल्या आहेत. कानिफ काकडे यांनीही विनंती केल्याने त्यांची बदली झाली आहे.
"त्यांची बदली रद्द व्हावी म्हणून गावकरी आग्रही आहेत मात्र त्याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील. गावकऱ्यांनी शाळा बंद आंदोलन करू नये अशी विनंती आम्ही केली आहे," असं गुरव म्हणाले.
ज्या शिक्षकाची बदली रद्द व्हावी म्हणून गावकरी आंदोलन करत आहेत ते कानिफ काकडे म्हणाले, "गावकरी माझ्यावर एवढे प्रेम करत आहेत, हे मला बदली झाल्यावर समजले. त्यांनी माझ्यावर एवढं प्रेम का करावे याचे कारण मला समजत नाही. मी माझे नेमून दिलेले काम करत राहिलो. इयत्ता सहावी - सातवी वर्गासाठी मी शिकवत आहे.
"मी प्रज्ञाशोध परीक्षा, स्पर्धा परीक्षा, इंग्रजी गणित या विषयात विद्यार्थी तयार व्हावेत म्हणून प्रयत्न केले. गावकरी मंडळीच्या परवानगीने ज्यादा तास घेतले. मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी जे कष्ट घेतले. त्याला यश आले. गावकरी शाळेत येऊन कौतुक करत होते. इथवर ठीक होत. पण बदली झाल्यावर सुद्धा त्यांनी तसच प्रेम करावं. माझ्यासाठी वरिष्ठाकडे अर्ज विनंती कराव्यात हे माझ्यासाठी वेगळा अनुभव आहे," काकडे गुरुजींनी म्हटलं आहे.