You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चांदीच्या ताटात जेवण ते काळ्या रंगाच्या कपड्यांवर निर्बंध; मराठी साहित्य संमेलनात नेमकं चाललंय काय?-ब्लॉग
99 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होतंय. लेखक विश्वास पाटील या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
ते आधीच वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त राहिलेले असल्याने या संमेलनाला वादाची किनार असणार, हे तसं गृहित धरण्यासारखंच होतं आणि तसं झालंही.
साहित्य संमेलनाला अशा वादांची परंपरा आहेच. तसंही वादाशिवाय होईल ते मराठी साहित्य संमेलन कसलं? त्यामुळे संमेलनाच्या पहिल्याच दिवशी विश्वास पाटील यांच्या संभाजी कादंबरीवरून संभाजी ब्रिगेडनं आक्षेप नोंदवत आंदोलन केलं.
प्रशासनानं त्यांची विश्वास पाटील यांच्यासमवेत बैठक घडवून आणली आणि 'काही अनावधानाने चुकीचं लिहिलं असल्यास मी ते मागे घेईन' अशा आश्वासनावर सध्या साहित्य संमेलन 'शांतते'त पार पडेल, अशी अधांतरी अपेक्षा आहे.
राजकीय प्रसिद्धीसाठी संमेलनाचा वापर
मात्र, बाकी सगळ्या गोष्टी अगदी 'अपेक्षे'प्रमाणेच झालेल्या आहेत. एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना इतकं मोठं संमेलन आपल्या राजकीय प्रसिद्धीसाठी वापरलं नसतं, तर अगदीच चुकल्या-चुकल्यासारखं वाटलं असतं.
संपूर्ण सातारा शहरभर साहित्य संमेलनासाठीच्या कमानी लावण्यात आल्या आहेत. मात्र, या कमानीवर एखादा तरी साहित्यिक असावा? गेला बाजार या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा तर चेहरा असावा? साहित्य संमेलनात राजकारण्यांचं काय काम? हा प्रश्नही आता घिसापिटा झालेलाय.
तरीही, राजकीय प्रसिद्धीचं अत्यंत बटबटीत आणि सवंग असं प्रदर्शन करण्यात सत्ताधाऱ्यांनी जराही कसूर सोडलेली नाहीये. संपूर्ण साताऱ्यात ठिकठिकाणी लावलेल्या कमानींवर शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांचे फोटो दिसतात.
अधूनमधून एखाद्या कमानीवर आमदार जयकुमार गोरेही डोकवतात.
साताऱ्यात महाराष्ट्रभरातून लोक येत आहेत, तर स्थानिक आमदार आणि संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून एखादी कमान लावाविशी वाटणं, हा सामान्य मानवी राजकारणी स्वभाव म्हणून समजून घेता येऊ शकतं.
पण संपूर्ण शहर साहित्य संमेलनाच्या नावानं आपल्याच प्रसिद्धीसाठी 'कमानमय' करणं, हा कोणता साहित्य प्रकार असतो, यावरच एक ठराव पारित करून सत्यशोधन समिती बसवली पाहिजे.
जेणेकरून, पुढील साहित्य संमेलनात 'राजकारण्यांचा साहित्य संमेलनात इतका हस्तक्षेप कशासाठी?' हा विचारून विचारून गुळगुळीत झालेला प्रश्न महाराष्ट्राला पुन्हा पडणार नाही.
'दोन्ही बाजूंनी आनंदीआनंद'
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरींनी आपल्या फेसबुकवर याच अनुषंगाने टीका करत लिहिलं, "साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या फोटोला सर्वात खालच्या रांगेत का होईना, छोट्यात छोट्या साईजमध्ये का होईना स्थान दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे."
"यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असते, तर हा प्रकार पाहून संतप्त झाले असते. दुर्गा भागवत अध्यक्षा असत्या तर हा अपमान सहन न करता राजीनामा देऊन मोकळ्या झाल्या असत्या. सध्या महाराष्ट्रात दोन्ही बाजूंनी आनंदीआनंद आहे!"
काल मावळत्या संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांच्या हस्ते साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान झाला. तेव्हा तर कहरच झाला.
मंचावरील एक मान्यवर स्वागताध्यक्षांचे कौतुक करताना म्हणाले, "12 वर्षे झालं हे संमेलन साताऱ्यात व्हावं, हे त्यांच्या मनात होतं. त्यांना साहित्य आस्वाद किती किंवा साहित्याची आवड किती, हा प्रश्न वेगळा."
"संमेलन व्हावं आणि आपल्या वडिलांनी घेतलेलं होतं, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. आज त्यांच्या वडिलांनी जी परंपरा ज्येष्ठ साहित्यिकांच्या सत्काराची सुरू केलेली आहे, तीच परंपरा आपण 32 वर्षांनंतर होणाऱ्या साहित्य संमेलनात करतोय."
म्हणजे, किती निरागसपणे 'साहित्याची आवड किती, हा प्रश्न संमेलनापासूनच वेगळा' केलेला आहे पाहा... हेच संपूर्ण संमेलनभर दिसून येईल.
तुम्हाला भव्य मंच दिसेल, झगमगाट दिसेल, चमकोगिरी दिसेल... पण साहित्याच्या आवडीचा प्रश्न संपूर्ण आयोजनात वेगळा तो वेगळाच राहिलाय.
साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांना डावलल्याचा आरोप
कारण, ज्या साताऱ्यात हे संमेलन होतंय, तिथल्या ज्येष्ठ साहित्यिकांना डावलल्याचा आरोप करणारा एक मेसेज दिवसभर सोशल मीडियावर फिरतोय.
साहित्यातील मातब्बर असलेले दत्तप्रसाद दाभोळकर, भारत पाटणकर आणि ज्यांनी आपल्या साहित्यातून बहुजनांना आपलं डोकं आपल्या धडावरच असलं पाहिजे, हेच आजवर सांगितलं, ते आ. ह. साळुंखे अशा प्रमुख साहित्यिकांनाच डावललं असल्याची तक्रार या व्हायरल मेसेजमधून दिसते.
2013 साली ज्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात हत्या झाली आणि 'तुमचा दाभोलकर करू' ही उक्ती एखाद्या 'साहित्यिक उक्ती'प्रमाणे अभिव्यक्तीची गळचेपी करणाऱ्यांचे घोषवाक्यच ठरले, ते नरेंद्र दाभोलकर साताऱ्याचे.
दाभोलकरांनी महाराष्ट्राला तिमिरातून तेजाकडे नेणारी कित्येक पुस्तकं लिहिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारा अलीकडच्या काळातील 'पृथ्वीमोलाचा असलेला हा माणूस.' साहित्य संमेलनात नरेंद्र दाभोलकरांचं प्रतिबिंब कुठेतरी दिसावं?
ऐनवेळी लांबून आलेल्यांना पासशिवाय साधा चहा देखील नाही
आता या साहित्य संमेलनात प्रामाणिक साहित्यप्रेमींचं काय झालंय? पृथ्वी जशी शेषनागावर तरली असल्याचं मिथक सांगितलं जातं, तसं हे 99 वं साहित्य संमेलन 'पासेस'वर तरलेलं आहे, हे मिथक नसून वास्तव आहे.
ज्यांनी आधी नोंदणी केली आणि ज्यांना पास मिळाले, त्यांनाच भोजनाचा आस्वाद घेता येईल, अशी इथली स्थिती आहे. एका बाजूला, ऐनवेळी लांबून आलेले लोक आम्हाला साधा चहा देखील पासशिवाय मिळत नाहीये, अशी तक्रार करताना दिसत आहेत.
एकीकडे निमंत्रित साहित्यिकांचे चांदीच्या ताटात सातारी चवीचे भोजन देऊन कोडकौतुक होणार असल्याचं सांगण्यात आलंय तर दुसरीकडे ऐनवेळी आलेल्यांसाठी भोजन-निवास व्यवस्था नसल्याचं दिसतंय.
त्यामुळे, स्वागत कक्षाजवळ यावरून खडाजंगीही पाहायला मिळाली. कारण नियोजित पत्रिकेनुसार 11 वाजता उद्घाटन समारंभ आणि 10 वाजले तरी स्वागत कक्षाजवळ लोकांना माहिती देण्यासाठी कुणीच उपस्थित नव्हतं.
ज्यांना साहित्याची आवड आहे, ते सगळे लोक 'कुणी पास देता का पास' असं म्हणत संमेलनभर हिंडताना दिसताहेत.
काळ्या रंगाचा शर्ट घालून आलेल्यांना सरळ घरचा रस्ता
याहून निराळा आणि संतप्त करणारा प्रकार म्हणजे काळा रंगाला साहित्य संमेलनामध्ये असलेली नो एन्ट्री.
बरं हा प्रकार कुणाबाबत घडावा? तर 2025 चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रदीप कोकरे याच्याबाबतच.
प्रदीपने फेसबुकवर लिहिलंय, "मी माझ्या स्वभावाप्रमाणे पोलिसांची, मुख्यमंत्र्यांची आणि आयोजकांची तिथे अक्कल काढली. काळे कपडे घालणाऱ्यांची किंवा काळ्या रंगाची इतकी भीती वाटते, तर आयोजकांनी पत्रिका करताना ठळक अक्षरात तसं नोंदवून आपला बिनडोकपणा दाखवून द्यायला काहीच हरकत नव्हती. बरीच बाचाबाची झाली."
प्रदीपने पुढे लिहिलंय, "शेवटी पोलिसांकडे काहीही उत्तर नव्हतं. तर पोलिसांना आणि असा आदेश काढणाऱ्या थोर लोकांना न जुमानता मी संमेलनात काळ्या रंगासहित पुस्तक प्रदर्शनात असणार आहे. ज्यांना ज्यांना गेटवर अडवलं त्यांनाही मी आत घेऊन आलोय. मुख्यमंत्र्यांना निषेधाची इतकी भीती वाटत असेल, तर त्यांनी गपचूप घरी बसावं."
काळ्या रंगाचा शर्ट घालून आलेल्या कित्येकांना घरी पाठवताना मी पाहिलं.
पोलिसांना कारण विचारलं तर 'वरून आदेश आहेत,' एवढंच उत्तर. हेच कॅमेऱ्यावर ऑफिशियली बोला म्हटलं तर तेही नाही.
संमेलनात आत जाण्यासाठी आधी ग्रंथप्रदर्शनातूनचं जावं लागतं, ही एक जमेची बाजू. संमेलनात पुस्तकांची विक्री होत नाही, अशी तक्रार प्रकाशकांनी याआधीच्या संमेलनांबाबत बरेचदा केली आहे.
त्यावर उतारा म्हणून हा उपाय केला असावा. पण तो कौतुकास्पदच म्हणायला हवा. त्यानिमित्ताने का होईना, पण ग्रंथ प्रदर्शनामधील लोकांचे चालते पाय वाढतील आणि विक्रीचा आकडाही काहीसा वाढेल, अशी अपेक्षा आहे.
(या लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक आहेत.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)